माझीशेती कृषीविषयक वार्तापत्र (12/09/2018)

    कृषीविषयक घडामोडी :


  • अंगणवाड्यांमधील शेवयांचा आहार ठरतोय जीवघेणा. 


जळगाव : अंगणवाडीत बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारातील शेवयांचे प्रकरण शालेय पोषण आहाराप्रमाणे गाजू लागले आहे. बुरशीयुक्‍त शेवयांचा पुरवठा आणि आता असोदा येथे शेवया खाल्ल्याने बालकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या शेवया बालकांच्या जिवावर उठल्या असून, याबाबत आवाज उठविणाऱ्या सदस्यांचा आवाज सभागृहातच दाबला जात आहे, तर प्रशासनात मात्र कारवाईबाबत बोंबाबोंब दिसत आहे.



  • कोल्हापुरात यांत्रिकीकरण योजनेचे अनुदान थकले. 


कोल्हापूर : कृषी यांत्रिकीकरण योजना अद्यापही थकबाकीतच अडकली आहे. २०१७-१८ चे थकीत अनुदान शेतकऱ्यांना दिल्याशिवाय २०१८-१९ च्या सोडती काढू नका, अशा सूचना आल्याने आता जिल्ह्यात यांत्रिकीकरण योजनेच्या यंदाच्या सोडतीचे कामकाजही ठप्प झाले आहे.



  • जत तालुक्यातील गावांना पाणीटंचाईच्या झळा. 


सांगली : बेबंद पाणीउपसा, भूगर्भातील घटलेला पाणीसाठा, वाढते तापमान आणि कमी पाऊसमान, यामुळे जत तालुक्‍याला दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईस तोंड द्यावे लागत आहे. विशेषत: पूर्व भागातील जवळपास ५० गावे टंचाइने त्रस्त झाली आहेत. सहा गावांना अधिग्रहण केलेल्या विहिरी, कूपनलिकेतून पाणीपुरवठा सुरू आहे. याबरोबरच १६ गावांकडून टॅंकरची मागणी करण्यात आली आहे.



  • शेतीमाल खरेदीकरिता अभिकर्ता नियुक्तीसाठी ‘महाएफपीसी’चे प्रयत्न. 


पुणे   : राज्यात हमीभाव योजनेअंतर्गत शेतमालाची खरेदी करण्यासाठी अभिकर्ता संस्था म्हणून मान्यता मिळावी, यासाठी ‘महाएफपीसी’कडून जोरदार पाठपुरावा सुरू आहे. पणन विभागाकडून याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे.



  • पुणे विभागात तेलबिया पिकांची १ लाख ७० हजार हेक्टरवर पेरणी. 


पुणे ः दिवसेंदिवसे खाद्यतेलास मागणी वाढत आहे. त्यामुळे तेलबिया पिकांची पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. पुणे विभागात तेलबिया पिकांचे सरासरी क्षेत्र एक लाख ४० हजार ५२० हेक्टर आहे. त्यापैकी खरिपात एक लाख ७० हजार ३६० हेक्टरवर म्हणजेच १२१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.



  • राज्यात पाणीटंचाई वाढण्यास सुरवात. 


पुणे  : ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने पाणीटंचाई कमी होत असल्याचे चित्र असतानाच, सप्टेंबर महिन्यात राज्यातील पाणीटंचाईची तीव्रता पुन्हा वाढू लागली आहे. औरंगाबाद जिल्ह्याला पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा बसत असून, गेल्या आठवडाभरामध्ये नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई वाढल्याचे स्पष्ट होत आहे. पावसाच्या दडीने राज्यातील इतरही भागात पुढील काळात टंचाई वाढणार आहे.



  • सातारा जिल्ह्यात स्ट्रॅाबेरी लागवडपूर्व कामे वेगात सुरू. 


सातारा  ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्र्वर तालुक्यातील स्ट्रॅाबेरीच्या लागवडपूर्व कामांना गती आली आहे. पावसाने उघडीप दिल्याने जमिनीची मशागत करणे, मल्चिंग, बेड सोडणे आदी कामांमध्ये शेतकरी सध्या व्यस्त असल्याचे चित्र महाबळेश्र्वर तालुक्यात दिसत आहे.



  • मराठवाड्यात सोयाबीन,कपाशीला पावसाच्या खंडाचा फटका. 


औरंगाबाद   : यंदा पावसाळ्याची सुरवात चांगली झाली. मात्र जून मध्य ते ऑगस्टदरम्यान पावसाच्या खंडाला सामोरे जावे लागले होते. सध्या पुन्हा एकदा मराठवाड्यातील पिकांना पावसाच्या खंडाचा सामना करावा लागत आहे. जवळपास २२ ऑगस्टपासून मराठवाड्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेंग अवस्थेत असलेले सोयाबीन व बोंड अवस्थेत असलेल्या कपाशीवर संकटाचे ढग गडद झाले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा एकदा आकाशाकडे लागल्या आहेत.



  • नगर जिल्ह्यातील ९० गावांना दूषित पाणीपुरवठा. 

नगर  ः ग्रामीण भागाला शुद्ध पाणीपुरवठा करावा असे शासनाचे आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जिल्हाभरात सध्या सुमारे ९० गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यात पारनेर तालुक्‍यातील सर्वाधिक गावे असल्याची बाब आरोग्य विभागाच्या मासिक तपासणीत स्पष्ट झाली आहे.


  • हमीभाव नसलेल्या पिकांसाठी ‘एसएमपी’ : पणनमंत्री देशमुख. 

मुंबई  : ``ज्या पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) जाहीर केली जात नाही, त्या पिकांसाठी वैधानिक किमान किंमत (एसएमपी) जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांची या पिकांच्या बाजारभावात होणारी फसवणूक थांबवावी, हा त्यामागचा उद्देश आहे. व्यापाऱ्यांनी एमएसपी आणि एसएमपी यातील फरक समजून घ्यावा,`` असे आवाहन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी (ता. १०) केले.


  • उडदालाही मिळेना हमीभाव. 

जळगाव ः मुगानंतर आता उडदाचे उत्पादन घरात आले आहे, त्यातच हमीभावाच्या मुद्द्यावरून ठप्प असलेले काही बाजार समित्यांचे कामकाज हवे तसे गतिमान झालेले नाही. परंतु जळगाव बाजार समितीत मात्र सोमवारी (ता. १०) मूग व उडदाचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लिलाव झाले. या वेळी उडदाला केंद्राने प्रतिक्विंटल ५६०० रुपये दर जाहीर केला असताना, खासगी बाजारात ४००० ते ४५०० रुपये दर देण्यात आले. 


  • केळी बाजार सावरला. 

जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार किंवा निर्यातक्षम केळीला १३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळाले आहेत. निर्यातक्षम केळीला २५० रुपये प्रतिक्विंटल, असे ऑनचे (जादा) दर मिळत आहे. पिलबाग केळीमधील कापणी जवळपास आटोपली आहे. यावल, मुक्ताईनगर, रावेरातून केळीचा पुरवठा कमी झाला आहे. केळीची जाहीर दरांपेक्षा कमी दरात खरेदी व व्यापाऱ्यांकडून पिळवणूक यासंबंधी ‘ॲग्रोवन’ने मागील महिन्यात प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेची दखल घेत दरांची काटेकोर अंमलबजावणीसंबंधी खरेदीदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे अर्ली कांदेबाग केळीला भावफरकही दिला जात आहे.



  • काटेकोर छाननीमुळे ठिबक अनुदानाचे अडीच लाख अर्ज रद्द

पुणे: राज्यात ठिबकपासून वंचित राहिलेल्या खऱ्या लाभार्थ्यांना अनुदान देण्याचा प्रयत्न कृषी खात्याने सुरू केला आहे. त्यासाठी काटेकोरपणे केलेल्या छाननीतून तब्बत अडीच लाख अर्ज रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 


  • तापमानाचा ‘पारा’ चढला. 

पुणे: पावसाने दडी मारताच राज्यात निरभ्र आकाश होत आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येऊ लागल्याने उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. तापमानाचा ‘पारा’ चढल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. मंगळवारी (ता.११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पोषक हवामान नसल्याने काही दिवस पावसाची मुख्यत: उघडीप राहणार असून, तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता अाहे. 

  • वऱ्हाडात खरिपात केवळ ३० टक्क्यांपर्यंत पीककर्ज वितरण. 


अकोला  ः शासनाने शेतकऱ्यांना अार्थिक पाठबळ देण्यासाठी या हंगामात पीक कर्जवाटपाच्या उद्दिष्टात मोठी वाढ केली; परंतु ही वाढ केवळ अाकड्यांपुरतीच शिल्लक राहिली असून, यंदाच्या खरीप हंगामात केवळ सरासरी ३० टक्क्यांपर्यंत पीककर्ज वितरित झाले आहे. पुढील महिन्यापासून रब्बी हंगाम सुरू होत असून, त्यासाठी पीक कर्जवाटप करण्याचे नियोजन अाहे.  


उद्याचे हवामान :-
तापमान  :-१९ अंश से ते ३१ अंश से . 
पाऊसमान  :- ढगाळ वातावरण . 
आद्रता  :- ६५ %
वारे :- उत्तरेकडून दक्षिणेकडे  १ m /s 

पीक सल्ला :
मिरची :
या पिकांवर फुलकिडे ,मावा ,व कोळी या  प्रमुख किडी आहेत . बीजप्रक्रिया इमिडाक्लोप्रिड / कर्बोसल्फान  
+ट्रायकोडर्मा +याची करावी . वाफ्यात निबोळी पेंड टाकावी . रोपे लावतेवेळी  इमिडाक्लोप्रिड / कर्बोसल्फान+ट्रायकोडर्मा+द्रावणात रोपे ३ तास बुडवून लागण करावी . शेतात निबोळी पेंड /ट्रायकोडर्मा +/कर्बोफुयरॉन दाणेदार जमिनित मिसळावी . सर्व किडीच्या नियंत्रणासाठी ५ % निबोळी अर्क , व्हर्टिसीलियम २० ग्राम , व्हर्मीमेक ,५ मिली . मनोक्रोटोफॉस १५ मिली असिफेट २० ग्राम प्रति १० लिटर पाण्यात फवारण्या कराव्यात . 
,