माझीशेती : कृषिविषयक बातमीपत्र (१०/०४/२०१८) • ·         वखार महामंडळ उभारणार राज्यात ९ व्यावसायिक शीतगृहे
पुणे  : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने राज्यात ९ जिल्ह्यांमध्ये व्यावसायिक शीतगृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे पुण्यातील पहिले शीतगृह याचवर्षी चालू करण्याचा संकल्प महामंडळाने केला आहे. यासाठी वखार महामंडळाने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून निधी मिळवला आहे. Read More
 • ·         'उजनी'ची पाणीपातळी ३२ टक्क्यांवर
सोलापूर  : वाढते ऊन आणि पाण्याचा उपसा या दोन्हींमुळे सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. जानेवारी महिन्यात ९९ टक्‍क्‍यांपर्यंत असलेली पाणीपातळी अवघ्या तीन महिन्यांतच निम्म्याहून अधिक प्रमाणात घटली आहे. सोमवारी (ता. ९) दुपारी धरणातील पाणीपातळी ३२.७७ टक्‍क्‍यांवर पोचली होती. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोलापूर जिल्ह्याला उन्हाच्या चटक्‍यांबरोबर टंचाईच्याही झळांना तोंड देण्याची वेळ येणार आहे. अधिक वाचा.
 • ·         केवळ कॅव्हेंडिश केळी लागवडीऐवजी जैवविविधता जपणे आवश्यक 
गेल्या दशकामध्ये कॅव्हेन्डिश केळी पिकामध्ये पनामा आणि काळा सिगाटोका या रोगांचा धोका वाढत आहे. या रोगासाठी प्रतिकारक जातींच्या विकासासाठी फारसे संशोधन झालेले नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे वॅगेनिंगन विद्यापीठ आणि संशोधन येएथील प्रो. गेर्ट केमा यांनी सांगितले. अधिक वाचा.

 • ·         पंढरपुरी म्हशींचे संवर्धन करणारे औसेकर यांचा गौरव 
पुणे  : जातिवंत पंढरपुरी म्हशींचे संवर्धन करणारे पंढरपूर (जि. सोलापूर) येथील पशुपालक गोविंद पाराजी औसेकर यांना राष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात येणार आहे. मदुराई (तामिळनाडू) येथील ‘सेवा` या संस्थेतर्फे दर दोन वर्षांनी देशभरातील जातिवंत भारतीय पशू, पक्षांचे संवर्धन, पैदास आणि प्रसार करणाऱ्या व्यक्ति किंवा संस्थांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात येतो. कर्नाल( हरियाणा) येथे २१ मे रोजी होणाऱ्या समारंभामध्ये गोविंद औसेकर यांचा प्रशस्तीपत्र आणि रोख दहा हजार रुपये देऊन गौरव करण्यात येणार आहे. अधिक वाचा
 • ·         युरोपियन बाजारपेठेत लिंबांची टंचाई... 
नेदरलॅंडमधील बाजारपेठेमध्ये लिंबामध्येही मोठी उलाढाल होत असते. येथून युरोपमधील विविध रिटेल चेनमध्ये मालाचा पुरवठा होत असतो. उत्तम दर्जाच्या लिंबांची उपलब्धता कमी झाल्याने हा पुरवठा कमी पडला आहे. मेक्सिको येथे नुकत्याच झालेल्या पावसामुळे वातावरणामध्ये आलेला थंडावा आणि सापेक्ष आर्द्रतेमध्ये झालेली वाढ याचा परीणाम मेक्सिकन लिंबांच्या आयातीवर झाला आहे. त्याचप्रमाणे ब्राझील येथील लिंबू उत्पादकांनाही पावसामुळे फटका बसला आहे. तिथे लिंबांच्या रंग आणि दर्जावर विपरीत परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. परिणामी, बाजारामध्ये उत्तम दर्जाच्या लिंबांची कमतरता जाणवत असल्याचे हेग इंटरनॅशनल या कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. अधिक वाचा
 • ·         जलयुक्‍तमध्ये नाशिक विभाग राज्यात अव्वल 
नाशिक  : जलयुक्‍त शिवार योजनेमुळेे नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमधील ९०० गावांमध्ये जलक्रांती झाली आहे. विभागातील पाचही जिल्हे मिळून ९७ टक्के कामे पूर्ण झाली असून, नाशिक विभाग राज्यात अव्वलस्थानी आहे. त्याखालोखाल नागपूर विभागाने ९६ टक्के, तर कोकण विभागाने ९६.५५ टक्के कामे पूर्ण करत अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले आहे. अधिक वाचा
 • ·         सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूचे दर वधारले 
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी, शेपूची आवक कमीच राहिली. आवक कमी असली, तरी मागणी वाढल्याने भाज्यांचे दर काहीसे वधारल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथीची रोज साधारपणे पाच ते सहा हजार पेंढ्या आणि शेपूची ३ हजार पेंढ्यांपर्यंत आवक राहिली. भाज्यांची सगळी आवक स्थानिक भागातून झाली. या आधीच्या सप्ताहाच्या तुलनेत आवकेत जवळपास निम्म्याने घट झाली. शिवाय गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली होती. पण या सप्ताहात भाज्यांना मागणी वाढली. विशेषतः मेथी, शेपूला चांगला उठाव मिळाला. अधिक वाचा
 • ·         एच. टी. बियाण्यांविरोधात कृषी विभागाचे व्यापक धोरण
नागपूर  : येत्या हंगामात एच. टी. बियाण्यांचा प्रसार होऊ नये, याकरिता कृषी विभागाकडून व्यापक अभियान हाती घेण्यात आले आहे. एच. टी. बियाणे असलेल्या ठिकाणची माहिती मिळताच थेट पोलिसांना घेऊन छापेमारी करण्यासोबतच भिंतीपत्रकाच्या माध्यमातून, असे अवैध व पर्यावरणविरोधी बियाणे न वापरण्यासंदर्भाने जागृतीही केली जात आहे. अधिक वाचा
 • ·         कासदाह निर्मूलनासाठी पुणे 'झेडपी' राबवणार कार्यक्रम 
कासदाह हा जिवाणूजन्य आजार असून, तो दुभत्या जनावरांमध्ये आढळून येतो. जनावराची धार काढल्यानंतर ते लगेच खाली बसते. त्या वेळी गोठ्यातील जमिनीवर असलेले रोगकारक जीवाणू जनावरांच्या सडातून आत प्रवेश करतात. दुभत्या जनावरांच्या ज्या सडात जीवाणू पसरतात त्यातून दूध येणे बंद होते. एका सडातून दूध येणे बंद झाले तरी २५ टक्के दूध उत्पादनाला फटका बसतो. वेळीच निदान व उपचार झाल्यास या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. याविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. अधिक वाचा
 • ·         खानदेशात उन्हाळ कांदा काढणी वेगात 
उन्हाळ कांद्याची काढणी (खांडणी) वेगात सुरू आहे. परंतु सध्या समाधानकारक दर नसल्याने कांदा उत्पादकांना त्याचा फटका बसत आहे. धुळे व शिरपूर बाजार समितीमध्ये कांदा आवक वाढली असून, प्रतिदिन सुमारे एक हजार क्विंटलवर आवक या दोन्ही बाजार समित्यांमध्ये होत आहे. धुळे बाजार समितीमध्ये कांद्याला सध्या किमान ३०० व कमाल १००० रुपये क्विंटल आणि शिरपुरातही कमाल दर १००० रुपये क्विंटलपयर्यंत आहे. मागील १० ते १२ दिवसांत दर क्विंटलमागे १०० रुपयांनी कमी झाले आहेत. अधिक वाचा
 • ·         नांदेड, परभणी, हिंगोलीत २७७ टन रेशीम कोष उत्पादन 
२०१७-१८ या वर्षात नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत २७७.७६ टन (२७७७.६ क्विंटल) रेशीम कोष उत्पादन घेण्यात आले. २०१६-१७ मध्ये १२७.५ टन उत्पादन झाले होते. यंदा कोष उत्पादनात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. शाश्वत उत्पन्न मिळू लागल्यामुळे या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा कल रेशीम शेतीकडे वाढत आहे, परंतु पुरेशा मनुष्यबळाअभावी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळण्यास अडचणी येत आहेत. परिमाणी, अनेक तालुक्यांतील शेतकरी रेशीम शेतीपासून अजूनही दूर आहेत. अधिक वाचा
 • ·         कोल्हापुर कृषी उत्पन्न बाजार समिती साप्ताहिक आढावा 
ओला वाटाणा, भेंडीच्या दरात वाढ कायम होती. ओला वाटाण्यास दहा किलोस ५०० ते ६००, तर भेंडीचे दर १०० ते २७० रुपये इतके होते. गवारीची पन्नास ते शंभर पोती आवक होती. गवारीस दहा किलोस २०० ते ४०० रुपयांपर्यंत दर होता. कारल्याच्या आवकेत काहीशी वाढ झाली. कारल्यास दहा किलोस  ४० ते २५० रुपये दर मिळाला. कारल्याचे दर गेल्या सप्ताहाच्या तुलनेत स्थिर असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. दोडक्‍याची दोनशे ते तीनशे करंड्या आवक झाली. दोडक्‍यास दहा किलोस  ५० ते २२० रुपये दर मिळाला. काकडीच्या आवकेत या सप्ताहातही वाढ होती. काकडीची दररोज दोनशे ते तीनशे करंड्या आवक होती. दहा किलोस २० ते २५० रुपये दर मिळाला. गाजराची दीडशे पोत्यांची आवक होती. गाजरास दहा किलोस ५० ते १७० रुपये दर होता. फ्लॉवरची दररोज सहाशे ते सातशे पोती आवक झाली. फ्लॉवरला दहा किलोस  ५० ते २५० रुपये दर होता.
 • ·         राज्यातून ८८ हजार ८९० टन द्राक्षे युरोपात निर्यात 
राज्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून १५ एप्रिल पर्यंत आटोपण्याची चिन्हे आहेत. या स्थितीत गतसप्ताहाच्या अखेरपर्यंत राज्यातून एकूण ६७४३ कंटेनर मधून ८८, ८९० टन द्राक्षे युरोपीय देशांत निर्यात झाली. येत्या सप्ताहात ही निर्यात ७ हजार कंटेनरचा आकडा पार करेल अशी चिन्हे आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारात द्राक्षांचा तुटवडा जाणवत असतांना देशांतर्गत व जागतिक बाजारातून मागणी वाढली. देशांतर्गत बाजारात प्रतिकिलोला ३५ ते ५५ व सरासरी ४५ रुपये दर मिळाला. निर्यातक्षम द्राक्षांना या वेळी किलोला ५० ते ८० व सरासरी ६५ रुपये दर मिळाले. नाशिक, नगर व सांगली जिल्ह्यातील काही मोजक्‍याच बागा शिल्लक आहेत. अधिक वाचा
 • ·         लेअर पक्ष्यांतील अंडी उत्पादन घटण्याची कारणे 

 पक्ष्यांच्या निरीक्षणातून अाजार अाणि शारीरिक कमतरतेचा अंदाज येतो आणि त्याप्रमाणे पशुवैद्याकडून त्वरित उपचार करता येतात. सर्वसाधारणपणे पक्षी (मादी) वय २० ते २२ आठवडे झाल्यानंतर अंडी देण्यास सुरवात करतात. हे जरी खरे असले तरी अंडी देण्याची शारीरिक प्रक्रिया प्रथम दिवसापासून सुरू होते. परंतु प्रत्यक्षात अंडे २० ते २२ आठवडे वय झाल्यानंतर शरीराबाहेर पडते. त्यासाठी एक दिवसाच्या पिलापासून ते अंंडी देईपर्यंत पक्ष्यांचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. अधिक वाचा
माझीशेती : लाभार्थी घटक - युवा

तरुण-तरुणींना सामाजिक स्तरावर शैक्षणिक, मानसिक आणि आर्थिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने प्रकल्पाची रचना केली आहे. प्रकल्पात सहभागी युवांचा अभ्यास करून त्यांना शिक्षण घेण्यासाठी विद्यावेतन दिले जाते. प्रौढ घटकांना चालू शिक्षणावर आधारित बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष भेट आणि कृतीच्या सहाय्याने अनुभव दिला जातो. जे घटक काही कारणास्तव शैक्षणिक प्रवाहातून बाहेर पडले आहेत त्यांना किमान कौशल्य आत्मसात करण्यासाठी कार्यशाळा घेतल्या जातात.

प्राथमिक स्तरावर सहभागी युवांना व्यवसाय असो वा नोकरी SWOT अनलिसिस करून क्षेत्र निवड करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. व्यवसाय आणि नोकरी यामधील प्राधान्य तपासणी करून आवश्यक प्रशिक्षण दिले जाते.

माझीशेतीच्या शेतकरी ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी
www.mazisheti.org/p/youth.html

रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीसोबत ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी शेती आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या क्षेत्रात आवश्यक सेवा पुरवठा करण्यासाठी शेतकरी, महिला यांच्यासोबत सहभागी करून व्यवसाय शृंखला सक्षम केली जाते.