माझीशेती : कृषिविषयक बातमीपत्र (16/05/2018)

पावसाळी अधिवेशन नागपुरात; लगबग सुरू


मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत होणार की नागपुरात, हा तिढा सुटला असून हे अधिवेशन नागपुरात होण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. येत्या चार जुलैपासून हे अधिवेशन सुरू होणार असून, तीन आठवडे इतके कामकाज होणार आहे. यासाठी विधिमंडळाचे, तसेच मंत्रिमंडळ आस्थापनावरील अधिकारी- कर्मचारी यांची लगबग सुरू आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.

सोलापूर, बार्शी बाजार समिती निवडणुकीसाठी मतदार यादी तयार
सोलापूर : न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी बार्शी व सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. सोलापूरसाठी १ लाख १८ हजार ८९९, तर बार्शीसाठी १ लाख ६ हजार १७६ एवढे मतदार अंतिम मतदार यादीत घेण्यात आले आहेत. 

मोहळ तालुक्यात कालव्याला पाणी सुटल्याने फळबागांना दिलासा
मोहोळ, जि. सोलापूर  : उजनीच्या डाव्या कालव्याला पाणी सुटल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. अत्यंत कडक उन्हाळ्यात पाणी सुटल्याने ऊस, मका, भुईमूग, कडवळ या पिकासह डाळिंब, द्राक्ष, बोर, केळी या फळबागांना जीवदान मिळाले आहे.


बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी
जळगाव : बिबट्याच्या हल्ल्यात बोदवड (जि. जळगाव) तालुक्‍यातील एक शेतमजूर गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारार्थ खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मन्साराम भागले (रा. कुसुंबा) असे जखमी शेतमजुराचे नाव आहे. ते कुऱ्हा हरदो शिवारात शेतात काम करीत असताना सोमवारी (ता. 14) सकाळी त्यांच्यावर हल्ला करून बिबट्या नजीकच्या जंगलात पसार झाला. ही घटना घडताच मोठी गर्दी शेतात झाली. इतर शेतकरी घटनास्थळी येताच बिबट्या पसार झाला. यासंदर्भात प्रत्यक्षदर्शी शेतकरी व इतरांनी लागलीच वन विभागाला माहिती दिली. लागलीच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हा बिबट्या सुमारे तीन वर्षांचा आहे. ते रस्ता भरकटून कुऱ्हा हरदो भागात दाखल झाला. हाच बिबट्या या परिसरातील एका झाडावर जाऊन बसल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बिबट्या वन विभागातील कर्मचाऱ्यांनाही दिसला. त्याला नजीकच्या जंगलात कर्मचाऱ्यांनी हुसकावले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

शहादा बाजार समिती बरखास्त करा : स्वाभिमानीची मागणी
नंदुरबार : शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी दरात गहू व हरभऱ्याची खरेदी केल्याप्रकरणी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्याकडे नुकतीच करण्यात आली. 

कापूस, ज्वारी उत्पादकांसाठी ४८ कोटी प्राप्त
जळगाव : जिल्ह्यात मागील हंगामात कापूस, ज्वारी या पिकांसाठी विमा संरक्षण घेतलेल्या ८५ हजार ५७८ पैकी ३० हजार ६६३ शेतकरी विमा संबंधीच्या भरपाईस पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांसाठी ४७ कोटी रुपये निधी प्राप्त झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ८५ हजार शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी विमा कंपनीकडे १६ कोटी ३३ लाख ६२४ हजार रुपये भरले होते. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाईल, असे सांगण्यात आले. 

बौंडअळी, कापूस बियाणे, कर्जमाफीप्रश्‍नी शेतकरी संघटनेचे निवेदन
जळगाव : गुलाबी बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतनिधी मिळावा, कापूस बियाणे लवकरात लवकर विक्री सुरू करावी, अशी मागणी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेतर्फे पारोळा (जि. जळगाव) येथे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली. 


कोळ्यांना प्रशिक्षित करण्यासह होतोय वर्तनाचा अभ्यास
प्राचीन काळापासून माणूस अन्य अनेक प्राण्यांना पाळीव बनविण्याचे प्रयत्न करत आला आहे. त्यातील काही बाबत त्याला यशही आले, तर काही प्राणी मात्र कायमच त्याच्यापासून दूर राहिले. कोळ्यांच्या शरीरातून निघणाऱ्या जाळ्याचे अनेक गुणधर्म मानवासाठी उपयुक्त आहेत. असे जाळे सातत्याने मिळत राहण्यासाठी कोळी पाळण्याचेही विचार भविष्यात माणसांच्या मनामध्ये नक्कीच येणार आहे. अशा वेळी कोळ्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता निर्माण होणार आहे. असेच काही प्रयोग मॅंचेस्टर विद्यापीठामध्ये सुरू असून, त्या अंतर्गत कोळ्याला विविध लांबी, उंचीवरून उड्या मारून भक्ष्य पकडण्यास प्रेरित केले जाते.

बोंड अळी रोखण्यासाठी ‘पंदेकृवि’ देणार बायो कंट्रोल तंत्र
अकोला  : आगामी हंगामात कपाशीवरील बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांपर्यंत कमी खर्चाचे ‘बायो कंट्रोल’ तंत्र पोचविणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली. नुकतीच मुंबईत राज्यस्तरीय खरीप आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी कुलगुरू डॉ. भाले यांनी याबाबत सविस्तर माहिती सादर केली.

पंधरा दिवसांत १६ हजार क्‍विंटल हरभरा खरेदीचे आव्हान
अमरावती  : तुरीसोबतच हरभरा खरेदीचादेखील जिल्ह्यात खेळखंडोबा सुरू असल्याचे चित्र आहे. हरभऱ्याची २९ मे पर्यंत खरेदी होणार असून, उरलेल्या १५ दिवसांत १६ हजार ५४४ शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदीचे आव्हान प्रशासनासमोर आहे. 

पाकमधून आयातीचा परिणाम साखर दरावर होणार नाही
कोल्हापूर /पुणे : देशात पाकिस्तानामधून सुमारे ६० लाख टन साखर आयात केली असल्याच्या बातम्या पसरल्या असल्या तरी प्रत्यक्षात केवळ तीन हजार टन इतकीच साखर आयात झालेली आहे. देशात यंदाच्या हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन आणि गेल्या वर्षीचा शिल्लक साठा लक्षात घेता यंदा ३६० लाख टन साखरेची उपलब्धता राहणार आहे. त्या तुलनेत पाकिस्तानातून आयात झालेल्या साखरेचे प्रमाण किरकोळ असून, साखरेच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले.


केंद्रीय पथक आजपासून मराठवाडा, विदर्भाच्या दौऱ्यावर
औरंगाबाद  : खरीप हंगामात कापूस, धान पिकांचे किडींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीबद्दल मदत करण्याचा निर्णय शासनाने १७ मार्च २०१८ च्या निर्णयान्वये घेतला आहे. त्या अनुषंगाने बुधवारपासून (ता. १६) दोन दिवस केंद्राचे पथक केंद्र शासनास पाठविलेल्या ज्ञापनाच्या अनुषंगाने मराठवाडा आणि विदर्भात पाहणी करणार आहे. मात्र अनेक ठिकाणी शेतकरी पुढील खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. असे असताना हे पथक येऊन काय पाहणी करणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

विदर्भात कृषी खात्यात ७० टक्‍के रिक्‍त पदे
नागपूर (प्रतिनिधी) : या वर्षीच्या बदल्यांसाठी समुपदेशनाचा पॅटर्न कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. विदर्भात सद्यःस्थितीत ७० टक्‍के पदे रिक्‍त असून, बदली प्रक्रियेत ही पदे भरण्यासाठी विदर्भाला झुकते माप देण्याची गरज वरिष्ठ अधिकारी स्तरावरून व्यक्‍त होत आहे. 

खरिपासाठी कापूस बियाण्यांच्या २ कोटी पाकिटांची उपलब्धता
मुंबई  : खरीप २०१८ मध्ये कापूस लागवडीसाठी राज्यात ४२ कंपन्यांच्या माध्यमातून २ कोटी पाकिटे बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असून, साधारणत: ४० लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी प्रथमच सुमारे ५ हजार बियाण्यांचे नमुने पेरणीपूर्व तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.

दूध दराच्या प्रश्नांवर शुक्रवारी लाखगंगा येथे बैठक
औरंगाबाद  : दूध दराच्या प्रश्नावर ग्रामसभेतून फुकट दूधवाटप करण्याचा निर्णय घेऊन सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या लाखगंगा येथे शुक्रवारी (ता. १८) दूध उत्पादकांची महत्त्वपूर्ण बैठक होऊ घातली आहे. या बैठकीत पुढे नेमके काय करायचे, मागणीच्या अनुषंगाने आंदोलनाची पुढील दिशा कशी असावी, याविषयी निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती शेतकरी नेते धनंजय धोर्डे यांनी दिली. 

मोदींनी दाऊदऐवजी पाकिस्तानी साखर आणली
मुंबई : देशात आणि राज्यात यावर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामातील साखर मोठ्या प्रमाणात विक्रीविना पडून आहे. तरीही सरकारने पाकिस्तानातून लाखो टन साखर आयात केली आहे. यामुळे साखरेचे दर कोसळणार असून याचा फटका साखर उद्योगांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. पाकिस्तानातून कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमला भारतात आणण्याचे आश्वासन देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाऊदऐवजी पाकिस्तानची साखर भारतात आणली, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.

'ईव्हीएम'वरून विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल
पुणे : गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या विजयावर ईव्हीएममधील गोंधळ असल्याचे बोलले जात असून, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त करत भाजपवर हल्ला चढविला आहे.

पुणे जिल्हा बॅंकेकडून ५४७ कोटींचे पीककर्ज वाटप

पुणे  : खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक अडचण भासू नये, यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एक एप्रिलपासून पीककर्ज वाटपास सुरवात केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. गेल्या दीड महिन्यात उद्दिष्टाच्या १६९८ कोटी ४२ लाख ७६ हजार रुपयांपैकी ५४७ कोटी ९० लाख ९० हजार रुपये म्हणजेच ३२ टक्के पीककर्ज वाटप केले असल्याचे बॅंकेच्या सूत्रांनी सांगितले.   

भारतीय सैन्याचे रक्त लागलेली पाकिस्तानची साखर कशी खायची ?
मुंबई : या देशातल्या लाखो-करोडो शेतकऱ्यांनी ऊस पिकवला, आज त्या उसातून साखर मोठ्या प्रमाणात या देशात निर्माण झाली आहे. ती गोडाऊनमध्ये असताना पाकिस्तानमधून साखर आणण्याचा केंद्र सरकारने जो घाट घातला आहे, भारतीय सैन्याचे रक्त लागलेली पाकिस्तानची साखर कशी खायची? असा सवाल करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या आयातीच्या धोरणाचा निषेध केला.

मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ दोन टक्के पीककर्ज वाटप
औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत येत्या खरीप हंगामासाठी ९९ कोटी ८४ लाख २६ हजार रुपये म्हणजेच केवळ २ टक्‍के पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाला जूनपर्यंत अपेक्षित उद्दिष्टानुसार कर्जपुरवठा करणे शक्‍य होईल का हा खरा प्रश्‍न आहे. 

Popular Posts