Friday, September 8, 2017

गोएक्स्पोर्ट (नेदरलंड) आणि सोलापुर अग्रो उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्यातक्षम भेंडी गुणवत्ता नियंत्रण कार्यशाळा संपन्न


"गो एक्सपोर्ट"कंपनीमार्फत संचालक श्री. प्रकाश पाटील उपस्थित होते आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानकडून महेश बोरगे, रावसाहेब देशमुख, संदीप तोडकर यांनी मार्गदर्शन केले. रावसाहेब देशमुख यांनी भेंडी लागवडीपासून काढणीपर्यंत उदा.माती परीक्षण, बियाणे निवड, निविष्ठा व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, काढणी व काढणीपश्चात व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. निर्यातीसाठी आवश्यक असणारे 'ग्लोबल  ग्याप' प्रमाणीकरण व त्यासाठी प्रत्येक स्तरावर घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणारे प्रयोगशील शेतकरी श्री. संदीप तोडकर आणि त्यांच्या कष्टाने उभे केलेल्या 'तन्मय हायटेक' या व्यवसायाची आधी केले मग सांगितले या तत्वावर स्वतःची यशोगाथा उपस्थित शेतकऱ्यांना सांगितली. सन २०११ मध्ये १० गुंठे पडीक जमिनीत सुरु केलेली आधुनिक शेती आणि सध्याचे "तन्मय हायटेक"च्या माध्यमातून घेतेलेले परदेशी फळ भाजीपाल्यांचे उत्पादन घेताना आलेल्या अडचणी, माझीशेती आणि कृषी विभाग यांच्या सहाय्याने घेतलेली गरुडभरारी या सर्व गोष्टी ऐकताना शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन गेल्या.

"माझीशेती" प्रमुख महेश बोरगे यांनी शेतीला हा व्यवसाय म्हणून पहा असा मोलाचा संदेश दिला. पारंपारिक आणि आधुनिकतेचे फायदे याबद्दल मोलाचा संदेश दिला. माझीशेतीच्या शाश्वत ग्रामीण विकास प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करीत माझीशेतीकडून तंत्रज्ञानाची सांगड घालून राबवीत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील व्यावसायिकांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी संस्थेचा "संस्था संसाधन केंद्र" (ORC - Organization Resources Center) या उपक्रमाचा लाभ घेवून जागतिक स्तरावर शेती व शेतीपूरक तसेच बारा बलुतेदार व्यवसायांना व्यासपीठ उपलब्ध करून घेण्याचे आवाहन केले.

गोएक्स्पोर्टचे संचालक यांनी शेतकऱ्यांना पारंपारिक शेतीपासून दूर राहून आधुनिक शेतीमध्ये व्यावसायिकता आणल्यास भविष्यात शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही असे सांगितले. शेतकऱ्यांनी निर्यातक्षम भाजीपाला, फळे पिकवण्यासाठी पुढाकार घेतल्यास गोएक्स्पोर्टचे नेदरलँड्समधील कार्यालय निर्यातीची हमी घेऊ शकते मात्र शेतकऱ्यांनी स्वतःमध्ये व्यावसायिकता अंगीकारावी असे सुचविले.

या कार्यक्रमामध्ये शेतकर्यांनी चांगला प्रतिसाद देत भेंडी निर्यातीबद्दल सकारात्मक प्रतिसाद नोंदविला. तसेच त्यांना भेडसावणाऱ्या शंकेचे सर्वोतपरी निरसन करून घेतले. माळकवठे ता.दक्षिण सोलापुर येथे सोलापुर अग्रो प्रोडयुसर कंपनी व माझीशेती यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना 'भेंडी' निर्यातीबद्दल सखोल मार्गदर्शन केले. ''गो एक्सपोर्ट''कंपनीचे डिरेक्टर प्रकाश पाटील व मंदार कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम घडवून आणला.