माझीशेती कृषी वार्ता ०९/०७/२०१८

यवतमाळ जिल्ह्यात एक हजार शेततळ्यात मत्सशेती
यवतमाळ : शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे. यंदा जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ्यांची निर्मीती झाली आहे. या शेततळ्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी एका हजार शेततळ्यात मत्सशेतीचा अभिनव प्रयोग केला जाणार असून मत्सशेतीसाठी आतापर्यंत ५०० शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली.

जालना जिल्ह्यातील चार तालुक्यात पावसाची हजेरी..
जालना - मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी आणि सोमवारी जालना जिल्ह्यातील चार तालुक्यात कमबॅक केले आहे. जालना, बदनपुर, भोकरदन आणि जाफराबाद ताकलुक्यात पावसाने सोमवारी पहाटे हजेरी लावली. 

अकोल्यातील शेतमाल निर्यातीचा करार
अकोला ः गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील फळे, भाजीपाला निर्यातीच्या क्षेत्रात ठोस पाऊले पडू लागली आहेत. शनिवारी (ता. ७) प्रशासन व संबंधित कंपन्यांमध्ये करार झाला. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केळी, डाळिंब, मिरची व भेंडी या भाजीपालावर्गीय पिकांच्या निर्यातीची मोठी संधी मिळाली आहे.

नांदेड, परभणी, हिंगोलीतील ३० तालुक्यांत पाऊस
नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ३० तालुक्यांतील १४३ मंडळांमध्ये रविवारी (ता. ८) सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा (७३ मिमी), पिंपरखेड (६५ मिमी) या दोन मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे जमीन खरडून गेल्याने पिकांच्या मुळ्या उघड्या पडल्या. गुरुवार (ता. ५) पासून या तीन जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. पिकांतून पाणी वाहिल्यामुळे नुकसान होत आहे. परंतु जून महिन्यात सरासरी न गाठलेल्या मंडळांवर अजूनही पाऊस रुसला असल्यामुळे पेरणी लांबत चालली आहे.

  पन्हाळ्यात आत्मातर्फे भात पीक प्रात्यक्षिक
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या माध्यमातून ४० एकरवर भात पीक प्रात्यक्षिके राबविली जात आहेत. येत्या पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग म्हणून पन्हाळा तालुक्यातील भाताचे आगार समजल्या जाणाऱ्या बाजारभोगाव, किसरुळ, वारणूळ या गावांमध्ये फुले समृद्धी आणि कर्जत ७ या अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित भात जातीची रोपवाटिका तयार करून त्याद्वारे लागवड केली जात आहे. सध्या मुख्य शेतात चिखलणी करून रोपलागण करण्याचे काम चालू आहे.

नगरमध्ये चार पिकांचे बियाणे बदलाचे प्रमाण १०० टक्के
नगर : पिकांची पेरणी, लागवड करताना आता नवीन वाणांचा वापर केला जात आहे. असे असले तरी अजूनही काही पिकांत दरवर्षी बियाणे बदलाचे प्रमाण अल्प आहे. खरिपात बाजरी, कापूस, सूर्यफूल आणि तीळ या चारच पिकांत दरवर्षी बियाणे बदलाचे प्रमाण १०० टक्के आहे. खरीप ज्वारीचे प्रमाण सर्वांत कमी म्हणजे दहा टक्के आहे.

मत्स्य व्यवसायातून मिळाला सव्वा कोटीचा महसूल
नाशिक : नाशिक विभागातील मत्स्य व्यवसाय विभागाच्या ताब्यातील पेसा क्षेत्रातील तलावांव्यतिरिक्त ३०७ पैकी २५३ पाटबंधारे तलावांमधून २०१७-१८ या वर्षात १३ हजार ९७५ मेट्रिक टन मत्स्य उत्पादन झाले आहे. यातून सरकारला २ कोटी ३० लाख ९० हजार ४६१ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

जुन्नर तालुक्‍यातून फलोत्पादन अभियानासाठी सर्वाधिक अर्ज
पुणे  ः एकात्मिक फलोत्पादन अभियानातील (एनएचएम) घटकांच्या अनुदानाचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून ३० जूनपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. यंदा या अभियानासाठी जिल्ह्यातून १३ हजार ६०८ अर्ज दाखल झाले असून, जुन्नर तालुक्‍यातून सर्वाधिक २९९२ अर्ज आले आहेत. शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सर्व तालुका व जिल्हास्तरीय सोडत पुढील आठवड्यात होणार आहे.