माझीशेती : कृषीविषयक वार्तापत्र (०९/१०/२०१८)


कृषीविषयक वार्तापत्र  • अमेरिकन फॉल आर्मी वर्मचा उसावरही हल्ला !.


पुणे ः अमेरिकन फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) या नव्या किडीने महाराष्ट्रात मका पिकाद्वारे शिरकाव करीत पुढील संकटाची चाहूल दिली. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्राचे सर्वांत महत्त्वाचे पीक असलेल्या ऊस पिकातही या अळीने आपला मोर्चा वळवला असून, उसाची पाने फस्त करण्यास सुरवात केली आहे. हुमणी किडीसह विविध समस्यांमुळे आधीच त्रस्त असलेल्या ऊस उत्पादकांसाठी ही धोक्याची मोठी घंटाच मानली जात आहे.  • जळगाव जिल्ह्यात ऑनलाइन नोंदणीचा ‘सर्व्हर डाउन`.

जळगाव : जिल्ह्यात कडधान्य खरेदीसंबंधीची ऑनलाइन नोंदणी पाचोरा, अमळनेर, जळगाव येथे सुरू आहे. परंतु किचकट प्रक्रियेमुळे नोंदणी वेळेत होत नसल्याची स्थिती आहे. सर्व्हर डाऊन असते. त्यातच वेळ जातो. यामुळे रात्री उशिरापर्यंत संबंधित केंद्रात काम सुरू आहे.


 • पीककर्जप्रश्नी बॅंकांवर कठोर कारवाई करा : देवेंद्र फडणीस.

जळगाव  ः खरिपात शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बॅंका टाळाटाळ करत आहेत. राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश देऊनही बॅंकांनी कर्जवाटपात आखडता हात घेतला. शेतकऱ्यांना जे कर्ज दिले जाते, त्यावरील व्याजाची हमी शासनाने घेतली आहे. परंतु ज्या बॅंका कर्जमाफीच्या लाभार्थींना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत, त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करावी. तसेच उद्दिष्टापेक्षा कमी कर्ज देणाऱ्या बॅंकांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले. 


 • खरीप पीक कर्जवाटपात शेतकऱ्यांची केवळ थट्टाच.


मुंबई ः सप्टेंबर महिना संपला तरी राज्यात खरिपाचे पीक कर्जवाटप विदारक स्थितीत आहे. उद्दिष्टाच्या फक्त ४९ टक्के पीककर्जाचे वाटप झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाला हरताळ फासत राष्ट्रीयीकृत, व्यापारी बँकांनी पीककर्जाकडे पाठ फिरवली आहे. दुष्काळी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत खूपच कमी पीककर्जाचे वाटप झाले आहे. दुर्दैव असे, की शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी रेटा लावला म्हणून स्टेट बँकेने यवतमाळ जिल्ह्यातील बँकेची पट्टणबोरी येथील शाखाच बंद केली आह • सोलापूर जिल्ह्यात खरिपात शेतकऱ्यांना १ हजार कोटींचे कर्जवाटप.

सोलापूर  : वार्षिक पतपुरवठा आराखड्यानुसार यंदाच्या खरीप हंगामात सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ५० हजार ५५० शेतकऱ्यांना एक हजार ३८६ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र ८१ हजार ४९७ शेतकऱ्यांना एक हजार ३७ कोटी रुपयांचा कर्जपुरवठा झाला आहे. उद्दिष्टाच्या ७४.७९ टक्के कर्जवाटप यंदा झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाटपाची आकडेवारी वाढली आहे.


 • नाशिक जिल्ह्यात खरिपासाठी १,६८५ कोटींचे कर्जवाटप.

नाशिक : अन्नधान्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा, यासाठी यंदा बँका सरसावल्याचे सकारात्मक चित्र नाशिक जिल्ह्यात दिसू लागले आहे. चालू आर्थिक वर्षात २६२६ कोटी रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवले असताना, एकट्या खरिपाच्या हंगामात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत १ हजार ६८५ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी ९८८ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले होते.


 • नगर जिल्ह्यात ग्रामसेवकांची ९९ पदे रिक्त.


गर ः ग्रामीणविकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामसेवकांची जिल्ह्यात ९९ पदे रिक्त आहेत. एकाच ग्रामसेवकाकडे अनेक ग्रामपंचायतींचा कार्यभार असल्याने त्यांची दमछाक होत आहे.
 • भूजल अधिसूचनेला ‘स्वाभिमानी’चा विरोध.

मुंबई ः राज्य शासनाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र भूजल अधिसूचनेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शविला आहे. या नियमावलीची तातडीने अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार असल्याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे. तसेच, या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी असणाऱ्या तोकड्या व अकार्यक्षम यंत्रणेमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी या संदर्भात सूचना व हरकतींचे सविस्तर पत्र शासनाला लिहिले आहे. 


 • बोंड अळीचे अनुदान अन्‌ विम्याचा परतावा रखडला.

नेकनूर, जि. बीड : यंदा दुष्काळ पडला असताना गतवर्षीच्या बोंड अळीचे अजून अनुदान मिळाले नाही. शिवाय भरलेल्या विम्याचा परतावाही आमच्या पदरी पडला नसल्याची व्यथा नेकनूर येथील शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. ६) जिल्हा प्रशासन दरबारी मांडली आहे.


 • राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा : धनंजय मुंडे.

मुंबई ः मराठवाड्यासोबतच संपूर्ण राज्यात या वर्षी अभूतपूर्व आणि भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना अनेक विषयांवर बोलणारे मुख्यमंत्री दुष्काळाच्या प्रश्नावर गप्प का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. सरकारी कागद रंगवण्यापेक्षा तातडीने दुष्काळ जाहीर करा, अशी आग्रही मागणीसुद्धा त्यांनी केली आहे. 


 • दुष्काळाच्या सावटात उसाचीही होरपळ.


औरंगाबाद : यंदा गाळपासाठी उपलब्ध होणाऱ्या उसाची दुष्काळाच्या सावटाने होरपळ वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत गाळपासाठी उपलब्ध होणाऱ्या उसाचे क्षेत्र जास्त असले तरी गतवर्षीइतकाही ऊस गाळपासाठी उपलब्ध होण्याची शक्यता नाही. विशेषतः मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत पाहायला मिळते आहे.  • बॅंक कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण.

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्‍यातील काळेगावथडी येथील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या विभागीय कार्यालयासमोर सोमवारपासून (ता. ८) आमरण उपोषण सुरू केले आहे. पीककर्ज, मुद्रा कर्जवाटप, बोजा यासह इतर बॅंकेशी संबंधित मागण्यांबाबत दिलेल्या निवेदनाची दखल घेतली नसल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. 


 • सागरी मिडोव गवतामध्ये २२ टक्क्यांनी घट.


सामान्यत बदलत्या वातावरणामुळे माणसे किंवा सजीव स्थलांतर करू शकतात. ती सोय वनस्पतींना नाही. गेल्या काही वर्षामध्ये बदलत्या वातावणाचा फटका गुयाम येथील समुद्री गवताला (मिडोव) बसत असल्याचे संशोधनामध्ये दिसून आले. अमेरिकन विद्यापीठातील पर्यावरण शास्त्र विभागाने केलेल्या विश्लेषणामध्ये मिडोव हे समुद्री गवत २२ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन मरीन अॅंड फ्रेशवॉटर रिसर्चमध्ये प्रकाशित झाले आहे. • वन्यप्राण्यांच्या नुकसानीचाही पीकविम्यात समावेश : राधामोहनसिंह.


नवी दिल्ली  ः देशात वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण मोठे आहे. आतापर्यंत या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना भरपाई मिळत नव्हती; परंतु वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या पीक नुकसानाचाही समावेश पंतप्रधान पीक विमा योजनेत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेच्या अभ्यासाठी दोन जिल्ह्यांमध्ये प्रयोगिक तत्त्वावर ही योजना राबविली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली. • आॅक्टोबर हीट हळूहळू वाढतेय...

पुणे ः देशातून माॅन्सून परतल्याने आकाश निरभ्र राहत आहे. त्यामुळे आॅक्टोबर हीटही हळूहळू वाढू लागली असून, उकाड्यात वाढ होत आहे. मुंबईजवळ असलेल्या सांताक्रूझमध्ये सोमवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सर्वाधिक ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.


 • युरोपातील वणव्यांचा तापमान वाढीशी जोडला संबंध.

मध्य युरोपमधील जंगलात लागणाऱ्या आगीमुळे तापमानामध्ये वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण आणणे शक्य झाल्यास जागतिक तापमानाची वाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादीत ठेवणे शक्य असल्याचे बार्सिलोना विद्यापीठातील संशोधनात पुढे आले आहे. हे संशोधन नेचर कम्युनिकेशन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.


 • रब्बीसाठी ‘जायकवाडी’तून आवर्तनाची शक्यता धूसर.


परभणी ः  पैठण येथील जायकवाडी धरणामध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा अद्याप निम्माही उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी कालव्याद्वारे पाणी आवर्तने मिळण्याची शक्यता धूसर आहे. सध्या संरक्षित पाणी आवर्तन सुरू आहे. परंतु पाण्याचा प्रवाह कमी असल्याने परभणी जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे डाव्या कालव्याच्या प्रवाहाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. • पावसाच्या अनिश्चिततेचा विचार करून रब्बीचे नियोजन करा.

जालना : यंदा रब्बीचे नियोजन करताना पावसाच्या अनिश्चिततेचा विचार करूनच नियोजन करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला. खरपूडी कृषी विज्ञान केंद्रात शुक्रवारी (ता. ५) पार पडलेल्या २५४ व्या मासिक चर्चासत्रात हा सल्ला देण्यात आला.


 • केन ॲग्रोच्या ऊस बिलासाठी कडेगावात तीव्र आंदोलन.

कडेगाव, जि. सांगली : रायगाव (ता. कडेगाव) येथील केन ॲग्रो एनर्जी (इंडिया) लि. साखर कारखान्याने उर्वरित शेतकऱ्यांची थकीत एफआरपी तात्काळ द्यावी, या मागणीसाठी बळिराजा शेतकरी संघटना शनिवारी (ता. ६) येथे तहसील कार्यालयासमोर रणरणत्या उन्हात तब्बल पाच तास धरणे आंदोलन केले. 
उद्याचा हवामान अंदाज 

A . कोकण 
तापमान - २४ अंश से. ते ३३ अंश से. 
पाऊसमान - हलका ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 
आद्रता - ६९% ते ९९% 
वारे - १ ते २ किमी/तास. 

B . पश्चिम महाराष्ट्र 
तापमान - २० अंश से. ते ३१ अंश से. 
पाऊसमान - हलका ते मध्यम पाऊस होण्याची  शक्यता  
आद्रता - ४३% ते ९९%
वारे - १ ते ४ किमी/तास. 

C . खान्देश 
तापमान - २० अंश  से.ते ३३ अंश से. 
आद्रता - ३२% ते ९९% 
वारे - १ ते २ किमी/तास. 

D . मराठवाडा 
तापमान - २० अंश से. ३५ अंश से. 
पाऊसमान - २२% ते ७७% 
आद्रता - १ ते ४ किमी/तास. 

E . विदर्भ 
तापमान - २० अंश से. ते ३५ अंश से. 
आद्रता - ४०% ते ८२% 
वारे - १ किमी/तास. 

F . विदर्भ 
तापमान - २३ अंश से. ३५ अंश से. 
आद्रता - २४% ते ५१% 

वारे - १ ते ४ किमी/तास. 

पीक सल्ला :

 • पिकाचे नाव :बटाटा .

या पिकाची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात करतात .
 बटाटयाच्या योग्य वाढीसाठी २२ अंश से ते २४ अंश सेल्सिअस तापमानांची गरज असते . 
योग्य वाढ व विकास होण्यासाठी लागवड गादी वाफयावर करावी. 
दोन ओळींमधील आंतर दोन फूट ,तर झाडांमधील आंतर जमिनीचा मगदूर व जातीनुसार ३० सेमी किंवा ४५ सेमी ठेवावे . 

१ हेक्टर लागवडीसाठी १५-२० क्विंटल बियाणे लागतात .