माझीशेती कृषीविषयक वार्तापत्र (०८/१०/२०१८)


 कृषीविषयक वार्तापत्र


नगर जिल्ह्यात उसासह अन्य पिकांवरही ‘हुमणी’चा प्रादुर्भाव

नगर  ः सर्वच ठिकाणी ऊसपिकावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र आता केवळ उसातच नाही, तर खरिपातील अन्य पिकांवरही हुमणीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. असे असताना हुमणी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यासह अन्य बाबीत कृषी विभागाला गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. हुमणीवर उपाययोजना करण्याबाबतच्या मार्गदशर्न कार्यशाळा केवळ कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.


युरोपातील वणव्यांचा तापमान वाढीशी जोडला संबंध
मध्य युरोपमधील जंगलात लागणाऱ्या आगीमुळे तापमानामध्ये वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण आणणे शक्य झाल्यास जागतिक तापमानाची वाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादीत ठेवणे शक्य असल्याचे बार्सिलोना विद्यापीठातील संशोधनात पुढे आले आहे. हे संशोधन नेचर कम्युनिकेशन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

रब्बीसाठी ‘जायकवाडी’तून आवर्तनाची शक्यता धूसर

परभणी ः  पैठण येथील जायकवाडी धरणामध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा अद्याप निम्माही उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी कालव्याद्वारे पाणी आवर्तने मिळण्याची शक्यता धूसर आहे. सध्या संरक्षित पाणी आवर्तन सुरू आहे. परंतु पाण्याचा प्रवाह कमी असल्याने परभणी जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे डाव्या कालव्याच्या प्रवाहाचा वेग वाढविणे आवश्यक आहे.


पावसाच्या अनिश्चिततेचा विचार करून रब्बीचे नियोजन करा
जालना : यंदा रब्बीचे नियोजन करताना पावसाच्या अनिश्चिततेचा विचार करूनच नियोजन करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला. खरपूडी कृषी विज्ञान केंद्रात शुक्रवारी (ता. ५) पार पडलेल्या २५४ व्या मासिक चर्चासत्रात हा सल्ला देण्यात आला.

केन ॲग्रोच्या ऊस बिलासाठी कडेगावात तीव्र आंदोलन

कडेगाव, जि. सांगली : रायगाव (ता. कडेगाव) येथील केन ॲग्रो एनर्जी (इंडिया) लि. साखर कारखान्याने उर्वरित शेतकऱ्यांची थकीत एफआरपी तात्काळ द्यावी, या मागणीसाठी बळिराजा शेतकरी संघटना शनिवारी (ता. ६) येथे तहसील कार्यालयासमोर रणरणत्या उन्हात तब्बल पाच तास धरणे आंदोलन केले.‘उजनी’च्या पाण्याला मुख्यमंत्र्यांकडून बगल
लातूर  ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूरला ‘उजनी’चे तर बीडला कृष्णा खोऱ्याचे पाणी देण्याबाबत भाष्य करतील, अशी अपेक्षा असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात या विषयाला बगल दिली. निसर्ग आपली परीक्षा घेत असून, त्याला आव्हान देण्याचे काम आम्ही करत आहोत. संकटाच्या काळात सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा आशावाद मात्र मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

लेखामेंढा शेतीक्षेत्रातही वेगळे अस्तित्व जपेल ः जिल्हाधिकारी

गडचिरोली  ः सामाजिक उपक्रमात वेगळेपण जपणाऱ्या लेखामेंढा गावाने केवळ राज्यच नाही, तर देशपातळीवर वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामस्थांच्या सामूहिक पुढाकाराने दुर्गम भागातील हे गाव नावारुपास आले. येत्या काळात ग्रामविकासासोबतच शेती क्षेत्रातही हे गाव आपले वेगळे अस्तित्व जपून नवी क्रांती घडवेल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी व्यक्‍त केला.


चटका वाढला
पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा बसत आहे. रविवारी (ता.७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील तापमानात सरासरीपेक्षा ४ ते ६ अंशांची वाढ झाली आहे. सांताक्रुज आणि नगर येथे राज्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अरबी समुद्रातील वादळाच्या प्रभावामुळे आज (ता.८) कोकणात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

सूत, कापड आयातीवर निर्बंधाची शक्‍यता

जळगाव ः विदेश व्यापारातील आयात व निर्यातीमधील तफावत (तूट) वाढत असल्याने रुपया कमकुवत होत आहे. डॉलरची वाढती तूट रोखण्यासह स्थानिक बाजारपेठेतील वस्त्रोद्योगाला चालना देण्यासंबंधी सूत, कापड व तयार कपडण्यांच्या आयातीवर केंद्रीय विदेश व्यापार विभाग लवकरच निर्बंध आणण्याची शक्‍यता आहे. पुढील हंगामात देशांतर्गत बाजारात सुताचे दर टिकून राहतील, असे वाटत असले तरी अमेरिकेशी संबंध ताणल्याने चीनने भारताकडून सुताची आयात कमी केली आहे. यामुळे सुताचे दर दबावात आले असून, ते मागील २५ दिवसांत किलोमागे १० रुपयांनी कमी झाले आहेत. 


युरोपातील वणव्यांचा तापमान वाढीशी जोडला संबंध
मध्य युरोपमधील जंगलात लागणाऱ्या आगीमुळे तापमानामध्ये वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण आणणे शक्य झाल्यास जागतिक तापमानाची वाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादीत ठेवणे शक्य असल्याचे बार्सिलोना विद्यापीठातील संशोधनात पुढे आले आहे. हे संशोधन नेचर कम्युनिकेशन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये ९३ टक्के पाणीसाठा

पुणे  : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणे ओव्हर फ्लो झाली. मात्र सप्टेंबरमधील पावसाच्या दडीने पावसाळा संपण्यापूर्वीच धरणांमधील पाणीपातळी कमी होण्यास सुरवात झाली. उजनीसह जिल्ह्यातील सर्व २५ धरणांंची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता २१६.८४ टीएमसी असून, शनिवारी (ता.८) यात २०१.१३ टीएमसी (९३ टक्के) पाणीसाठा झाला होता.  पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याची मागणी वाढणार असल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचे आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे.


`ब्रॅंड मूल्यवृद्धीसाठी हवा स्वच्छ कापूस, पॅकिंगवर भर`

औरंगाबाद  : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्तापूर्ण असलेल्या देशातील कापसाच्या ब्रॅंडची मूल्यवृद्धी करण्यासाठी स्वच्छ कापसासह पॅकिंगवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. त्यासाठीची तयारी औरंगाबाद येथे पार पडलेल्या दोनदिवसीय कापूस परिषदेत दाखविली गेली.

गृहनिर्माण संस्थांमध्ये सुरू होणार शेतीमाल विक्री दालन
पुणे   ः थेट ग्राहकांना शेतीमाल उपलब्ध व्हावा तसेच शेतकऱ्यांना शेतीमालाचा योग्य मोबदला मिळावा या उद्देशाने गृहनिर्माण संस्थांमध्ये शेतीमाल विक्री करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. अटल महापणन विकास अभियानाअंतर्गत गृहनिर्माण संस्थांना शेतीमाल विक्री दालन सुरू करता येणार आहे. या विक्री दालनाचे (कॉप-शॉप) शेतकरी गट, महिला बचत गट, शेतकरी कंपन्या कराराद्वारे संचलन करू शकणार आहेत. या निर्णयामुळे गृहनिर्माण संस्थांमधील सदस्यांना घरपाेच शेतीमाल रास्त दरात उपलब्ध हाेणार आहे.

व्यापाऱ्यांच्या भल्यासाठी खरेदीला विलंब?
जळगाव ः दर्जेदार कापूस कवडीमोल भावाने व्यापाऱ्यांच्या पदरात पडावा, यासाठीच कापसाच्या सरकारी खरेदीत जाणीवपूर्वक उशीर केला जात असल्याचा आरोप होत आहे. राज्य सरकारने अद्याप अधिसूचना काढलेली नसल्यामुळे कापूस खरेदीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. उशिरा येणाऱ्या कापसात आर्द्रता, लाल कीड, कवडी येत असल्याने दर्जाचा प्रश्न निर्माण होतो आणि खरेदी केंद्रांवर नाकारला जातो. परत व्यापाऱ्यांना या कापसाची कवडीमोल दराने विक्री करावी लागते. शासकीय यंत्रणा २० ते २५ टक्केही कापसाची खरेदी करत नाही. 


उद्याचा हवामान अंदाज 

A . कोकण 
तापमान - २५ अंश से. ते ३४ अंश से. 
पाऊसमान - हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
आद्रता - ६८% ते ९९% 
वारे - १ ते २ किमी /तास. 

B .पश्चिम महाराष्ट्र 
तापमान - २१ अंश से. ते ३० अंश से. 
पाऊसमान - हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. 
आद्रता - ५१% ते ९९%
वारे - १ ते ३ किमी /तास. 

C . खान्देश 
तापमान - २१ अंश से. ते ३३ अंश से.
आद्रता - ३४% ते ९९%
वारे - १ किमी /तास.

D . मराठवाडा 
तापमान - १९ अंश से. ते ३५ अंश से. 
आद्रता - २६% ते ८७%
वारे - १ ते ३ किमी /तास. 

E . विदर्भ 
तापमान - २० अंश से. ते 35 अंश से. 
आद्रता - ४१% ते ८४%
वारे - १ किमी /तास. 

F . विदर्भ 
तापमान - २२ अंश से. ते ३३ अंश से.  
आद्रता - ३१% ते ६१%
वारे - १ ते ३ किमी /तास.


पीक सल्ला ( फुलशेती )

पिकाचे नाव :  ऍस्टर
जमीन व हवामान : 
यासाठी मध्यम ते हलक्या काळ्या जमिनीची  व समशीतोष्ण हवामान आवशक्यता असते. 
लागवड :
या रोपांची लागवड ऑक्टोबर मध्ये करावी. याची अभिवृद्धी बियांपासून करतात.
दोन रोपांतील /ओळीतील अंतर ४५- ६० cm सरी पाडून सरींच्या दोन्ही अंगास 
३० सेमी अंतरावर रोपांची लागवड करावी. 
खते : 
लावणीच्या वेळी हेकटरी २५ टन शेणखत २५० किलो नत्र १०० किलो पालाश 
आणि पीक फुलावर येताच ५० किलो नत्र द्यावे.