Mazisheti Agrinews (08/08/2018)

गिरणा धरणाच्या आवर्तनातून खरिपाची तहान भागणार
जळगाव : जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. खरिपातील पिकांना पाण्याची नितांत गरज असून, त्यासाठी गिरणा धरणातून खरिपासाठी पाण्याचे आवर्तन सोडले जाणार आहे. या संदर्भात अर्जांची प्रक्रिया व पीकस्थिती याबाबत जिल्हा प्रशासनाने नुकतीच चर्चा केली.

थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचे ‘लपून बसा` आंदोलन
चोपडा, जि. जळगाव : चोपडा साखर कारखान्याकडे असलेल्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता.७) पोलिस ठाण्यात ‘लपून बसा` आंदोलन केले. पैसे न मिळाल्यास स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहनाचाही इशारा त्यांनी दिला.

केळी उत्पादनात तमिळनाडूचा दबदबा
जळगाव ः केळी उत्पादनात देशात तमिळनाडूचा यंदा दबदबा राहिला असून, महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात २०१७-१८ मध्ये ३६०० दशलक्ष मेट्रिक टन केळीचे उत्पादन झाले आहे, तर तमिळनाडूने सर्वाधिक ५१३६.२ दशलक्ष मेट्रिक टन केळीचे उत्पादन घेऊन आपली आघाडी राखली आहे. केळी लागवडीतही कर्नाटक व तमिळनाडू आघाडीवर आहेत, तर उत्पादनात महाराष्ट्र गुजरातसह तमिळनाडूच्या तुलनेत मागे राहिल्याची माहिती मिळाली आहे.

तूर, हरभऱ्याचे पैसे मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही
लातूर   ः शासनाच्या खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या तूर व हरभऱ्याचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. सात दिवसांत पैसे देण्याची शासनाची घोषणा फोल ठरली आहे. चार महिन्यानंतरही शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाच्या समोर सोमवारपासून (ता. ६) धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

विदर्भात अाज अतिवृष्टीचा इशारा
पुणे   : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र ठळक झाल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. मंगळवारी (ता. ७) पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात दाट ढग जमा झाले होते. आज (ता. ८) विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दूधदराबाबत अजूनही संभ्रम कायम
नगर ः दूधदरवाढीच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने २५ रुपये लिटर दराने दूध खरेदी करणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार १ ऑगस्टपासून दूध संकलन करणाऱ्या संस्थांनी २५ रुपये दर देणार असल्याचे सांगून खरेदीही सुरू केली. मात्र, अनुदान कसे मिळणार, ३.५ फॅट व ८.५ एसएनएफपेक्षा कमी दर्जाचे दूध खरेदी केल्यानंतर त्याला दर कसा द्यायचा याबाबत अजून काहीसा संभ्रम असल्याने बहुतांश ठिकाणी खरेदीच्या पावत्या देण्याऐवजी त्याची रजिस्टरवर नोंद केली जात आहे. ३.२ फॅट, ८.३ पेक्षा कमी एसएनएफ असलेल्या दुधाला अनुदान मिळणार नसल्याने असे दूध स्वीकारूच नका, असे सांगितले असल्याचे दूध संकलन केंद्र चालक सांगत आहेत.