माझीशेती : कृषिविषयक बातमीपत्र (09/04/2018)

फलोत्पादन अभियानात कांदा चाळ, नियंत्रित शेती, सामूहिक शेततळे व अस्तरीकरण, कृषी प्रक्रिया, निर्यातदार शेतकरी, आदींसाठी ५०० कोटींची तरतूद 
फलोत्पादन अभियानात कांदा चाळ, नियंत्रित शेती, सामूहिक शेततळे व अस्तरीकरण, कृषी प्रक्रिया, निर्यातदार शेतकरी, आदींविषयीच्या निधीचे नियोजन असणार आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत २६३ कोटी, आरकेव्हीवायमधून २०० कोटी व मार्चच्या शेवटच्या दिवशी मिळालेल्या ४५ कोटींच्या कार्यक्रमाचा या संपूर्ण नियोजनात समावेश असणार असल्याचे श्री. पोकळे यांनी स्पष्ट केले. बैठकीला राज्याचे अप्पर कृषी सचिव विजयकुमार, कृषी आयुक्‍त सच्चिंद्रप्रतापसिंह, ‘पोकरा’चे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी, फलोत्पादन संचालक पी. एन. पोकळे, मृद व संधारण संचालक कैलास मोते आदींची विशेष उपस्थिती होती. अधिक वाचा 

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत साडे सत्तावीस हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त 
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्यात आतापर्यंत सुमारे २७ हजार ६१६ ग्रामपंचायती आणि तेहतीस जिल्ह्यांमधील ३४४ तालुके हागणदारीमुक्त झाले आहेत. गडचिरोली जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये शौचालयांची शंभर टक्के कामे पूर्ण झाली असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचा अहवाल सांगतो आहे. अधिक वाचा

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वनविकास योजनेमधुन वनालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांकडून होणारी हानी टाळण्यासाठी लोखंडी जाळीचे कुंपण (चेन लिंक फेन्सिंग) उभारण्याची योजना
मुंबई : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतपिकांचे, पशुधनाचे नुकसान, मानवी जीवितहानी यांसारख्या समस्या उद्भवतात. यावर उपाय करण्यासाठी वन विभागाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वनविकास योजनेची व्याप्ती वाढवत वनालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांकडून होणारी अशी हानी टाळण्यासाठी वनांच्या हद्दीवर लोखंडी जाळीचे कुंपण (चेन लिंक फेन्सिंग) उभारण्याची योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचे निश्चित केले आहे. अधिक वाचा

वादळी पाऊस, गारपिटीचा फळबागा, रब्बीला तडाखा 
पुणे: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात शनिवारी दुपारनंतर वादळी पावसाने हजेरी लावली. जोरदार वारे, गारा, मेघर्जनेसह आलेल्या पावसाने गहू, कांदा, मका, भाजीपाल्यासह पेरू, सीताफळ, आंबा, डाळिंब, केळी, द्राक्ष या फळबागांचे नुकसान झाले आहे. बराच वेळ गारा पडल्याने काही ठिकाणी गारांचा खच पडला होता. मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते. विजा पडल्याने जीवितहानीच्या घटनाही घडल्या आहेत. अधिक वाचा.

ब्रॉयलर विक्री ५७ रु. प्रतिकिलो दराने.. मागील आठवडा ६५ रु. पर्यंत बाजार वाढ 
नाशिक विभागात शनिवारी (ता.७) रोजी ५७ रु. प्रतिकिलो दराने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. आठवडाभरात ६५ रु. पर्यंत बाजारभाव वधारला होता. मात्र, या पातळीवर विक्रीचा दबाव वाढल्यामुळे बाजारभाव टिकू शकले नाहीत. ब्रॉयलरच्या बाजारभावाच्या दृष्टीने मार्च महिना अत्यंत खराब गेला. महिन्याचा सरासरी विक्री दर ५५ रु. च्या आसपास निघेल. अधिक वाचा.

पुण्यात घेवडा, आले, फ्लॉवर, मटारच्या दरात वाढ
गुलटेकडी येथील पुणे कृषी बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ८) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली हाेती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक मंदावली असून, आले, घेवडा, फ्लाॅवर, मटारच्या दरात वाढ झाली अाहे. तर इतर बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर हाेते. तर पालेभाज्यांचे वाढलेले दर कायम हाेते. अधिक वाचा 

समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरी कार्यक्रमांतर्गत ४१ हजार ६६१ विहिरींचे कामे पूर्ण झाली आहेत. सध्या राज्यात ७६ हजार ६८९ विहिरींची कामे रखडली 
समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरी कार्यक्रमांतर्गत ४१ हजार ६६१ विहिरींचे कामे पूर्ण झाली आहेत. सध्या राज्यात ७६ हजार ६८९ विहिरींची कामे रखडली आहेत. या `समृद्ध महाराष्ट्र` योजनेत मराठवाडा फारच मागे आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत २९ हजार ७१९ विहिरींची कामे रखडलेली आहेत. त्यामुळे शासनाने आता पावसाळ्याच्या आधी ही कामे पूर्ण व्हावीत, याकरिता मुदतवाढ दिली असून एक एप्रिल ते ३० जून या कालावधीत सिंचन विहिरीचे कामे पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अधिक वाचा 

पशुसंवर्धन विभागाकडून वैरण विकास कार्यक्रम व कामधेनू दत्तक ग्राम योजनामधुन नगर जिल्ह्यात चारा उत्पादनावर होणार दीड कोटी खर्च
नगर : चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून वैरण विकास कार्यक्रम व कामधेनू दत्तक ग्राम योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी एक कोटी ५८ लाख ४२ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. या निधीतून २६ हजार ४०३ शेतकऱ्यांना मोफत बियाणे दिले जाणार आहे. १९०४ हेक्‍टरवर होणाऱ्या चारा पीक लागवडीतून वर्षभरात सुमारे १ लाख ३८ हजार ४२० मेट्रीक टन चारा उपलब्ध होईल. अधिक वाचा.


कृषी विभाग - कोणत्याही परिस्थितीत निधी खर्च झालाच पाहिजे...पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना 
यंदाचा सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी कृषी विभागाने खर्च न झाल्याने परत पाठवला आहे. त्याचे पडसाद रविवारी (ता. ८) येथे आयोजित खरीप हंगाम नियोजन बैठकीत उमटले. श्री. पाटील यांनी निधी परत का गेला? काय त्रुटी राहिल्या याची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. कामे मंजुरीचा कालावधी, सुरू होण्याचा कालावधी यात अंतर पडत असल्याने कामे पूर्ण होत नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून देताच त्यांनी भर पावसात गावात जाऊन बैठका घ्या आणि जलसंधारण कामांची गरज ओळखून नियोजन करा असे अधिकाऱ्यांना सुनावले. अधिक वाचा.

पूर्णा नदीवरील येलदरी धरण तसेच गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा संपला
परभणी : वाढते तापमान, बाष्पीभवन, उपसा आदी कारणांनी उपयुक्त पाणीसाठा संपत चालल्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम, लघू सिंचन प्रकल्प तळ गाठत आहेत. पूर्णा नदीवरील येलदरी धरण तसेच गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा संपला असून केवळ मृत पाणीसाठा शिल्लक आहे. लघू तलावांमध्ये केवळ ६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. वाढत्या तापमानासोबत जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्या, वस्त्या, तांड्यावरील पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक गहिरे होत चालले आहे. चार तालुक्यांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी १० टॅंकर सुरू आहेत. ५१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अधिक वाचा.

शेतकरी नवराच हवा... दीडशे जोड्यांच्या प्राथमिक बोलणीचा ऐतिहासिक वधु-वर मेळावा 
महाराष्ट्र व कर्नाटकातील सुमारे ३८० मुलींनी शेतकरी ‘वर’ कसा असावा याबाबत अपेक्षा व्यक्त करत शेतकरी नवऱ्यासाठी पसंती दाखवली. येथील दिगंबर जैन मंदिराच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यासाठी दोन्ही राज्यांतील सुमारे ९५० इच्छुक शेतकरी वरांनी नोंदणी केली. एक एकरापासून शंभर एकर क्षेत्र असलेल्या मुलांनी यात सहभाग घेतला. अधिक वाचा 

नाम फौंडेशन कडून धर्मादाय कार्यालयास सामुदायिक विवाहांसाठी प्रत्येक जिल्ह्याला एक लाख रुपये
पुणे  : शेतकऱ्यांच्या मुलांचे सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण्यासाठी नाम फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयाला एक लाख रुपये देणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दिली. शुक्रवारी (ता. ६) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मकरंद अनासपुरे म्हणाले, की अवकाळी पाऊस, गारपिटीच्या अस्मानी संकटाने उभे पीक आडवे होत आहे. अधिक वाचा 

कृषी विभागाची ‘कृषी ताई’ची संकल्पना आता ग्रामस्तरावर
शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यापासून प्रगतिशील महिला शेतकऱ्यांना ‘कृषी ताई’ म्हणून काम करण्याची संधी दिली जाणार आहे. या कृषी ताईची महिला आमसभेतून निवड केली जाणे आवश्‍यक आहे. शिवाय प्रत्येक गावांमध्ये महिला शेतकऱ्यांची आमसभा घेतली जावी, त्या आमसभेत होणारे प्रत्येक निर्णय त्या सभेच्या प्रोसेडींगवर घेतले जावे, त्या प्रोसेडिंगवरील विषय ग्रामसभेमध्ये मांडून त्यामधील किती विषय ग्रामसभा मान्यता देते यासह इतरही सविस्तर नोंदी घेणे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत घेणे संबंधित यंत्रणेला आवश्‍यक करण्यात आले आहे. अधिक वाचा