Saturday, February 7, 2015

जशी लोकसभा, विधानसभा तशी ग्रामसभा.... संकलन - श्री. मिलींद पोळ, सांगली

जशी लोकसभा, विधानसभा तशी ग्रामसभा....
संकलन - श्री. मिलींद पोळ, सांगली
दि.07/01/2015

जशी लोकसभा, विधानसभा तशी ग्रामसभा. लोकसभेचे सभासद खासदार असतात. विधानसभेचे सभासद आमदार असतात. तसेच ग्रामसभेचे सभासद मतदार असतात.

माणूस १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. मग तो प्रत्येक नागरिक आपोआपच ग्रामसभेचा सदस्य बनतो. एकदा सदस्य झाला कि तो मरेपर्यंत सदस्य असतो. ग्रामसभेला निवडणूक नाही. गावातील प्रत्येक मतदार नागरिक हा ग्रामसभेचा सदस्य आहे.

ग्रामसभेत हजर राहण्याचा, ग्रामसभेत मत, विचार मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. बहुमतांनी ठराव पास / नापास करण्याचा, मत देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे.

जसे हे अधिकार आहेत तसेच हे अधिकार बजावण्याचे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. गावातील ग्रामपंचायत आपण सांगतो तशी चालविणे, चालते कि नाही हे पाहणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.

ग्रामसभेत जे ठरेल, जे ठराव होतील त्याची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. जर ग्रामसभेला गेलो नाही, आपण सांगतो त्याप्रमाणे ठराव करून घेतले नाहीत, तर ग्रामपचायतीमध्ये ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच व सदस्यांचा मनमानी कारभार चालेल.

अनेक गावात प्रत्यक्षात ग्रामसभा होत नाहीत. ग्रामसभेच्या ८ दिवस आधी लोकांच्या सह्या घेतल्या जातात, किंवा खोट्या सह्या / अगन्ठे  घेतात. व सरपंच / ग्रामसेवक मनानेच खोटे ठराव घेवून पंचायत समितीत पाठवून देतात. यामुळे प्रत्यक्षात गावात फार मोठा भ्रष्टाचार होवूनही लोकांना माहिती असू शकत नाही.

वर्षातून किमान ६ ग्रामसभा घेणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. ६ पेक्षा जास्त घेतल्या तर हरकत नाही. पैकी ४ ग्रामसभांच्या तारखाही फिक्स आहेत.

२६ जानेवारी            - प्रजासत्ताक दिन
१   मे                       - कामगार दिन
१५ ऑगस्ट              - स्वातंत्र्य दिन
२   ऑक्टोबर           - गांधी जयंती

या दिवशी ग्रामसभा भरविणे बंधनकारक आहे. ग्रामसभेची नोटीस हि सभेच्या तारखेपूर्वी १० दिवस आधी बजावावी लागते. नोटीस हि ग्रामपंचायत कार्यालयात तसेच सर्वाना पाहता येईल, व सहजपणे वाचता येईल अशा ठिकाणी लावून प्रसिद्ध करावी लागते. तसेच सभेच्या ८ दिवस अगोदर व सभेच्या एक दिवस अगोदर अश दोन वेळा प्रत्येक वार्डात, वाडीत सविस्तर दवंडी हि द्यावी लागते.

सभेचा अध्यक्ष

आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तसेच निवडणुकीनंतरचा पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो. सरपंचांच्या गैरहजेरीत उपसरपंच हा अध्यक्ष असतो बाकी उर्वरित ग्रामसभेचा अध्यक्ष मतदारांनी बहुमताने निवडून दिलेला व्यक्ती हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो.

ग्रामसभेत कसे बोलावे ?

ग्रामसभेत मतदारांना बोलण्याचा अधिकार आहे. मतदारांनी ग्रामसभेच्या अध्यक्षाची परवानगी घेवून बोलावे तसेच उभे राहून अध्यक्षांना अध्यक्ष महाराज असे संबोधून त्यांचेकडे पाहून बोलावे. अध्यक्षांनी सुद्धा माहिती विचारणाऱ्याकडे पाहून बोलावे.

सभेत मतदारांच्या प्रश्नाला फक्त अध्यक्षच उत्तर देवू शकतात. इतरांना उत्तरे देण्याचा अधिकार नाही.

सभेचे कामकाज

ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव असतो. ग्रामसभेचे इतिवृत्त सचिव तयार करून व्यवस्थित ठेवतो. मात्र त्याच्या अनुपस्थित अध्यक्ष सांगेल तो शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविका या सारख्या शासकीय/ निमशासकीय / ग्रामपंचायत कर्मचारी तयार करील.

अत्यंत महत्वाचे -

पुढील ग्रामसभेत ज्या विषयांचे ठराव व्हावेत असे आपणास वाटते, त्याचे निवेदन तयार करून तसा विनंती अर्ज सभेच्या ८ दिवस आधी ग्रामपंचायतीत जमा करून त्याची पोच घ्यावी.

ग्रामसभेत ठराव मांडावा, त्यावर बहुमत घेण्यास भाग पाडावे. ठराव पास . नापास झालेला प्रोसिडिंग बुक मध्ये लिहिला कि नाही. ठराव जसा झाला तसाच लिहिला कि बदल करून लिहिला हे शिकलेल्या मुलाकडून मोठ्याने वाचून घ्यावे. अन्यथा ठराव होवूनही प्रोसिडिंग बुकात न लिहिणे किंवा चुकीचा लिहिणे हे प्रकार सर्रास घडतात.

ग्रामसभेत आपण रस्ता, पाणी, गटार, वीज, शिक्षण, आरोग्य, शौचालये, रेशन, रोजगार, घरकुले, असे कोणतेही नागरी, सार्वजनिक हिताचे प्रश्न उपस्थित करू शकतो व त्यावर चर्चा घडवून आणू शकतो व ठराव करण्यास भाग पडू शकतो.

आपण जर नियमितपणे ग्रामसभेत उपस्थित राहिलो व ग्रामसभेत सहभाग दिला व ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप केला तर आपणास गावातील कोणत्याही अडचणीसाठी तालुका, जिल्ह्याच्या गावी जाण्याची गरज नाही.

आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घेणे बंधनकारक आहे. तसेच उर्वरित ग्रामसभा इंग्रजी मुळाक्षरांच्या (अल्फाबेटिकल्स प्रमाणे) अद्याक्षरांप्रमाणे इतर वाडे, वस्तीवर घ्याव्यात.

आपण जर निवेदन दिले कि, अमुक तारखेला अमुक वाजता, अमुक या ठिकाणी ग्रामसभा घ्यावी, तर त्या प्रमाणे ग्रामसभा घ्यावी लागते.

-------------------------------------------
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान, सांगली
-------------------------------------------
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
Website - www.mazisheti.org
Facebook - www.facebook.com/agriindia
Twitter - mazishetifoundation
Plus - mazisheti foundation
LinkedIN - mazisheti foundation
Whatsapp - 9975740444
----------------------------------------
**** सर्व शेतकर्यांना माहितीची गरज आहे. तुमच्या संपर्कातील सर्व शेतकरी बांधवांना आमचेसोबत जोडा.
**** न्यूज व इतर अपडेट्स करिता शेतकरी बंधुनी <नाव_गट नं._तालुका_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> माहिती 09975740444 या नं.वर कळवा तसेच हा नंबर फोनबुक मध्ये समाविष्ट करायला विसरु नका.
**** शेतकरीसाठी विविध स्तरावर निस्वार्थीपणे काम करायची इच्छा असेल तर आमचेशी संपर्क करा.
**** तुमची संस्था नोंदणीकृत असेल आणि तुम्हाला समाजसेवेची आवड असेल तर mazishetifoundation@gmail.com वर संपर्क करा.

No comments:

Post a Comment