डाळींब

माझीशेती : डाळींब
 Click here to take part in our Whats App group 

जमीन / माती / Land

हलक्‍या व मध्यम जमिनीत जमिनीच्या मगदुराचा विचार करून 4.5 x 3.0 मीटर अंतरावर 60 सेंटिमीटर लांबी, रुंदी व खोलीचे खड्डे उन्हाळ्यात खणून ते पावसाळ्यापूर्वी खत, माती मिश्रणाने भरून घ्यावेत.

लागवड
गणेश, जी- 137, मृदुला, फुले आरक्ता, भगवा या जातींची निवड करावी. डाळिंबाच्या झाडास अनेक फुटवे येतात. यापैकी एकच खोड ठेवल्यास खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे काही वेळा संपूर्ण झाड जाण्याचा धोका असतो. यासाठी सुरवातीच्या वाढीच्या काळातच चार ते पाच खोडे विकसित होऊ द्यावीत आणि यावरील जमिनीपासून दोन ते अडीच फुटापर्यंतचे फुटवे येऊ देऊ नयेत.

खत व्यवस्थापन 
पूर्ण वाढ झालेल्या झाडांना प्रति झाड प्रति वर्ष -
शेनखत - ४० ते ५० किलो,
नत्र - ६२५ ग्रॅम
स्फुरद - २५० ग्रॅम
पालाश - २५० ग्रॅम
आवश्‍यकतेनुसार झाडास आधार द्यावा. चांगल्या वाढीसाठी व उत्पादनासाठी रासायनिक व सेंद्रिय खतांचा नियमित पुरवठा करणे आवश्‍यक आहे. पहिल्या एक ते दोन वर्षांच्या कालावधीत खतांच्या मात्रा दर महिन्यास पिकाच्या वाढीनुसार विभागून दिल्यास झाडाची वाढ जोमाने होते. पुढील टप्प्यात गरजेनुसार रासायनिक खतांची मात्रा वाढवीत न्यावी. जमिनीच्या मगदुराप्रमाणे चांगल्या उत्पादनासाठी नियमित पाणीपुरवठा करणे आवश्‍यक आहे.

डाळिंब फळांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन
१) तेलकट डाग रोग
अ) सुरुवातीस झाडाच्या कोणत्याही भागावर काळपट करडया रंगाचे डाग दिसताच करावयाचे उपाय
उपाय :
पिक कालावधी मध्ये रोग नियंत्रणासाठी (०. ५%बोर्डोमिश्रणाची परंतु १%छाटणी केल्यानंतर ) व त्यानंतर स्त्रेप्तोसायक्लीन (५ग्राम /१०लि. )किंवा २-ब्रोमो ,२- नायट्रो प्रोपेन १,३-डायोल (ब्रोनोपॉल) (५ ग्राम . /१०लि. )+ कॉपर ऑक्सिक्लोरीड किंवा कॉपर हाड्रोक्साईडची (२०-२५ग्राम ./१०लि. )पाण्यात संयुक्तरीत्या मिसळून फवारणी करावी.
जर इतर बुरशीजन्य रोग आढळल्यास कॉपर ऐवजी योग्य ते बुरशीनाशक फवारणीसाठी वापरावे .
विश्रांती कालावधीमध्ये छाटणीनंतर बोर्दोदिश्रानाची (१%) प्रतिबंधक फवारणी घ्यावी . तसेच आलटून पालटून स्त्रेप्तोसाय्क्लीन (२. ५ग्राम./१०लि.) किंवा ब्रोनोपॉल ५ग्राम. /१० लि. +कॉपर ऑक्सिलोरीड / कॉपरहाड्रोक्साईडची (२०-२५ग्राम /१० लि.) संयुक्तरीत्या फवारणी करावी. दोन फवारणीतील अंतर १५ ते २० दिवस ठेवावे.

** बागेतील स्वच्छता
(जीवाणूंची वाढ आणि प्रसार थांबविण्यासाठी )
प्रादुर्भाव झालेली झाडांची पाने , फळे व फांद्या शेतातून काढून जाळ्याव्यात.
ब्लिचिंग पावडरच्या साहयाने (कि.घ. ३३% क्लोरीन )प्रत्येक ३ महिन्यांनी २५कि. ग्रा . /१०० लि . /हेक्टर पाण्यात मिसळून झाडाखालील मातीत ओतावे
छाटणी करावयाची अवजारे सोडियम हायपोक्लोईडच्या (२.५%) च्या साह्याने निर्जंतुक करावीत.
बागेतील तणे उपटून नष्ट करावीत व बाग तणमुक्त ठेवावीत.

** ब) फळावर काळपट करड्या रंगाचे ठिपके दिसतात, फळावर चिरा पडतात व ते फुटते. प्रादुर्भाव वाढल्यास रोगाचे तेलकट डाग फांद्यावर सुद्धा आढळतात.
उपाय : रोगाच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन (५ ग्रॅम. /१०लि.) किंवा ब्रोनोपॉल (५ग्रॅम /१० लि. )+कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रोक्सिड (२० ते २५ ग्रॅम. /१० लि.) ची फवारणी आलटून पालटून बोर्डो /बोर्डोक्स मिश्रणाच्या (०. ५ ते १%) च्या फवारणी सोबत करावी.

बहार बदलणे : 
मृग बहार घेणे टाळावे आणि त्याएवजी कमीतकमी ४-५ वर्ष हस्त बहार घ्यावा.
बागेतील स्वछता (जीवाणूंची वाढ आणि प्रसार थांबविण्यासाठी ) आधी दिल्या प्रमाणे करावी.
बागेतील झाडाची छाटणी :
तेल्या रोगाची लागण झाडांच्या इतर फांद्यांवर झाली असल्यास त्यांची छाटणी करावी आणि त्या जाळाव्यात.
फांद्याची छाटणी प्रादुर्भाव ग्रस्त भागापासून २-३ इंच खालून करावी.
छाटणी केल्यानंतर त्या भागावर बोर्डेक्स पेस्ट (१०%) लावावी. पावसाळ्यात तेलयुक्त पेस्ट (५०० ग्रॅम . कॉपर ऑक्सिक्लोराईड +१लि. जवसाचे तेल )वापरावी किंवा चौबातीया पेस्ट (१किलो लाल गेरू +१ किलो कार्बोनेट +१. २५ लि . जवसाचे तेल ) वापरू शकता.

झाड मोठ्या प्रमाणात प्रादुर्भावग्रस्त झाल्यास ते उपटून काढून टाकावे व त्या जागी नवीन रोप लावावे किंवा त्या झाडाचे मुख्य खोड जमिनीपासुन २-३ इंच वरून तोडावे आणि नवीन निघणाऱ्या फुटव्यामधून खोड तयार करावे.

बागेत घ्यावयाची दक्षता

गरज असेल तरच फवारणी घ्यावी व रसायने योग्य मात्रेतच वापरावीत अन्यथा जास्त फवारण्यामुळे रोग वाढीस चालणा मिळते.

फवारणीच्या अगोदर सर्व प्रादुर्भाव ग्रस्त फळे काढून जाळून टाकावीत.
कीटकनाशके,बुरशीनाशके, किंवा अन्नद्रव्य यांच्या फवारण्या जीवाणू नाशकासोबत एकत्रित करून फावाराव्यात.

पीक कालावधीमध्ये पाऊस पडल्यानंतर लगेचच अतिरिक्त जीवाणूनाशकाची फवारणी करावी.
नेहमी (पाऊस असताना किंवा नसताना)चांगल्या प्रतीचे स्प्रेडर आणि स्टीकर फवारणीमध्ये वापरावेत व बोरडेक्स मिश्रणामध्ये ते वापरू नयेत.

बोरडेक्स मिश्रणाचे द्रावण तयार केल्यानंतर त्याचा वापर ताबडतोब करावा (एक दिवसामध्ये).
झाडांना संतुलित अन्नद्रव्ये पुरवावी, तसेच झाडांना ३ ते ४ महिन्याची विश्रांती दयावी आणि झाडांची योग्य वाढ व रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी वर्षातून फक्त एकच बहार घ्यावा.

फळे काढल्यानंतर बागेच्या विश्रांती कालावधीमध्ये रोगप्रतिबंधक फवारण्या न चुकता नियमित घ्याव्यात.

२) मर रोग
या रोगामुळे लागण झालेल्या झाडाची एखादी फांदी किंवा संपूर्ण झाडावरील फांद्या शेंड्याकडून पिवळ्या पडतात.
उपाय :
हा रोग बुरशी व खोड भुंगेरे यांच्यामुळे झाल्याची लक्षणे दिसताच क्लोरपायरीफॉस २०ई. सी. (२. ५ ते ४ मि. ली. /लि. )+कार्बेन्डाझीम ५० डब्लू पी. (२ग्रॅम. /लि. ) किंवा प्रोपिकोण्याझोल २५ ई. सी. (२मि. ली. /लि) या औषधाचे ५ ते ८ लिटर द्रावण झाडाच्या बुंध्याजवळच्या भागात चोहोबाजूंनी माती ओली होईल इतपत ओतावे. प्रादुर्भाव ग्रस्त झाडाच्या सभोवतालच्या भागात तसेच निरोगी झाडाभोवती १५ ते २० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळेस अशा प्रकारचे ड्रेचिंग करावे.

खोड पोखरणारी आळी व खोड भुंगेर्याचा प्रादुर्भाव दिसून आल्यास माती /काव /गेरू (४ किलो )+लिंडेन (२५ग्रॅम) + क्लोरोपायरीफॉय २० इ. सी. (२०मि ली )+कॉपरऑक्साईड (२५ग्रॅम ) यांच्या मिश्रणाची १० लिटर पाण्यामध्ये पेस्ट बनवून खोडला जमिनीपासून १ते २फुट वरपर्यंत लावावी.

खोड पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास छिद्रातील भुसा सुईने बाहेर काढावा आणि प्रत्येक छिद्रात २ ते ३ मिली डी. डी. व्ही. पी. चे द्रावण (५मिली /१०ली)सोडून छिद्र लगेचच चिखलाने बंद करावे.

मर रोग जर सुत्रकृमिमुळे झाला असेल तर झाडाच्या अळ्यातील माती गोलाकार उकरून त्यात फोरेट १०जी (१० ते २०ग्रॅम. /झाड )किंवा कार्बोफ्युरोन ३जी (२० ते ४० ग्रॅम. /झाड )टाकावे व पुन्हा मातीने झाकून घ्यावे तसेच दोन झाडांमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत किंवा प्रत्येक झाडांच्या बुंध्याभोवती आफ्रिकन झेंडूची लागवड करावी. यामुळे सुत्रकृमिंची संख्या कमी होण्यास मदत होते. जर झेंडूची झाडे ४-५महिने तशीच राहू दिली तर त्याचा सुत्रकृमी नियंत्रणासाठी चांगला उपयोग होतो.

मर रोगाची लक्षणे दिसताचक्षणी लागण झालेले झाड आणि निरोगी झाड यामध्ये ३-४ फुट लांबीची चर खोदल्यास त्याचा इतत्र होणारा प्रसार रोखण्यास मदत होते. बागेमध्ये मर रोगग्रस्त झाडे आढळल्यास ती तोडून शेताच्या बाहेर खड्ड्यामध्ये जाळावीत.

छाटणी करावयाची अवजारे निर्जंतुक करावी. छाटणी पावसाळा ते उन्हाळा या कालावधीमध्ये टाळावी व नेहमी हिवाळ्यामध्ये करावी. प्रादुर्भाव व निरोगी झाडांवर आंतरप्रवाही बुरशी नाशकांची फवारणी करावी.


डाळिंबामध्ये बहाराचे नियोजन…

- ज्या भागात तेलकट डाग रोगाचे प्रमाण जास्त आहे, अशा भागात शक्‍यतो मृगबहार/पावसाळी घेऊ नये.
- डाळिंबाचा पहिला बहार दोन वर्षांनंतरच धरावा.
- वर्षांतून फक्त एकच बहार घ्यावा.
- बहार घेतल्यानंतर बागेला 3 ते 4 महिने विश्रांती द्यावी.

आंबे बहार व्यवस्थापन 

डाळिंबामध्ये प्रामुख्याने मृग बहार, हस्त बहार आणि आंबे बहार असे तीन बहार घेतले जातात. आंबे बहारात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये फुले येतात. फळांची काढणी जून-ऑगस्टमध्ये येते. या बहारात भरपूर फुले येतात, फळांचा रंग आणि प्रत अतिशय चांगली असते. आंबे बहारात कीड आणि रोगांचे प्रमाण कमी अतिशय कमी असते. उत्पादन चांगले मिळते. संरक्षित पाणी असल्यास आंबे बहार धरणे फायद्याचे ठरते.

ताण आणि पानगळ 

डाळिंबाला एकाच वेळी फुले आणि फळे येण्यासाठी झाडांना विशिष्ट कालावधीसाठी विश्रांती, पाणी तोडणे, पानगळ करून छाटणी करणे या बाबी महत्त्वाच्या असतात.
- जमिनीच्या मगदुराप्रमाणे डाळिंबाच्या झाडांना किती दिवस ताण द्यायचा ते ठरवावे.
- बहार धरताना साधारणतः जमीन जर हलकी असेल तर बहार धरण्याअगोदर 30-35 दिवस पाणी तोडावे.
- तसेच मध्यम ते भारी जमिनीत 40-45 दिवस पाणी बंद करावे. झाडांना ताण दिल्यानंतर छाटणीच्या तीन आठवडे आधी 20 मिली इथेफॉन प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करून पानगळ करावी.

छाटणी 
- डाळिंबात छाटणी न केल्यास फळे टोकाला लागतात. त्यामुळे पानगळ केल्यानंतर डाळिंबाची हलकीशी छाटणी करावी. छाटणी करताना रोगट, तेलकट डाग रोगाच्या फांद्या काढून टाकाव्यात. भरपूर सूर्यप्रकाश, हवा खेळती राहील आणि फळे सावलीत राहतील अशा प्रकारे छाटणी करावी. छाटणी करताना झाडाचा वरचा समतोल बिघडणार नाही याची काळजी घेऊनच छाटणी करावी.
- आंबे बहारात प्रखर सूर्यप्रकाशामुळे फळांवर काळे डाग पडण्याची शक्‍यता असते. त्यासाठी झाडाच्या आतील भागात रिफिल व पेन्सिल काड्या ठेवून त्यावर फळे धरावीत. छाटणी केल्यानंतर लगेच 1 टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
अन्नद्रव्य व्यवस्थापन 

- माती परीक्षण करून डाळिंब झाडाच्या वयानुसार रासायनिक खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा.
- डाळिंबाचा बहार धरताना प्रति झाड 20 किलो शेणखत, 2 किलो निंबोळी पेंड, 1 किलो गांडूळ खत, 25 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्लस, 15 ग्रॅम पीएसबी आणि 15 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर द्यावे.
-- ---- -- ---- -- ---- खताची मात्रा प्रति झाड ---- -- ---- --
जाडाचे वय (वर्ष) ---- शेणखत (किलो) ---- नत्र (ग्रॅम) ---- युरिया (ग्रॅम) ---- स्फुरद (ग्रॅम) ---- एसएसपी (ग्रॅम) ---- पालाश (ग्रॅम) ---- एमओपी (ग्रॅम)
1 ---- 10 ---- 250 ---- 540 ---- 125 ---- 800 ---- 125 ---- 200
2 ---- 20 ---- 250 ---- 540 ---- 125 ---- 800 ---- 125 ---- 200
3 ---- 30 ---- 500 ---- 1100 ---- 125 ---- 800 ---- 125 ---- 200
4 ---- 40 ---- 500 ---- 1100 ---- 125 ---- 800 ---- 250 ----400
5 व पुढील ---- 50 ---- 625 ---- 1400 ---- 250 ----1600 ---- 250 ---- 400
- डाळिंबाच्या पूर्ण वाढ झालेल्या झाडांना 325-250-250 ग्रॅम नत्र - स्फुरद - पालाश पहिले पाणी देतेवेळी द्यावे.
- उर्वरित नत्राची अर्धी मात्रा गाठ सेट झाल्यावर दोन ते तीन हप्त्यांत विभागून द्यावी. तसेच बहार धरतेवेळी 200 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेटची मात्रा द्यावी.
- फळे लिंबू आकाराची असताना 500 ग्रॅम 18-46 आणि 100 ग्रॅम एमओपी द्यावा.
- फळे पेरू आकाराची असताना 200 ग्रॅम 19-19-19 आणि 100 ग्रॅम एमओपी द्यावा.
- झाडांच्या वाढीच्या अवस्थेनुसार 12-61-0, 19-19-19, 13-40-13, 13-0-45, 0-52-34 आणि0-0-50 या विद्राव्य खतांच्या ग्रेडचा वापर करावा.

पाणी व्यवस्थापन 

डाळिंब हे उष्ण कटीबंधातील फळपीक असून, फार कमी पाणी लागते.
- डाळिंबाचे झाड ताणावर असताना दीड महिना पाणी पूर्ण बंद करावे.
- त्यानंतर ताण सोडताना डाळिंबाला पहिले पाणी पाच ते सहा तास ठिबक सिंचनने द्यावे.
- डाळिंबाची बाग फुलोऱ्यात असताना बेताचे पाणी द्यावे.
- गाठ सेठ झाल्यानंतर खालील वेळापत्रकाप्रमाणे पाणी द्यावे.
येथे चौकट नं. 2 - compose/29-11-2014/agr-cs6 (a)
महिना ---- लि/दिवस/झाड ---- महिना ---- लि/दिवस/झाड
जानेवारी ---- 17 ---- मे ---- 44
फेब्रुवारी ---- 18 ---- जून ---- 30
मार्च ---- 31 ---- जुलै ---- 22
एप्रिल ---- 40 ---- ऑगस्ट ---- 20
- डाळिंबाच्या झाडाला अति पाणी दिल्यास सूत्रकृमी, मर आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते.

फळ काढणी -
शाश्‍वत डाळिंब उत्पादन घेण्यासाठी डाळिंब झाडाच्या वयाप्रमाणे फळांचे उत्पादन घ्यावे.
- पूर्ण वाढ झालेल्या झाडाला 60 ते 80 फळे घ्यावीत.
- डाळिंबाचे फळ पक्‍व झाले की टोकाकडील पुष्प पाकळ्या मिटतात. फळांचा गोलाकारपणा किंचित कमी होऊन फळांना चपटा आकार येतो.
- साधारणतः फुलोऱ्यानंतर 150 ते 210 दिवसांनी आणि फळधारणेनंतर 120 ते 130 दिवसांनी डाळिंब काढणीस येतात.
संपर्क - डॉ. संतोष मरभळ, 9405851848
02555-235555
(डाळिंब संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसार केंद्र, लखमापूर, ता. सटाणा, जि. नाशिक.)

डाळिंब फळांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन
** ३) फळावरील बुरशीजन्य ठिपके आणि फळकुज -
फळाच्या सालीवर वेगवेगळ्या आकाराचे व रंगाचे ठिपके आणि पाकळी किंवा देठांच्या टोकाकडून फळे कुजलेली आढळतात.
फायटोप्थोरा करपा
सविस्तर उपाय :-
मृग बहारामध्ये या बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होते म्हणून हस्त अथवा आंबे बहर घेणे अधिक सोयीस्कर ठरते.
जुनी फळे, कोमेजलेल्या /वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्यात.
बोर्डेक्स १% आणि कॉपर च्या फवारण्या विश्रांती कालावधीमध्ये पण नियमित कराव्यात.
खालील पैकी बुरशी नाशकाची फवारणी करावी :-
क्लोरोथ्यालोनिल ७५% डब्लू. पी. (ग्रॅ. लि),
थायोफेनेट मिथिल ७०% डब्लू. पी. (१. ५ ग्रॅ. /लि ),
कार्बेन्डाझीम (१. २ग्रॅ. /लि ),
म्यान्कोझेब ७५% डब्लू. (पि. २ग्रॅम. /लि ),
कॅप्टन ५०%डब्लू. पी. (२ ग्रॅ. /लि)
बेनोमील (०. ५-१ ग्रॅ. /लि),
सल्फर ८०% डब्लू. पी. (२. ५ ग्रॅ./लि ), आणि
बोर्डेक्स मिश्रण (१%).
फवारण्याची सुरुवात फुले येण्याच्या अगोदर किंवा फुले आल्यावर आणि त्यानंतर १० ते १५ दिवसांच्या अंतराने हवामानाच्या अंदाजानुसार आणि बुरशी नाशकाच्या प्रकारानुसार कराव्यात.
** ४) फुलकिडे
फुल किड्याच्या प्रादुर्भावामुळे झाडांची कोवळी पाने वेडेवाकडे व गुंडाळलेले आढळतात. तसेच फळांवर ओरखडल्या सारखे व गंजल्यासारखे खडबडीत चट्टे पडतात.
सविस्तर उपाय :-
प्रादुर्भाव दिसताच
थायोमिथोक्झाम २५ डब्लू. जी (०.३ ग्रॅम/लि) किंवा
असेटामिप्रीड ७५ एस. पी. (१ग्रॅम/लि) ची फवारणी पालवी ते फळ तोडणीपर्यंतच्या कालावधी मध्ये करावी .
प्रादुर्भाव झालेली कोवळी पाने नेहमी नष्ट करावीत.
फुलकिडे मिरची, कांदा, लसुन, व टोमाटो या पिकांवर देखील उपजीविका करत असल्यामुळे डाळींबामध्ये यासारखी आंतरपिके घेऊ नयेत.
** ५) फळे पोखरणारी अळी
कळी,फुले व फळांवर छिद्रे दिसताक्षणी करावयाचे उपाय
सविस्तर उपाय :
फुल धारणा ते फळ काढणीपर्यंतच्या कालावधीमध्ये
डेल्टामेथ्रीन २. ८ ई . सी. (१. ५ मि. ली. /लि )किंवा
मिथोमिल ४० एस. पी. (१ ग्रा./लि. )किंवा
अझाडीरक्तीन १५०० पी . पी . एम (३मि. ली. /लि .)
ची फवारणी १५ दिवसाच्या अंतराने करावी.
प्रादुर्भावग्रस्त फळे, फुले व कळ्या जमा करून नष्ट कराव्यात.
हि कीड पेरू, चिकू, आवळा आणि चिंच या फळांवर देखील उपजीविका करत असल्याने डाळींबामध्ये या सारखी आंतरपिके घेऊ नयेत. जर डाळींबाची बाग १-२ हेक्टर असल्यास फळांना बटर पेपरणे झाकून घ्यावे त्यामुळे फळ पोखरणाऱ्या अळी पासून संरक्षण मिळते.
** ६) डाळींबामधील रस शोषणार पतंग आणि त्याचे व्यवस्थापन
१तीव्रता - डाळींबामध्ये आढळणारे रस शोषणारा पतंग हा ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीमध्ये सक्रिय होऊन मृग बहारमधील फळांचे मोठे नुकसान करतात.
नुकसानाची पद्धत -
या पतंगाची सोंड हि फळाच्या सालीला छिद्र पाडण्याइतकी मजबूत असते. रात्रीच्यावेळी नर आणि मादी दोन्ही पतंग फळांना छिद्रे पाडून नुकसान करतात. अशा छिद्रामधून विविध प्रकारच्या बुरशी व जीवाणूचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे अशा छिद्रामधून रस बाहेर पडताना दिसतो. अशा प्रकारे कालांतराने बुरशी व जीवाणूच्या प्रादुर्भावाने फळ सडन्यास सुरुवात होऊन अशी फळी नंतर गळून पडतात.
उपाय :
फळ शोषनारा पतंग हा ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यांमध्ये सक्रीय होत असल्याने ज्या भागांमध्ये याचा प्रादुर्भाव आढळून आलेला असल्यास त्या भागांमध्ये मृग बहार घेणे टाळावे.
या पतंगाचे पोषण करणाऱ्या इतर वनस्पती टिनोस्पोरा स्पेसीज, घाणेरी , एरंडी इ . वनस्पती बागेच्या परिसरातून नष्ट कराव्यात.
प्रादुर्भावग्रस्त फळे तोडू नयेत कारण अशा फळाकडे पतंग परत आकर्षिला जात असल्याने चांगल्या फळांचे संरक्षण होण्यास मदत होते.
बटर पेपर, वर्तमान पत्र तसेच पॉलिमर पिशव्या यांच्या आच्छादनानेफळे झाकून टाकावीत.
रात्रीच्या वेळी प्रखर झोताच्या विजेच्या (टोर्च) साहय्याने पतंगाना पकडून जाळून टाकावे.
विषारी आमिष बनवण्याकरिता ९५% मळी किंवा काकवी आणि ५% म्यालाथिओन ५० ई.सी.चा वापर करावा. अशी आमिषे रात्रीच्या वेळी सी एफ एल दिव्याखाली मातीच्या मोठ्या पसरट भांड्यामध्ये ठेवावी. त्यामुळे प्रकाशाकडे पतंग आकर्षिले जाऊन विषारी अमिषामध्ये पडून मरतात.

तेल्यावर विद्यापीठाची शिफारस, काढणी व पश्चात काळजी
डाळिंबावरील तेलकट डाग रोग नियंत्रणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले वेळापत्रक -
1) मागील हंगामात संपूर्ण फळे काढणी झाल्यानंतर 2-ब्रोमो, 2-नायट्रो प्रोपेन 1, 3 डायोल (ब्रोमोपॉल) 50 ग्रॅम + कॅप्टन 500 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यातून फवारावे.
2) फळांची काढणी झाल्यानंतर बागेला तीन महिने विश्रांती द्यावी.
3) बहार धरण्याअगोदर 15 दिवस झाडांच्या आकारानुसार 6 इंच खोल जमिनीची चाळणी करून घ्यावी आणि त्यासोबत झाडाच्या डेऱ्याच्या बाहेरील बाजूने 9 इंच खोल, 6 इंच रुंद खोली घेऊन मुळांची छाटणी करावी.
4) बहार घेण्यापूर्वी संपूर्ण पानगळ करण्यासाठी इथेफॉन 2 मि. लि. प्रति लिटर) या प्रमाणात फवारणी करावी. रोगट फांद्यांची छाटणी करावी व झाडांची मुळे 15 दिवस सूर्यप्रकाशात उघडी करून ठेवावीत.
5) पानगळ आणि छाटणीनंतर ब्रोमोपॉल 50 ग्रॅम + कॅप्टन 250 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यातून फवारावे.
6) खाली पडलेले संपूर्ण पाने व छाटलेले रोगट अवशेष गोळा करून जाळून टाकावेत.
7) बागेत जमिनीवर ब्लिचिंग पावडर (60 किलो प्रति हेक्‍टर) किंवा कॉपर डस्ट 4 टक्के (20 किलो प्रति हेक्‍टर) या प्रमाणात धुरळणी करावी.
8) झाडांच्या खोडाला निमऑइल + ब्रोमोपॉल 50 ग्रॅम + कॅप्टन 500 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या मिश्रणाची फवारणी करावी.
9) सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करून माती परीक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
10) नवीन पालवी फुटल्यानंतर ब्रोमोपॉल 25 ग्रॅम किंवा बोर्डोमिश्रण 1 टक्का किंवा कॅप्टन 250 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी फवारावे. पानांवर आणि फळांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर 10 ते 12 दिवसांनी फवारणी करावी आणि रोग नसेल तर 30 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
11) झाडाची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी पानांची वाढ होत असताना 0-52-34 हे विद्राव्य खत कॅल्शिअम नायट्रेट आणि सिलिकॉन 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन
डाळिंबाच्या पानावर निसर्गाने उपयुक्त जिवाणूंचे कवच तयार केलेले आहे. यापैकी अनेक जीवाणू हे झान्थोमोनास आणि तेल्या यापासून झाडाचे संरक्षण करू शकतात. मात्र असे जीवाणू प्रयोगशाळेत सहजी वाढवता येत नाहीत. बाजारात उपलब्ध उपयुक्त जीवाणूंपेक्षा हे फार वेगळे आहेत. असे उपयुक्त जीवाणू खाली दिल्याप्रमाणे अनेकविध विशिष्ट कामे करतात:
1. झान्थोमोनासला पानावर थर तयार करण्यापासून रोखणे.
2. पर्णरंध्रातील पोकळीत पाण्याचा थर साठण्यास अटकाव करणे.
3. झान्थान डिंकाचे विघटन करणे.
4. झान्थोमोनासला मारणे.
पिकावर वापरात असलेल्या अनेक फवारण्यामुळे असे जंतू नष्ट होतात. वेळोवेळी अशा जंतूची पानावर फवारणी करून त्यांचा समतोल सांभाळावा लागेल.
** डाळींब फळाचे काढणी पश्चात व्यवस्थापन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन
१) डाळिंब फळाचे तोडणीपूर्वी पक्व्तेची लक्षणे -
* भगवा जातीचे फळ १५० तर गणेश जातीचे फळ १३५ दिवसांनी पक्व होतात.
* भगवा जातीची फळे पक्व झाल्यानंतर गडद लाल व गणेश जाती मध्ये पिवळसर रंग येतो व दोन्ही मध्ये सालीवर चकाकी दिसून येते.
* पक्वतेत कळीच्या पुढच्या टोकाचा भाग आतील भागास वळतो व अतिशय कोरडा /कडक झालेला असतो.
* फळांचा आकार कठीण बनतो आणि फळावरील साल खरवडली जाऊ शकते.
* फळाला बोटांनी टिचकी मारल्यावर खणखण आवाज येतो.
* पक्व्तेमध्ये भगवा जातीच्या फळातील दाणे भडक लाल तर, गणेश जातीतील दाणे फिक्कट गुलाबी दिसतात.
* रसाचा टि एस एस १३-१६. ५ ब्रीक्स आम्लातांक ०.८ % टि एस एस व आम्लतेचे गुणोत्तर २५- ४० इतके असते.
** फळांची तोडणी
* पूर्ण पक्व झालेल्या फळांची तोडणी सकाळी किंवा दुपार नंतर करावी .
* फळ तोडताना ओढून न तोडता जागेवरच कात्रीने तोडावीत/ काटावे.
* साठवण खोक्यामध्ये आधी कागदाचा लगदा वगैरे ठेऊन मग त्यात तोडलेली फळे ठेवावीत
** फळांची प्रतवारी नुसार संवेष्टन :
वजनानुसार फळांची प्रतवारी ठरवली जाते.
फळांचे श्रेणीकरण शेतामध्ये गुणवत्ता तसेच डागांच्या आधारावर केले जाते.
तोडणी नंतर फळांचे श्रेणीकरण खाली दिलेल्या गुणांच्या आधारे केले जाते .
** श्रेणीफळांची प्रत
१. सुपर साईज- आकर्षक मोठया आकाराची, गडद रंगांची डाग नसलेली > ७५० ग्रॅ.
२. किंग साईज- आकर्षक मोठया आकाराची, डाग नसलेली वजन > ५०० ग्रॅ.
३. क्वीन साईज-मोठया आकाराची,आकर्षक किरकोळ डाग नसलेली >४००ग्रॅ. आणि <५०० ग्रॅ.
४. प्रिन्स-आकर्षक डागविरहीत, वजन>३००आणि <४००ग्रॅ.
५. १२-अ १-२ ठिपके असलेली, वजन >२००ग्रॅ. आणि <३००ग्रॅ.
६. १२-ब वजन <२५० ग्रॅ.
** संवेष्टन :
* श्रेणीकृत केलेले फळ कपड्यांनी साफ करा किंवा त्यांना ईथिल ओलेट द्रावणामध्ये बुडवून काढा. त्यामुळे त्यांचावरील माती व धुळ स्वच्छ होऊन फळांना चकाकी येते.
* सर्वोकृष्ट श्रेणीतील प्रत्येक फळांवर टिशु पेपर किंवा प्लास्टिक लायनर लावला पाहिजे.
* निर्यातीसाठी चार किलो क्षमता असलेल्या कार्डबोर्ड करोगेटेड फायबरबोर्ड (३७५X २७५X १०० मि. मि.) किंवा ५ किलो क्षमता असलेल्या (४८० X३००X१०० मि. मि.) बॉक्समध्ये संवेष्टन केले जाते.
** साठवण:
* ८ आठवड्यापर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी तापमान ५ अंश से. आणि सापेक्ष आद्रता ९०-९५% पाहिजे.
* फळांचे साठवण ५ अंश से. पेक्षा कमी तापमानात केल्याने चिलिंग इन्जुरी होते.
* आद्रता नियंत्रण करणे हे खूप महत्त्वाचे आहे. आद्रता कमी झाल्यास फळे ही कोरडी बनतात आणि त्यांची साल कडक होते.