Wednesday, January 13, 2016

बेदाणा / किसमिस/ सुकी द्राक्षे

बेदाण्यासाठीच्या बागेचे फळछाटणीनंतरचे व्यवस्थापन

बाजारात बेदाण्याला चांगला दर मिळत असल्यामुळे बेदाणा निर्मितीसदेखील चांगला वाव आहे. या लेखामध्ये दर्जेदार बेदाणानिर्मितीसाठी बागेचे व्यवस्थापन कसे असावे याबद्दलची माहिती आपण घेत आहोत.

द्राक्षबागेत एप्रिल महिन्यात खरड छाटणी झाल्यानंतर द्राक्षबागेत नवीन फुटी निघतात. या फुटींची योग्य ती वाढ होण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतात. त्यानंतर वेलीवर तयार झालेल्या काडीमध्ये घडनिर्मिती झाली, काडी परिपक्व झाली. याच काडीवर आता फळछाटणी करावयाची आहे. त्यानंतर बागेचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे असते.

वेलीची मुळी सक्षम करा
1) बेदाण्यासाठीच्या द्राक्ष बागेतील वेलीवर इतर द्राक्षांपेक्षा (उदा. खाण्याची व मद्यनिर्मितीची द्राक्षे) घडांची संख्या जास्त असते. त्यामुळेच वेलीची अन्नद्रव्यांची गरजसुद्धा तितकीच वाढते. ही गरज पूर्ण करण्यासाठी आपल्या बागेत शिफारसनुसार अन्नद्रव्यांची मात्रा द्यावी. परंतु, जर वेलीची मुळी कार्यक्षम नसेल तर जमिनीतून किंवा ठिबकद्वारे दिलेले अन्नद्रव्य वेल उचलण्यास असमर्थ ठरेल. याकरिता जमिनीत पांढरी मुळी महत्त्वाची असते.
2) पांढरी मुळी नवीन तयार झाली असल्यामुळे इतर मुळींपेक्षा सक्षम असते. ही मुळी दिलेले अन्नद्रव्य आवश्यकतेनुसार उचलते. ही मुळी तयार करण्याकरिता फळछाटणीच्या 12 ते 14 दिवसांपूर्वी बोद खोदून चारी घ्यावी. त्यानंतर चारीच्या तळात काडीकचरा, कंपोस्ट किंवा शेणखत आणि शिफारशीत खतमात्रा मिसळून बंद करावी. यामुळे पांढरी मुळी तयार होऊन आवश्यक अन्नद्रव्यपुरवठा करण्यास वेल सक्षम राहाते.

द्राक्षवेल निरोगी असावी
1) द्राक्षबागेत ऑक्टोबर महिन्यात फळछाटणी घेतली जाते. अशा वेळी पाऊस सुरू असतो. सोबतच जमिनीत ओलावा जास्त असल्याने बागेमध्ये आर्द्रता जास्त प्रमाणात वाढते. यामुळे जुन्या कॅनॉपीवर (फळ छाटणीपूर्वी) डाऊनी मिल्ड्यू व करपा या रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.
2) फळछाटणी करतेवेळी ही रोगग्रस्त पाने वेलीवर थोड्या प्रमाणात राहिली तरी तितकीच हानिकारक असतात. त्यामुळे फळछाटणीच्या दोन दिवसांपूर्वी बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. फळछाटणी होताच बागेत पुन्हा दोन दिवसांमध्ये वेलीवर एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी वेलीच्या ओलांड्यावर तसेच जमिनीवरसुद्धा करावी. याचसोबत वेलीवर चुकून राहिलेली रोगग्रस्त पाने बाग पोंगाअवस्थेत येण्यापूर्वीच काढून टाकावीत. यामुळे द्राक्षबाग निरोगी ठेवण्यास मदत होईल.
3) वेलीवर नवीन फुटी व घडांची आवश्यकता
1) फळछाटणीनंतर बागेमध्ये वेलीवर 100 पेक्षा जास्त घड आलेले दिसून येतात. आपण प्रत्येक काडीवर 4 ते 5 डोळ्यांवर हायड्रोजन सायनामाईडचे पेस्टिंग करतो, त्यामुळे प्रत्येक काडीवर तितक्याच फुटी बाहेर येतात.
2) बेदाणानिर्मितीकरिता आवश्यक असलेली घडांची संख्या व वेलीवर त्या घडांच्या पोषणाकरिता गरजेची पाने या गोष्टींचा विचार करता वेलीवर प्रती वर्गफूट 2 ते 2.5 घड असणे गरजेचे असते.
3) प्रत्येक घडाच्या पोषणाकरिता त्या काडीवर 15 ते 16 पानेसुद्धा तितकीच महत्त्वाची असतात. तेव्हा वेलीवर आवश्यक तितक्या फुटी राखून इतर फुटी काढून टाकाव्यात. यामुळे कॅनॉपीमध्ये मोकळी हवा राहील.
4) प्रत्येक पान व घड सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात येत असल्यामुळे त्या वेलीचे प्रकाशसंश्लेषण चांगले होऊन अन्नद्रव्याचा साठासुद्धा तितक्याच प्रमाणात होईल. वेल सशक्त राहून घडाचा विकास चांगला होण्यास मदत होईल. या फुटी काढण्याची ठराविक वेळ आहे. म्हणजेच फळछाटणीच्या 14 ते 15 दिवसांच्या कालावधीमध्ये बागेतील अनावश्यक फुटी काढून टाकाव्यात.

बेदाणानिर्मिती आणि संजीवकांचा वापर
1) जर द्राक्षमण्याची साल पातळ असेल तरच बेदाण्याची प्रत चांगली आहे असे मानली जाते. म्हणजेच अशा प्रकारचा बेदाणा तोंडात टाकल्यावर लवकर विरघळेल. ही परिस्थिती तयार होण्याकरिता फळकाढणी करतेवेळी मण्यामध्ये गोडी (जवळपास 24 डिग्री ब्रिक्स) आणि साल पातळ असावी. याकरिता संजीवकाचा वापर शक्य तितका टाळावा.
2) एकसारखा बेदाणा मिळण्याकरिता द्राक्षघड सुटसुटीत असावा. म्हणजेच घडाच्या दोन पाकळ्यांमधील अंतर वाढल्यास हा घड सुटसुटीत करून घेता येईल. परिणामी एकसारखा आकाराचे मणी मिळवता येईल. तेव्हा संजीवकाचा वापर फक्त प्रिब्लुम अवस्थेमध्येच करावा.
1) पोपटी रंगाची घड अवस्था ः 10 पीपीए जीए3 (ही अवस्था फळछाटणीनंतर 17 ते 19 व्या दिवशी दिसून येईल.)
2) जीए3ची दुसरी फवारणी ः 15 पीपीएमने करावी.
ही फवारणी पहिल्या फवारणीच्या 4 ते 5 दिवसांनी करावी. यामुळे मोकळा घड मिळण्यास मदत होईल. यानंतर बागेमध्ये संजीवकाची फवारणी टाळावी. मणी सेटिंगनंतर फवारणी केल्यास मण्याची साल जाड होईल. त्यामुळे साखर उतरण्यास उशीर लागेल. फळकाढणी करण्याकरिता उशीर होईल.

अन्नद्रव्यांचा पुरवठा
द्राक्षबागेमध्ये बेदाणानिर्मितीकरिता घडांची संख्या व उपलब्ध घडांचा विकास होण्यासाठी आवश्यक ती कॅनॉपी असावी. याकरिता बागेमध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा गरजेचा असतो. फळछाटणीनंतर ही वाढ तीन टप्प्यांमध्ये विभागली जाते.

पहिला टप्पा शाकीय वाढ
1) वेलीची शाकीय वाढ होण्याकरिता फळछाटणीनंतर सुरवातीच्या 30 दिवसांकरिता नत्राचा वापर गरजेचा असतो. ही गरज पूर्ण होण्याकरिता युरिया, 12:61:0, 13:0:45, 18:46:0 इत्यादी खतांचा शिफारशीनुसार वापर केला जातो.
2) जमिनीचा प्रकार व वेलीच्या वाढीचा जोम या गोष्टींचा विचार करूनच वर दिलेल्या खतांपैकी निवड करावी.

दुसरा टप्पा घडाचा विकास होणे
1) या अवस्थेमध्ये घडाचा तसेच मण्याचा विकास होणे गरजेचे आहे. याचवेळी वेलीमधील सोर्स सिंक संबंध प्रस्थापित करावा. याकरिता मणी सेटिंगपर्यंत वेलीवरील घडाच्या विकासाकरिता आवश्यक त्या पानांची पूर्तता झाली, की शेंडापिंचिंग करून घ्यावी. यावेळी घडाचा विकास होण्याकरिता स्फुरदाची आवश्यकता असते, तेव्हा 0:52:34 किंवा फॉस्फरीक ऍसिडच्या माध्यमातून 30 ते 60 दिवसांच्या कालावधीमध्ये स्फुरदाची उपलब्धता करून घ्यावी.

वाढीचा तिसरा टप्पा मण्यात गोडी येण्याची स्थिती
1) या अवस्थेमध्ये वेलीस नत्राचा व स्फुरदचा पुरवठा बंद करून फक्त पालाशची पूर्तता करावी. ही अवस्था बागेमध्ये 60 ते 90 दिवसांच्या कालावधीमध्ये असते.
2) जमिनीचा प्रकार, कॅनॉपीची अवस्था इ. गोष्टींचा विचार करता 0ः0ः50 किंवा सल्फेट ऑफ पोटॅश या ग्रेडच्या खतांच्या माध्यमातून वेलीस पालाशची पूर्तता करावी. यामुळे मण्यामध्ये गोडी वाढेल. त्याचा परिणाम चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार करण्यास सोपे होईल.

द्राक्षापासून बेदाणा कसा तयार करतात?

* चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार करावयाचा असेल, तर बेदाणे तयार करतेवेळी एकसारख्या आकाराचे, रंगाचे घड बागेतून तोडावेत.
* घड काढण्यापूर्वी मण्यामध्ये साखरेची गोडी उतरली आहे याची खात्री करून घ्यावी, कारण चांगल्या प्रतीचा बेदाणा म्हटल्यास त्यात गोडी जास्त असावी लागते.
* काढलेली द्राक्षे शक्यतो सुरवातीला स्वच्छ पाण्यातून काढून घ्यावी. त्यानंतर ही द्राक्षे 25 ग्रॅम पोटॅशिअम कार्बोनेट अधिक 15 मि.लि. ईथाइल ओलिएट (डीपिंग ऑइल) प्रति लिटरच्या द्रावणात दोन ते चार मिनिटे बुडवून ठेवावीत.
* या द्रावणाचा सामू 11 पर्यंत असावा. तद्नंतर द्रावणातून काढलेली द्राक्षे सावलीमध्ये जाळीवर सुकवावीत. वातावरणातील तापमानानुसार 15 ते 22 दिवसांत चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार होऊ शकतो.
* चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार करायचा असेल, तर जास्त तापमान (35-40 अंश से.) व कमी आर्द्रता (30 टक्केपेक्षा कमी) असल्यास त्याचे परिणाम चांगले मिळतात.
* वाऱ्याचा वेग कसा आहे, यावरसुद्धा बेदाण्याची प्रत अवलंबून असते. हवा खेळती असल्यास कमी वेळेत चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार होतो.

*चांगल्या प्रतीचा बेदाणा
- एकसारख्या आकाराचा आणि रंगाचा बेदाणा.
- तयार झालेल्या बेदाण्याची साल पातळ असावी.
- बेदाण्याची गोडी चांगली असावी.

☎020-26956060
(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे येथे कार्यरत आहेत.)
माहिती संदर्भ -अग्रोवोन

No comments:

Post a Comment