Wednesday, September 30, 2015

लसुन लागवड

लसूण लागणीपासून काढणीपर्यंत माहिती पोस्टाने मागविण्यासाठी
<लसुन, शेतकऱ्याचे नाव आणि पोस्टाचा पत्ता (पिनकोडसह)>
असा मेसेज ९९७५७४०४४४ या क्रमांकावर पाठवा.

पोस्टाचा होणारा खर्च शेतकऱ्यांना द्यावा लागतो.
हवामान
 • रब्बी हंगामातील पिक असून लसूण वाढीच्या काळात थंड आणि किंचित दमट हवामान, तर गड्डा परिपक्व होताना काढणीच्या काळात कोरडे हवामान हवे असते. 
 • गड्ड्याची वाढ सुरू होण्यापूर्वी पानांची संख्या भरपूर असली आणि त्यांची वाढ चांगली झाली तरच अधिक उत्पादनाची हमी असते. 
 • ऑक्टोबर मध्ये लागण केल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या काळात रात्रीचे कमी तापमान झाडांच्या वाढीस पोषक ठरते.
 • फेब्रुवारी, मार्च या काळात रात्री तापमान कमीच राहते; परंतु दिवसाच्या तापमानात वाढ होते. 
 • हवेतील आर्द्रता कमी होते आणि गड्डा पोसू लागतो.
 • एप्रिल महिन्यात तापमान आणखी वाढते. या काळात गड्डे काढणीस येतात. 
जमीन
 • भुसभुशीत आणि कसदार लागते.
 • मध्यम काळ्या जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरवठा चांगला असल्यास उत्पादन चांगले मिळते.
 • भारी काळ्या किंवा चोपण जमिनीत गड्ड्यांची वाढ चांगली होत नाही.
 • पाण्याचा चांगला निचरा न होणाऱ्या जमिनी टाळाव्यात. 
पूर्व मशागत
 • खोल नांगरट करून दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.
 • हरळी, लव्हाळ्याच्या गाठी किंवा पूर्वपिकाची धसकटे वेचून घ्यावीत. 
 • एकरी ४ ते ६ टन शेणखत शेवटच्या कुळवणीद्वारे जमिनीत मिसळून द्यावे.
 • लागवडीसाठी २ x ४ किंवा ३ x ४ मीटर अंतराचे वाफे करावेत.
 • जमीन सपाट असेल तर दीड ते दोन मीटर रुंदीचे आणि १० ते १२ मीटर लांबीचे सरे करता येतात.
 • लसूण पाकळ्या टोकण करून लावाव्या लागतात.
 • निवडलेल्या पाकळ्या सपाट वाफ्यात १५ x १० सें.मी. अंतरावर व दोन सें.मी. खोलीवर लावाव्यात.
 • रुंदीशी समांतर वाफ्यात दर १५ सें.मी. अंतरावर खुरप्याने रेषा पाडून त्यात १० सें.मी. अंतरावर पाकळ्या उभ्या ठेवाव्यात व नंतर मातीने झाकून घ्याव्यात.
बिजप्रक्रिया
लागवडीपूर्वी पाकळ्या कार्बेन्डाझिम व कार्बोसल्फानच्या द्रावणात दोन तास बुडवून लागवड करावी. दहा लिटर पाण्यात २० मि.लि. कार्बोसल्फान व २५ ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळून द्रावण तयार करावे.

जाती
वाण
विशेषता
वाण
विशेषता
भीमा ओंकार
कंद मध्यम आकाराचे, घट्ट आणि पांढरे 
एका कंदात १८ ते २० पाकळ्या असतात 
लागवडीपासून १२० ते १३५ दिवसांत पीक तयार होते 
५.५ टन प्रति एकर उत्पादन मिळू शकते 
भीमा पर्पल
कंद मध्यम आकाराचे, घट्ट व जांभळे 
एका गड्ड्यात १६ ते २० पाकळ्या 
लागवडीपासून १३५ ते १५० दिवसांत पीक तयार होते 
६.५ टन प्रति एकर पर्यंत उत्पादन मिळू शकते.
साधा लसूण
या लसणाच्या पाकळ्या बारीक असून साल पांढरट असते. निघायला किचकट, अर्क व वास गावराण लसणापेक्षा कमी असून एका गड्ड्याचे वजन १५ ग्रॅमपर्यंत असते. या लसणाच्या पाकळ्या जास्त निघतात.
यमुना सफेद लसूण(जी २८२)
गड्डा घट्ट, पांढरा १ ते ६ पाकळ्यांचा असून ५.६ सेंमी जाड व ५.५ ते ६ सेंमी उंचीचा असतो. १४० ते १५० दिवसात काढणीला येतो. एकरी ७० ते ८० क्विंटल उत्पादन मिळते. 
गुजरात (जुनागढ) लसूण
हा लसूण अतिशय मोठ्या पाकळीचा साधारण १ किलोत १५ ते २० लसूण कांड्या बसतात. या लसणास स्वाद कमी व अर्क कमी असतो. परंतु अधिक उत्पन्न व दिसण्यास आकर्षक असल्याने प्रक्रिया उद्योजक, हॉटेल व्यावसायिक व्यवसायिक, मसाले उत्पादक निर्यातदार हा लसूण अधिक पसंत करतात, हा लसूण निवडायला सोपा असून टरफल मोठे असते.
गावराण लसूण
डेरेदार, आकर्षक व रंग पांढरा मिश्रीत फिक्कट जांभळा असतो. घट्ट असून मर कमी असते. कवच जाड, कुडी मोठी डेरेदार व सोलण्याच्या जागी विशिष्ट प्रकारची ठेवण असलेला व सोलायला सोपा असतो. आतल्या कुडीच्या वरही मध्यम जाड, चमकदार असतो. हा लसूण सोलताना नाकात झिणझिण्या आणणारा वास येतो व यात अर्क जास्त असतो. या लसणास स्वाद चांगल असून आयुर्वेद मुल्य अधिक आहे. हा लसूण खानदेश, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये प्रसिद्ध आहे.
अॅग्रीफाउंड व्हाईट लसूण (जी ४१)
लागवडीपासून १२० ते १३५ दिवसात काढणीस येतो. गड्डा मध्यम ते मोठा साधारण जाडी ४ ते ४.५ सेंमी व उंची ४.५ सेंमी असते. गड्ड्यामध्ये १३ ते १८ पाकळ्या असून रंग पांढरा असतो. स्वाद मध्यम तिखट असून सरासरी एकरी ५० ते ६० क्विंटल उत्पादन मिळते.
श्वेता लसूण
गड्डा पांढरा शुभ्र, ५.२ सेंमी जाड व ५ सेंमी उंचीचा असतो. गड्ड्यात २२ ते ३३ पाकळ्या असतात. १३० ते १३५ दिवसात काढणीस तयार होऊन एकरी ४० क्विंटल उत्पादन मिळते.
गोदावरी लसूण
गड्डा मध्यम, जांभळट पांढरा असतो. गड्ड्यामध्ये २० -२५ पाकळ्या असतात. गड्डा ४.३५ सेंमी जाड व ४.३ सेंमी उंचीचा असतो. १४० ते १४५ दिवसात काढणीस तयार होऊन एकरी ४० ते ४५ क्विंटल उत्पादन मिळते.खत व्यवस्थापन
 • लसुन पिकाला एकरी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद व २० किलो पालाश लागते. लागवडीपूर्वी ५० टक्के नत्र व संपूर्ण पालाश व स्फुरद द्यावे. नत्राची राहिलेली मात्रा दोन हप्त्यांत विभागून द्यावी.
 • पहिली मात्रा लागवडीनंतर ३० दिवसांनी, तर दुसरी मात्रा ४५ ते ५० दिवसांनी द्यावी.
 • सुपर फॉस्फेट किंवा अमोनिअम सल्फेटचा वापर केल्यास आवश्‍यक गंधकाची मात्रा पिकास मिळू शकते, अन्यथा २५ किलो गंधक देण्यासाठी दाणेदार गंधकाचा वापर करावा.
 • पाकळ्यांची लागवड झाल्यानंतर कोरड्या वाफ्यात, पाटात आणि वरंब्यावर तणनाशक फवारावे, त्यासाठी १५ मि.लि. ऑक्‍सिफ्लोरफेन किंवा २५ मि.लि. पेंडीमिथॅलीन प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून वापर करावा.
 • तणनाशकाच्या वापरानंतर लगेच पाणी द्यावे किंवा लागवड करून पाणी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तणनाशक वापरले तरी चालते.
 • लागवडीसोबत तणनाशकाचा वापर केल्यामुळे जवळपास ३० ते ४० दिवस गवत उगवत नाही, त्यानंतर हलकी खुरपणी करणे आवश्‍यक असते. खोल नांगरट करून हरळीच्या काशा किंवा लव्हाळ्याच्या गाठी वेचणे हाच पर्याय वापरावा.
पाणी व्यवस्थापन
 • प्रकिया युक्त लसुन पाकळ्या कोरड्यात लावल्यानंतर लगेच पाणी द्यावे. उगवण झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. 
 • सूक्ष्म सिंचनासाठी १२० सें.मी. रुंदीचे, ४० ते ६० मीटर लांबीचे व १५ सें.मी. उंचीचे गादी वाफे ट्रॅक्‍टरला जोडता येणाऱ्या सरी यंत्राने तयार करावेत.
 • सरी यंत्राच्या फाळाची दोन टोके १६५ सें.मी. अंतरावर कायम करून ट्रॅक्‍टर चालविला, तर १२० सें.मी. रुंदीचा गादी वाफा तयार होतो.
 • वाफ्याच्या दोन्ही कडेला ४५ सें.मी. रुंदीच्या दोन सऱ्या तयार होतात. या जागेचा उपयोग फवारणी करणे, गवत काढणे, पिकांचे निरीक्षण करणे इत्यादी कामांसाठी होतो. 
रोग व किडींचे नियंत्रण
तपकिरी करपा
जांभळा करपा
पानांवर पिवळसरतपकिरी रंगाचे लांबट चट्टे पडतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात. पिकांच्या बाल्यावस्थेत हा रोग आल्यास झाडांची वाढ खुंटून गड्डा लहान राहतो व प्रसंगी पूर्ण झाड मरते.
पानांवर सुरवातीला खोलगटलांबटपांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांच्या मधला भाग जांभळा व नंतर काळपट होतो. असे अनेक चट्टे एकमेकांना लागून पडल्यामुळे पाने काळी पडतात व वाळतात.
नियंत्रन
१० ते १५ दिवसांच्या अंतराने २५-३० ग्रॅम मॅंकोझेब किंवा २० ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति दहा लिटर पाण्यात कीडनाशकांसोबत आलटून पालटून फवारावे. फवारणीच्या द्रावणात स्टिकर जरूर वापरावे.

फुलकिडे
लक्षण
नियंत्रन
पूर्ण वाढलेली कीड व त्यांची पिल्ले पानांतून रस शोषून घेतात, त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे पडतात. पाने वाकडी होऊन वाळतात. या किडीची पिल्ले व प्रौढ दिवसा पानांच्या बेचक्‍यात लपून राहतात व रात्री पानांतून रस शोषतात. 
पाकळ्या उगवून आल्यानंतर एकरी चार किलो फोरेट वाफ्यात वापरावे व पाणी द्यावे; तसेच दर १२ ते १५ दिवसांनी सायपरमेथ्रीन १० मि.लि. प्रति दहा लिटर पाण्यात स्टिकरसह मिसळून फवारावे.

सूत्रकृमी
लक्षण
नियंत्रन
लसणाच्या खोडालगत पेशींमध्ये शिरतात. पेशींचा भाग पोखरतात व तो भाग भुसभुशीत बनतो, सडतो व त्याला वास येतो. खोडाचा भाग सडल्यामुळे झाड सहज उपटून येते व मुळाचा भाग तसाच जमिनीत राहतो.
पिकाची फेरपालट हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तसेच पिका भोवताली झेंडू लागवड केल्यास प्रादुर्भाव कमी होतो.

अधिक उतपन्नासाठी 
 • लसणाच्या पाकळ्या उभ्या लावाव्यात, त्यामुळे उगवण एकसमान होते. 
 • लागवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्या कार्बेन्डाझिम व कार्बोसल्फानच्या द्रावणात दोन तास बुडवून लागवड करावी. 
 • तणनाशक फवारल्यानंतर त्याचा संपर्क पाण्याशी एक ते दोन तासांत आला पाहिजे हे लक्षात ठेवावे. 
 • लव्हाळा किंवा हरळीकरिता ग्लायफोसेट तणनाशक वापरू नये. 
 • ठिबक किंवा तुषार सिंचनावर लसणाची वाढ चांगली होते, उत्पादन अधिक येते, पाण्याची बचत होते, तसेच तणांचा व किडींचा उपद्रव कमी होतो.

Tuesday, September 29, 2015

भाजीपाला काळजी (150929)

भाजीपाला काळजी (150929)
-इरफ़ान शेख,केज,बीड

* रब्बी हंगामात वाटाणा, कोबी, फुलकोबी, लसूण, टोमॅटो पिकांची लागवड करण्यासाठी जमिनीची तयारी करून लागवड करण्यास सुरवात करावी.
* ज्या भागात भाजीपाला पिकांची लागवड झालेली असेल तिथे सध्याच्या वातावरणामुळे बऱ्याचशा भाजीपाला पिकावर रस शोषणाऱ्या किडींचा व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे.
* कांदा पिकावर फुलकिडे व करपा यांच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील १५ मिली अधिक मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड २५ ग्रॅम अधिक स्टिकर १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* टोमॅटो पिकावर लागवडीनंतर रस शोषणाऱ्या किडीसाठी इमिडाक्‍लोप्रीड ५ मिली किंवा थायामेथॉक्‍झाम ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून साध्या हातपंपाने फवारणी करावी.
*टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळी प्रथम पाने खाते. नंतर हिरवी किंवा पिकलेली फळे पोखरत आत शिरून गर खाते. या किडीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन (१० टक्के प्रवाही) १० मिली किंवा क्विनॉलफॉस २० मिली किंवा डेल्टामेथ्रीन १टक्के + ट्रायझोफॉस  १० टक्के हे संयुक्त कीटकनाशक २० मिली अधिक मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कार्बन्डाझीम १० ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरजेनुसार अधूनमधून ४ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
* वांगी पिकावर शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण करावे.
* कीडग्रस्त शेंडे दर आठवड्यातून खुडून टाकावे आणि नष्ट करावेत.
* तोडणीवेळी कीडग्रस्त फळे गोळा करून जमिनीत गाडून टाकावीत.
* ल्युसील्युर कामगंध सापळे एकरी ४० या प्रमाणात वापरावेत. त्यातील ल्यूर दोन महिन्यांनी बदलावा.
* अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन (१० टक्के प्रवाही) १० मिली किंवा  डेल्टामेथ्रीन १ टक्के + ट्रायझोफॉस ३५ टक्के कीटकनाशक २० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
* गरजेनुसार अधून-मधून ४ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
* वेलवर्गीय भाजीपाला पिकांवर  वातावरणामुळे केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. त्यासाठी कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून गरजेनुसार १५ दिवसांच्या अंतराने फवारावे.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
चळवळ - नाविन्यपुर्ण शेतीची
-----------------------------------
** शेतीच्या बातम्या व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
------------------------------------------
विभागीय कार्यालय - सांगली, रायगड, औरंगाबाद, अकोला, नाशिक, चंद्रपुर
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
www.mazisheti.org
www.fb.com/agriindia
Whatsapp - 9975740444

Monday, September 28, 2015

बटाटा लागवड

रब्बी बटाटा लागवड तंत्र (150928)
-इरफ़ान शेख,केज,बीड
www.fb.com/agriindia

* ९ ते १० रु किलो किमान भाव मिळाल्यास हे पीक चांगले उत्पन्न देते. पाण्याची सोय असणारे व लक्ष देवू शकणार्या शेतकऱ्यांना हे नक्की करता येईल.
* यासाठी जमीन मध्यम प्रतीची, पोयटा माती, पाण्याचा निचरा होणारी लागते.
* या पिकासाठी उभी आडवी खोल नांगरनी करून जमीन खूप भुसभुशीत करावी. खोल ४५ सेमी वर सरी किंवा माथा ९० सेमी रुंदीचा राहील असे बेड करावे.
* लागवड ऑक्टोबर २० ते  नोव्हेंबर अखेर पर्यंत जास्तीत जास्त करता येवू शकते.
* या पिकास थंडी मानवते तापमान १० ते २५ सेल्सियस हे वाढीसाठी उत्तम.
* सरी वरंबा किंवा रेज्ड बेड . ४५ बाय ३० सेमी अंतरावर गोळी (छोटा )बटाटा लागवड करता येवू शकते. बेने बटाटा मोठा असल्यास कापून किमान ३० ग्रॅम वजनाची फोड करुण कापलेला भाग जमिनीकडे ४ ते ६ सेमी खोल लागवड करता येतो.
* शेणखत १० टन  प्रति एकर शिवाय युरिया ५० किलो , पोटॅश ५० किलो आणि सुपर फोस्फेट प्रत्येकी ५० किलो. निंबोळी खत मिळाल्यास एकरी एक टन. ३० दिवसांनी मिश्र खत प्रती एकर ५० किलो दयावे.
* वाण निवडताना बेने शक्य तोवर गोळी बटाटा निवडावा. बेने किमान ३ महिने जुने असावे कुफरी चंद्रमुखी ,पुखराज ,ज्योती ,सिंधुरी हे वाण प्रसिध्द . याशिवाय चिप्स साठी चिप्सोना १,२,३ इत्यादि निवडावीत.
* लागवड पूर्वी बीज प्रक्रिया कार्बन डेझीम १० ग्रॅम १० लिटर पाण्यात द्रावण करून त्यात बेने बुडवावे.
* या पिकास जमीन मगदुरा नुसार किमान दर १० दिवसांनी पाणी दयावे लागते. ठिबक सिंचनाची व्यवस्था केल्यास द्रवरूप किटकनाशके, बुरशीनाशके सहज देता येतात.
* १ महिन्यांनी  झाड्याच्या बुडाशी किमान ४ इंच मातीची भर दयावी.
* यावरील रोग प्रामुख्याने करपा येतो, त्यासाठी मंकोझेब ३० ग्रॅम किंवा कॉपर ओक्सिक्लोराईड ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून बुडवून फवारावे. निंबोळी अर्क.
*प्रमुख किडी म्हणजे मावा, तुडतुडे, पांढरी माशी या किडी चा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी योग्य किटकनाशक फवारावे .
* काढणी  ९० ते १०० दिवसांनी खोल आडवी पास लावून किंवा कुदळीने खणून करता येईल.
* ऊसात बटाटा आंतर पीक चांगला नफा देते.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
चळवळ - नाविन्यपुर्ण शेतीची
-----------------------------------
** शेतीच्या बातम्या व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
------------------------------------------
विभागीय कार्यालय - सांगली, रायगड, औरंगाबाद, अकोला, नाशिक, चंद्रपुर
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
www.mazisheti.org
www.fb.com/agriindia
Whatsapp - 9975740444

माझीशेती : माती परीक्षण

पीकांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते.  उदा.- १) सामू PH २) विधुत वाहकता EC, ३)चुनखड़ी CaCO3 ४) सेंद्रिय कर्ब OC...