माझीशेती कृषिविषयक बातमीपत्र (२५/०४/२०१८)

तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढ 
नागपूर : यापूर्वी निर्धारित केलेले अटी व नियम कायम ठेवत केंद्रीय कृषी मंत्रालयाने नाफेडअंतर्गत तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. २३ एप्रिल रोजी या संदर्भातील आदेश काढण्यात आले. 
बाजारात तुरीचे दर घसरल्याने शासनाने नाफेडअंतर्गत तुरीच्या खरेदीस मंजुरी दिली. एफएक्‍यू दर्जाच्या तुरीची ५०४० या हमीभावाने खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. राज्यभरात लाखो शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. खरेदी केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे कळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

तूर खरेदीत राज्याला एक हजार कोटींचा भुर्दंड
राज्यातील तूर खरेदी सुरवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात होती. यामागे गैरव्यवहाराचे मोठे षड्‌यंत्र आहे. काही विशिष्ट व्यक्तींच्या फायद्यासाठी तूर विक्रीत जाणीवपूर्वक मोठा घोळ घालण्यात आला. या प्रकरणी आता पणन महासंघाचे महाव्यवस्थापक अनिल देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, यातल्या बड्या धेंडांवरही कारवाईची गरज आहे. 
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेता.


नेदरलॅंड फळ बाजारात ब्राझीलचे वर्चस्व
गेल्या काही वर्षांमध्ये आंबा, लिंबू आणि अॅव्हाकॅडो ही फलत्रयी नेदरलॅंड येथील बाजारपेठेमध्ये वर्चस्व गाजवत आहे. ही फळे बहुतांश ब्राझीलमधून आयात केली जातात. त्याविषयी माहिती देताना कार्लोस अॅन्ड्रे यांनी सांगितले, की लिंबू आणि आंबा ही फळे ब्राझीलमधील प्रामुख्यान पेट्रोलिना शहराच्या परिसरातून येतात. अर्थात, आंब्याचे उत्पादन अन्य विभागामध्ये होत असले तरी ते स्थानिक बाजारातच विकले जाते. पेट्रोलिना येथून आयात केलेली फळे युरोपियन देसामध्ये प्रामुख्याने नेदरलॅंड, जर्मनी आणि स्पेनमध्ये विकली जातात. त्याचप्रमाणे कॅनडा, संयुक्त अरब अमिरात आणि काही वेळा रशियामध्येही पाठवली जातात.

उन्हामुळे लाही लाही
पुणे : वाढलेल्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. उन्हाच्या चटक्याबरोबरच उकाड्यातही मोठी वाढ झाली आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी तापमान गेले काही दिवस सातत्याने चाळीशी पारच आहे. विदर्भातील चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४४.५ अंश सेल्सिअस, तर ब्रह्मपुरी येथे ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

रणरणत्या उन्हातील धान्य महोत्सवाकडे ग्राहकांची पाठ
नागपूर : विदर्भाचा उन्हाळा राज्यात सर्वदूर प्रसिद्ध असतानाच याच रणरणत्या उन्हात सेंद्रिय धान्यमहोत्सव घेत नव्या विक्रमाची नोंद नागपूरच्या आत्मा यंत्रणेने आपल्या नावे केली आहे. मात्र, हा धान्यमहोत्सव केवळ औपचारिकताच ठरला असून, ग्राहकांनी पाठ फिरविल्याने सहभागी शेतकऱ्यांचादेखील हिरमोड झाला आहे.

दख्खनी मेंढीची लोकरदेखील दर्जेदार 
दख्खनी मेंढीच्या लोकर संशोधनासाठी प्रकल्प उभारण्याचे नियोजन असून, त्याबाबतचा प्रस्ताव वस्त्रोद्योग विभागाला सादर करण्यात आला आहे. याबाबत दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील सहकार्य केले आहे. प्रकल्पासाठी ब्राझीलच्या संशोधकाची नियुक्ती करण्यात आली आहे. 
- महादेव जानकर, पशुसंवर्धनमंत्री 

अन्य खात्याच्या मंत्र्यांचाही ‘कृषी’च्या बदल्यांमध्ये रस
पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर अधिकाऱ्यांना ‘मागेल तेथे बदली’ मिळण्याची पद्धत बंद करणे किंवा नागरी सेवा मंडळाच्या कामकाजाला बळकटी देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे सोडून राज्यातील अन्य खात्याचे मंत्रीच चक्क कृषी विभागातील गुणनियंत्रण प्रमुखाच्या बदल्यांमध्ये रस घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पूर्वहंगामी कापूस लागवडीला बसणार फटका
जळगाव  : गुलाबी बोंड अळीचा धसका आणि बियाण्यांसंबंधीच्या अडचणी यामुळे यंदा जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवड सुमारे ४५ हजार हेक्‍टरने कमी होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञ व अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. 

कोकणवर अन्याय करणाऱ्यांची राखरांगोळी करू : उद्धव ठाकरे 
नाणार  : नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार हे नाणारच राहणार; पण प्रकल्प जाणार. तुम्ही आमच्या जमिनी खरेदी करू शकता; पण आमच्यातील देशभक्ती तुम्ही खरेदी करू शकणार नाही. कोकणवर अन्याय करणाऱ्यांची राखरांगोळी करू, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. २३) जाहीर सभेत दिला.

राज्यातील धरणसाठा ३३.८६ टक्क्यांवर
पुणे  : तापमान वाढताच राज्यातील धरणांचा पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. सोमवारपर्यंत (ता.२३) राज्यातील लहान, मध्यम, मोठ्या अशा एकूण ३ हजार २४६ प्रकल्पांमध्ये ४८४.७७ टीएमसी (३३.८६ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले. गेली काही वर्षे दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात यंदा चांगली स्थिती आहे. मात्र, विदर्भातील पाणीसाठा मात्र चिंताजनक आहे. तर काेकण, पुणे विभागात पुरेसा पाणीसाठा असून, नाशिक विभागातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे.


उद्योगांमध्ये वापर होणाऱ्या साखरेवर कर लावावा : शरद पवार
कोल्हापूर  : देशात तयार होणाऱ्या साखरेपैकी ६५ ते ७० टक्‍के साखर मिठाई, औषधे आणि शीतपेयांसाठी वापरण्यात येते. या साखरेवर सेस किंवा कर लावून ती रक्‍कम साखर कारखान्यांमार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावी. साखरेचा साठा करण्यासाठी कारखान्यांना येणारा खर्च, तसेच व्याज शासनाने द्यावे. अशी परिस्थिती यापूर्वी निर्माण झाली होती. त्या वेळी आपण मंत्री असताना यातील काही निर्णय घेतले होते, असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी (ता. २३) येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी फायद्याचा
आरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता कोणीही नाकारत नाही. मात्र, नेमका कोणता व्यायाम करावा असे विचारले तर त्यात मतभिन्नता येते. अगदी सर्वांना सहजपणे करता येण्यासारखा व्यायाम म्हणजे चालणे. अनेकजणांचे चालणे बऱ्यापैकी होत असले तरी व्यायाम केल्याचे मानले जात नाही. आरोग्यासाठी तेवढे पुरेसे नसल्याचे आपले उगीचच मत असते. चालणे हा पुरेसा व्यायाम आहे का, असा प्रश्न पाच ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांना विचारण्यात आला असता, पाचपैकी चारजणांनी चालण्याच्या पक्षात आपले वजन टाकले. मात्र, एकजणाने केवळ चालणे हा संपूर्ण आरोग्यासाठी पुरेसा व्यायाम नसल्याचे सांगितले.

Popular Posts