Mazisheti Agrinews (10/08/2018)

तग धरण्यासाठी बिया वापरतात तीन धोरणे
उष्ण कटिबंधीय वनामध्ये सातत्याने होत असलेल्या बुरशी, जिवाणू, कीटक आणि प्राणी यांच्या हल्ल्यातून विविध झाडांच्या बिया वाचणे अत्यंत मुश्किल असते. अशा स्थितीमध्ये स्वतःला वाचवण्यासाठी बियांच्या नेमक्या कोणत्या बाबी उपयुक्त ठरतात, याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न स्मिथसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इन्स्टिट्यूट येथील संशोधकांनी केला आहे. त्याचा फायदा जंगलांचे संवर्धन, पिकांचे व्यवस्थापन करण्यामध्ये होणार आहे. हे संशोधन जर्नल इकॉलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

ऊसबिल देयके आठ ते दहा दिवसांत देणार
औरंगाबाद : येत्या आठ ते दहा दिवसांत एफआरपीप्रमाणे बिले अदा करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने शेतकरी संघर्ष समितीने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर बुधवारी (ता. ८) सुरू केलेले धरणे आंदोलन अखेर त्याच दिवशी रात्री उशिरा मागे घेतले.

`रावे`अंतर्गत बोंड अळी नियंत्रण मोहीम
परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत घटक तसेच संलग्न मिळून एकूण २७ कृषी महाविद्यालयातील ग्रामीण कृषी कार्यानुभव (रावे)च्या २ हजार २८० विद्यार्थ्यांच्या मदतीने मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील १९८ गावांमध्ये गुलाबी बोंड अळी नियंत्रण मोहीम राबविण्यात येत आहे. येत्या काळात या जनजागृती मोहिमेची व्याप्ती ५०० गावांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील खरिपास पावसाची आस
जळगाव  : जिल्ह्यात मागील १७ दिवसांपासून काही भागांचा अपवाद वगळला तर पाऊस नाही. पश्‍चिम भागातील अमळनेर, पारोळा, पाचोरा, भडगाव, जामनेर, चाळीसगाव भागात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पाऊस नसल्याने पिकांची स्थितीही नाजूक बनत आहे. मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे; पण पाऊस हुलकावणी देत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आहे. 

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना बंद
पुणे: केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ऊस तोडणी यंत्रासाठी (शुगरकेन हार्वेस्टर) दिले जाणारे अनुदान बंद करण्यात आले आहे. ही योजना पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी राज्यातील साखर कारखान्यांनी केली आहे. 

सटाणा बाजार समितीत शेतकऱ्यांना रोख रक्कम देण्याची सक्ती
सटाणा, जि. नाशिक  : येथील बाजार समितीत शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना रोख पेमेंट देण्याची सर्व व्यापाऱ्यांना सक्ती करण्यात आली असून, सोमवारपासून (ता. ६) या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरवात झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती मंगला सोनवणे यांनी दिली.