Mazisheti Agrinews 07/07/2018

वनहक्क दावे रखडले; शेतकऱ्यांना निकालाची प्रतीक्षा
नाशिक : मुख्यमंत्र्यांनी वनहक्काचे दावे महिनाभरात निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देऊनही ते काम पूर्ण झालेले नाही. परिणामी, जिल्हाधिकाऱ्यांनी हे दावे निकाली काढण्यासाठी पुन्हा तीन महिन्यांची मुदत संबंधित यंत्रणांना दिली आहे. वृक्ष लागवडीच्या नावाखाली वनहक्क दाव्याची २३०० प्रकरणे वनविभागाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत धूळ खात पडून आहेत.

नाशिक जिल्ह्यात २८ टक्केच खरीप कर्जवाटप
नाशिक : खरीप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला, तरी जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३० हजार ६८४ शेतकऱ्यांना ७३२ कोटी ७३ लाखांचे कर्जवाटप झाले आहे. त्याची टक्केवारी फक्त २७.९१ टक्के आहे. पीककर्जासाठी बँकांनी २६२५ कोटी ७० लाखांचे लक्ष्य ठेवले असताना प्रत्यक्षात वाटप कमी आहे. बँकांनी विविध कारणांनी शेतकऱ्यांना कर्ज न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी सावकारांचे मोठ्या प्रमाणात कर्ज घेतल्याचे बोलले जात आहे.

गडहिंग्लज परिसरात सोयाबीनवर निळा भुंगा
गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : सध्याच्या काळात सततच्या बदलत्या हवामानामुळे सोयाबीनवर निळा भुंगा, तर उसावर हुमणीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. जून महिन्याच्या सुरवातीला चांगला पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. उगवणही चांगली झाली; परंतु महिन्यातील २० दिवसांहून अधिक काळ पावसाने ताण दिला. ऊन आणि रिमझिम पावसामुळे किडींना पोषक हवामान तयार झाले. त्यामुळे सोयाबीनवर निळ्या भुंग्यासह पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला.

दुबार पेरणीसाठी पैसा कुठून आणायचा
सांगली ः रोहिणी, मृग नक्षत्रावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी केलीय. वाफसावर उगवण झाली. पण, आता पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. अगोदरच पेरणीसाठी खर्च झाला आहे. त्यात खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळत नाही. तर दुबार पेरणीसाठी पैसा कुठून आणायचा, असा प्रश्‍न तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पडला आहे.

पुणे जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात भात लागवड सुरू
पुणे  : गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात जोरदार पाऊस बरसत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीस सुरवात केली आहे. येत्या आठवड्यात या लागवडीस आणखी वेग येण्याची शक्‍यता आहे. यंदा सुमारे ६४ हजार ८०० हेक्‍टरवर भात लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाचा आहे.

मराठवाड्यात हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढला
औरंगाबाद : अनुकूल हवामानामुळे सध्या टाकळी माळी परिसरात हुमणीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या परिसरातील शेतकरी गणेश विनायक बुरकूल यांच्या कपाशी लागवडीमध्ये सध्या हुमणीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मराठवाड्यात विविध पिकांच्यामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अवेळी होणारा पाऊस, दोन पावसात पडलेला मोठा खंड या बाबी हुमणीच्या वाढीस कारणीभूत ठरत आहेत.

जायगाव होणार सीताफळांचे गाव
सातारा  : जायगाव (ता. कोरेगाव) या दुष्काळी गावाची पाणीदार गाव म्हणून ओळख झाली आहे. आता सीताफळाचे गाव म्हणून ते ओळखले जाणार आहे. जायगावच्या डोंगररांगांत आणि शिवारात गावातील रोपवाटिकेत तयार केलेल्या एक लाख सीताफळांची रोपे लावण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला आहे. नुकतेच जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते सीताफळाच्या रोप लागवडीस प्रारंभ केला.

राज्यात उसाची लागवड अडीच लाख हेक्टरने वाढणार
पुणे : राज्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा उसाचा पेरा किमान दोन ते अडीच लाख हेक्टरने जादा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मंत्री समितीची बैठक यंदा लवकर घेऊन गाळप हंगामाचा संभ्रम निकालात काढावा लागणार आहे. 

कोकण, घाटमाथा, विदर्भात दमदार पाऊस
पुणे: मॉन्सूनच्या पावसाने जोर धरल्याने कोकण, घाटमाथा, विदर्भात दमदार पाऊस पडत आहे; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढला आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण किनारपट्टी आणि विदर्भात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद होत अतिवृष्टी झाली अाहे. पावसाने नद्यांना पूर आला असून, कोकणात अनेक नद्यांनी पात्र सोडले आहे. धरणांच्या पाणलोटात पडत असलेल्या पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.