Mazisheti Agrinews (06/08/2018)

पुणे जिल्ह्यात खरीप कांद्याची ३७७४ हेक्टरवर लागवड
पुणे   ः यंदा पावसाला उशीरा सुरवात झाली. परिणामी, खरीप कांदा लागवडीसदेखील उशिराने सुरवात झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार ७७४ हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. येत्या काळात या लागवडीस आणखी वेग येण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कामगंध सापळ्यांचा सामूहिक वापर करा
औरंगाबाद : कामगंध सापळ्यांचा सामूहिक वापर केल्यास कपाशी पिकाचे होणारे नुकसान टाळता येणे शक्‍य असल्याचे मत कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. किशोर झाडे यांनी व्यक्‍त केले.

काजू, सुपारी, भातासाठी तारण योजना
पुणे ः कोकणातील शेतकऱ्यांना शेतीमाल तारण योजनेचा लाभ मिळावा, यासाठी कोकणातील १० बाजार समित्यांमध्ये काजू, सुपारी आणि भात तारणा योजना पुढील वर्षी राबविण्यात येणार आहे. यासाठी पणन मंडळाच्या वतीने ३ कोटी १० लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. तर काजू तारण योजनेत यंदा १४ शेतकऱ्यांना ७२ टन तारणातून ७२ लाखांचे कर्ज वितरित केले आहे.   

‘एचटी’ बियाणे चौकशीसाठी ‘एसआयटी’ला मुदतवाढ
मुंबई : परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनुक (हर्बिसाइड टॉलरंट ट्रान्सजेनिक जीन-'एचटी’) वापरून बीटी बियाण्यांचे अवैधपणे उत्पादन, साठवणूक आणि विक्री केल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कृषी खात्याने नेमलेल्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) चौकशीसाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. राज्याच्या व्हीआयपी सुरक्षा विभागाचे प्रमुख विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

राज्यात १५ कोटी ८८ लाख वृक्षलागवड
नगर ः दुष्काळावर मात करायची असेल तर ‘‘झाडे लावा झाडे जगवा’’ असे अवाहन करत शासनाच्या तेरा कोटी वृक्षलागवडीची ऑगस्ट महिन्यात मोहीम राबवली. त्याला राज्यभरात उदंड प्रतिसाद मिळाला आहे. महिनाभरात राबवण्यात आलेल्या अभियानातून राज्यातील मुंबईसह छत्तीस जिल्ह्यामध्ये सुमारे १५ कोटी ८८ लाख ७१ हजार ३५२ वृक्षलागवड झाली आहे. यंदा ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा २२.१३ टक्के जास्ती वृक्षलागवड झाली आहे. वृक्षलागवडीत मराठवाड्यातील चार जिल्हे दुपटीने पुढे आहेत.

बियाणे कंपन्यांना ९३ कोटी नुकसानभरपाईची नोटीस
नागपूर ः बोंड अळीच्या नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या १४ लाखांपैकी ९ लाख तक्रारींवर सुनावणी पूर्ण झाली आहे. त्याआधारे बियाणे कंपन्यांना ९३ कोटी रुपयांच्या भरपाईसंदर्भाने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. अमरावती विभागातील पाच जिल्हे आणि बीड जिल्हा या दोनच भागांतील सुनावणी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

कोकण, विदर्भात पावसाचा जोर उद्यापासून वाढणार
पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने शनिवारी (ता. ४) कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. नाशिकमधील सुरगाना येथे सर्वाधिक १५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. पावसाला पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून कोकणात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

सोलापुरात हिरजला होणार रेशीम पार्क
सोलापूर : हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे रेशीम पार्क उभारणीसाठी ६ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, पुढील महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. यामुळे सोलापुरात रेशीम पार्कअंतर्गत कोष बाजारपेठ उभारण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.