Mazisheti Agrinews (04/08/2018)

खरिपाला लागली पावसाची आस
नाशिक : नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ८७.८० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचे काम पूर्ण केले. तरीही जुलैच्या उत्तरार्धात पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची पिके संकटात आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी  शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

नांदेड जिल्ह्यात ७ लाख ४७ हजार हेक्टरवर पेरणी
नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ७ लाख ४७ हजार ३१३ हेक्टरवर (९२.७८ टक्के) पेरणी झाली आहे. बहुतांश भागातील पेरण्या उरकल्या आहेत; परंतु अद्याप अंतिम पेरणी क्षेत्र निश्चित करण्यात आले नाही. बुधवार (ता. २५) पर्यंतच्या पेरणी अहवालानुसार यंदा जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात सरासरीपेक्षा १ लाख २६ हजार १०९ हेक्टरने वाढ झाली आहे, तर कपाशीच्या क्षेत्रात ५८ हजार ८५७ हेक्टरने घट झाल्याचे स्पष्ट होत आहे.

मराठवाड्यात ४३९२ एकरांवर तुतीची लागवड
औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदा आजपर्यंत ४ हजार ३९२ एकरवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. यंदा तुती लागवडीसाठी मराठवाड्याला ३७०० एकरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पावसाचा खंड असूनही मराठवाड्याने तुती लागवडीसाठी मिळालेले उद्दिष्ट पार केले आहे. यावरून रेशीम उद्योग मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देणारा वाटत असल्याचे अधोरेखित झाले आहे.

सांगली जिल्ह्यात सोयाबीन लागवडीत घट
सांगली ः गेल्यावर्षी शासनाने सोयाबीन हभीमावाने खरेदी करण्यासाठी सातबाराची अट घातली होती. मात्र, मुख्य पिकात सोयाबीन हे आंतरपिक म्हणून घेतले जाते. यामुळे सोयाबीनची नोंद सातबारावर होत नाही. याचा फटका जिल्ह्यातील सोयाबीन पिकाच्या क्षेत्रावर झाला आहे. तसेच सोयाबीनला अपेक्षित दर मिळला नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला. गतवर्षी जिल्ह्यात ४७ हजार ३८५ हेक्‍टर पेरणी झाली होती. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात ३८ हजार ८७० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. अर्थात ८ हजार ५१५ हेक्‍टरने क्षेत्रात घट झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात १ लाख ४० हजार क्विंटल बियाणे विक्री
नांदेड  ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात जुलैअखेरपर्यंत विविध पिकांच्या १ लाख ४० क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून, ४ हजार ९७८ क्विंटल बियाणे शिल्लक आहे. विविध ग्रेडच्या १ लाख ४० हजार ९४८ टन खतांची विक्री झाली असून, ३९ हजार ४९७ क्विंटल खतसाठा शिल्लक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यात दूध उत्पादकांना प्रतिदिन एक कोटी दरवाढ

सातारा ः जिल्ह्यात गाईचे दैनंदिन २० लाख लिटर दूध संकलन होत आहे. राज्य शासनाने दुधास लिटरमागे पाच रुपये वाढ केल्याने जिल्ह्यात प्रतिदिनी एक कोटी रुपये प्रतिदिन अधिक मिळत आहेत. या दरवाढीतून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, धोक्यात आलेला दूध व्यवसाय पुन्हा उभा राहण्यास मदत होणार आहे. 

सोयाबीनचा पेरा १०२ लाख हेक्टरवर
नवी दिल्ली ः देशात कापसाखालील क्षेत्रात घट होऊन तेलबीयांचा पेरा वाढेल अशी शक्यता जणकारांनी पेरणी सुरू होणाच्या आधीच वर्तविली होती. देशात आतापर्यंत १०२ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीत सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली. 

बोंड अळीग्रस्तांना १३५० कोटी वितरित
मुंबई : गेल्या हंगामातील कापसावरील गुलाबी बोंड अळीच्या नुकसानीपोटी राज्य सरकारने राज्य आपत्ती निवारण निधीतून (एसडीआरएफ) १३५० कोटी रुपयांचा दुसरा हप्ता नुकताच वितरित केला आहे. बोंड अळीग्रस्त सुमारे २२ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असे मदत आणि पुनर्वसन विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यता
पुणे : कोकणात आजपासून (ता. ४) तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंत कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली. 

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पडणार ९५ टक्के पाऊस
पुणे : मॉन्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्‍यात (ऑगस्ट ते सप्टेंबर) देशात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने (आयएमडी) जाहीर केला आहे. या अंदाजात ८ टक्के कमी अधिक तफावत राहण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात देशात ९६ टक्के म्हणजेच सर्वसाधारण पाऊस पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.