Mazisheti Agrinews (03/08/2018)

राज्यात खरीप अडचणीत
पुणे  : राज्यात खरिपाच्या पेरण्या जवळपास आटोपल्या असून, अनेक भागांत पावसाअभावी पिके धोक्यात आलेली आहेत. बीड, औरंगाबाद, सोलापूर आणि नंदुरबार भागांत ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. नगर जिल्ह्याच्या काही भागांत तर पिके सुकू लागली आहेत. 

बोंड अळी नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्न करा
औरंगाबाद  : बोंड अळीचा प्रादूर्भाव निदर्शनास आला आहे. या बोंड अळीच्या नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज असल्याचे मत औरंगाबादचे अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे यांनी व्यक्‍त केले.

ऑक्‍सिजन वाढीसाठी शेतकऱ्यांची पिके महत्त्वाची
कोल्हापूर : कार्बन क्रेडिटचे योगदान शेतकऱ्याला सर्वाधिक मिळू शकते. परंतु, या बाबत अद्याप फारशी जागृती झाली नाही. वातावरणातील ऑक्‍सिजन वाढीसाठी शेतकऱ्यांची पिके महत्त्वाची ठरतात. त्यांना याचा लाभ झाला पाहिजे, असा सूर गुरुवारी (ता. २) येथे झालेल्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरण शास्त्र विभाग, आणि शेतकरी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ‘कार्बन क्रेडिटस आणि जलव्यवस्थापन’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा झाली.

बोंड अळी निर्मूलनासाठी सूचनांची अंमलबजावणी करा
नांदेडः शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करावा. बेकायदेशीर कीटकनाशके आढळून आल्यास विक्रेत्यावर कडक कारवाई करावी. कृषी विभागाने बोंड अळी नियंत्रणाबाबतची सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवावी. कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर बोंड अळी नियंत्रणाची माहिती दर्शनी भागावर लावण्यात यावी. जिनिंग प्रेसिंग मालकांनी बोंड अळी निर्मूलनासाठी सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.

वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा सोयाबीनवरच भरवसा
अकोला  : गत हंगामात बोंड अळीच्या प्रादुर्भावाचा कापूस पिकाला बसलेला फटका पाहता या वेळी वऱ्हाडातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकालाच पसंती दिल्याचे समोर अाले अाहे. अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत मिळून अातापर्यंत अाठ लाख ६७ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला अाहे. सध्या हे पीक वाढीच्या स्थितीत असून, जूनमधील लागवड झालेल्या पिकाची फुलोरावस्था सुरू झाली अाहे.  

आत्मातर्फे ८३९ गावांत शेतकऱ्यांना कामगंध सापळे देणार
परभणी ः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी परभणी जिल्ह्यातील ८३९ गावांतील प्रत्येकी पाच शेतकऱ्यांना एक एकर कपाशीच्या पिकांमध्ये लावण्यासाठी कामगंध सापळे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बोंड अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या कीटकनाशकांच्या किमतीच्या ५० टक्के अनुदान थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) च्या माध्यमातून बॅंक खात्यावर जमा केली जाणार आहे, या संदर्भात आत्माच्या सूत्रांनी माहिती दिली.

नगर जिल्ह्यात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली
नगर   ः जिल्ह्यात गेल्या २० ते २२ दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे चार लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिके अडचणीत आली आहेत. पाऊस नसल्याने खरीप पिकांची वाढ खुटली आहे. त्याचा थेट फटका उत्पादनाला बसणार असल्याचे दिसत आहे. अजून आठ दिवस पाऊस झाला नाही, तर बऱ्याच ठिकाणी पिके वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

बोंड अळी नियंत्रणासाठी फेरोमोन ट्रॅप लावावेत ः जिल्हाधिकारी पाण्डेय
अकोला  : गत हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बोंड अळी नियंत्रणासाठी कपाशीच्या शेतात फेरोमोन ट्रॅप लावल्यास मोठा फायदा होतो. बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी शेतात तातडीने फेरोमोन ट्रॅप लावावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.

पुणे जिल्ह्यात पावसाअभावी पिके सुकू लागली
पुणे   ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात १५ दिवसांपासून उघडीप दिली आहे. बुधवारी (ता. १) पुणे जिल्हयातील मुळशी, भोर, मावळ, वेल्हे, जुन्नर तालुक्‍यात पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्या. मात्र, पूर्वेकडील भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पाण्याअभावी पिके सुकू लागल्याचे चित्र आहे.

विमा कंपनी विरोधात पाच हजारांवर शेतकरी जाणार ग्राहक मंचात
यवतमाळ ः प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचे पाहून त्रस्त पाच हजारांवर पीकविमाधारक शेतकऱ्यांनी अखेर न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स विमा कंपनीविरोधात हे शेतकरी दाद मागणार असून, इतक्‍या मोठ्या संख्येने शेतकरी न्यायालयाचे दार ठोठावण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. 

खानदेशात पीके पाण्याअभावी कोमजली
जळगाव ः जळगाव आणि धुळे जिल्ह्यात मागील १० ते ११ दिवसांपासून पावसाने आोढ दिली आहे. उकाडा व उष्णता वाढल्याची स्थिती आहे. परिणामी, खरिपाची पिके पाण्याअभावी कोमेजू लागली असून, त्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.