Mazisheti Agrinews (02/08/2018)

तारळे परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ; पिकांचे नुकसान
तारळे, जि. सातारा  ः तारळेसह परिसरात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतांना रानडुकरांनी लक्ष्य केले असून ते पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, पीक नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पुणे जिल्ह्यात फलोत्पादन अभियानासाठी १३ हजार ७८९ अर्ज पात्र
पुणे  ः एकात्मिक फलोत्पादन अभियानातील (एनएचएम) घटकांच्या अनुदानाचा लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांकडून ३० जूनपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातून यासाठी १४  हजार ३२५ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १३ हजार ७८९ अर्ज पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या अर्जदारांना अभियानातील घटकांचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर उद्या (ता. ३) सोडत काढण्यात येणार आहे. या वेळी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी विभागाच्या सूत्रांनी केले.

बुलडाण्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस
अकोला  : पावसाळ्याचे दोन महिने उलटले असून, या कालावधीत अकोला-वाशीम या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला अाहे. मात्र लगतच्या बुलडाणा जिल्ह्यात जून आणि जुलै या दोन महिन्यांत पावसाने अपेक्षित सरासरीसुद्धा अोलांडलेली नाही. परिणामी या जिल्ह्यातील लाखो शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत अाहेत. जिल्ह्यात दोन महिन्यांत सरासरी ३४४ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात २४७ मिमी पाऊस झाला. हा पाऊसही असमान झालेला असून, कमी पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे आहेत. परिणामी पाणीटंचाई कायम असून, पिकांची स्थितीसुद्धा जेमतेम अाहे.

पीकविमा योजनेसाठी ९० लाखांहून अधिक अर्ज
पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होण्याचे प्रमाण यंदा गेल्या वर्षीपेक्षा वाढले आहे. मंगळवारी (ता.३१) रात्री बारा वाजेपर्यंत ९० लाखांहून अधिक अर्ज भरण्यात आले असून, शेतकऱ्यांची अर्ज भरण्याची मुदत आता संपली आहे.  

ऊसाला ठिबकसाठी दोन टक्क्याने कर्ज
पुणे : पाण्याची बचत व ऊस उत्पादकता वाढीसाठी कमी व्याजदरात शेतकऱ्यांना कर्ज देण्यास राष्ट्रीयीकृत बॅंका देखील तयार झालेल्या आहेत. केवळ दोन टक्के व्याजात ठिबकसाठी कर्जवाटप लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.


पावसाच्या खंडामुळे पिके संकटात
परभणीः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे वाढीच्या, परिपक्वेतेच्या अवस्थेतील पिकांना पाण्याचा ताण बसला आहे. बहरात आलेली पिके पावसाने दडी मारल्यामुळे संकटात आहेत. उघडिपीमुळे किडींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पिके वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील खरीप संकटात
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पावसाने अद्यापही दमदार हजेरी न लावल्याने खरिप हंगामातील पिके पाण्याअभावी माना टाकू लागल्या आहेत. विशेषतः ऊस, डाळिंब, चारापिके यांना त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. हंगामाच्या सुरवातीला पावसाने चांगली सुरवात केली; पण त्यानंतर त्याने दडी मारली. पावसाळी हंगामातील दोन महिने हातचे गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पीकविमा भरण्याबाबत खानदेशात शेतकरी उदासीन
जळगाव : खानदेशात सुमारे ३१ हजार शेतकरी खरीप पीकविमा योजनेत सहभागापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांचे विमा हप्ते सर्व्हर डाउन, बॅंकांची टाळाटाळ यामुळे भरता आले नाहीत. ऑफलाइन कामकाज सुरू होते, परंतु शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून आली.

यवतमाळमध्ये आजपासून फवारणीबाबत जनजागृती मोहीम
यवतमाळ  : मागील वर्षी फवारणी करताना विषबाधा होऊन २२ शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. यंदा १३ रुग्णांना विषबाधा झाल्याचे निर्देशनास आले आहे. यंदा मागील वर्षीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून गुरुवार (ता. २) ते शनिवार (ता. ४) दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक गावात फवारणीबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच दर १० दिवसांनी आरोग्य तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

शेतकऱ्यांकडील अॅडव्हान्स कापून घेण्यास मान्यता
पुणे: एक ऑगस्टपासून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपये दर देताना संस्थांनी अॅडव्हान्स दिलेला असल्यास त्याची कपात करून घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मात्र, दूधखरेदीच्या बिलाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत जमा करण्याची अट शिथिल केलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कीडनाशकाच्या बाटलीसोबत आता गॉगल आणि मास्क
नागपूर ः राज्यात या पुढे कोणतेही कीडनाशक विक्री करताना त्यासोबत मास्क आणि गॉगल देणे विक्रेत्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात यापूर्वी फवारणीदरम्यान घडलेल्या विषबाधांवर नियंत्रणासाठी हा पर्याय अवलंबिण्यात आल्याची माहिती कृषी खात्याच्या विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

सांगली जिल्ह्यातून ६२ हजार पीकविमा प्रस्ताव
सांगली ः खरीप हंगामातील पीकविम्यासाठी जिल्ह्यातील ६२ हजार ०९८ इतक्‍या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. पीकविम्यापोटी एक कोटी ६५ लाख रुपये बॅंकेत जमा झाले आहेत. गतवर्षी जिल्हा बॅंकेत सुमारे १ लाख १६ हजार ५२४ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. इंटरनेटची रेंज नाही, महाईसेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची अडवणूक, कागदपत्रे मिळविण्यासाठीची धडपड यामुळे यंदा पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसते आहे.

मालेगाव परिसरातील खरीप संकटात
मालेगाव, जि. नाशिक  : गेल्या महिनाभरात शहर व तालुक्यात पावसाचा थेंबही पडलेला नाही. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पेरण्या तर केल्या; पण पिके जगणार कशी? अशी चिंता आता शेतकऱ्यांना सतावत आहे. तालुक्यात ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी बाजरी, ज्वारी, मका व कपाशीला पाण्याअभावी फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

जळगाव जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा १५ टक्के प्रादुर्भाव

जळगाव ः जिल्ह्यातील पूर्वहंगामी कापसाच्या क्षेत्रात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तो सुमारे १५ टक्के असल्याचे नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.