माझीशेती : कृषिविषयक बातमीपत्र (26/04/2018)

 • नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तूर खरेदी करण्याचे आव्हान.. तूर खरेदी आदेश पोचले, खरेदी ठप्पच ! सातारा जिल्ह्यात १३५७ क्विंटल हरभरा खरेदी  
 • कच्च्या जूटला ३७०० रुपये हमीभाव
 • सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ, अकोल्यातील टोमॅटो शेतात ‘लालचिखल’
 • जालन्यातील रेशीम कोष खरेदी थांबली
 • सोलापूर दूध संघाला सहा कोटींचा तोटा
 • कृषी यांत्रिकीकरणाचा पुणे जिल्ह्यातील २७७७ शेतकऱ्यांना लाभ
 • पाच जिल्ह्यांतील कारखान्यांकडून ८३ लाख ५४ हजार टन उसाचे गाळप
 • ग्राम कृषी संजीवनी समित्यांची १०६९ गावांमध्ये होणार स्थापना
 • यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचा मावळातील शेतकऱ्यांचा निर्णय
 • पुणे विभागात खरिपासाठी सव्वा लाख क्विंटल बियाण्यांची मागणी
 • हिंगोलीमध्ये खरिपात कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज
 • नाशिक जिल्ह्यात ‘जलयुक्त’मुळे पाणी साठवण क्षमता वाढली
 • महाराष्ट्र सर्वाधिक उष्ण राज्य, राज्यात ११ ठिकाणी पारा ४२ अंशांवर
 • जळगाव जिल्ह्यात १८२५ शेततळ्यांची कामे पूर्ण
 • रब्बीतील आठ तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर
 • नागरी सेवा मंडळाच्या ‘क्लोन’मुळे अधिकारी त्रस्त
 • IPL 2018: Gautam Gambhir steps down as Delhi Daredevils captain; 
सविस्तर बातमीपत्रासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा. 


सातारा : जिल्हा पणन विभागाकडून कोरेगाव व फलटण येथे हमीभावाने हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्रांवर आतापर्यंत १३५७.७० क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. खरेदी केंद्रावर येणाऱ्या हरभऱ्यास ४४०० रुपये क्विंटल असा हमीभाव दिला जात असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हरभऱ्याची खरेदी केंद्रावर विक्री करावी, असे आवाहन अनिल देसाई, जिल्हा पणन अधिकारी, सातारा यांनी केले आहे. 

Shreyas Iyer to lead struggling side Gautam Gambhir has not quite had a happy homecoming as leader of Delhi Daredevils in the 11th edition of the Indian Premier League (IPL), presiding over one loss after another in the initial stages of the tournament, following which he has now decided to stand down from captaincy. 

३० नोव्हेंबर २०१७ ला ऑनलाइन नोंदणी झाल्याचा मेसेज आला, पण तूर घेऊन या म्हणून अजून मेसेज आला नाही. चौकशी केली तर अजून पत्र नाही, खरेदी सुरू नसल्याचं फोनवर बाजार समितीकडून सांगितलं जातं. २६ मार्च २०१८ ला परळी बाजार समितीला याविषयी लेखी पत्र दिलं, पणं उत्तर काही मिळनां. खरेदी सुरू नाही अन्‌ नोंदणी असून घेऊन येण्याचा मेसेज नाही, ज्यांनी तरू घातली त्यांना पैसे नाही. कशी ऑनलाइन अन्‌ झटपट खरेदी म्हणावं. - धनंजय सोळंके, नागापूर, ता. परळी, जि. बीड.

परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत आधारभूत किंमत दराने तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे नोंदणी केलेल्या; परंतु मोजमाप राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता नवीन नोंदणी केली जाणार नाही. मुदत वाढीच्या २० दिवसांच्या कालावधीत नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील ४२ हजारांवर शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आव्हान शासकीय यंत्रणेपुढे आहे. अपुऱ्या गोदाम व्यवस्थेमुळे खरेदीची गती संथच राहणार आहे. त्यामुळे शिल्लक शेतकऱ्यांपैकी किती जणांची तूर खरेदी केली जाईल, याबाबत अनिश्चितता आहे.जालना : येथील प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष बाजारातील कोष खरेदी थांबली आहे. व्यापारी नसण्यासोबतच बहुतांश रेशीम कोष उत्पादकांनी वाढलेले तापमान, पाणीटंचाई यामुळे कोष उत्पादनाला ब्रेक दिल्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसतो आहे. व्यापारी कसे येतील यासाठी प्रयत्न सुरू असताना उत्पादकांची गैरसोय होऊ नये म्हणून संपर्क करणाऱ्या शेतकऱ्यांना व्यापारी उपलब्ध होतील तसे कळिवले जाईल व त्यानुसार कोष बाजारात घेऊन येण्याचे सांगितले जात आहे. उत्पादनातील घट, दर्जेदार व अपेक्षित कोष न मिळणे हेही व्यापारी न येण्यामागचे कारण असू शकते. थांबलेली खरेदी सुरळीत होण्यासाठी पावले उचलली जातील. जास्त व दर्जेदार रेशीम कोष उत्पादनाच्या काळात बाजारपेठ पूर्ण क्षमतेने सुरू राहील याची काळजी घेतली जाईल. असे दिलीप हाके, सहायक संचालक, रेशीम, मराठवाडा, औरंगाबाद यांनी सांगितले.

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने एकूण दूध संकलनातील शिल्लक दूध विक्रीसाठी परजिल्ह्यांत सर्वेक्षण केले. परंतु, शासनाने दरवाढीचा निर्णय घेतल्यापासून आणि अतिरिक्‍त दूध शासनाकडून योग्य दराने खरेदी न केल्याने जिल्हा दूध संघाला गेल्या १० महिन्यांत सुमारे पाच कोटी ८५ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष, आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. 

नवी दिल्ली : कच्च्या जूटच्या हमीभाव वाढीला केंद्राने मंजुरी दिली आहे. चांगल्या प्रतीच्या कच्च्या जूटला २०१८-१९ मध्ये क्विंटलमागे २०० रुपये वाढ करण्यात आली आहे. यंदा प्रतिक्विंटल ३७०० रुपये हमीभाव देण्याचे जाहीर केले आहे. २०१७-१८ मध्ये जूटला ३५०० रुपये हमीभाव होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत २०१८-१९ च्या हंगामात कच्च्या जूटच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने शेतमालाला हमीभाव देण्यासाठी आणलेल्या A2+FL या सूत्रानुसार कच्च्या जूटला देण्यात आलेला हमीभाव हा उत्पादन खर्चावर ६३.३ टक्के परतावा मिळेल.

कऱ्हाड, जि. सातारा  : रखरखत्या उन्हात राबून शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक घेतले. मात्र, टोमॅटोचे दर गडगडल्याने हे पीक शेतकऱ्यांच्या मुळावर आले आहे. कमी कालावधीत चार पैसे जादाचे मिळतील, या आशेने अनेकांनी कर्ज काढून, व्याजाने पैसे घेऊन टोमॅटो लागवड केली. आता या पिकाला मातीमोल दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, बाजारात टोमॅटो नेण्यासाठी वाहतूक खर्चही अंगावरच फिरत असल्याने सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे.

पुणे : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्यात आली. कृषी यांत्रिकीकरणाचा पुणे जिल्ह्यातील सुमारे २७७७ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे १८ कोटी ९ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद  : मराठवाड्यासह खानदेशातील पाच जिल्ह्यांमधील २३ साखर कारखान्यांनी यंदा ८३ लाख ५४ हजार ६०१. ७ टन उसाचे गाळप केले. यातून सरासरी ९.९४ टक्‍के साखर उताऱ्याने ८३ लाख ५५३ क्‍विंटल साखर उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली. औरंगाबाद, जालना, बीड, नंदूरबार व जळगाव या पाच जिल्ह्यांतील २३ साखर कारखान्यांनी यंदा ऊस गाळपात सहभाग नोंदविला. या २३ कारखान्यांपैकी १६ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. यामध्ये नंदूरबारमधील दोन, जळगावातील दोन, औरंगाबादमधील एक, जालन्यातील पाच तर बीडमधील सहा कारखान्यांचा समावेश आहे.


अकोला : सद्यःस्थितीत हवामान बदलामुळे शेतीवर प्रतिकूल परिणाम दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने शासन नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) राबवला जात आहे. याअंतर्गत येत्या महाराष्ट्रदिनी (१ मे) १५ जिल्ह्यांतील १०६९ गावांमध्ये ग्रामसभा घेऊन त्यात ग्राम कृषी संजीवनी समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे.

वडगाव मावळ, जि. पुणे : गेल्या वर्षी यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड केली होती. यामुळे वेळ व श्रमात मोठी बचत झाली होती. भात उत्पादनातही वाढ झाली होती. त्यामुळे यंदाही यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करण्याचा निर्णय मावळातील भात उत्पादकांनी घेतला आहे. कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून यंदा भात लागवडीसाठी आम्ही तीन शेतकऱ्यांनी यंत्राची खरेदी केल्याची माहिती भात उत्पादक शेतकरी पुंडलिक जोरी यांनी दिली.

पुणे : खरीप हंगामासाठी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने कृषी आयुक्तालयाकडे सुमारे एक लाख २७ हजार ७९९ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी दिल्यानंतर बियाण्यांचा पुरवठा केला जाणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ३ लाख ५६ हजार ३९५ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी प्रस्तावित आहे. यंदा कपाशीच्या क्षेत्रात २० टक्के घट तर सोयाबीन, तुरीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध व्हावेत, यासाठी विविध पिकांच्या १ लाख १० हजार ८७४ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. कपाशीच्या क्षेत्रात २० टक्के घट होण्याचा अंदाज आहे सोयाबीन, तुरीचे क्षेत्र वाढणार आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून दिले जाईल, असे विजय लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांनी सांगितले.

नाशिक  : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यात जलसंधारणाशी संबंधित गेल्या तीन वर्षांत १६ हजारांहून अधिक कामे झाली असून, तब्बल ६४ अब्ज ६३ कोटी ७० लाख लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. या कामांमुळे ओझरखेड धरण भरेल, एवढी पाणी साठवण क्षमता नव्याने निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. नाशिक जिल्ह्यात येवला, नांदगाव, सिन्नर, बागलाण, मालेगावसह अनेक तालुके वर्षानुवर्षे टंचाईच्या झळा सोसत आहेत. यामुळे गावांना टंचाईमुक्त करण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार योजना राबविण्यास सुरवात केली.

नगर  : ‘टोमॅटोचे भरघोस उत्पादन आले, सारं शेत लालभडक झालं. मात्र बाजारात रुपया-दोन रुपये किलोने ते विकावे लागतात. मिळणाऱ्या दरातून मजुरांची रोजंदारी भागत नाही. त्यामुळे हतबल झालेल्या अकोले तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने शेतातले टोमॅटो शेतातच काढून टाकले. त्यामुळे साऱ्या शेतात टोमॅटोचा लालचिखलच दिसत होता. 

पुणे : विदर्भ उन्हात होरपळत असतानाच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही उन्हाचा चटका चांगलाच वाढला. बुधवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील   ११ ठिकाणी तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. मराठवाड्यातील परभणी येथे   राज्यातील उच्चांकी ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

पुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने देशात महाराष्ट्र राज्य आणि पूर्व विदर्भाचा भाग सर्वांत उष्ण ठरत आहे. महाराष्ट्रासह गुजरात, तेलंगणा, राजस्थान राज्यांत अनेक ठिकाणी उन्हाचा चटका वाढला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भासह सर्वंच ठिकाणी तापमान सरासरीच्या वर गेले होते; तर २१ एप्रिल रोजी चंद्रपूर येथे हंगामातील उच्चांकी ४५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. 

जळगाव : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात दोन हजार शेततळी निर्माण करण्याचा लक्ष्यांक देण्यात आला होता. यापैकी आतापर्यंत १८२५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. २८ शेततळ्यांची कामे सुरू आहेत. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत ८ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १११ शेततळी शिंदी (ता. चाळीसगाव) येथे तर नगाव (ता. अमळनेर) येथे ५५ शेततळी पूर्ण झाली आहे. यामुळे ही योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. 

मुंबई : राज्य सरकारने रब्बी २०१७ -१८ च्या हंगामात तीन जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करुन उपाययोजना व मदत जाहीर केली आहे. संबंधित तालुक्यात तातडीने आठ सवलती लागू करण्यात आल्या असून शेतपिकांच्या ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान दिले जाणार आहे.

पुणे : कृषी विभागातील बदल्यांमागे घडणाऱ्या खऱ्या हालचालींना वाचा फोडल्याबद्दल अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘ॲग्रोवन’च्या भूमिकेचे स्वागत केले. नागरी सेवा मंडळाचा ‘क्लोन’ काढून टाकल्याशिवाय पारदर्शकता येणार नाही, असे मत या वेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.