Friday, January 15, 2016

कार्नेशन (जास्वंद)

फुल शेती
कार्नेशन (जास्वंद)

जमीन 
मध्यम प्रतीच्या काळ्या अथवा पोयट्याच्या आणि पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत कार्नेशनचे पीक चांगले येते. पाण्याचा निचरा चांगला झाला नाही तर कार्नेशनच्या पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. कार्नेशनच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू ६ ते ७ असावा.

पॉलिहाऊसमध्ये कार्नेशनची लागवड करताना पोयटा माती आणि उत्तम कुजलेले शेणखत टाकून जमीन तयार करतात. एका भाग पोयटा माती, एक भाग कोकोपीट आणि एक भाग वाळू यांचे मिश्रण कार्नेशनच्या लागवडीसाठी वापरल्यास फुलांचे भरपूर उत्पादन मिळते. कोकोपीट उपलब्ध नसल्यास त्याऐवजी चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत वापरावे.

अ) चबाउड अथवा मार्गारेट कार्नेशन : 
या प्रकारामध्ये कार्नेशनच्या हंगामी प्रजातींचा समावेश होतो. या प्रकारातील कार्नेशनची फुले मोठ्या आकाराची आणि एकेरी अथवा दुहेरी असतात. मात्र काढणीनंतर ही फुले जास्त काळ टिकत नाहीत. या प्रकारातील कार्नेशनची अभिवृद्धी बियांपासून केली जाते.या प्रकारात जायंट चबाऊड, कॉम्पॅक्ट, ड्वार्फ चबाऊड, एनफन्ट डी नाईस, फल्यू डी कॅमेलिया, मार्गारिटा इत्यादी जाती आहेत.

आ) बॉर्डर आणि पिकोटी कार्नेशन : 
या प्रकारात फुलांचे समान भाग पडणारी गोलाकर फुले येतात. या प्रकारातील फुलांच्या पाकळ्या रुंद असतात आणि फुलांमध्ये एका रंगाच्या अथवा विविध रंगाच्या छटा दिसतात. या प्रकारातील कार्नेशनच्या झाडाला पहिल्या वर्षी एकच लांब दांडा येतो. नंतर मात्र झाड झुडपाप्रमाणे वाढते. बॉर्डर कार्नेशनचे फुलांच्या रंगानुसार बिझारीज, फ्लेक्स, सेल्फस, फॅन्सीज आणि पिकोटीज असे अनेक अनेक प्रकार आहेत.१) बिझारीज : उदाहरणार्थ : क्रिमझन बिझारीज, पिंक बिझारीज, पर्पल बिझारीज.२) फ्लेक्स : उदाहरणार्थ: स्कारालेट फ्लेक्स ३) पिकोटी : या प्रकारातील फुले पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची असतात.

इ) परपेच्युअल फ्लॉवरिंग कार्नेशन : 
या प्रकारात कार्नेशनच्या संकरातून निर्माण झालेल्या जातींचा समावेश होतो. या प्रकारातील कार्नेशनला वर्षभर फुले येतात. ही फुले चांगल्या प्रतीची असून काढणीनंतर जास्त दिवस टिकत असल्यामुळे दूरच्या बाजारपेठेत पाठवता येतात. शिवाय त्यांचे दांडे लांब असल्यामुळे त्यानं कटफ्लॉवरसाठी चांगली मागणी असते.

ई) मालमिसन: 
या प्रकारातील झाडांची पाने रुंद असतात . फुले मोठ्या आकाराची, दुहेरी आणि गुलाबी रंगाची असतात. फुले खूप सुंगधी असतात.कार्नेशनचे वरील विविध प्रकार असले तरी फुलांच्या वापरानुसार स्टँडर्ड कार्नेशन आणि स्प्रे कार्नेशन असे दोन प्रमुख गट पडतात. स्टँडर्ड कार्नेशनला लांब दांड्यावर मोठ्या आकाराची फुले येतात. ह्या प्रकारची फुले थंड हवामानात चांगली येतात. स्प्रे कार्नेशनला फुलांचे दांडे आखूड असतात. फुलांचा आकारही लहान असतो आणि थोड्या उष्ण हवामानातही फुले चांगली वाढतात.

कार्नेशनच्या काही महत्त्वाच्या जाती आणि त्यांचे रंग पुढीलप्रमाणे आहेत.
१) पांढऱ्या रंगाच्या जाती - व्हाईट सीम, व्हाईट परफेक्शन, फ्रॅग्रंट अॅन, जॉर्ज ऑलवूड, आइसकॅप, मॅडोना, स्नोक्लोव्ह.
२) गुलाबी रंगाच्या जाती - बेलीज स्प्लेंडर, बेलीज सुप्रीम, पींक हेलेना, क्राऊली सीम, लिंडा, पिंक सीम, ऑलवूड्स पिंक, शॉकिंग पिंक,
३) गर्द गुलाबी (सालमन पिंक) - लेडी सीम, मेरी, प्रिन्सेस ऑफ वेल्स, पॅरिस पोर्ट्रेट.
४) गर्द लाल (स्कारलेट) - ब्रिटानिया, रॉयल मेल, स्केनिया, विल्यम सीम, अॅलेक्स स्पार्क्स.
५) नारिंगी (क्रिमसन) - बेलीज मास्टरपीस, डिप्लोमॅट, जोकर, रॉयल क्रिमसन.
६) पिवळा - यलो सीम, मेरी चबाऊड , ब्युटी ऑफ केंब्रिज, गोल्डन रेड, ऑलवूड्स यलो, हेलिऑस.
७) जांभळा आणि लव्हेंडर - मगरिट, स्टार्म, लॉरायल.
८) अॅप्रिकॉट सेल्फस - हर्वेस्ट मून, मंडारीन सीम, टँजेरीन सीम
९) मिश्र रंगछटा (फॅन्सीज) - ऑर्थर सीम, कँडी सीम, डस्टी सीम, बेलीड अॅमॅरिल्लो, ऑरेंज ट्रायंफ,टँजेटी, लापका, डॅझलर, डस्टी रोज, सीम स्ट्राईप, रेड एज स्कायलाईन.

कार्नेशनच्या काही प्रमुख जातींची गुणवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत -
१) व्हाईट सीम - रंग पांढराशुभ्र, लवकर फुले येणारी
२) डस्टी सीम - फिकट गुलाबी रंग, सतत फुले येणारी
३) लेडी सीम - गर्द गुलाबी रंग, लवकर फुले येणारी
४) शॉकिंग पिंक - गर्द गुलाबी रंग, जोमदार वाढ
५ ) स्केनिया - गर्द लाल, शेंदरी रंग, अत्यंत आकर्षक फुले, जोमदार वाढ.
६) ऑर्थर सीम - पांढऱ्या पाकळीवर लाल रंगाचे पट्टे, जोमदार वाढ.
७) हार्वेस्ट मून - गर्द सोनेरी पिवळ्या रंगाची फुले.

अभिवृद्धी आणि लागवड पद्धती : 
कार्नेशनची अभिवृद्धी बियांपासून आणि शाखीय पद्धतीने करता येते. मार्गारेट म्हणजेच हंगामी कार्नेशनची अभिवृद्धी बियांपासून, पर्पेच्युअल फ्लॉवरिंग कार्नेशनची अभिवृद्धी छाट कलम पद्धतीने, तर बॉर्डर कार्नेशनची अभिवृद्धी गुटी कलम पद्धतीने करतात.

बियांपासून अभिवृद्धी : 
कार्नेशनची बियांपासून अभिवृद्धी करण्यासाठी उत्तम कुजलेले शेणखत आणि पोयटा माती टाकून गादीवाफे तयार करावेत. लाकडी खोकी किंवा बांबूच्या टोपल्यांत शेणखत आणि पोयटा माती आणि पानांचे खत सम प्रमाणात भरून त्यावर कार्नेशनचे बी (१ लि. पाण्यामध्ये २५ ते ३० मिली जर्मिनेटर घेऊन त्या द्रावणात बीजप्रक्रिया करून) पेरावे. बियांची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यांत करावी. बी पेरल्यापासून ५ ते १० दिवसांत उगवून येते. नंतर २० दिवसांत रोपे लागवडीसाठीतयार होतात.

छाटकलम पद्धतीने अभिवृद्धी : 
मातृवृक्षाच्या खोडावर आणि फांद्यांवर फुटणाऱ्या बगल फुटींचा आणि शेंड्याकडील फाटे कलमांचा उपयोग करून कार्नेशनची अभिवृद्धी मोठ्या प्रमाणावर केली जाते. ज्या जातीची लागवड करायची आहे, त्या जातींची जातीवंत निरोपी कलमे खात्रीलायक ठिकाणाहून आणून मातृवृक्षाची लागवड करावी. पूर्ण वाढलेल्या एक वर्षाच्या मातृवृक्षापासून १५ ते २५ फाटे कलमे तयार होतात.

फाटे कलम लावताना खालील बाबी लक्षात घ्याव्यात.
१) कार्नेशनच्या फाटे कलमांना मुळे चांगली फुटण्यासाठी जर्मिनेटर चा वापर तसेच १५ ते २० डी सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. पॉलिहाऊसमध्ये नियंत्रित वातावरणात वर्षभर कार्नेशनची फाटे कलमे तयार करता येतात. परंतु नैसर्गिक हवामानात अशी छाट कलमे तयार करताना हवामानाचा विचार करणे आवश्यक आहे. पुणे, नाशिक आणि महाबळेश्वर या ठिकाणी जुलै महिन्यात किमान ७ फुट उंचीवर पॉलिथीनचे आच्छादन टाकून छाट कलमे तयार करतात. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये छाट कलमे तयार केल्यास त्यांना चांगली मुळे फुटून मोठ्या प्रमाणावर छाट कलमे तयार करता येतात. उन्हाळ्यात छाट कलामांना चांगली मुळे फुटत नाहीत.
२) छाट कलमे लावण्याकरिता योग्य मध्यम निवडण्याची गरज आहे. एक भाग पोयटा माती, एक भाग कोकोपीट अथवा उत्तम कुजलेले शेणखत आणि एक भाग वाळू यांच्या मिश्रणात छाट कलमे लावली तर त्यांना चांगली मुळे फुटतात. वाळू, परलाईट, व्हार्मिफ्युलाईत आणि ओले शेवाळ या माध्यमात छाट कलमांना चांगली मुळे फुटत नाहीत.
३) खोडावरून अथवा उपफांद्यांवरून येणाऱ्या बगलफुटीचा १० ते १५ सेंटिमीटर लांबीचा शेंडा काढून घ्यावा. त्यावर ४ ते ६ पानांच्या जोड्या असाव्यात. अशा प्रकारे निवडलेल्या छाट कलमाचा खालचा १ सेंटिमीटर लांबीचा भाग १ लि. पाण्यामध्ये २० ते २५ मिली जर्मिनेटर १० ग्रॅम प्रोटेक्टंटच्याद्रावणात बुडवून लागवड केल्यास त्याला लवकर आणि जास्त मुळे फुटतात. लागवड करण्यापुर्वी छाट कलमे १० लिटर पाण्यात १०० मिली जर्मिनेटर + ५० ग्रॅम प्रोटेक्टंट या प्रमाणात मिसळून तयार केलेल्या द्रावणात भिजवून घ्यावीत. नंतर लागवड करताना कलमाची खालची दोन पाने जमिनीला टेकणार नाहीत अशा बेताने लावावीत. पाने जमिनीला टेकल्यास त्यावर बुरशीजन्य रोगाची वाढ सुरू होण्यास मदत होते. छाटकलमांची लागवड ५ सेंटिमीटर अंतरावर करावी. लागवडीनंतर ३ आठवड्यांत मुळे फुटतात आणि पुढे एक आठवड्यात मुळांची चांगली वाढ होते.
४) मुळे फुटलेली छाट कलमे शीतगृहामध्ये २ महिने तर मुळे न फुटलेली छाट कलमे ६ महिन्यांपर्यंत साठवून ठेवता येतात. शेतात कार्नेशनची लागवड करण्यासाठी जमिनीची नांगरट करून, कुळवून चांगली मशागत करावी. नंतर चांगले कुजलेले शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खत मातीत मिसळावे. गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यावरून पाण्याचा निचरा चांगला होतो. त्यामुळे मर रोगाचा उपद्रव कमी होतो. लागवडीपुर्वी वाफे फॉरमेल्डिहाईडच्या द्रावणाने पूर्ण निर्जंतूक करून घ्यावेत. लागवडीपुर्वी ठिबक संचाची मांडणी करून घ्यावी.

हंगाम आणि लागवडीचे अंतर : 
कार्नेशनची लागवड खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात उघड्या शेतात करता येते. महाबळेश्वरसारख्या जास्त पावसाच्या प्रदेशात जोरदार पाऊस संपल्यावर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात या पिकाची लागवड करता येते. कारण नंतरच्या थंड हवामानात हे पीक चांगले येते.पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर येथे कमी पाऊस पडणाऱ्या परंतु हवामान सौम्य असणाऱ्या भागात खरीप हंगामासाठी जून - जुलै महिन्यांत लागवड करता येते. जोरदार पावसाच्या किंवा कडक उन्हाळ्याच्या काळात कार्नेशनची लागवड करू नये.पॉलिहाऊसमध्ये हवामानाचे घटक (तापमान, सुर्यप्रकाश, आर्द्रता) नियंत्रित केलेले असतात. त्यामुळेया पिकाची केव्हाही लागवड करता येते आणि वर्षभर उत्पादन मिळविता येते. कार्नेशन पिकासाठी लागवडीचे अंतर १५ x १५ सेंटिमीटर असावे. सर्वसाधारणपणे स्टँडर्ड कार्नेशन २० x १५ सेंटिमीटर अंतरावर लावतात. अशा रीतीने दर चौरस मीटर क्षेत्रामध्ये ३० ते ४० झाडे बसतात. पॉलिहाऊसमध्ये कार्नेशनच्या लागवडीसाठी १ मीटर रुंद, २० सेंटिमीटर उंच आणि १५ ते २० मीटर लांबीचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यावर २० x २० सेंटिमीटर अंतरावर रोपांची लागवड करावी. या अंतरावर लागवड केल्यास दर चौरस मीटर जागेत २५ झाडे बसतात.

वळण आणि आधार देण्याची पद्धत : 
कार्नेशनच्या पिकामध्ये शेंड्याकडील कळी खुंडल्यास बाजूच्या फांद्यांची संख्या वाढते आणि एका झाडावर एका वेळी बरीच फुले घेत येतात. कार्नेशनच्या लागवडीनंतर सुमारे ४ आठवड्यांनी झाडाला ५ ते ६ पानांच्या जोड्या येतात. त्यानंतर जमिनीपासून १५ ते २५ सेंटिमीटर उंचीवर कार्नेशनच्या झाडाचा शेंडा खुडून टाकावा. त्यामुळे खोडावरील पानांच्या बगलेतीलअंकुरांना वाढीची चालना मिळून जास्त फांद्या फुटतात. सर्व झाडे एकाच वेळी खुडणीस येत नसल्यामुळे३ ते ४ आठवडे शेंडा खुडणीचे काम करावे. शेंडा खुडणीनंतर प्रत्येक झाडाला ५ ते ६ उपफांद्या वाढतात. कार्नेशनच्या स्टँडर्ड प्रकारामध्ये जास्तीत जास्त ६ उपफांद्या ठेवून बाकीचे खालचे फुटवे काढावेत. फांदीच्या शेंड्याकडे कळी येण्यास सुरवात झाल्यावर प्रत्येक झाडाजवळ बांबूच्या काठीचा आधार देऊन फांद्या २ - ३ ठिकाणी ठराविक उंचीवर बांधून झाडांना आधार द्यावा किंवा जमिनीच्या सपाटीपासून १२.५ सेंटिमीटर उंचीवर झाडांच्या ओळीतून वाफ्याच्या लांबीनुसार उभी - आडवीतार बांधावी. पिकाची उंची वाढत जाईल त्याप्रमाणे १२.५ सेंटिमीटर उंचीवर उभ्या - आडव्या तारा बांधाव्यात. तारांना मधून मधून लाकडी खांबांचे आधार द्यावेत. अशा पद्धतीने तारांचे जाळे बनवून फांद्यांना आधार दिल्यास फांद्या न मोडता लांब दांड्याची फुले मिळू शकतात.कार्नेशनमध्ये काही जातींत कळीचे फुलात रूपांतर होताना कळी फुटून फुल खराब होते. खताची प्रमाणापेक्षा जास्त मात्रा देणे, जास्त तापमान, रात्रीच्या तापमानात अचानक बदल होणे. नत्राची मात्रा कमी होणे, बोरॉनाची कमतरता असणे इ. कारणांमुळे कळी फुटण्याचे प्रमाण वाढते. हे टाळण्यासाठी मुख्य फांदीच्या शेंड्याकडील कळीने रंगाची छटा दाखवेपर्यंत बाजूच्या काळ्या खुडू नयेत. मुख्य फांदीवरील मोठ्या कळीला देठापासून एकतृतीयांश लांबीवर रबर बँड अडकवावा.

महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण : 
कार्नेशनच्या पिकावर लाल कोळी, मावा, तुडतुडे, टॉंरट्रिक्स मॉथ, सूत्रकृमी इ. किडींचा उपद्रव होतो.
१) लाल कोळी : 
लाल कोळी कार्नेशनच्या पानाच्या काळाच्या खालच्या बाजूस राहतात आणि पानांतील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळसर दिसू लागतात. पानांवर कोळ्यांची जाळी तयार होते. किडीचा उपद्रव खूप वाढल्यास झाडांची वाढ खुंटते आणि फुलांची प्रतही कमी होते.उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात २० ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक आणि २० ग्रॅमप्रोटेक्टंट या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.

२) मावा : 
मावा या किडीची पिल्ले आणि प्रौढ किडे झाडाच्या पानांतील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडू लागतात. पाने निस्तेज होतात आणि त्यांची वाढ खुंटते. ही कीड पानाफुलांच्या देठांवर तसेच फुलांच्या पाकळ्यांवर राहून रस शोषून घेते. त्यामुळे फुलांची प्रत खराब होते.उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात १० मिलीलिटर मॅलॅथिऑन (५०%) आणि २० ग्रॅम प्रोटेक्टंट या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.

३) फुलकिडे : 
ही कीड पानांच्या मागील बाजूस राहते आणि पानांतील अन्नरस शोषून घेते. अन्नरस शोषूनघेण्यासाठी ही कीड पानाचा मागील भाग खरवडते. त्यामुळे पानाच्या मागील बाजूस खरचटल्यासारखे डाग दिसतात.कळ्या आणि फुलांच्या पाकळ्यांवरही ही कीड राहते. त्यामुळे कळ्या आणि फुले काळपट पडतात. त्यांची प्रत खराब होते.उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी पिकावर १० लिटर पाण्यात २० मिलीलिटर डायमेथोएट + २५ ग्रॅम प्रोटेक्टंट या प्रमाणात मिसळून फवारावे.

४) टॉंरट्रिक्स मॉथ: 
या किडीच्या अळ्या चंदेरी रंगाच्या धाग्यांच्या सहाय्याने कार्नेशनची काही पाने एकत्र गुंडाळतात आणि त्यात लपून राहून अधाशाप्रमाणे पाने खातात. ही अळी झाडाचे शेंडे खाते तसेच कळ्यांमध्ये घुसून आतील भागावर उपजीविका करते. पाने गुंडाळून त्यात राहण्यास सुरुवात केल्यानंतर अळीचे नियंत्रण करणे अतिशय कठीण असते.

५) सूत्रकृमी : 
कार्नेशनच्या पिकावर सुत्रकृर्मिच्या१५ ते २० जातींचा उपद्रव होतो. सूत्रकृमी झाडाच्या मुळांमधील पेशींमध्ये राहून आतील अन्नरसावर उपजीविका करतात. त्यामुळे झाडाच्या मुळांचीवाढ खुंटते. झाडाला अतिशय कमी प्रमाणात फुले येतात.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी कार्नेशनची लागवड करताना निर्जंतुक केलेली माती वापरावी. तसेचकार्नेशनच्या प्लॉटच्या कडेने झेंडूची लागवड करावी.

महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण : कार्नेशनच्या पिकावर मर रोग, पानावरील ठिपके इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव होतो.

१) मर रोग : 
कार्नेशनच्या पिकाला मर (फ्युजेरियम बिल्ट ) या रोगाची फार मोठ्या प्रमाणावर लागण होऊन पिकाचे मोठ्या प्रमाणवर नुकसान होते. या रोगामुळे झाडाची पाने पिवळी पडून सुकतात. झाडांनी वाढ खुंटते. जमिनीलगतच्या खोडावरील साल काळपट पडल्यासारखी दिसते. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास संपूर्ण झाड सुकून वाळून जाते.उपाय : या रोगाचे नियंत्रण सुरूवाती सुरूवातीपासून काळजी घ्यावी लागते. पिकांच्या लागवडीसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन आणि रोगप्रतिकारक जातींची निवड करावी. रोगाची लागण झालेली दिसताच अशी झाडे उपटून नष्ट करावीत. या रोगाची बुरशी मातीत वाढते लागवडीपूर्वी माती निर्जंतूक करून घ्यावी. सुरूवातीच्या अवस्थेत जर्मिनेटर ३० मिली १० लिटर पाण्यातून ४ - ४ दिवसांच्या अंतराने दोन वेळा ड्रेंचिंग करावे.

२) खोडकूज :
कार्नेशनच्या पिकावर फ्युजेरियम रेझीयम नावाच्या बुरशीमुळे खोडकूज हा रोग होतो. या बुरशीची लागण जमिनीजवळील खोडाजवळ जास्त प्रमाणात होते आणि बुरशी खोडाच्या आतील भागात प्रवेश करते. त्यामुळे खोड कुजून संपूर्ण झाड मरते.

३) पानावरील ठिपके : 
या बुरशीजन्य रोगामुळे कार्नेशनच्या पानांवर आणि खोडावर ठिपके पडतात. त्यामुळे पाने वळतात आणि पूर्ण वाढ होण्यापुर्वीच गळून पडतात.उपाय : या रोगाच्या नियंत्रणसाठी १० लिटर पाण्यात थ्राईवर ३० मिली + क्रॉंपशाईनर ३० मिली + न्युट्राटोन ३० मिली + हार्मोनी १५ मिली या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.

शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण :
१) कळी फुटणे (कॅलिक्स स्प्लिटिंग)
कार्नेशनमध्ये कॅलिक्स स्प्लिटिंग म्हणजेच फुलाचा निदलपुंज फाटणे ही विकृती दिसून येते. निदलपुंज फाटल्यामुळे फुलांचे भाग व्यवस्थित ठेवण्याचे कार्य नीट होत नाही आणि निदलपुंज एका बाजूस फाटून फुलांचे आतील भाग बाहेर पडलेले दिसतात. अशा फुलांना बाजारात किंमत मिळत नाही. ही विकृती एक तर आनुवंशिक असते किंवा वातावरणातील तापमान आणि इतर घटकांचा परिणाम तसेच नायट्रोजन आणि बोरॉन या द्रव्यांची कमतरता झाल्यामुळे दिसून येते.
उपाय : या विकृतीस बळी न पडणाऱ्या जातींची लागवडीसाठी निवड करावी. फुले कळीच्या अवस्थेत असताना तापमानात बदल होण्याची शक्यता असेल तर कळीभोवती रबर बँड गुंडाळावे.

२) चुरगळलेले शेंडे (कार्ली टिप) : 
या विकृतींमध्ये फांद्यांचे शेंडे चुरगळल्यासारखे दिसतात. अशा चुरगळलेल्या शेंड्यांची वाढ होता राहिल्यास त्यांना विशिष्ट नागमोडी आकार येतो. कमी सूर्यप्रकाश आणि कमी तापमानात ही विकृती आढलून येते. नत्राची कमतरता असल्यास काही प्रमाणात ही विकृती दिसून येते.
उपाय : या विकृतीच्या नियंत्रणसाठी पिकाला स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल अशी व्यवस्था करावी. योग्य तापमान राखावे. पिकला नत्र खताचा योग्य प्रमाणात पुरवठा करावा.

तणांचे नियंत्रण : कार्नेशन हे बहुवर्षायु पीक म्हणून लावले जाते म्हणून सुरूवातीपासून तणनियंत्रणाबाबतयोग्य काळजी घ्यावी. कार्नेशनच्या पिकाला तारांचा आधार द्यावा लागत असल्यामुळे लागवडीनंतर शेतात आंतरमशागत करणे कठीण जाते. म्हणूनच लागवडीपुर्वी हरळी, लव्हाळा, कुंदा यासारख्या तणांच्या नियंत्रणासाठी खोल नांगरणी करून तणांची मुळे काढून टाकावीत. लागवडीनंतर शेतात उगवणारी घोळा दीपमाळ, पांढरी फुली, आघाडा, शिंपी, कोंबडा यासारखी तणे खुरपणी करून काढून टाकावीत.

फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री: 
चबाऊड (हंगामी) कार्नेशनची लागवड केल्यापासून अडीच ते तीन महिन्यांत फुले येतात. ही फुले लांब दांड्यासह काढून विक्रीसाठी पाठवतात. परपेच्युअल फ्लॉवरिंग (बहुवर्षायु) कार्नेशनची लागवड केल्यानंतर सुमारे ५ महिन्यांनी फुलांची काढणी सुरू होते. फुल ७५% उमलल्यानंतर लांब दांड्यासह छाटून घ्यावे आणि लगेचे पाण्यात ठेवावे.उन्हाळ्यामध्ये हिवाळी हंगामाच्या तुलनेत थोडे लवकर म्हणजे जास्त अमलण्यापूर्वी फुलांची काढणी करावी. स्टँडर्ड कार्नेशनसाठी फुले दूरच्या बाजारपेठेत पाठवायची असतील तर काढल्यानंतर काही काळ थंड जागी ठेवतात. स्टँडर्ड कार्नेशनसाठी फुलांच्या बाहेरील सर्व पाकळ्यांवर रंगाची छटा दिसू लागल्यावर म्हणजेच फुलाच्या कळीतील बाहेरील रंगाच्या पाकळ्या देठाशी ९० अंशांचा कोन करतात, अशा अवस्थेत फुलांची काढणी करावी. स्प्रे कार्नेशनच्या बाबतीत फुलांच्या दांड्यावरील दोन फुले पुर्णउमलल्यानंतर आणि इतर फुले रंग दाखवू लागल्यानंतर फुलांची काढणी करावी. फुले धारदार चाकूने छाटूनघ्यावीत. फुलांची काढणी ८ महिने चालू राहते आणि या काळात प्रत्येक झाडापासून फुलांचे ६ ते ८ दांडे मिळतात. दर चौरस मीटर क्षेत्रातून फुलांचे २०० दांडे मिळतात.

फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण : 
फुले काढल्यानंतर फुलांचे दांडे लगेच २ - ४ तास पाण्यात अथवा संरक्षक द्रावणात बुडवून ठेवावेत. त्यानंतर फुलांचे प्रीकुलिंग करावे. प्रीकुलिंगसाठी १ ते २ अंश सेल्सिअस तापमान आणि ९० % सापेक्ष आर्द्रता असावी, नंतर फुलांची प्रतवारी करावी. कार्नेशनची प्रतवारी करताना फुलांच्या दांड्याची लांबी, फुलांचा आकार, रंग, निरोगी फुले आणि कॅलिक्स स्प्लिटिंगचा अभाव या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.कार्नेशनच्या फुलांच्या रंगानुसार आणि आकारनुसार २० ते २५ फुलांची एक याप्रमाणे जुड्या बांधतात.८ ते १० जुड्या प्लॅस्टिक क्रेटमधून अथवा पुठ्ठ्याच्या खोक्यात भरून विक्रीसाठी पाठवितात.० अंश सेल्सिअस तापमान आणि ९०% आर्द्रता अशा नियमित शीतगृहात ४ ते ६ आठवड्यांपर्यंत कार्नेशनची फुले साठवून ठेवता येतात.

फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री: 
चबाऊड (हंगामी) कार्नेशनची लागवड केल्यापासून अडीच ते तीन महिन्यांत फुले येतात. ही फुले लांब दांड्यासह काढून विक्रीसाठी पाठवतात.परपेच्युअल फ्लॉवरिंग (बहुवर्षायु) कार्नेशनची लागवड केल्यानंतर सुमारे ५ महिन्यांनी फुलांची काढणी सुरू होते. फुल ७५% उमलल्यानंतर लांब दांड्यासह छाटून घ्यावे आणि लगेचे पाण्यात ठेवावे.उन्हाळ्यामध्ये हिवाळी हंगामाच्या तुलनेत थोडे लवकर म्हणजे जास्त अमलण्यापूर्वी फुलांची काढणी करावी. स्टँडर्ड कार्नेशनसाठी फुले दूरच्या बाजारपेठेत पाठवायची असतील तर काढल्यानंतर काही काळ थंड जागी ठेवतात. स्टँडर्ड कार्नेशनसाठी फुलांच्या बाहेरील सर्व पाकळ्यांवर रंगाची छटा दिसू लागल्यावर म्हणजेच फुलाच्या कळीतील बाहेरील रंगाच्या पाकळ्या देठाशी ९० अंशांचा कोन करतात, अशा अवस्थेत फुलांची काढणी करावी. स्प्रे कार्नेशनच्या बाबतीत फुलांच्या दांड्यावरील दोन फुले पुर्णउमलल्यानंतर आणि इतर फुले रंग दाखवू लागल्यानंतर फुलांची काढणी करावी. फुले धारदार चाकूने छाटूनघ्यावीत. फुलांची काढणी ८ महिने चालू राहते आणि या काळात प्रत्येक झाडापासून फुलांचे ६ ते ८ दांडे मिळतात. दर चौरस मीटर क्षेत्रातून फुलांचे २०० दांडे मिळतात.

फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण : 
फुले काढल्यानंतर फुलांचे दांडे लगेच २ - ४ तास पाण्यात अथवा संरक्षक द्रावणात बुडवून ठेवावेत. त्यानंतर फुलांचे प्रीकुलिंग करावे. प्रीकुलिंगसाठी १ ते २ अंश सेल्सिअस तापमान आणि ९० % सापेक्ष आर्द्रता असावी, नंतर फुलांची प्रतवारी करावी. कार्नेशनची प्रतवारी करताना फुलांच्या दांड्याची लांबी, फुलांचा आकार, रंग, निरोगी फुले आणि कॅलिक्स स्प्लिटिंगचा अभाव या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. कार्नेशनच्या फुलांच्या रंगानुसार आणि आकारनुसार २० ते २५ फुलांची एक याप्रमाणे जुड्या बांधतात.८ ते १० जुड्या प्लॅस्टिक क्रेटमधून अथवा पुठ्ठ्याच्या खोक्यात भरून विक्रीसाठी पाठवितात.० अंश सेल्सिअस तापमान आणि ९०% आर्द्रता अशा नियमित शीतगृहात ४ ते ६ आठवड्यांपर्यंत कार्नेशनची फुले साठवून ठेवता येतात.

No comments:

Post a Comment