माझीशेती वार्तापत्र (१८/०५/२०१८)

• सातारा जिल्ह्यात २६ टक्के पीककर्जाचे वितरण
सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १६८० कोटी रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी एप्रिलअखेर ४३७ कोटी २३ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या २६ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. त्यात सर्वाधिक जिल्हा बॅंकेने ४१० कोटी ७८ लाख रुपये वाटप केले आहे. रब्बी हंगामाप्रमाणेच खरीप हंगामात राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांच्या दुर्लक्ष सुरू असून, या बॅंकांनी उद्दिष्टांपैकी अवघे तीन टक्के पीककर्ज वितरण केलेले आहे.

• सांगली जिल्ह्यात ६० टक्के क्षेत्रावरील हळद लागवड पूर्ण
सांगली : जिल्ह्यात हळद लागवड अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सुरू झाली. आज अखेर जिल्ह्यात सुमारे ६० टक्के क्षेत्रावर लागवड झाली असून, उर्वरित ४० टक्‍के क्षेत्रावरील लागवड पंधरा दिवसांत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.

• परभणी जिल्ह्यात मोसंबी, संत्रा, पेरूसाठी फळपीक विमा लागू
परभणी : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना २०१८-१९ अंतर्गत मृग बहारासाठी जिल्ह्यातील मोसंबी, संत्रा, पेरू या फळपिकांचा समावेश केला आहे. ३० मंडळामध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे.

• परभणी बाजार समिती सचिवास निलंबित करण्याचे आदेश
परभणी : शासकीय तूर खरेदीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित बैठकीस अनुपस्थित राहिल्यामुळे परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिवांना निलंबित करण्यात यावे, असे आदेश जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी यांनी बाजार समितीच्या सभापतींना दिले आहेत.

• वसमत (हिंगोली) येथे शेतकरी उत्पादक कंपनीकडून ई-नाममध्ये ट्रेडिंग
हिंगोली : वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नामअंतर्गत ट्रेडिंग करणारी सातेफळ (ता. वसमत) येथील सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी ही पहिली शेतकरी कंपनी ठरली आहे. बुधवारी (ता. १६) या शेतकरी उत्पादक कंपनीने ५०० क्विंटल हळदीचे ऑनलाइन ट्रेडिंग केल्याची माहिती सूत्रांनी दिली.


• जुन्या बोर बागांचे पुनरुज्जीवन करण्याचे तंत्र
जुन्या बोर फळबागांची उत्पादकता कमी होत जाते. अशा वेळी या बागा सांभाळणे परवडत नाही. नव्याने बाग लावल्यानंतर उत्पादन घेण्यास सुमारे तीन वर्षे लागतात. अशा वेळी बागेचे पुनरुज्जीवन करण्याचा उत्तम पर्याय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरतो. सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

• चिंच फळधारणेसाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन आवश्‍यक
चिंच फळझाडाच्या फळधारणेसाठी रासायनिक व सेंद्रिय खतांचा संतुलित प्रमाणात पुरवठा करणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्याशिवाय पाण्याची अतिरिक्त मात्रा न देणे, पानोळा व्यवस्थापन व व्योग्य पाणीव्यवस्थापन या बाबीही महत्त्वाच्या आहेत. सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

• नगर जिल्ह्यामध्ये ‘जलयुक्त’मधून साडेतीन हजार कामे पूर्ण

नगर : जलयुक्त शिवार अभियानातून गेल्यावर्षी (२०१७-१८) निवडलेल्या २४१ गावांत कामे जोमाने सुरू केली आहेत. आतापर्यंत या गावांत तब्बल सात हजार ३६ कामे सुरू झाली असून, त्यातील तीन हजार पाचशे आठ कामे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत झालेल्या कामांवर ४३ कोटी पेक्षा जास्त खर्च झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.


• नांदेड, परभणी, हिंगोलीत ३३ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी लटकली
नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत आधारभूत किंमत दराने केली जाणारी तूर खरेदी मंगळवारी (ता. १५) बंद झाल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील नोंदणी केलेल्या ३३ हजार ९७ शेतकऱ्यांची तूर खरेदी लटकली आहे. मंगळवार (ता. १५) पर्यंत या तीन जिल्ह्यांमध्ये २९ हजार ८१ शेतकऱ्यांची ३ लाख ४५ हजार १२६ क्विंटल तूर खरेदी झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

• ग्रामपंचायतीच्या स्वच्छ प्रभागाला मिळणार रोख पुरस्कार
यवतमाळ : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत आता ग्रामपंचायत स्तरावरील प्रभागालादेखील दहा हजार रुपयांच्या बक्षिसाने गौरविले जाणार आहे. त्यामुळे या अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी होऊन स्वच्छता अभियाना एक चळवळ करावी, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.

• सिन्नर बाजार समितीच्या फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका
सिन्नर, जि. नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारातून नाशिक ॲग्रो इंडस्ट्रिज लि.ने कांदा खरेदीपोटी शेतकऱ्यांना दिलेले धनादेश न वटल्याने बाजार समितीने शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून संबंधित फर्मच्या दोघा कांदा व्यापाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या दोघा व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे १६ लाख ३७ हजार रुपये जमा केले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या ६९ शेतकऱ्यांना बुधवारपासून (ता. १६) कांद्याची रक्कम मिळणार आहे.

• बांबू संशोधन आणि प्रशिक्षण : शिक्षणाबरोबर स्वयंरोजगाराची संधी
बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे २ वर्षे कालावधीचा ‘डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी’ हा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या पूर्ण वेळ अभ्यासक्रमासाठी कमीत कमी दहावी पास असणारे विद्यार्थी प्रवेशपात्र असून, यास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची मान्यता आहे. केंद्रातर्फे वसतिगृहाची सुविधा उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना १५०० रुपये दरमहा विद्यावेतनही दिले जाते. अल्पमुदतीच्या या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकावर अधिक भर असून, विद्यार्थ्यांसाठी स्वयंरोजगाराची वाटही प्रशस्त होऊ शकते.

• हिंगोली जिल्ह्यात फळबागांचे वाळून सरपण
हिंगोली : जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील अनेक गाव-शिवारातील फळबागा पाण्याअभावी जागेवरच वाळून गेल्या आहेत. फळबागांचे सरपण झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

• स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राचा प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रिमंडळाकडे : मंत्री खोत

मुंबई : महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव महात्मा फुले कृषी विद्यापीठा(राहुरी)ने तयार केला असून, तो शासनाच्या मान्यतेसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवला असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

• पदोन्नती मिळालेल्या ‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांचे ‘डिमोशन’
अकोला : अमरावती विभागात २०११ मध्ये कृषी सहायकांना दिलेली कृषी पर्यवेक्षक ही पदोन्नती काढून घेतली जाणार असून, या अनुषंगाने मंगळवारी (ता. २२) विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात संबंधितांना उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.

• पारंपरिक शेतीला कृषी पर्यटनाची जोड आवश्यक : कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर
मुंबई : ग्रामीण भागातील पारंपरिक शेतीला कृषी पर्यटनाची जोड मिळाली तर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी पारंपरिक कृषी पद्धती जपून कृषी पर्यटनाला वाव देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले.

• ऊस गाळपास प्रतिटन ६०० रुपये, साखर निर्यातीस १५० रुपये अनुदान द्या
सांगली: साखर दरातील घरसणीमुळे साखर कारखाने अडचणीत आहेत. कारखाने टिकण्यासाठी राज्य शासनाने ऊस गाळपाला प्रतिटन ६०० रुपये अनुदान आणि केंद्र शासनाने निर्यातीसाठी प्रतिटन १५० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी साखर कारखाना अध्यक्ष, प्रतिनिधींच्या वतीने करण्यात आली.

• वृक्ष लागवडीला वन सत्याग्रहाचे स्वरूप देणार : मुनगंटीवार
पुणे : हरित महाराष्‍ट्रासाठी या वर्षीच्या १३ कोटी वृक्ष लागवडीला वन सत्याग्रहाचे स्वरूप देण्यात येणार आहे. तर, वृक्ष लागवड ही केवळ चळवळ न राहता यामाध्यामातून रोजगार निर्मितीदेखील करणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी (ता.१७) पत्रकार परिषदेमध्ये दिली.

• एचटी कपाशीचे बियाणे कृषी विभाग जाळणार
नागपूर : एका खासगी कंपनीच्या धानोरा (जि. बुलडाणा) येथील गोदामात जप्त करण्यात आलेल्या अनधिकृत एचटी कपाशी बियाण्यांच्या भस्मीकरणाला राज्यस्तरीय पर्यावरण समितीने मान्यता दिली आहे. परिणामी लवकरच हा साठा पर्यावरण नियमांच्या आधीन राहून जाळण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.


• 'हमीभाव' कशाला हवा?, आता मार्केटिंग करा : सदाभाऊ खोत
मुंबई : ‘‘हमीभाव कशाला हवा, मार्केटिंग करा’’ असा सल्ला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आयुष्यभराची उत्पादन खर्चावर रास्त भावाच्या मागणीच्या लढाईला सदाभाऊंनी भाजपच्या वळचणीला जाऊन तिलांजली दिल्याचे जुने-जाणते कार्यकर्ते बोलत आहेत.

सविस्तर ठळक बातम्यांसाठी https://www.mazisheti.org/2018/05/18.news.html येथे भेट द्या.