Wednesday, January 13, 2016

काजू

जमीन
पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व जमिनींत, जांभा दगडापासून तयार झालेल्या वरकस जमिनीत काजूचे पीक चांगले येते. काजूचे झाडास थंडी सहन होत नाही. रेताड आणि दरसाल सुमारे ७५ - ३८० सेंमी. पाऊस पडणाऱ्या भागातही चांगले वाढते. सामान्यतः काजूची लागवड समुद्रकिनाऱ्या नजीकच्या प्रदेशात केली जाते. परंतु समुद्रकिनाऱ्यापासून १६० किमी. इतक्या आत किमान तापमान ७-१० अंश से. असलेल्या प्रदेशात त्याची लागवड करता येते. क्षारपड जमीन वगळता इतर सर्व प्रकारची जमीन चालते. 



बियाणे
डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने काजूच्या वेंगुर्ला - १ ते वेंगुर्ला - ८ जातीचे संशोधन केले आहे. यापैकी प्राधान्याने वेंगुर्ला - 4, वेंगुर्ला - 8 या जातींची कलमे निवडावीत. लागवडीसाठी वेंगुर्ला-1, वेंगुर्ला-4, वेंगुर्ला-6, वेंगुर्ला-7, वेंगुर्ला-8 या जातींची निवड करावी. 

लागवड
रोपे तयार करण्यासाठी लागणारे बी निरोगी, एकसारखे मोठया आकाराचे व वजनदार आणि भरपूर बी देणाऱ्या झाडांपासून निवडावेत. वाफ्यात 20 दिवसांत रोपे 10-13 सेंमी. उंच वाढलेनंतर खड्यात लावतात. खड्यासाठी 1.5 X 1.5 X 1.5 फूटाचे खड्डे घेवून पावसाची सुरुवात झालेवर कलमे / रोपे लावावित. बिया लावण्याच्या वेळी खड्डयात बोर्डो मिश्रण टाका. खड्डा भरताना त्यामध्ये चांगली माती, चार घमेली शेणखत, तीन किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण भरा. दोन खड्डयांमधील अंतर 4 ते 9 मी. ठेवावे. एक हेक्टरमध्ये सुमारे 250 झाडे बसवतात. कोकणातील उतारावरील रोपांना पावसाच्या पाणलोटापासून वाचविण्यासाठी खड्डयाच्या वरच्या बाजूला मातीचा बांध घाला. 


कलम

कलमे लावताना कलमांची हंडी फुटणार नाही, याची काळजी घ्या. कलमाला काठीचा आधार द्या. कलमाच्या खुंटावर येणारी फूट काढून टाका. कलमांच्या जोडावरील प्लॅस्टिकची पिशवी काढून टाकावी. आळ्यात गवताचे आच्छादन करावे. उन्हाळ्यात गरजेनुसार कलमांना पाणी द्यावे.

खत व्यवस्थापन
मोठया झाडांना साधारणपणे पाचव्या वर्षापासून प्रतिवर्ष पावसाळयात प्रतिझाड ४ ते ५ घमेली शेणखत, २ किलो युरिया, १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ०.५०० गॅ्रम म्युरेट ऑफ पोटॅश ही खते द्यावीत. त्यापूर्वी वयोमानानुसार प्रतिवर्ष मात्र कमी करून द्यावी.


पाणी व्यवस्थापन 
कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे प्रमाण जास्त असते. या फळबागांना उन्हाळ्यात पाणी व्यवस्थापन संवेदनशील असते. फळबागांच्या सिंचनासाठी अस्तरित शेततळ्याचा (कोकण जलकुंड तंत्रज्ञान) वापर फायदेशीर आहे. पाणी साठवणीसाठी दर दहा झाडांमध्ये जमीन जर डोंगरउताराची व खडकाळ असल्यास 4 x 1 x 1 मी. किंवा 2 x 1 x 2 मी. या मापाचा चौकोनी खड्डा खोदावा. अस्तराच्या स्वरूपात माती किंवा भातपेंढ्याचा वापर करून सुमारे 15 सें.मी. जाडीचा थर पसरावा. अस्तरीकरनामध्ये कीटकनाशक पावडर वापरावी. अस्तरीकरण करताना प्लॅस्टिक व्यवस्थित पसरावे. बाष्पीभवनाद्वारा होणारा पाण्याचा ऱ्हास टाळण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर 100 मि.लि. नीम / उंडी तेल ओतावे. तसेच तेलाच्या उग्र वासामुळे मोकाट जनावरे, उंदीर, सरडा, विंचू इत्यादी पाण्याजवळ जात नाहीत. 


किड व रोग नियंत्रण
कीड
बी पोखरणारी अळी
बी व फळ जेथे एकमेकांना चिकटलेली असतात, त्यामधून प्रादुर्भाव होतो. झाडावरील भुशासारखा भुसा बियांवर दिसू लागला की अस्तित्व समजते. प्राथमिक अवस्थेत रोगट फळे व बिया गोळा करुन नष्ट कराव्यात.

मूळ किडा व खोड किडा
याच्या प्रदुर्भावमुळे झाड मरते. त्यांच्या नाशासाठी क्रिओसोटमध्ये भिजवलेले कापसाचे बोळे छिद्रात ठेवाव्यात. मेलेले किडे काढून टाकतात. पाने खाणाऱ्या अळया व गर्दभुऱ्या फुलकिडयांचाही उपद्रव होतो. त्यांच्या नाशासाठी फॉलिडॉल फवारावे.

रोग 
रोप कूज
हा रोग पिथियम स्पायनोसम व फायटॉप्थोरा जातीच्या कवकांमुळे (हरितद्रव्य रहित बुरशीसारख्या सूक्ष्म वनस्पतींमुळे) होतो. यामुळे रोपे उगवल्यानंतर कुजतात. रोग निवारणासाठी बिया लावण्याच्या वेळी खड्डयात बोर्डो मिश्रण टाकतात.

भुरी
ओडडियम जातीच्या बुरशीमुळे हा रोग होतो. डिसेंबर जानेवारी महिन्यात ढगाळ हवा पडल्यास, मोहोरावर या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या काळात तुडतुडयांचाही उपद्रव होतो. फॉलिडॉल व गंधक सम प्रमाणात घेऊन ती भुकटी मोहोरावर मारावी. 

फळकूज
रायझोपस व ऍस्परजिलस जातीच्या बुरशीमुळे हा रोग होतो. रोगनाशनासाठी बोर्डो मिश्रण फवारावे.

सडी लागणे
पिलिक्युलेरिया साल्मोनीकलर या बुरशीमुळे झाडाच्या फांद्यावरुन खाली सुकू लागतात. रोग इतर सर्व भागांत पसरुन झाड मरते. रोग निवारणाचे खात्रीचे उपाय नाहीत त्यामुळे रोगग्रस्त झाडे नष्ट करावित.

टी मॉस्किटोचा प्रादुर्भाव 
पालवी व मोहोरावर काजूवरील ढेकण्या (टी मॉस्कीटो)चा प्रादुर्भाव दिसून येतो. पूर्ण वाढलेले ढेकण्या तसेच त्यांची पिल्ले कोवळ्या पालवीतून, मोहोरातून तसेच कोवळ्या फळांमधून रस शोषून घेतात व त्या जागी विषारी द्रव सोडतात. त्यामुळे कोवळ्या पालवीवर व मोहोरावर काळे चट्टे उठतात. हे चट्टे वाढून पूर्ण पालवी व मोहोर सुकतो, जळल्यासारखा दिसतो. फळावर काळ्या रंगाचे खोलगट खड्डे उठतात. या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनात घट संभवते. 

फुलकिडीचा प्रादुर्भाव 
कोवळ्या पालवीवर व मोहोरावर फुलकिडीचा (थ्रिप्स) प्रादुर्भाव दिसून येतो. फुलकिडी पिवळसर रंगाच्या, अतिशय सूक्ष्म आकाराच्या असतात. त्या कोवळी पालवी, कोवळा मोहोर तसेच कोवळी फळे खरवडतात. फळांवर करड्या रंगाचे चट्टे उठलेले दिसतात. काजू बिया खराब दिसतात, वेड्यावाकड्या वाढतात, तसेच उत्पादनात घट येते. 

वरील दोन्ही किडींच्या नियंत्रणासाठी मोहोर अवस्थेतील बागेमध्ये, प्रोफेनोफॉस 10 मि.लि. प्रति 10 लिटरप्रमाणे फवारणी करावी. फळधारणा सुरवात झालेल्या बागेमध्ये, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ( 5 टक्के) 6 मि. लि. प्रति 10 लिटर. 

उत्पन्न
पुर्ण वाढलेले काजूचे झाड साधारण १० ते १२ वर्षानंतर १५ ते २० किलोपर्यंत काजू बीचे उत्पन्न देते. एका झाडापासून २ ते २.५ हजार रूपयांचे उत्पन्न मिळू शकते. प्रत्येक झाडापासून मिळणारी फळे व बिया यांचे उत्पन्न निरनिराळे असते. पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून सरासरी 68 किग्रॅ. फळे व 9 किग्रॅ. बिया मिळतात.

शासकीय सहाय्य्य
काजू लागवडीसाठी म. गां. रा. ग्रा. रो. हमी योजनेतून तीन वर्षासाठी अनुदान मिळत असून अल्प व अत्यल्प भूधारकांना याचा मोठया प्रमाणावर लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतक-यांनी नजिकच्या ग्रामपंचायतीत ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

संपर्क - 02366-262234 
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.

No comments:

Post a Comment