माझीशेती कृषीविषयक वार्तापत्र [ ०८/०९/२०१८] :

     कृषीविषयक घडामोडी:

  • टोमॅटोची पट्टी रुपया ! (व्हिडिओसह). 


सासवड, जि. पुणे : येथील संतोष जगताप या शेतकऱ्याने ४०० किलो टोमॅटो विक्रीसाठी मुंबईला पाठविला होता. सर्व खर्च वजा जाता त्यांच्या हातात एक रुपया पडला आहे. आता मजुरी कशी द्यायची, असा प्रश्‍न जगताप यांना पडला आहे. 


असा 
  • परतीच्या माॅन्सूनसाठी हवामान घटक अनुकूल. 

 
दक्षिण कोकण व दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढणार असून मध्य, उत्तर व पूर्व महाराष्ट्र म्हणजेच उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रापासून पूर्वेस व दक्षिणेस हवेचा दाब १००८ हेप्टापास्कल इतका वाढेल, तेव्हा हवामान ढगाळ राहील आणि विदर्भात व कोकणात अत्यल्प पावसाची शक्‍यता तर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र व पश्‍चिम महाराष्ट्रात पावसात उघडीप राहील. उत्तर भारतातील काश्मीरचा भाग, पंजाब व हरियानाचा भाग तसेच उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, सिक्कीम या भागांवर केवळ १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे त्या भागात मध्य स्वरूपात पावसाची शक्‍यता राहील. याचाच अर्थ असा की अद्यापही त्या भागात नैऋत्य माॅन्सून सुरूच राहील. तीच स्थिती ओरिसा भागात राहील. बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे हळूहळू नैऋत्य मॉन्सूनचा प्रभाव कमी होत जाईल. मात्र ही स्थिती पुढे आणखी बदलेल. ९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल आणि महाराष्ट्रातील पाऊस थांबेल तर १० सप्टेंबर रोजी उत्तर दक्षिण दिशेने महाराष्ट्राच्या पूर्व भागावर १००८ तर पश्‍चिम भागावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्या वेळी महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागात कोकणासह पाऊस थांबेल.


  • जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू. 


जळगाव : कमी दर्जाचा शेतीमाल किंवा धान्य (नॉन एफएक्‍यू) हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करण्याची मुभा शासनाच्या यंत्रणांनी दिल्याने जिल्ह्यातील जळगाव, पाचोरा, चाळीसगाव येथील बाजार समित्या सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी मुगाची खरेदी सुरू झाली आहे. परंतु चोपडा, जळगाव, अमळनेर येथील काही व्यापाऱ्यांनी आपल्याला नॉन एफएक्‍यू शेतीमाल हमीभावापेक्षा कमी दरात खरेदीसंबंधी लेखी हमी किंवा पत्र शासनाने द्यावे, अशी भूमिका कायम ठेवली आहे.


  • व्यवस्थापनाद्वारे मिरची उत्पादनवाढ शक्‍य. 

नंदुरबार : मिरची पीक नाजूक आहे. या पिकाचे योग्य व्यवस्थापन अगदी रोपावस्थेपासून करणे आवश्‍यक आहे. या अवस्थेत रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो. तो न रोखल्यास विषाणूजन्य रोगांचे आक्रमण पिकावर होते, असे मत तज्ज्ञांनी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

  • ‘वसाका`बाबत दुसरा पर्याय सुचवा : आमदार आहेर. 

कळवण, जि. नाशिक : ‘‘वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास देण्याऐवजी दुसरा कोणताही सक्षम पर्याय असल्यास सर्वांच्या सहकार्याने त्यासाठी प्रयत्न करण्यास तयार आहोत``, अशी ग्वाही ‘वसाका`चे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली.

  • हळद उत्पादनात भारत अग्रेसर. 


सांगली ः भारत जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक देश आहे. जगात उत्पादित होणाऱ्या एकूण उत्पादनापैकी ७५ टक्के उत्पादन भारतात होते. गुणवत्ता चांगली असल्याने हळदीला देशांतर्गत आणि परदेशातही मोठी मागणी आहे. देशातून गेल्या पाच वर्षापासून हळदीची ८ ते १० टक्के निर्यात होत आहे. गेल्या वर्षी दाेन टक्‍क्‍यांनी वाढू होऊन १२ टक्के निर्यात झाली होती. 


  • नाशिक जिल्हा वनहक्क दावे निपटाऱ्यात राज्यात अव्वल. 

नाशिक  : आदिवासींनी अतिक्रमित केलेली वनजमीन ताब्यात देणाऱ्या वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत नाशिक जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. प्रलंबित दाव्यांचा निपटारा करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात तीन समित्या तयार करण्यात आल्यामुळे प्रत्येक दिवशी सुमारे ७०० दाव्यांना मंजुरी दिली जात आहे.

  • विदर्भ, कोकणात आज पावसाचा अंदाज. 

पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. या ठळक प्रणालीमुळे आज (ता. ८) विदर्भासह कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात मुख्यतः हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामानातील बदलामुळे तापमानातही चढ-उतार होत अाहेत.  

  • बोंड अळी काही प्रमाणात नियंत्रणात : कृषी विभागाचा दावा. 


पुणे  : राज्यातील कपाशीच्या एकूण क्षेत्रापैकी सध्या बोंड अळीचे संकट पाच टक्क्यांपेक्षाही कमी क्षेत्रावर आहे. पाऊस व क्रॉपसॅपमधील उपाययोजनांमुळे १०० गावांमधील बोंड अळी नियंत्रणात आली आहे, असा दावा कृषी विभागाने केला आहे.  



  • अकोला जिल्ह्यात प्रकल्प भरल्याने रब्बीसाठी मिळणार पाणी.

अकोला  ः गेल्या दोन वर्षांत प्रथमच अकोला जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प तुडुंब भरले अाहेत. यामुळे येत्या रब्बी हंगामासाठी प्रकल्पांमधून पाणी उपलब्ध होणार अाहे. हे पाणी देण्यापूर्वी जिल्ह्यात असलेले बहुतांश कालवे मोकळे केले जाणार अाहेत. येत्या अाठवड्यात कालवे स्वच्छतेचे काम सुरू होणार अाहे. शुक्रवारी (ता. ७) येथे झालेल्या जलसंधारण कार्यशाळेत कालवा स्वच्छतेसाठी तातडीने यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे अाश्वासन देण्यात अाले अाहे. जिल्ह्याचा जल व मृदसंधारण विभाग यासाठी पुढाकार घेत अाहे.  


  • सरकार इथेनॉलचे दर वाढविण्याच्या विचारात. 


नवी दिल्ली ः देशात २०१८-१९ च्या गाळप हंगामात अतिरिक्त साखरेचा प्रश्न जटील होण्याची शक्यता असल्याने कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे वळावे, यासाठी केंद्र सरकार इथेनॉलच्या दरात वाढ करण्याचा विचार करत आहे. बी-हेवी मोलॅसिसपासून (साखर तयार करण्याऐवजी उसाच्या रसाचा इथेनॉलनिर्मितीसाठी वापर) तयार होणाऱ्या इथेनॉलला प्रतिलिटर ५३ रुपये, तर १०० टक्के संपृक्त (कॉन्सन्ट्रेटेड) उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी प्रतिलिटर ५९ रुपये दर जाहीर केला जाण्याची शक्यता आहे, असे या निर्णय प्रक्रियेशी संबंधित सूत्रांनी सांगितले.  


  • अन्न प्रक्रिया योजना नियमांच्या कात्रीत. 


कोल्हापूर : प्रक्रिया उद्योग वाढावेत म्हणून सुरू केलेल्या मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेतील प्रस्ताव राष्ट्रीयीकृत बॅंकांनी कर्जपुरवठा केला नाही म्हणून शासनाने प्रलंबित ठेवले आहेत. सहकारी बॅंकांनी केलेल्या कर्जपुरवठ्याला शासनाने केराची टोपली दाखविली आहे. प्रक्रिया उद्याेगाचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी जागृती होत असताना शासनाने नियमांच्या कात्रीत प्रस्ताव अडकून ठेवल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. 



  • ‘ग्लायफोसेट’ची सुनावणी पूर्ण. 


पुणे : राज्यात ‘ग्लायफोसेट’ तणनाशकावर बंदी आणण्याबाबत कृषी खात्याने रासायनिक कंपन्यांच्या सुनावणीचे कामकाज पूर्ण केले आहे. आता आठवड्याच्या आत याबाबत कृषी आयुक्तालयाकडून निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 



  • संग्रामपूर येथे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे जनावरांसह उपोषण. 


संग्रामपूर, जि. बुलडाणा  ः कर्जमाफी तसेच नवीन पीककर्जाच्या मागणीसाठी येथील बँक शाखांसमोर शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले. मात्र चार दिवसांपासून याची दखल घेतली जात नसल्याने शेतकरी शुक्रवारी (ता. ७) जनावरांसह उपोषणाला बसले होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी प्रशासन व बँकांकडून मागण्यांबाबत लेखी आश्‍वासन मिळाल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.


  • तापमानातील वाढीमुळे किडींचा उद्रेक वाढण्याची शक्यता.


कृषी क्षेत्रामध्ये विविध किडींचा उद्रेक वेगाने वाढत आहे. तयार होत असलेल्या अन्नाचा बारावा भाग हा किडींकडून फस्त होतो. वातावरणातील बदलांचे किडींवरील परिणामांचे विश्लेषण संशोधकांनी केले आहे. वाढत असलेल्या तापमानामुळे किडींच्या चयापचयाच्या वेगामध्ये वाढ होत असून, त्यांच्या खाण्याचे प्रमाण व वेग वाढत आहे. भविष्यामध्ये किडी पिकांचा अधिक प्रमाणात फडशा पाडण्याचा धोका `सायन्स` या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. 


  • उद्याचे हवामान :
तापमान :- १८ अंश से ते २८ अंश से . 
पाऊसमान :- ढगाळवतावरण हलका पाऊस . 
आद्रता  :- ६४ % . 
वारे :- १ m /s 


  • पीक सल्ला :
  • सोयाबीन वरील मोझॅइक रोग :
या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यावर पानांचा आकार लहान होऊन पाने पिवळसर होतात व त्याची वाढ खुंटते 
तसेच शेंगा कमी लागतात व शेंगात दाणे भारत नाहीत . 
  • नियंत्रण :
१] रोगग्रस्थ  झाडे उपटून नष्ट करावीत . 
२] तणांचे नियंत्रण वेळेवर करावे . 
३] मावा,तुडतुडे,पंढरीमाशी  या किडीचे नियंत्रण करावे .