माझीशेती कृषीविषयक वार्तापत्र [२०१८/०९/११]:

कृषीविषयक घडामोडी . 


गढूळ पाण्याच्या प्रवाहावर प्रक्रियेसाठी खनिजमिश्रित वाळूची यंत्रणा. 
पूर किंवा वादळी स्थितीमध्ये येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्याचे शुद्धीकरण करण्याची नवी पद्धती बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केली आहे. वाळूंच्या कणांवर खनिजांचे आवरण केल्यामुळे त्यांची गाळण क्षमता वाढते. परिणामी अवर्षणाच्या किंवा पाण्याच्या ताण स्थितीमध्ये अशा पाण्याचा पिण्यासाठी वापर करणे शक्य होते.

नाशिक जिल्ह्यात पावसाची दडी. 

नाशिक  : नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने दडी मारली असून, त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने काही दिवसांपासून धरणांमधील पातळीत वाढ होऊ शकलेली नाही. त्यामुळे यंदा पाऊस सरासरी गाठणार की नाही, याची चिंता सतावू लागली आहे.


‘बंद‘ला सोलापुरात संमिश्र प्रतिसाद. 

सोलापूर : इंधनदरवाढ आणि महागाईच्या विरोधात काँग्रेसने पुकारलेल्या बंदला विविध पक्षांसह संघटनांनी पाठिंबा दिला, पण सोलापुरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही प्रमुख बाजारपेठांतील बंद वगळता शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. शिवाय शाळा, महाविद्यालये आणि बॅंकाही सुरू होत्या. या बंदमुळे सोलापूर बाजार समितीतील आवक काहीशी कमी झाली होती, तरीही सगळे व्यवहार सुरळीत सुरू होते. दरम्यान, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने पेट्रोल पंपावर निदर्शने केली; तर जबरदस्तीने बाजारपेठा बंद करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले.


केंद्रीय कापूस संशोधन संस्था नोंदवतेय बोंड अळीचे निरीक्षण. 

नागपूर  ः फुलावर असलेल्या कापूस पिकावर सुरवातीलाच मोठ्या प्रमाणावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचा दावा केला जात होता; परंतु फुलधारणेच्या काळात कापसावर किती प्रादुर्भाव झाला याची नेमकी टक्‍केवारी जाणून घेण्यासाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या वतीने विविध जिल्ह्यांतील प्रक्षेत्रांना भेटी दिल्या जात आहेत.


इंधन दरवाढीविरोधात मुंबई, ठाण्यात निषेध आंदोलन. 

मुंबई   : पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी (ता.१०) पुकारलेल्या ‘भारत बंद’ला मुंबईसह ठाणे, नवी मुंबई शहरांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. या वेळी ठिकठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली. या `बंद`ला मनसेसह राज्यातील विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे ठिकठिकाणी मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.


पुणे जिल्ह्यात ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद. 

पुणे : इंधन दरवाढ आणि महागाईच्या निषेधार्थ काॅंग्रेससह विविध राजकीय पक्षांनी साेमवारी (ता.१०) पुकारलेल्या ‘बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्‍ह्यातील विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी रास्ता राेकाे, निदर्शने करीत माेदी सरकारविराेधात घाेषणाबाजी केली. या वेळी चाेख पाेलिस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. अनेक ठिकाणी बाजारपेठा सुरळीत हाेत्या; तर सुरक्षेच्या कारणास्तव विविध शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली हाेती.


तीन जिल्ह्यांतील बाजार समित्यांमधील व्यवहार `बंद`मुळे ठप्प. 

नांदेड   ः इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेससह अन्य पक्ष, संघटनांनी सोमवारी (ता.१०) पुकारलेल्या ‘बंद’ला नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ‘बंद’मुळे बाजार समित्यांमधील शेतीमालाचे व्यवहार ठप्प होते.


नगर जिल्ह्यात इंधन दरवाढीविरोधात आंदोलने
नगर  ः इंधन दरवाढीसह महागाईच्या विरोधात सोमवारी (ता.१०) नगर शहरासह जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेसह अन्य पक्षांनी आंदोलन केले. शहरासह जिल्ह्याच्या अन्य भागात ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेसह अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित ठिय्या आंदोलन केले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणीत, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरला आंदोलनात सहभाग घेतला.

बदलत्या वातावरणाची द्राक्ष उत्पादकांना धास्ती. 

सांगली ः सांगली जिल्ह्यामध्ये मिरज पूर्वसह काही भागांमध्ये द्राक्षे पिकाच्या छाटण्या आगाप घेण्यात येतात. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून बदलत्या वातावणामुळे द्राक्षे पीक धोक्‍यात आले आहे. सकाळी धुके आणि दिवसभर पडणारे ऊन यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत.


चीनला राज्यातून ४० लाख टन सोयाबीन पेंड निर्यातीचे संकेत.

मुंबई : राज्यातून आगामी हंगामात चाळीस लाख टन सोयाबीन पेंड चीनला निर्यात करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. राज्य सरकार आणि चीन सरकारमध्ये कराराच्या माध्यमातून लवकरच या निर्णयाला मूर्त स्वरूप येणार आहे. याद्वारे राज्यातील उत्पादनाचा विचार करता शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला दर मिळण्याच्यादृष्टीने ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले जाते. 


मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार?. 

पुणे : मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याकडे स्थिरावला अाहे. राजस्थानमध्ये हवामान कोरडे होत असल्याने नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) माघारी फिरण्यास पोषक हवामान तयार होऊ लागले आहे. त्यामुळे देशातून माॅन्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 


उद्याचे हवामान:
तापमान  :- १७ अंश से ते ३१ अंश से . 
पाऊसमान  :- ढगाळ  वातावरण . 
आद्रता  :- ५४ %
वारे  ;- उत्तरेकडून  दक्षिणेकडे  १ m /s . 


पीक सल्ला : 
रब्बी ज्वारी :
रब्बी ज्वारी लागवड करताना ज्वारीची सुधारित जात निवडावी . फुले ssf  ७३३ या जातीचे पीक तीन महिन्यात येते . 
पेरणीपूर्वी जमिनित जलसंधारण करावे . जमीनमध्ये उत्तरानुसार सपाट वाफे तयार करावेत . बळीराम नांगराच्या सह्हायाने दंड टाकावेत . १५ सप्टेंबर ते १५ऑक्टोबर  या काळात पेरणी करावी .