Mazisheti agrinews 11/01/2018

सोलापूर जिल्ह्यात ५४ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा ५४ हजार २९७ हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. सोयाबीनने १०० ची टक्केवारी ओलांडली आहे. तुरीची आतापर्यंत ८८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.


पाने खाणाऱ्या अळीमुळे ज्वारीचे नुकसान
जळगाव : जिल्ह्यात ज्वारीची उगवण बऱ्यापैकी झाली आहे, परंतु कमी पाऊस व इतर कारणांमुळे किडींचा प्रकोप वाढला आहे. नियंत्रणासाठी उपाययोजना वा फवारण्या कराव्या लागत असून, त्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे.

सातारा-लातूर महामार्गाच्या कामामुळे शेतपिकांचे नुकसान
सोलापूर  : सातारा-लातूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देताच सुरू आहे. त्यामुळे शेती पिकांचे नुकसान होत असून, त्या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची नुकतीच भेट घेतली. परंतु, आपण कोणत्याही प्रकारचा आदेश दिला नसून, संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटावे, असा सल्ला त्यांनी दिल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे या कामासाठी शेतकऱ्यांचा विरोध असतानाही पोलिस बंदोबस्तात काम करून शेतकऱ्यांवर जबरदस्ती केली जात असल्याचा प्रकारही समोर आला आहे.

पुणे जिल्ह्यात पावसाची हजेरी
पुणे  : जिल्‍ह्याच्या पश्‍चिम भागात असलेल्या तालुक्यांमध्ये तसेच धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे धरणांतील पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये लोणावळा येथे सर्वाधिक १३६ तर भोलावडे येथे १०५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पूर्व भागात असलेल्या तालुक्यांमध्ये ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे.  

सातारा जिल्ह्यात ११२५ शेततळी पूर्ण
सातारा  : मागेल त्याला शेततळे योजनेस सातारा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून उद्दिष्टाच्या दुप्पट म्हणजेच ४१२७ अर्ज प्राप्त झाले असून, ११२५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत; तसेच ४९ शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. सध्या सुरू असलेला पाऊस शेततळी भरण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.   

सोयाबीनचा पेरा ५२ लाख हेक्टरवर
नवी दिल्ली ः देशात आतापर्यंत झालेल्या पेरणीत कापसाखालील क्षेत्र कमी झाले आहे. मात्र कापसानंतर महत्त्वाचे खरीप पीक असलेल्या सोयाबनचा पेरा किंचित घटला असला तरी सरासरी पेरणी झाली आहे. सोयाबीनचा पेरणीत चार टक्के घट झाली असून आतापर्यंत ५२ लाख हेक्टरवर झाला आहे, मागील वर्षी याच काळात ५३ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाने दिली आहे. 

कोल्हापूर रेकवर दोन दिवसांत युरियाची मुबलक उपलब्धता
कोल्हापूर : ऐन खरीप हंगामात पुरेसा खत पुरवठा होत नसल्याने हैराण झालेल्या शेतकरी व विक्रेत्यांना दिलासा मिळणार आहे. येत्या दोन दिवसांत बहुतांशी खत कंपन्या कोल्हापूर रेकला युरियासह आवश्‍यक ती खते आणणार आहेत. खत पुरवठ्याबाबत मंगळवारी (ता. १०) झालेल्या कृषी अधिकारी व कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे वृत्त ॲग्रोवनमध्ये सोमवारी (ता. ९) प्रसिद्ध झाले होते. यानंतर तातडीने बैठक घेऊन कंपन्यांनी जास्तीत जास्त खते कोल्हापूर रेकवर आणावीत, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केल्यानंतर कंपन्यांनी याला सहमती दर्शविली.