माझीशेती कृषीविषयक वार्तापत्र [२०१८/०९/१०]:

कृषीविषयक घडामोडी :


  • पेट्रोल, डिझेलची सोळावी दरवाढ !. 


नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयात होणारी घसरण, तसेच जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे इंधन दरवाढ आज (सोमवार) सलग सोळाव्या दिवशी पाहायला मिळाली. पेट्रोलच्या दरात 23 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 32 पैशांनी वाढ झाली.



  • नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची मदार कृषी विभागावरच. 


नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून यंदा (२०१८-१९) नगर जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या ७०८७ कामांपैकी सर्वाधिक ५०६० कामे कृषी विभाग करणार आहे. २४८ कोटींच्या आराखड्यात १२१ कोटी ९२ लाख रुपये कृषी विभाग खर्च करणार आहे. त्यामुळे यंदा होणाऱ्या कामांत `जलयुक्त`ची सगळी मदार कृषी विभागावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेने जलयुक्तच्या कामात फार जबबादारी घेतलेली नाही.



  • पुणे विभागात पाणीटंचाई वाढण्याची शक्यता. 

पुणे   : सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीपासून पुणे विभागातील बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली आहे. पुणे, सातारा जिल्ह्यांतील कोरडवाहू पट्ट्यात पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाई कायम आहे. पुण्यातील बारामती आणि साताऱ्यातील माण तालुक्यात पाणीटंचाई वाढत असून, पुढील काळात इतरही भागात टंचाई वाढण्याची शक्यता आहे. पुणे, साताऱ्यातील १७ गावे ९३ वाड्यांमध्ये पाणीटंचाई भासत असून, पाणीपुरवठ्यासाठी १५ टॅंकर सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.  



  • कोल्हापूर जिल्ह्यात तीन नवीन तलावांना मंजुरी. 


कोल्हापूर : जिल्ह्यात तीन नवीन तलावांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. दोन साठवण तर एक लघुसिंचन प्रकल्पाचे प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी जलसंधारण विभागाकडे पाठवले होते. ते मंजूर झाले आहेत. औरंगाबाद येथे झालेल्या जलसंधारण महामंडळाच्या बैठकीत तीनही प्रकल्पांना मंजुरी दिली. यातील दोन साठवण तलाव कागल तालुक्‍यात तर एक लघुप्रकल्प चंदगडमध्ये होणार आहे. यामुळे १०६५ एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती.



  • नांदेड, परभणी, हिंगोलीसाठी ८९३ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट. 


परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील विविध बॅंकांना येत्या रब्बी हंगामात ८९३ कोटी ३४ लाख ३४ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु सद्यःस्थितीत खरीप पीक कर्ज वाटपाची गती अत्यंत धीमी आहे. त्यामुळे रब्बी पीक कर्ज वाटप लांबणीवर पडणार आहे.



  • नगरमध्ये गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ४० टक्के कमी पाऊस. 


नगर   ः आता पावसाळ्याचे तीन महिने संपले असले तरी अजूनही जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. केवळ अकोले तालुक्‍यात झालेल्या पावसावरच धरणातील पाणीसाठा वाढला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत तब्बल ४० टक्के कमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये पाऊस नसला तरी अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पाऊस सुरू होता. आता तेथेही जवळपास पाऊस थांबला आहे.  



  • कामचुकार कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करू : कृषी आयुक्त. 


यवतमाळ   : गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बोंड अळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाण्याचे आदेश दिले आहेत. यानंतरही जे अधिकारी, कर्मचारी कामचुकारपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिला.



  • इलेक्ट्रीक ट्रॅक्टर. 


मध्य फ्रान्स येथील ॲलेक्झांड्रे प्रेवॉल्ट (वय ३० वर्षे) इलेक्ट्रीक ट्रॅक्टर विकसित केला आहे. त्याला अल्पो (ALPO) असे नाव दिले असून, त्याचे प्रदर्शन नुकतेच मॅलिनट्राट शहराशेजारच्या शेतांमध्ये करण्यात आले. ते स्वत मेकॅट्रोनिक अभियंते असून, त्यांनी सहा लिव्हर (जॉयस्टिक)वर चालणाऱ्या पर्यावरणपुरक ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. दोन मोठ्या चाकांच्या मध्ये लावण्यात आलेल्या दोन लिथियम बॅटरीवर हा ट्रॅक्टर आठ तासांपर्यंत सेवा देऊ शकतो. या ट्रॅक्टरचे वजन ४५० किलो आहे.



  • तूर, हरभऱ्याचे थकीत १६३ कोटी वर्ग करा : ‘नाफेड’चे व्यवस्थापकीय संचालक. 


मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीवर खरेदी झालेल्या तूर आणि हरभऱ्याचे थकीत १६३ कोटींचे चुकारे आज (ता. १०) राज्य पणन महासंघाकडे वर्ग करण्याचे निर्देश ‘नाफेड’ने दिले आहेत. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या हाती चुकाऱ्यांचे पैसे उपलब्ध होतील, अशी आशा आहे. 



  • समृद्धी महामार्गाचा खर्च वाढता वाढे. 

मुंबई ः फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या खर्चाचा आकडा वाढता वाढतच चालला आहे. सुरुवातीच्या ३६ हजार कोटींवरून अवघ्या दोनच वर्षांत हा आकडा ५५ हजार कोटींच्याही पुढे पोचला आहे. 


  • राज्यात उन्हाचा चटका वाढला. 

पुणे : राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असून उर्वरीत राज्यात तुरळक पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला अाहे. 


  • आज पुंज रे बैलाले, फेडा उपकाराचं देनं.


पुणे : जवळपास निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात आज बैलपोळा सण मोठ्या पारंपारिक उत्साह आणि आनंदाने साजरा केला जात आहे. कमी-अधिक पाऊसमानाचे सावट या सणावर असले तरी बळीराजाने वृषभराजाप्रति आपली कृतज्ञता कोठेही कमी केलेली नाही. आप-आपल्यापरीने शेतकऱ्यांनी सण साजरा करण्याच्या तयारी केली आहे. सणा करिताचा बाजारहाट झाला असून आज दुपारपर्यंत आपल्या लाडक्या सर्जा-राजांसह गाय-वासरु आणि इतर पाळीव जनावरांच्या सजावटीचे काम चालेल. यानंतर गावात देवदर्शन झाल्यावर गावोगावी पोळा फुटेल. गावातून घरी आल्यानंतर वृषभराजाची मनोभावे पुजा केली जाईल..



  • ..माजलगाव तालुक्यात उसाला ‘हुमणी’चे ग्रहण. 


माजलगाव, जि. बीड  : कापसाचे पिके सलाइनवर आहे. कापूस, सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात आहे. त्यातच आता उसालाही ‘हुमणी’चे ग्रहण लागल्याने तालुक्यातील १७ हजार हेक्टरवरील उसाचे पीक धोक्यात आले आहे.




उद्याचे हवामान :
तापमान  :-१७ अंश से ते ३० अंश से . 
पाऊसमान  :- मुख्यत्तः स्वच्छ 
आद्रता  :- ९३ % . 
वारे  :-  २ m /s . 


पीक सल्ला :
 भात पिकावरील खेकडा हे कीड :
खेकडे भाताची रोपे जमिनीबाहेर कातरून टाकतात . तशेच शेताच्या बांध्यात असंख्य बिळे पाडतात . त्यामुळे शेतात पाणी साचून राहत नाही . त्यामुळे कधी 
कधी पिकास पाण्याचा तुटवडा भासतो . 
नियंत्रण :
१] खेकडे  गोळा करून त्यांचा नाश करावा . 
२] बेडूक खेकड्यांच्या बंदोबस्त करतो म्हणून बेडकांचे स्ववंर्धन करावे . 
३] खेकड्याच्या  नियंत्रणासाठी शीजवलेल्या भातात फोरेट १०% किंवा किवनॉलफॉस १.५ % भुकटी किंवा कार्बाफुरण ३% मिसळून गोळ्या तयार करून त्या 
    खेकड्याच्या बिळांमध्ये टाकाव्यात व बिळे बंद करावीत .