माझीशेती : कृषीविषयक वार्तापत्र (११/१०/२०१८)


कृषीविषयक वार्तापत्र


 • सांगली जिल्ह्यात ‘फलोत्पादन’चे ५५५ लाभार्थीं


सांगली ः एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात ४५२ लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे. त्याच्यासाठी २.९६ कोटी रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबरअखेर १०३ लाभार्थींना ८० लाख रुपये अनुदान केले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी दिली. • साताऱ्यात जलयुक्त शिवार योजनेची ८८ टक्‍के कामे पूर्ण


सातारा : जलयुक्त शिवार अभियानामुळे गेल्या तीन वर्षांत मृद्‌ व जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. २०१७-१८ मधील २०९ गावांतील ८८ टक्‍के कामे पूर्णत्वाला गेली आहेत. उर्वरित कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत शासनाने दिली आहे. • परभणीतील शासकीय दूध संकलन यंत्रणा तोकडी

परभणी ः सततचा दुष्काळ, नापिकीमुळे शेतकरी दूध व्यवसायाकडे वळत असल्यामुळे शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील शासकीय दुग्धशाळेतील दूध संकलनात महिन्यागणिक वाढ होत आहे; परंतु संकलन यंत्रणा तसेच दुग्धशाळेतील उपलब्ध प्रक्रिया यंत्रसामग्री तोकडी पडत आहे. अतिरिक्त ठरल्यामुळे दूध नाकारले जात आहे. त्यामुळे दूध उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. गतवर्षीच्या (२०१७) सप्टेंबरच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबर महिन्यात सुमारे तिपटीने वाढ झाली आहे.


 • परभणीतील आठ तालुक्यांवर दुष्काळाची छाया


परभणी ः केंद्र आणि राज्य शासनाच्या दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषांनुसार परभणी जिल्ह्यातील ९ पैकी ८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची प्रथम कळ (ट्रिगर-१) लागू होत आहे. त्यासाठी अनिवार्य आणि प्रभावदर्शक निर्देशांकानुसार अपेक्षित पावसाच्या सरासरी टक्केवारीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पीक उत्पादन नुकसान; तसेच पाणीटंचाईची माहिती सादर करावी. टंचाई आराखडे तयार करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिले. • उसाला पहिला हप्ता ३५०० रुपये दिल्याशिवाय हंगाम सुरू करू देणार नाही : रघुनाथदादा पाटील

कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात उसाचा पहिला हप्ता एकरकमी ३५०० रुपये व गेल्या हंगामातील अंतिम दर ४५०० रुपये घेतल्याशिवाय हंगाम सुरू करू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला.


 • साखर निर्यात नियोजनासाठी कारखाने, निर्यातदार एकत्र

पुणे   ः ऊस गाळप हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवस बाकी असताना साखर निर्यातीच्या नियोजनासाठी कारखान्यांची धावपळ सुरू झाली आहे. राज्यातील सर्व कारखाने आता निर्यातदारांसह एकत्र येऊन नियोजन करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.


 • जत तालुक्यात पावसाअभावी द्राक्ष, डाळिंब पीक धोक्यात


सांगली  ः जत तालुक्‍यात यंदा सरासरीइतकाही पाऊस झालेला नाही. तालुक्‍यात केवळ २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. परिणामी तालुक्‍यातून टॅंकरची मागणी वाढू लागली आहे. तालुक्‍यातील १३ तलाव, २ मध्यम प्रकल्प आणि जलंसधारण विभागाचे ९ तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे द्राक्ष, डाळिंब पिके धोक्‍यात आली आहेत. • ‘तितली’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकले !

पुणे  : बंगालच्या उपसागरामध्ये बुधवारी (ता. १०) ‘तितली’ या तीव्र चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे वादळ आज पूर्व किनाऱ्यावरील ओडिशाला धडकले आहे. १६५ किमी प्रतितास वाऱ्याचा वेग आहे. १५ मदत पथकांची नियुक्ती, करण्यात आली असून ३ लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अनेक भागात मुसळधार वृष्टी होत असून, राज्यात सावधानतेचा इशारा.​ अरबी समुद्रातील ‘लुबन’ हे तीव्र चक्रीवादळ ओमानच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. या दोन प्रणालींमुळे दोन्ही समुद्रांना उधाण आले असून, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. ‘तितली’च्या प्रभावामुळे पूर्व किनारपट्टीसह महाराष्ट्रात ढगाळ हवामान तयार झाले आहे. शुक्रवारपर्यंत (ता. १२) कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे.


 • जागतिक कापूससाठा दहा टक्क्यांनी घटणार


जळगाव ः कापूस व्यापारक्षेत्रात कमी उत्पादनामुळे साठ्यासंबंधीची अडचण यंदा राहणार आहे. मागील हंगामाच्या तुलनेत जागतिक कापूससाठा १० टक्‍क्‍यांनी कमी होणार असून, जागतिक गरज यंदा तीन टक्‍क्‍यांनी वाढल्याची माहिती कापूस बाजारपेठेतील विश्‍लेषक, जाणकारांनी दिली आहे.

विशेष म्हणजे जगातील सर्वांत मोठा वस्त्रोद्योगाचा डोलारा असलेल्या चीनमधील कापूससाठाही यंदा घटणार आहे. परिणामी कापसाचे दर टिकून राहतील, असे अपेक्षित आहे.


 • केंद्राच्या निकषांनुसारच दुष्काळ जाहीर होणार : मुख्यमंत्री

औरंगाबाद  : कुणाच्या मागणीवरून दुष्काळ जाहीर केला जात नाही. दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारने निकष ठरवून दिलेले आहेत. त्याची पूर्तता करून दुष्काळी भागातील जनतेला मदत, विमा परतावा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची तयारी प्रशासन व शासनाने केली आहे. त्या अनुषंगाने येत्या ३१ ऑक्‍टोबरपर्यंत टंचाई स्थिती घोषित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. दुष्काळी भागातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा आपण घेणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.


 • आयकर निवाड्याकडे साखर कारखान्यांचे लक्ष

पुणे: देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण केंद्र सरकारने ठेवलेले असताना दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना जादा ऊसदर देणाऱ्या साखर कारखान्यांवर आयकर लावण्यात आला आहे. या कराच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याकडे कारखान्यांचे लक्ष लागून आहे.


 • ‘सिद्धेश्‍वर’च्या चिमणीचा विकासाला अडथळा


सोलापूर : सोलापूरच्या विकासाला श्री सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा आहे. चिमणी पाडल्याविना या ठिकाणचा विकास अशक्‍य आहे. त्यामुळे विकासाला अडथळा ठरत असलेली सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी संबंधित यंत्रणेकडून तत्काळ पाडण्यात यावी, अशी मागणी संजय थोबडे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली.


उद्याचा हवामान अंदाज 


 • A . कोकण 

तापमान - २६ अंश से. ते ३३ अंश से.
पाऊसमान - हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. 
आद्रता - ६८% ते ९७% 
वारे - १ ते २ किमी /तास. 


 • B . पश्चिम महाराष्ट्र 

तापमान - २० अंश से. ते ३४ अंश से. 
पाऊसमान - हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. 
आद्रता - ३०% ते ९९% 
वारे - २ ते ३ किमी /तास 


 • C . खान्देश 

तापमान - २० अंश से. ते ३४ अंश से. 
आद्रता - २५% ते ९९%
वारे - १ किमी /तास . 


 • D . मराठवाडा 

तापमान - २३ अंश से. ते ३४ अंश से. 
आद्रता - २६% ते ६३% 
वारे - १ ते ५ किमी /तास. 


 • E . विदर्भ 

तापमान - २१ अंश से. ते ३४ अंश से. 
आद्रता - ४६% ते ७९% 
वारे - १ ते २ किमी /तास. 


 • F . विदर्भ 

तापमान - २३ अंश से. ते ३४ अंश से. 
आद्रता - २५% ते ५३%

वारे - २ ते ६ किमी /तास. 


पीक सल्ला :

 • पिकाचे नाव :बाजरी 

बाजरीचे लवकर पक्व होणारे वाण हे ७२-८० दिवसात काढणीसाठी तयार होतात . 
व इतर वाण ८५-९० दिवसात काढणीसाठी तयार होतात.
 सुधारित व्यवस्थापनाचा वापर असणाऱ्या हमखास पाऊस पढणाऱ्या 
बागायत शेतात माध्यम काळ्या जमिनित हेक्टरी ४०-४५ क्विंटल धान्य 

व ह्लक्या ते मध्यम जमिनित हेक्टरी २५-३० क्विंटल धान्य चारा मिळतो .