Wednesday, November 30, 2016

उन्हाळी बाजरी लागवड करण्यासाठी शेतीचे नियोजन

*माझीशेती: उन्हाळी बाजरी लागवड करण्यासाठी शेतीचे नियोजन (161130)*

उन्हाळी बाजरी अधिक दर्जेदार, टपोरी, हिरवीगार निघते त्यामुळे चांगला भाव मिळतो. ५/६ पाणी देण्याची सोय असेल तर उन्हाळी बाजरी करायला हरकत नाही. १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान उन्हाळी बाजरी पेरता येते. फुलोऱ्यात तापमान ३५ अंश सेल्सियस च्या पुढे गेल्यास उत्पादकता घटते, त्यामुळे शक्य तितक्या लवकर बाजरी पेरावी लागते.

पूर्वमशागत, एकरी २ टन शेण खत, २ वेळा कोळपणी, पेरताना एकरी ५० किलो १८:१८:१०, पेरणीनंतर ३० दिवसांनी ५० किलो युरिया द्यावे.
या काळात पाऊस नसल्याने उत्तम प्रतीचा कडबा/ चारा मिळतो.

उन्हाळी वातावरणात रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो. ९० दिवसात बाजरी काढणीस येते.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:
*महत्वाची सुचना -*
आपले सर्व शेतकरी आपल्या मुलांना शिकायला शहरात पाठवता. तुमचीही मुले शहरात असतील. महानगरे तर आपल्या अगदी हाकेच्या अंतरावर आहेत.....

शेतकरी बांधवांना एक कळकळीची विनंती आहे की, तुम्ही एक पाऊल पुढे टाकलेत तर तुमच्या जवळच्या शहरातील मार्केट यार्डमध्ये "शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांमार्फत" चालविलेले कृषिमाल विक्री केंद्र चालु करणार आहोत. यातील पहिल्या टप्प्यात पुणे आणि मुंबई येथे ही केंद्रे चालू झालेली आहेत.

प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाने महिण्यातुन एक दिवस शेतकऱ्यांसाठी दिल्यास शासनाच्या सहाय्याने व माझीशेतीच्या पुढाकाराने विकासाच्या दिशेने टाकलेला पाऊल प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. आम्ही शेतकर्यांच्या प्रगतीसाठी तुमच्याकडे हजारो हात पसरतो आहोत तुम्ही लाखो हात पुढे करुन प्रगतीचा मार्ग धरावा हि विनंती...

संस्थेचे स्वयंसेवक कोणत्याही स्वार्थाशिवाय तुमच्या प्रगतीसाठी प्रयत्नरत आहेत. आम्हाला अजुन स्फुरण चढवण्यासाठी तुम्ही आमच्या पाठीवर एक हात व हातात एक हात द्यावा ही विनंती.

अधिक माहितीसाठी आमच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क करा. किंवा 09975740444 वर संपर्क करा.

~~~~~
* तुमची संस्था नोंदणीकृत असेल आणि तुम्हाला समाजसेवेची आवड असेल तर mazishetifoundation@gmail.com वर संपर्क करा.
~~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

Wednesday, November 23, 2016

माझीशेतीच्या RSD प्रकल्पाचा महाराष्ट्रातील आढावा घेतल्यानंतर माझीशेतीचे अध्यक्ष व RSD प्रकल्पाचे प्रमुख महेश बोरगे यांनी व्यक्त केलेले मनोगत.

(आज दि.२३/११/२०१६ रोजी माझीशेतीच्या RSD प्रकल्पाचा महाराष्ट्रातील आढावा घेतल्यानंतर माझीशेतीचे अध्यक्ष व RSD प्रकल्पाचे प्रमुख महेश बोरगे यांनी व्यक्त केलेले मनोगत.)
शब्दांकन - धनंजय उरणे

सर्व सदस्यांसाठी, मग ते क्षेत्रावर काम करणारे असोत वा कार्यालयात.... आपण सर्वजण दि.०२ नोव्हें.१६ पासून माझीशेतीच्या व्यासपीठावर कार्यरत झालो आहोत. कार्यरत म्हणण्यापेक्षा एक सामाजिक कामाचा वसा घेतला आहे म्हणाले तरी वावगे ठरणार नाही. जसे की आपण घरच्यांच्या इच्छेला अनुसरून किंवा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कृषीचे शिक्षण पुर्ण केले आहे. आपण घेतलेल्या शिक्षणाचा प्रत्यक्ष उपयोग करायची हि उत्तम वेळ आहे. आपल्या ज्ञानाच्या तलवारीला म्यानातून बाहेर काढायची वेळ आली आहे.

समाजातील अतिशय हलाखीत आणि जोखीमेत दिवस काढणाऱ्या शेतकऱ्यांची ध्येयवादी मानसिकता ठेवून मदत करायचे महत्वाचे काम आपल्या हातून घडणार आहे. तुम्ही या सामाजिक कामासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत, याची मला खात्री आहे. 

आपण जेंव्हा हा वसा हाती घेतला तेंव्हा आपल्या मनाचे समाधान होत नाही तोपर्यंत आपल्या कामात बदल घडवीत जायचे. आपण नेहमी म्हणतो की आज मला मूड नाही..., म्हणजे काय तर आपण करीत असलेल्या कामात स्वारस्य नसणे. बरेचदा फक्त काहीतरी काम करायचे म्हणून करायचे आणि आजचा दिवस पुढे ढकलायचा असे वाटते, तेंव्हा समजायचे कि हे सध्या करत असलेले काम माझ्यासाठी नाही. मग अश्या वाट चुकलेल्या गाडीतून प्रवास करत पुढे जाऊन खाली उतरण्यापेक्षा आताच योग्य निर्णय घेतलेला बरा...

जेंव्हा आपण ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचा शाश्वत विकास करण्यासाठी आराखडा तयार करून कार्यरत होतो तेंव्हा त्यातून स्वतःच्या विकासाचा विचार देखील करायला हवा. आपण करतोय ते काम योग्य कि अयोग्य यासाठी स्वतःचे परीक्षण करण्याची संधी नेहमी स्वीकारली पाहिजे किंवा तशी संधी शोधली पाहिजे.

ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पामधून आपण जेव्हा कृषिच्या रण भूमीत आपल्या ज्ञानाची शस्त्रे घेऊन उतरतो तेंव्हा पहिल्या प्रथम आपला आत्मविश्वास वाढला पाहिजे. माझ्यामुळे माझी आणि शेतकऱ्यांची प्रगती झालीच पाहिजे. आपण विद्यालयात घेतलेले शिक्षण, प्रगत शेतकऱ्यांचे अनुभव, काम करताना आलेले अनुभव, मित्र-सहकाऱ्यांचा अनुभव, महाविद्यालये, शासकीय विभाग यांचा सहयोग घेऊन आपण गरजेनुसार प्रगतीचा आलेख चढता ठेवू शकतो. 

प्रत्यक्ष काम करताना आपली ज्ञानेंद्रिये जागृत ठेवून शेतकऱ्यांसारखा जात्याच संशोधक आपला उपयोग करून घेतो का? यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेली माहिती संकलित करून देणे म्हणजे हे काम आजच्या काळात शेतीला श्री कृष्णाने अर्जुनाला सारथी बनून केलेल्या पवित्र कामासारखे आहे. आणि असे हे पवित्र काम आपल्या वाट्याला आले आहे. माझ्या आणि तुमच्या पालकांचे नावलौकिक वाढविणे आणि आपल्या जन्माचे सार्थक करणे हे आपण आपल्या कर्तृत्वातून दाखवून देणार आहोत. 

शेतकऱ्यांना आपण दिलासा देत असू तर त्यांना गरजेच्या साधनांची उपलब्धता करून देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. कमीत कमी खर्चामध्ये उच्च गुणवत्तापूर्ण संसाधने उपलब्ध करणे आणि उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात बऱ्याच कंपन्या शेतकऱ्यांना वेगवेगळी आश्वासने देऊन लुभावत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित करून कृषि निविष्ठांचा गुणवत्तेच्या बाबतीत शोध घ्यायला हवा. जेणेकरून गरजेपेक्षा जास्त आणि गुणवत्ता नसलेली उत्पादने शेतकऱ्यांपासून दूर ठेवता येतील. 

बरेच शेतकरी हे संपुर्ण शेतकरी समाजाला दिशादर्शनाचे काम करीत असतात मात्र दैनंदिन जीवनातील व्यापातून त्यांची माहितीची देवाणघेवाण करणे शेतकऱ्यांना शक्य नसते. याकरिता 15 दिवस किंवा महिन्यातुन किमान तासभर तरी शेतकऱ्यांना एकत्र करुन ग्रुप चर्चा करणे आवश्यक आहे. या ग्रुपचे होणारे उत्पादन योग्य त्या हमी भावाने विकले गेले पाहिजे. आपल्या शेतकरी बांधवांचे पाल्य वेगवेगळ्या शहरात शिक्षण, नोकरी, व्यवसाय करीता गेलेले असतात, त्यांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आजच्या काळाची गरज आहे. 

RSD प्रकल्पाच्या विशेषतः lll नं.बॅच मध्ये महिलांनी भरारी घेतली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुन्हा एकदा राणी लक्ष्मीबाई च्या रूपाने प्रज्ञा कांबळे, पुनम सुतार, प्रियांका पाटील, प्रियांका सोनगेकर, जुईली गांधी, अश्विनी शिंदे प.महाराष्ट्रात अवतरलेल्या आहेत. प.महाराष्ट्रासारख्या अतिशय प्रगत शेतीच्या रणांगणात या रणरागिणी आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. माझीशेतीचा संपुर्ण स्टाफ या रणरागिनींना सर्वोतोपरी सहकार्यासाठी तत्पर राहील याची मी अध्यक्ष या नात्याने ग्वाही देतो. 

धन्यवाद... 🙏
🏻

Friday, November 4, 2016

माझीशेतीमार्फत शेतीची दशा आणि दिशा बदलण्यासाठी “ग्रामीण शाश्वत विकासाची” पायाभरणी वाफगावमध्ये सुरु.

(राजगुरुनगर/जिल्हा:पुणे)

शेतमाल व उत्पादनांना उत्तम व खात्रीशीर बाजारपेठ मिळवून देण्याच्या अनुषंगाने माझीशेती संस्थेद्वारे ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचा शाश्वत विकास करण्यासाठी “ग्रामीण शाश्वत विकास (RSD) उपक्रम राबाविला जात आहे. याच वाटचालीत दि.०२/११/२०१६ रोजी वाफगाव (ता.राजगुरुनगर) येथे माझीशेती संस्थेमार्फत ग्रामीण शाश्वत शेती उपक्रमाचा उद्देश सांगितला. ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावचे सरपंच मा.श्री.अजय भागवत यांना या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आश्वासन दिले. 
ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाची सुरुवात करताना वाफगाव ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांच्यासोबत माझीशेती  RSD  प्रकल्पातील सर्व सदस्य उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना श्री.अजय भागवत उपसरपंच म्हणाले की,शेतकऱ्यांना फक्त माझे ‘शेतकरी बांधव’न म्हणता, त्यांच्या शेतीमालाला सुयोग्य भाव आणि खात्रीशीर उत्पन्न मिळवून देण्याचे प्रयत्न करायला पाहिजे.यासाठी गावातील तरुण युवक व प्रगतशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन माझीशेतीच्या सहकार्याने काम करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. श्री. शैलेश मांदळे यांनी गावातील तरुण शेतकऱ्यांना भौगोलिक बंधने विसरून उज्वल भविष्याला गवसणी घालण्यासाठी आधुनिक प्रणालीचा वापर करून प्रगत शेती करण्याची गरज आहे असे सांगितले. तांत्रिकदृष्ट्या सक्षम तरुणांना उद्देशून बोलताना तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतीमध्ये वापर करून शेतीमध्ये प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन केले.
जुईली गांधी यांनी ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाची माहिती देताना गावातील अर्थव्यवस्था बळकट करण्यावर भर दिला. प्रगतशील शेतकऱ्यांच्या प्रयोगांना प्रसिद्धी देऊन इतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह शेती करण्यासाठी माझीशेतीच्या RSD प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. RSD प्रकल्पाच्या माध्यमातून शेती मार्गदर्शन, कृषी निविष्ठा, प्रशिक्षण, बांधावरील बैठक या अश्या वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांची क्षमता बांधणी करणे आणि तयार झालेला शेतीमाल विक्रीसाठी हमी भाव देण्यासाठी प्रयत्न करणे असे माझीशेतीचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. 

डाळिंब पिकातील उत्पादनाच्या दृष्टीने मधमाश्यांचे योगदान…. (१६११०४)

डाळिंब पिकातील उत्पादनाच्या दृष्टीने मधमाश्यांचे योगदान…. (१६११०४)
संकलन - जुईली गांधी 

डाळिंब पिकातील जास्तीत जास्त उत्पादनाच्या दृष्टीकोनातुन अत्यंत महत्वाच्या असणा-या परागीभवनाच्या क्रियेत मधमाश्या मह्तवाचे योगदान देत असतात. परंतु डाळिंब पिकावर होत असलेल्या विविध किटकनाशकांच्या फवारणीतुन मधमाश्या वाचत नाही, त्यामुळे मधमाश्यांचे संगोपन करुन त्यांची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी मधुमक्षिका पालन करणे गरजेचे आहे.


मधमाशा व पिके एकमेकांना पूरक
भारत अन्नधान्याच्या उत्पादनात जगात पाचव्या स्थानी आहे. मात्र महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची स्थिती फारशी चांगली नाही. अल्पभूधारक शेतकरी आजही शेतीला योग्य पूरक व्यवसायाच्या शोधात आहे. ‘मधुमक्षिका’ पालन हा त्याच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो़ पृथ्वीवरील जीवांच्या उत्क्रांती प्रक्रियेत प्राणी जीवन निर्माण होण्यापूर्वी फुलणाऱ्या वनस्पतीवर खाद्यासाठी पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या मधमाश्यांचा जन्म झाला. शेतातील पिके, वनस्पती व मधमाशा हे एकमेकांना पूरक आहेत. शेतपिकापैकी गळिताची धान्ये, कडधान्ये, चाऱ्याची पिके, मसाल्यांची पिके, बियाण्याची पिके व फळफळावळ यासारखी पिके परागभवनासाठी मधमाशांसारख्या किटकावर अवलंबून असतात. मधमाशांना परागफलन केल्याने या पिकांची प्रत वाढत असल्याचे निष्कर्ष नोंदविण्यात आले आहेत. मधमाश्यांअभावी चांगले उत्पादन होऊ शकत नाही असा निष्कर्षही या संशोधकांनी काढला आहे. इतर कोणत्याही कीटकांपेक्षा पराग फलनासाठी मधमाशा कार्यक्षम आहेत.
मधमाशी पालनातील अडचणी
मधमाश्यांच्या एका वसाहतीत सुमारे ५ ते १० हजार मधमाशा असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात परागसिंचन करण्याची क्षमता दुसऱ्या कोणत्याही किटकांत नसते. या मधमाशा फुलातील मकरंद गोळा करून मधाची निर्मिती करतात. त्यांचे हे कार्य निरंतर सुरू असते. पाळीव मधमाश्यांच्या वसाहतीच्या माध्यमातून हमखास परागफलन करता येते. महाराष्ट्रात सुमारे २१० लाख हेक्टर क्षेत्र निरनिराळ्या पिकांच्या लागवडीखाली आहे. तृणधान्य व भुईमूग वगळता सर्वच गळितांच्या पिकांच्या फुलोऱ्यापासून मधनिर्मिती केली जाते. मात्र मधमाशी पालनात काही अडचणी आहेत. खरीप व रबी हंगाम वगळता अन्य हंगामात त्यांना पुरेसे खाद्य मिळत नाही. कीटकनाशकांचा अती वापर हा मधमाशांसाठी हानीकारक ठरला आहे.
स्वयंरोजगार प्रदान करणारा व्यवसाय
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या यासाठी शासनाने डॉ. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्यांनी आपल्या अहवालात शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी अशी शिफारस केली आहे. मधमाशी पालनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो असा निष्कर्ष डॉ.घुगल व डॉ. राहिले यांनीही आपल्या अभ्यासात नोंदविला आहे. मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना एकरी पिक वाढीस मदत मिळू शकते. फुलात सुकून वाया जाणारा मकरंद व पराग मधमाशांच्या माध्यमातून गोळा करून कोट्यवधी रुपये किमतीच्या मधाची व मेनाची निर्मिती केली जाऊ शकते. मधमाशी पालन हा व्यवसाय स्वयंरोजगार प्रदान करणारा ठरू शकतो. यासोबतच या व्यवसायाला लागणारे पूरक व्यवसाय देखील गावांत निर्मित केले जाऊ शकतात. एका शेतकऱ्याने ८ ते १० वसाहती पाळल्यास त्याला चांगला मोबदला मिळू शकतो.

संदर्भ - दैनिक लोकमत