Friday, March 11, 2016

कोंबडी / कुक्कुट पालन

कोंबडी / कुक्कुट पालन

निवड
मांस उत्पादन - ब्रॉयलर
अंडी उत्पादन (खालीलप्रमाणे)
गावठी कोंबड्या (वार्षिक अंडी उत्पादन 60-80),
व्हाइट लेगहॉर्न (वार्षिक अंडी उत्पादन 240-260)
ऱ्होड आयलॅंड रेड (वार्षिक अंडी उत्पादन 240-260)

संगोपन
शेड
हवामानातील बदल ,ऊन, वारा ,पाऊस,थंडी तसेच इतर प्राण्यांपासून संरक्षणासाठी कॊंबडयांना घराची आवश्यकता आहे. कोंबडी घराची दिशा ही नेहमी पूर्व - पश्‍चिम ठेवा. प्रत्येक ब्रॉयलर पक्ष्याला एक चौ.फुट जागा लागते तर प्रत्येक अंडी देणा-या कोंबडीस अडीच ते तीन चौरस फूट जागा लागते. घराची लांबी पक्ष्यांच्या संख्येवर अवलंबून असते.मात्र रूंदी २५ फुटापेक्षा जास्त असू नये ही घरे जमीनीपासून २ फुट उंचीवर असावीत .सुरवातीस २ ते ३ फुट भिंती घ्याव्यात व त्यावर छतापर्यत बारीक जाळ्या बसवाव्यात .मधली उंची १२ ते १५ फूट असावी व छत दोन्ही बाजूस उतरते असावे. दोन्ही बाजूंस छपराचा पत्रा साधारणतः चार फूट बाहेर काढल्याने पडनारा पाऊस जमिनीवर पडून लिटर ओले होत नाही. घराची मधली उंची 12 ते 15 फूट व बाजूची उंची सात ते आठ फूट ठेवल्याने छपरास योग्य ढाळ मिळून पावसाचे पाणी झटकन ओघळून जाते.

खाद्य 
खाद्यात दोन प्रकारचे अन्न घटक असावेत .
१) उर्जा पुरविणारे
२) प्रथिने पुरविणारे
उर्जा पुरविण्यासाठी मका ,ज्वारी ,बाजरी ,बारली ,गहू ही धान्ये वापरतात तर प्रथिनांसाठी शेगदाणा,सोयाबीन ,तीळ पेंड वापरतात.

कोंबडयांचे खाद्य 
एकूण खर्चाच्या ६० – ७० % खर्च फक्त खाद्यावर होतो त्यासाठी ते फायदेशीर ठरण्यासाठी खाद्य संतुलित व चांगले असावे.

कोंबडी खाद्यनिर्मितीबाबत माहिती
1) पोल्ट्री व्यवसायामध्ये एकूण खर्चाच्या 70 टक्के खर्च हा फक्त खाद्यावर होतो. कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण खाद्यापैकी 35 ते 45 टक्के खाद्याचे रूपांतर हे अंडी व मांसामध्ये होते.
2) पक्ष्यांच्या वाढीसाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. कडधान्यांमध्ये सुमारे आठ ते 12 टक्के आणि द्विदल धान्यांमध्ये 30 ते 40 टक्के प्रथिने असतात. कोंबडीखाद्यामध्ये वनस्पतिजन्य प्रथिने आणि प्राणिजन्य प्रथिनांचा समावेश करावा.
3) ज्वारी, गहू, मका, तांदूळ इ. धान्यांत पिष्टमय पदार्थ भरपूर असतात. हे घटक आहारात असावेत.
4) पक्ष्यांच्या वाढीसाठी स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. हे पदार्थ अन्न तुटवड्याच्या कालावधीमध्ये शरीरास उष्णता व कार्यशक्ती पुरवितात. स्निग्ध पदार्थांमुळे खाद्याला चांगली चव येते. सर्व प्रकारचे खाद्यतेल व चरबी यांपासून स्निग्ध पदार्थ मिळतात.
5) हाडांची बळकटी आणि अन्नपचनासाठी कोंबड्यांना खनिजांची आवश्यकता असते. कोंबड्यांच्या आहारात खनिजांचा वापर योग्य प्रमाणात केल्यास पायांतील अशक्तपणा दूर होतो. हाडांची योग्य पद्धतीने वाढ होते, त्यांना बळकटी मिळते. शरीरास कॅल्शिअम, लोह, मीठ, फॉस्फरस, आयोडीन, तांबे, सोडिअम, पोटॅशिअम, सेलेनिअम, मॅग्नेशिअम, मॅंगेनिज, झिंक इत्यादी खनिजांची आवश्यकता असते.
6) जीवनसत्त्वांमुळे कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते, उत्पादन वाढते. शरीर कार्यक्षम व तजेलदार राहण्यासाठी जीवनसत्त्वांचा उपयोग होतो.
पाणी व्यवस्थापण 
पाण्याची भांडी रोज स्वच्छ व ताज्या पाण्याने भरावीत .त्यावर झाकण असावे, पाण्याची भांडी उंच विटांवर ठेवावीत व विटांस चुना लावावा,त्यामुळे पाणी गादीवर सांडणार नाही व घर कोरडे राहण्यास मदत मिळेल .भाडी दरदोज स्वच्छ करून भरावीत पाच कोंबड्यांना अंडी देण्यासाठी १४-१२ – १२ इंच आकाराचा एक खुराडा जमिनीपेक्षा दीड ते दोन फुट उंच ठेवावा.

लसीकरण
वय - रोग - लसीचे नाव-टोचणीची पध्दत (table)
१ दिवस - मँरेक्स - मँरेक्स - पायाच्या स्नायुमध्ये
५- ७ दिवस - राणिखेत - लासोटा - नाकात एक थेंब टाका
४ आठवडे - श्वासनलिकेचा डोळयात दोन थेंब टाकणे.संसर्गजन्य रोग
५ आठवडे - राणिखेत - लासोटा पिण्याच्या पाण्यातुन 
६ आठवडे - देवी - देवी लस पंखाखाली कातडीतून टोचून
८ आठवडे राणिखेत राणिखेत आर बी पंखाखाली कातडीतून टोचून
१८ आठवडे - देवी - देवी लस पंखाखाली कातडीतून टोचून
२० आठवडे - राणिखेत - राणिखॆत आर बी पंखाखाली कातडीतून टोचून

रोग नियंत्रण 
१) काँक्सिडिआँसिस - ओलसर असल्यास केव्हाही होते-गादी कोरडी ठेवावी.
२) जंत - जंताचे औषध दर ३ महिन्यांनी पाण्यातून द्यावे.
३) उवा, गोचिड, कुकुडवा - सर्व वयात येतात - स्वच्छता ठेवा, कोबडयांना जंतुनाशक लावा.

ब्रॉयलर कोंबड्यांतील आजारावर करा वेळीच उपाययोजना
ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये थंडीमध्ये उष्णतेची कमतरता, अमोनिया वायू साठणे, विविध संसर्गजन्य आजार, मूत्रपिंडाचे आजार, परोपजीवी जंतूचा प्रादुर्भाव, खाद्य घटकातील असमतोलता, अशा विविध कारणांमुळे पहिल्या एक-दोन आठवड्यांमध्ये मरतुक आढळते. हे टाळण्यासाठी कुक्कुटपालनामध्ये नेहमी आढळणारे आजार, प्रतिबंधक उपाय आणि औषधोपचार याविषयी माहिती असणे आवश्‍यक आहे. 
डॉ. एम. व्ही. धुमाळ, डॉ. डी. एस. गाडे

प्रथिनयुक्त मांसाची गरज भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपन केले जाते. ब्रॉयलर कोंबड्या 6 ते 8 आठवड्यांत अतिशय जलद वाढतात. बदलते हवामान, आहारातील असमतोलपणा, व्यवस्थापनातील त्रुटीमुळे कोंबड्यांना विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार होतात. त्यामुळे ब्रॉयलर कोंबड्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो व कोंबड्यांची उत्पादनक्षमता घटते. त्यासाठी ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये मरतुक कोणत्या कारणामुळे होते हे जाणून घेणे आवश्‍यक आहे.
1. पिलांमध्ये कमी-अधिक तापमानामुळे होणारी मरतुक- 
- ब्रॉयलर कोंबड्याच्या शरीराचे सामान्य तापमान 105 ते 107 अंश फॅरनहाइट असते. 
- पहिल्या आठवड्यामध्ये ब्रॉयलर कोंबड्यांना 95 अंश फॅरनहाइट तापमान देणे आवश्‍यक असते. यापेक्षा तापमान जास्त झाले तर पिलांच्या शरीरातील पाणी कमी होते. पर्यायाने विष्टेमधील कमी पाण्यामुळे विष्ठा पिलांच्या गुद्वाराजवळ साचते. गुद्वार बंद होऊन पिलांची मरतुक वाढते. 
- जास्त तापमानामध्ये पिलांना धाप भरते व पिलांचा श्‍वसनाचा वेग वाढतो. त्यामुळे पिलांचे खाद्य खाण्याचे प्रमाण घटते, वजनात वाढ होत नाही. 
- जास्त तापमानामध्ये कॅनिबालीझमची (स्वजाती भक्षण) समस्या निर्माण होते व पिलांचे मरतुकीचे प्रमाण वाढते. जेव्हा शेडमधील तापमान 60 ते 65 अंश फॅरनहाइटच्या खाली जाते तेव्हा पिले उष्णता असलेल्या ठिकाणी गर्दी करून एकमेकांवर बसतात, त्यामुळे चिलिंग (शीतकरण) होऊन वाढ खुंटते. 
- श्‍वसनाचे आजार होऊन पिलांमध्ये मरतुक होते.

उपाय - 
- वरील परिणाम टाळण्यासाठी पिले पक्षिगृहात येण्यापूर्वी 12 ते 14 तास ब्रुडर चालू करून शेडचे तापमान नियंत्रित ठेवावे. 
- पिलांना पहिले एक-दोन आठवडे 95 अंश फॅरनहाइट तापमान द्यावे, जेणेकरून पिलांना आल्हाददायक तापमान मिळेल. पिलांच्या सर्व शारीरिक क्रिया सामान्यपणे चालू राहतील. पिलांची सारखी वाढ होईल. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढून पिलांची मरतुक कमी होते.

2. शेडमध्ये जास्त प्रमाणात अमोनिया वायू जमा झाल्यामुळे होणारे विपरीत परिणाम ः 
- शेडमधील लिटर (पक्ष्यांची गादी) पाणी व पिलांच्या विष्टेमुळे दमट व ओलसर होते. त्यामुळे अमोनिया वायू तयार होतो. 
- अमोनिया वायू पिलांच्या डोळ्यातील आवरणावर परिणाम करतो. त्यामुळे पिलांचे खाद्य खाण्याचे प्रमाण घटते. पिलांची वाढ कमी होऊन श्‍वसन नलिकेमध्ये रक्तस्राव होतो. 
- अमोनिया वायूचे प्रमाण 25 पी.पी.एम.पेक्षा जास्त वाढल्यास असे परिणाम पिलांमध्ये दिसतात. 

प्रतिबंधात्मक उपाय - 
- पक्ष्यांचे लिटर दररोज दोन-तीन वेळा हलवावे. (खाली-वर करणे) 
- लिटरवर जास्त प्रमाणात पाणी सांडणार नाही याची काळजी घ्यावी. 
- ओलसर व पेंडीसारखे झालेले लिटर शेडमधून काढून नष्ट करावेत. 
- शेडमध्ये सतत खेळती व आल्हाददायक हवा ठेवावी. 
- लिटर ओले झाल्यास 1 किलो चुना पावडर प्रति 100 चौ. फुटास लिटरमध्ये मिसळावी.

3. आजारी नाभी (ओम्फालायटीस, नेव्हल इल) - 
- अंड्यामधून निघालेल्या नाभीचे मुख शक्‍य तो बंद होते, परंतु कधी कधी काही कारणांमुळे बंद होत नाही. त्यामधून जंतू प्रवेश करतात व नाभिला संसर्ग होतो, त्यामुळे पिलांच्या पोटाजवळील कातडी सुजते आणि पिलांचा पोट फुगून मृत्यू होतो. 
- अशा पिलांचे शवविच्छेदन केल्यानंतर पोटामध्ये शोषला न गेलेला अंड्याचा पिवळा भाग दिसतो आणि त्याचा घाण वास येतो. 
- हा आजार अंडी उबवणूक केंद्रामधील निर्जंतुकीकरणाच्या अभावामुळे होतो.

उपाय - 
- प्रतिजैवकांचा वापर पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार करावा. 
- अंडी देणाऱ्या कोंबड्यांची घरे स्वच्छ ठेवावीत. 
- अंडी उबवणूक यंत्रातील याचर व सेटर, बास्केट व इतर उपकरणांचे परिणामकारक निर्जंतुकीकरण करावे. 
- याचर बास्केट कोरडे असावे. 
- पिले आल्यानंतर त्यांना आठ तास गुळाचे पाणी व भरडलेली मका द्यावी. 
- उबवणुकीच्या वेळी अंडे ओलसर होऊ देऊ नये.

4. पांढरी हगवण (साल्मोनेल्लोसीस/पुल्लोरम डिसीज) - 
- हा आजार सूक्ष्म जीवाणूपासून होतो. या आजाराला पांढरी हगवणसुद्धा म्हणतात. कारण पिलांची विष्ठा पांढऱ्या रंगाची होते. 
- हा आजार प्रामुख्याने अंडी उबवणूक केंद्रात कोंबड्यांच्या बीजांडामध्ये दोष किंवा संसर्ग झाला असेल तर पुढे नुकत्याच तयार झालेल्या पिलांमध्ये उद्‌भवतो. 
- या आजारात पिल्लांचे पंख विस्कटलेले दिसतात. गुद्वाराजवळ पांढरी विष्ठा असते. 
- पिल्ले खाद्य खात नाहीत आणि श्‍वसनास त्रास झाल्यामुळे पिलांमध्ये मरतुक होते.

उपाय - 
- हा आजार मोठ्या कोंबड्यांना होतो, त्यामुळे आजारी, अंड्यांवरील कोंबड्या काढून टाकाव्यात. 
- पिलांना पाण्यामधून प्रतिजैवकाचा वापर पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार करावा.

5. रक्ती हगवण (कोक्‍सिडीओसिस) - 
- हा रोग परोपजीवी जंतूपासून होतो. 
- यामध्ये विटकरी किंवा लालसर रंगासारखी रक्ती विष्ठा (हगवण) असते. 
- पंख विस्कटलेले दिसतात. 
- पिलांमध्ये खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणामुळे पिलांचा मृत्यू होतो.

उपाय - 
- अशा रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास शेडचे प्रभावी निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक आहे. 
- निर्जंतुकीकरण केलेल्या शेडमध्येच पिलांचे संगोपन करावे. 
- कोंबड्यांची गादी (लिटर) नियमित खाली-वर करून त्यामध्ये चुन्याची पावडर मिसळावी. 
- पिलांना आल्हाददायक मोकळी हवा, पिण्यासाठी पुरेसे स्वच्छ पाणी द्यावे. 
- आजारी पिलांवर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.

6. संधीरोग (गाऊट) - 
- या आजारामध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, पिले निस्तेज दिसतात. 
- पिसे विस्कटलेली दिसतात. गुद्वार ओले दिसून काही वेळेस हिरवट विष्ठा दिसते आणि त्यामुळे पिलांमध्ये मोठ्या प्रमाणात मरतुक होण्याची शक्‍यता वाढते. 
- खाद्यातील प्रथिनांच्या चयापचयानंतर युरिक आम्ल तयार होते. 
- युरिक आम्ल हे रक्तामधून मूत्रपिंडाद्वारे शरीराच्या बाहेर विष्टेद्वारे टाकले जाते. 
- जेव्हा रक्तामधील युरिक आम्लाचे प्रमाण वाढते व ते मूत्रपिंडाद्वारे बाहेर काढण्यासाठी मूत्रपिंडाचे काम वाढते त्यामुळे मूत्रपिंडावर ताण निर्माण होतो तेव्हा गाऊट आजार होतो. 
- खाद्यातील जास्त प्रथिने, खनिजाचे कमी-जास्त प्रमाण, जीवनसत्त्वे व रसायनांमुळे चयापचयातील होणाऱ्या बिघाडामुळे पिलांमध्ये हा मूत्रपिंडाचा आजार होतो. 
- जास्त प्रमाणात सोडियम बाय कॅर्बोनेटचा वापर केल्यामुळेसुद्धा अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या मूत्रपिंडामध्ये कडक खडे तयार होतात. 
- खाद्यामधील प्रथिनाचे प्रमाण जास्त असल्यास युरिक आम्ल तयार होते आणि गाऊट होतो. 
- पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तामधील युरिक आम्ल व इतर खनिजाचे प्रमाण वाढते. ही स्थिती उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसते. 
- कठीण पाणी व मिठाच्या जास्त प्रमाणामुळेसुद्धा मूत्रपिंडावरील ताण वाढतो व गाऊट होतो. 
- लहान पिलामध्ये प्रतिजैवकांचा अनावश्‍यक वापर झाल्यास असमतोल चयापचयामुळे मूत्रपिंडावर ताण निर्माण होतो व गाऊट होण्याची शक्‍यता वाढते.

उपाय - 
- पिलांना पिण्याचे पाणी 24 तास उपलब्ध असावे. 
- पिलांना शिफारशीनुसार वयोमानाप्रमाणे खाद्य द्यावे. 
- आजार झाल्यास एक दिवस भरडलेली मका व गुळाचे पाणी पिण्यासाठी द्यावे. 
- शास्त्रोक्तपणे संतुलित आहार द्यावा. 
- तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावेत.

7. लसीकरण - 
ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये विविध रोगांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. उपचारापेक्षा प्रतिबंधक लसीकरण हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार खालील रोगाचे लसीकरण करावे.

संपर्क - डॉ. एम. व्ही. धुमाळ, 9422176705. 
(कुक्कुटपालन विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)