Friday, January 15, 2016

भुईमुग

उन्हाळी भुईमुग

ओळख - भारतात भुईमुगाचे क्षेत्राचे बाबतील तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरातच्या खालोखाल महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक लागतो. आपल्या राज्यातील या पिकाखालील खरीप हंगामातील एकूण क्षेत्र ३.५३ लाख हेक्टर असून उत्पादन ४.१५ लाख टन आणि उत्पादकता ११७५ किलो / हेक्टर आहे. हाराष्ट्रात उन्हाळी भुईमूगाखाली २.२५ लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून ३.७५ लाख टन उत्पादन मिळते. सरासरी उन्हाळी भुईमूगाची उत्पादकता ही १६५० ते १७०० किलो आहे. 

हवामान भुईमुग हे उष्ण आणि कोरड्या हवामानातले पीक असून साधारणतः १८ ते ३० अंश सें.ग्रे. तापमानात हे पीक चांगले येते. दिवसातला १० ते १२ तास भरपूर आणि स्वच्छ सूर्यप्रकाश योग्य वेळी पाणी पुरवठा, किडी- रोगांचा कमी प्रादुर्भाव इ. मुळे खरीपापेक्षा उन्हाळी भुईमुगाचे दीडदुपटीने जास्त उत्पादन मिळते. पश्चिम महाराष्ट्रात जानेवारीच्या शेवटी आणि फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात उन्हाळी भुईमुगाची पेरणी करावी.  कोकणात भात काढल्यानंतर रान तयार करून पेरणी करावी. कारण तिथे थंडी कमी असते तर विदर्भ मराठवाड्यात मार्चपर्यंत पेरणी करावी.

जमीन - उत्तम निचऱ्याच्या, मध्यम मऊ वाळूमिश्रित, चुनखडी युक्त, सेंद्रिय युक्त जमिनीत भुईमुगाचे पीक चांगले येते.  ६.५ ते ७.५ इतका सामू असावा.  भारी चिकन जमिनीत भुईमुगाचे पीक घेऊ नये. खरीपातले पीक काढल्यानंतर लगेचच हिवाळी नांगरट करावी.  २-३ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.  एकरी ६ ते ७ टन कुजलेले शेणखत शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या अगोदर टाकून मातीत मिसळून घ्यावे आणि जमीन पेरणीसाठी तयार करून ठेवावी.

बीज आणि प्रक्रिया - भुईमूग लागवड करताना हेक्‍टरी 100 ते 125 किलो बियाणे लागते. उन्हाळी भुईमुगासाठी टीएजी २४, टीजी २६, आय. सी. जी. एस. ११, एसबी ११, फुले २८५, पसाऱ्यामध्ये एम १३ या अधिक उत्पादन देणाऱ्या आणि चांगल्या जाती आहेत. निवडलेल्या जातीचे निरोगी आणि टपोरे बियाणे निवडून त्याच्यावर १ टक्का पारायुक्त अॅगॅलॉल अगर सेरेसॉन किंवा थायरम किंवा कार्बेन्डझिमची २ ग्रॅम प्रतिकिलोस बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबियम व स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धनाची २५० ग्रॅमची रबडी १० किलो बियाण्यास लावून सावलीत वाळवून मग पेरणी करावी.

पेरणी - उन्हाळी भुईमुगाची पेरणी 10 फेब्रुवारीपर्यंत पेरणी पूर्ण करावी. जमीन ओलवून वाफशावर आल्यानंतर दोन चाड्याच्या पाभरीने करावी. उपट्या जातीसाठी ३० × १० सें. मी. तर पसाऱ्या जातीसाठी ४५ × १० सें. मी. अंतरावर पेरणी करावी. उन्हाळी भुईमुगाची लागवड इक्रीसॅट पद्धतीने म्हणजे वरंबा, गादीवाफे पद्धतीने करावी. गादीवाफ्यावर प्लॅस्टिक मल्चिंग पेपरने लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळते. उपट्या जातीचे एकरी ५० किलो प्रक्रिया केलेले बियाणे, तर पसाऱ्या जातीसाठी एकरी ४० किलो बियाणे वापरावे.  पेरणी करताना १०० किलो डीएपी दुसऱ्या चाड्याने पेरावी. माती परीक्षणानुसार खते वापरावीत.

सुधारित पेरणी पद्धत : जमिनीची १५ ते १८ इंच खोल नांगरट करावी. त्यानंतर जमिनीमध्ये प्रति हेक्टर दहा टन शेणखत अगर कंपोस्ट मिसळावे. पुन्हा १० ते १२ इंच खोल उभी - आडवी वखरणी करावी. जमीन भुसभुशीत झाल्यानंतर एकसमान सपाट करावी. पाण्याचे व्यवस्थापन एकसमान राहण्यासाठी लहान आकाराचे वाफे किंवा गादी वाफे करताना माती परीक्षणाच्या शिफारशी प्रमाणे खताची मात्रा द्यावी. पेरणीसाठी स्पॅनिश उपटा प्रकाराचा वाण निवडावा.

सपाट वाफा : जमिनीचा उतार पाहून सर्वसाधारण १५ फूट लांब व दहा फूट रुंदीचे लहान वाफे करावेत. पुन्हा वाफ्यामध्ये जमीन एकसमान सपाट करावी. एक फूट अंतर असलेल्या दातेरी कोळप्याने दीड ते दोन इंच खोल ओळी आखाव्यात. ओळीमध्ये चार इंच अंतरावर एक बी किंव सहा इंच अंतरावर दोन बियाणे टोकण करावे. एका ठिकाणी दोन बियांचे टोकण केल्याने झाडाची कमाल संख्या राहते व उत्पादनात वाढ होते. टोकण झाल्यानंतर सर्व बियाणे दक्षतापूर्वक झाकून घ्यावे. नंतर पाणी सिंचन महत्त्वाचे असून, वाफ्यातील सर्व जमिनीस पाणी पोचल्यानंतर दुसऱ्या वाफ्यात पाणी सिंचन करावे.

गादी वाफा : जमिनीच्या सपाटीकरणानंतर पूर्व - पश्चिम गादी वाफे तयार करावेत, गादी वाफ्याची तळाची रुंदी ३.५ फूट, टपाची रुंदी २.५ फूट व उंची ०.५ फूट ठेवावी. यामुळे दोन गादी वाफ्यांमध्ये एक फूट रुंदीची सरी तयार होते. पेरणीपासून काढणीपर्यंत सर्व मशागत सरीतून करता येते. गादी वाफ्याच टप एकसमान सपाट करावा. टपावर १२ इंच अंतरावर दीड ते दोन इंच खोल ओळी आखाव्यात, ओळीमध्ये चार इंच अंतरावर एक बी किंवा सहा इंच अंतरावर दोन बियांचे टोकण करावे. टोकण झाल्यावर सर्व बियाणे मातीचे झाकून घ्यावे. तुषार सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे.

प्लॅस्टिक अच्छादन तंत्र : ही सुधारित तंत्रज्ञान पद्धत आहे. या तंत्रज्ञानातील बारकावे लक्षात घेणे आवश्यक असते. प्लॅस्टिक आच्छादन मशागतीसाठी कुशल मजुरांची गरज असते. या पद्धतीमध्ये प्राथमिक खर्च व वेळ अधिक लागतो. प्लॅस्टिक आच्छादनाची मशागत योग्य व व्यवस्थित करणे महत्त्वाचे असते. या पद्धतीमध्ये वर नमूद केल्याप्रमाणे गादी वाफे तयार करावेत. तीन फूट रुंदी, सात मायक्रॉन जाडी व १.२५ इंच व्यासाचे ८ x ८ इंच अंतरावर छिद्रे असलेले प्लॅस्टिक उपलब्ध असते. प्लॅस्टिक अंथरण्यापूर्वी गादी वाफ्यावर माती परीक्षण शिफारशीनुसार खताची मात्रा द्यावी. दुसऱ्या दिवशी प्लॅस्टिक अंथरण्याची प्रक्रिया सुरू करावी. प्लॅस्टिकच्या टोकाकडील कडा गादी वाफ्याच्या सुरवातीच्या कडावर अलगद खोचून मातीने बंद करावे. नंतर गाडी वाफ व प्लॅस्टिकच्या लांबीनुसार हळूहळू अलगद ताणून अंथरावे, प्लॅस्टिकच्या दोन्ही कडा गादी वाफ्याच्या काडावर अलगद खोचून बंद करावे. टोकण करण्यापूर्वी छिद्रातील माती भुसभुशीत करावी. छिद्रामध्ये दोन बियांचे टोक जमिनीकडे खाली दीड ते दोन इंच अलगद टोकण करावे. नंतर सरीमधील ओलसर मूठभर माती छिद्रावर लावून छिद्र संपूर्ण झाकले जाईल, याप्रमाणे बंद करावे. टोकण झाल्यावर तुषार सिंचन पद्धतीने सिंचन करावे. राज्यातील जमिनीमध्ये उन्हाळी हंगामात जमिनीच्या सुपीकतेनुसार सपाट वाफा मशागत पद्धतीने प्रति हेक्टर ५० ते ६० क्विंटल व प्लॅस्टिक आच्छादन पद्धतीने ६५ ते ७५ क्विंटल उत्पादनक्षमता आहे.

खत व्यवस्थापन - साधारणतः प्रति एकरी 10 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरद द्यावे. त्यासाठी ५० किलो अमोनियम सल्फेट किंवा २२ किलो युरिया आणि १२५ किलो सिंगल सुपर फोस्फेट, १० ते १२ किलो झिंक सल्फेट, २ ते ३ किलो बोरेक्स, पेरणीच्या वेळी द्यावे.  १ ते १|| किलो फेरस सल्फेट ५०० लिटर पाण्यातुन उभ्या पिकावर फवारावे.  खताच्या बाबतीत भुईमुग फुलावर येण्यापूर्वी साधारण ४० दिवसांनी एकरी २५० ते ३५० किलो जिप्सम दोन ओळीत सरळ मिसळुन पाणी द्यावे.

सुक्ष्मअन्नद्रव्ये -
१)      जस्त (झींक) : झाडांची पाने लहान राहतात. पानांच्या शिरामधील भाग पिवळा होतो व नंतर पाने वाळल्यासारखी दिसतात. जमिनीत जस्त कमी असल्यास ४ किग्रॅ. प्रति एकरी झींक सल्फेट पेरणीच्या वेळेस जमिनीत मिसळावे किंवा उभ्या पिकात कमतरता आढळल्यास १ किलोग्रॅम झींक सल्फेट २०० लि. पाण्यात मिसळून फवारावे.
२)      लोह : भुईमूगाची वाढ खुंटते, पाने पिवळी व त्यानंतर पांढरी पडतात. त्यासाठी एकरी १ किलोग्रॅम फेरस सल्फेट, ४०० ग्रॅम चुना आणि १ किलोग्रॅम युरिया २०० लिटर पाण्यात विरघळून पिकावर फवारणी करावी.
३)      बोरॉन : पेरणीनंतर ३० ते ५० दिवसांनी पिक असताना १०० ग्रॅम बोरीक आम्ल २०० लिटर पाण्यात विरघळून फवारले असता किंवा एकरी २ किलोग्रॅम बोरॅक्स पेरणीपूर्वी जमिनीत मिसळल्यास बोरॉन ची कमतरता राहत नाहीउत्पादनात वाढ होते.
४)      कॅल्शियम व गंधक : ज्या जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण ४० ग्रॅम/१०० ग्रॅम पेक्षा कमी आहे. अशा जमिनीत भुईमूगासाठी प्रती एकरी २०० किलोग्रॅम जिप्सम पेरणीच्या वेळी आणि पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी २ हप्त्यांत झाडालगत ५ सें. मी. अंतरावर आऱ्यांची वाढ होते त्या भागात जमिनीत पेरून दिल्यास उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भुईमूगाच्या इक्रीसॅट पद्धतीच्या लागवडीत जिप्सम हे खत देण्याची शिफारस आहे. जिप्सममधून कॅल्शियम २४% आणि गंधक १८.६ % उपलब्ध होते असल्याने भुईमूगाच्या आऱ्या जमिनीत सुलभरित्या जाण्यास, जसेच शेंगा चांगल्या पोसण्यास मदत होते.

आंतरमशागत - भुईमुगाची उगवन झाल्यानंतर नांग्या पडल्या असतील तर बी टोकून नांग्या भरून घ्याव्यात.  कारण एकरी १ ते १| लाख रोपं असणं फार महत्वाचं आहे.  पहिल्या दीड महिन्यात दोन खुरपण्या आणि दोन कोळपण्या करून पीक तणविरहीत ठेवावे. भुईमुगाच्या सर्व प्रकारच्या आंतरमशागतीची कामे आऱ्या सुटण्याच्या अगोदर करावीत. शेवटची कोळपणी खोल आणि पासेला दोरी बांधून करावी. याशिवाय ४० दिवसांनी आणि ५० दिवसांनी २०० लिटर पाण्याचा पत्र्याचा मोकळा ड्रम दोनदा फिरवावा म्हणजे सगळ्या आऱ्या जमिनीत घुसतात आणि त्यांना शेंगा लागतात.

पाणी व्यवस्थापन - वाफशावर भुईमुग पेरल्यानंतर ३-४ दिवसांनी उगवण चांगली होण्यासाठी हलकसं पाणी द्यावे.  नंतर मात्र उन्हाळा असल्याने ८-१० दिवसांनी ६-७ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.  फुलोऱ्यात आऱ्या सुटण्याच्या वेळी शेंगा दुधात असताना आणि भरताना ओलावा असणे फार महत्वाचे आहे. भुइमुगाला तुषार सिंचनाने पाणी देणे उत्पादनाच्या दृष्टीने फायद्याचे ठरते.

कीड व रोग व्यवस्थापन -  
उन्हाळी भुईमुगावर फारशा किडी- रोगाचा प्रादुर्भाव होत नाही तरी पण मावा, तुडतुडे, फूलकडे, पान गुंडाळणारी अळी यांच्या नियंत्रणासाठी फॉस्फामिडान १२० मि. लि., क्वीनालफॉस १ लिटर सायपरमेथ्रीन २०० मि. लि. ५०० लिटर पाण्यातून आलटूनपालटून फवारावीत.

शेंडेमर रोगाच्या नियंत्रणासाठी फूलकिडीचे नियंत्रण केले पाहिजे.  त्यासाठी फॉस्फामिडान फवारावे.  टिक्का तांबेऱ्याच्या नियंत्रणासाठी डायथेन एम. ए. ४५ १२५० ग्रॅम अगर बाविस्टीन २५० ग्रॅम ५०० लिटर पाण्यातून फवारावे.

उत्पादन - अश्या पद्धतीने उन्हाळी भुइमुगाचे व्यवस्थापन केल्यास एकरी सहजपणे वाळलेल्या शेंगाचे १० ते १५ क्विंटल उत्पादन येऊन जमिनीची सुपीकता, बेवड आणि फेरपालट साधते. उन्हाळी हंगामात भुईमुगाचे चांगले उत्पादन मिळते. सर्व प्रकारचे योग्य व्यवस्थापन केले तर उन्हाळी भुईमुगाचे जातीनिहाय उपट्या जातीचे वाळलेल्या शेंगाचे एकरी १० ते १२ क्विंटल आणि पसऱ्या जातीचे एकरी १२ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते.  शिवाय ढाळ्यांचा हिरवा अगर वाळवून पौष्टिक चारा २ ते ३ टन मिळतो. ऐन उन्हाळ्या जनावरांना पौष्टिक चार मिळतो आणि बेवड तसेच फेरपालट या दोन गोष्टी साध्य होतात.

स्‍त्रोत - प्रल्‍हाद यादव, बावस्कर टेक्नॉलॉजी, डॉ.जीवन कातोरे