Friday, February 10, 2017

भूजल आणि वराहमिहीर

भूजल आणि वराहमिहीर
डॉ. रजनी जोशी

बृहत्‌संहिता या ग्रंथात दकार्गल अध्यायामध्ये वराहमिहीर नावाच्या ज्योतिषी व पर्यावरणशास्त्रज्ञ यांनी पावसाचा थेंब न थेंब कसा साठवता येईल, भूजल पातळीत कशी वाढ करता येईल याची माहिती दिली आहे. सन 1981 मध्ये उन्हाळ्यात आंध्रमध्ये चित्तूर जिल्ह्यात कूपनलिका खोदल्या होत्या. एकूण 150 विहिरी खोदल्या व प्रत्येक विहिरीला पाणी लागले. या कामासाठी त्यांनी वराहमिहिरांनी दिलेल्या लक्षणांची मदत घेतली व पाणी शोधून काढलेचा उल्लेख आहे. 

त्यात ढगांची उत्पत्ती, पाऊसमान, पाऊसकाळ, पाऊसप्रमाण, पडणारे पाणी आणि मुरणारे पाणी याचा आजमितीला विचार करणे प्राधान्याचे ठरले आहे. वराहमिहीर यांच्या बृहत्‌संहितेत पाण्याविषयी विस्तृत माहिती दिली आहे. 
1) गर्भ लक्षण अध्याय, 
2) गर्भ धारण अध्याय, 
3) प्रवर्षण अध्याय, 
4) दकार्गल अध्याय. 

यातील दकार्गल अध्यायात वराहमिहिराने भूगर्भातील पाण्याच्या प्रवाहाची माहिती मिळते. आकाशातून पडलेले पाणी जमिनीत जिरल्यानंतर ते जमिनीत असलेल्या भेगांमधून भूगर्भात इकडेतिकडे वाहू लागते व त्याचे प्रवाह बनतात. या प्रवाहांना "शिरा' किंवा "नसा' असे नाव दिले आहे. काही शिरा भूपृष्ठाच्या अगदी नजीक तर काही खोलवर असतात. आकाशातून पडणाऱ्या पाण्याची चव, रंग प्रथमतः एकाच स्वरूपाची असते, परंतु जसजसे ते पाणी जमिनीत जिरू लागते, तसतशी त्याची चव, रंग आदी गुणधर्म भूमीच्या किंवा मातीच्या प्रकाराप्रमाणे भिन्न-भिन्न होत जातात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या पाण्याची परीक्षा ते ज्या परिस्थितीत आहे, त्याप्रमाणे भिन्न-भिन्न रीतीने होते. 

प्राचीन भारतीय जलशास्त्रज्ञांनी प्रत्येक दिशेचे एकेक अधिपती सांगितले आहेत. त्या दिशेकडे वाहणारी भूपृष्ठाखालील जलशिरा त्या अधिपतीच्या नावाने ओळखली जाते. 

दिशा
त्यांचे अधिपती

दिशा
त्यांचे अधिपती
पूर्व
इंद्र

आग्नेय
अग्नी
पश्‍चिम
वरुण

नैर्ऋत्य
निर्मदती
दक्षिण
यम

वायव्य
वायू
उत्तर
सोम

ईशान्य
शिव

या आठ शिरांव्यतिरिक्त आणखी एक नवीन शिरा आहे. तिला "महाशिरा' असे नाव असून, ती त्या प्रदेशात वाहणाऱ्या सर्व शिरांचा मध्यबिंदू मानली आहे. महाशिरा व इतर आठ प्रमुख शिरांपासून अनेक उपशिरा पुन्हा विविध दिशेने फुटतात. या नऊ शिरांशिवाय आणखी एक शिरा आहे. ती खालून वर वाहते, म्हणजेच ती उर्ध्वगामी आहे. जी शिरा उर्ध्वगामी आहे ती अत्यंत उत्कृष्ट, तर जी अधोगामी आहे ती निकृष्ट प्रतीची मानली आहे. जी उर्ध्वगामी नाही आणि अधोगामीही नाही म्हणजेच जी भूपृष्ठाला समांतर वाहते ती जलशिरा मध्यम प्रतीची मानली आहे. 

भूपृष्ठावरील लक्षणे : 
भूपृष्ठावरील वनस्पती -
भूगर्भांतर्गत शिरांमुळे भूपृष्ठावरील वनस्पती, माती इत्यादी गोष्टींच्या रंग, रूप आदी लक्षणांवरून अंतर्गत शिरा शोधून काढता येऊ शकतात. भुजल प्रवाहामुळे भूपृष्ठावरील वनस्पतींमध्ये खालील वैशिष्ट्ये दिसतात. 

- काही झाडांची मुळे भूगर्भात असलेल्या पाण्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत असतात. 
- भिन्न जातीची व प्रकारची काही झाडे व वेली एकमेकांत गुंतून वाढतात. 
- निष्कंटक प्रदेशात काही वेळा एखादाच तृणमय किंवा निष्कंटक पट्टा सापडतो.
- एखाद्या प्रदेशात वनस्पतींची पाने पांढुरक्‍या रंगाची असतात. 
- काही वनस्पती व झाडांची वाढ काही प्रदेशात पूर्ण होत नाही. ती खुरटतात. 
- झाडांची पाने, बुंधे व फांद्या पांढुरक्‍या रंगाच्या दिसतात. 
- एखाद्या प्रदेशातील वनस्पतींमधून दुधासारखा पांढरा रस बाहेर येतो. 
- एखाद्या प्रदेशात झाडांना खूप पाने येतात. 
- झाडांच्या फांद्या लांब वाढून खाली वाकत जातात. 
- काही प्रदेशात झाडांना गाठी येतात. 

जमिनीची वैशिष्ट्ये :
वालुकामय, तांबडी, तपकिरी, पांढरी असे मातीचे प्रकार असतात. काही ठिकाणी माती व वाळू नसून नुसतेच खडक असतात. काही ठिकाणी नुसताच मुरूम किंवा चुनखडी असते. या प्रत्येक भू-भागाचे पाणी शोधून काढण्यासाठी सूक्ष्म निरीक्षण करावे लागते. 

काही प्रदेशात खूप वारुळे असतात. वारुळांमधून खूप आर्द्रता असते, त्या ठिकाणी वाळवीची वसाहत असते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे वारूळ तयार करता करता त्या थेट भूगर्भातील पाण्यापर्यंत जातात. त्यामुळे वारूळ असणे हे त्याखाली निश्‍चित पाणी असल्याचे निदर्शक लक्षण मानले गेले आहे. 
खोदताना वाळवी जी माती वर फेकतात ती टेकडीच्या रूपाने पृष्ठावर दिसते. या मातीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, म्हणून या मातीला "आस्राव भेषज' (म्हणजेच स्रवलेले औषध) असे अथर्ववेदात म्हटले आहे. 

निरनिराळ्या प्रदेशांत जशी वनस्पतींची व मातीची लक्षणे वेगवेगळी आढळतात, तशीच त्या त्या प्रदेशात सापडणाऱ्या प्राण्यांची वैशिष्ट्येसुद्धा भिन्न-भिन्न असतात. 
 
वृक्षांवरून भूजल शोधणे :
- आजूबाजूचा भाग निर्जल व शुष्क, एखाद्या ठिकाणी जर वेताचे झाड अगर बेट असेल, तर वेताच्या पश्‍चिमेला तीन हातांवर व साधारण चार पुरुष खोलीवरून जलशिरा वाहते. खोदत असताना साधारण सात-आठ हातांवर पांढरा बेडूक, पिवळी माती व कठीण दगडाचा पातळ थर लागतो, त्याखाली पाणी असते. 
- निर्जल प्रदेशात जांभळाचे झाड. त्यापासून उत्तरेला नऊ-दहा हातांवर सहा पुरुष खोलीवर एक पूर्वाभिमुख जलशिरा मिळेल. खोदताना लोखंडासारखा वास येणारी माती, त्याखाली पांढुरक्‍या रंगाची निस्तेज माती व एक बेडूक सापडेल. त्या जांभळाच्या पूर्वेला एखादे मोठे वारूळ असेल तर झाडाच्या दक्षिणेला नऊ हात अंगावर सात हात खोदल्यावर एखादा मासा, बदकाच्या आकाराचा दगड व निळसर माती मिळेल, ही लक्षणे असली तर त्याला पाच पुरुष खणल्यावर गोड्या पाण्याचा अखंड झरा सापडतो. 
- मऊ व चमकदार पाने असलेल्या वृक्षांच्या दक्षिणेला पाच पुरुष खोलीवर पाणी मिळते. 
- जर वड, पळस व औदुंबर किंवा वड व पिंपळ यांची झाडे एकत्र आढळतील, तर त्यांच्या खाली तीन हातावर उत्तरवाहिनी जलशिरा आढळते. 
- एखाद्या भूप्रदेशातील झाडांची पाने जर मऊ व चमकदार असतील किंवा तेथे वेलींच्या जाळी असतील किंवा कमळ, गोक्षुरा (गोखूर), उशीर (वाळा), गुंड्र (गुळवेस), काश, नलिका (दालचिनी) किंवा नल (देवनळ) नावाचे गवत भरपूर प्रमाणात उगवले असेल तर पंधरा हात खोलीवर तेथे पाणी मिळते. 
- खजूर, जांभूळ, अर्जुन, वेत, हस्तीकर्ण (शिंदणी), नागकेसर, शतपत्र (गजकर्णी), कदंब, करंज, सिंदुवार (निर्गुंडी), बिभीतक (बेहडा) किंवा मदयंतिका (मेहंदी) यांचे वृक्ष एखाद्या प्रदेशात असतील तर पंधरा हात खोलीवर पाणी मिळते. 
- वृक्षांच्या किंवा वेलींच्या पानाला छिद्रे असतील तर त्यापासून दूर अंतरावर पाणी असते. 
- करीर वृक्षातून दूध येत असून, त्याला तांबडे कोंब येत असतील तर त्याच्या खाली पाणी असते. 
- एखाद्या निर्जल किंवा निष्कंटक प्रदेशात गवताळ पट्टा किंवा कंटकमय विभाग किंवा याउलट तृणमय व कंटकमय प्रदेश निस्तृण किंवा निष्कंटक विभाग आढळला तर त्याखाली साडेचार हातावर किंवा पश्‍चिम दिशेला तीन हातावर व तीन पुरुष खोलीवर पाणी किंवा धन सापडते. 
- एखाद्या वृक्षाची फांदी निस्तेज किंवा खाली लोंबणारी असेल तर त्या वृक्षाखाली पंधरा हातांवर पाणी मिळते. 
- एखाद्या वृक्षाची फळे, फुले व पाने वाजवीपेक्षा जास्त तेजस्वी दिसत असतील, तर त्याच्या पूर्वेला तीन हातांवर व वीस हात खोलीवर पाणी मिळेल. खोदताना प्रथम एक दगड व पिवळी माती मिळते. 
- जर कंटकारी झाडाला काटे नसतील व पांढरी फुले आली असतील तर भूमीखाली साडेतीन पुरुष खोलीवर पाणी मिळते. 
- जर निर्जल प्रदेशातील खजुराच्या झाडाला दोन शेंडे आले असतील तर त्याच्या पश्‍चिमेला दोन हातावर तीन पुरुष खोलीवर पाणी सापडते. 
- कर्णिकार किंवा/आणि पळस वृक्षांना लाल रंगाऐवजी पांढऱ्या रंगाची फुले आली, तर दहा हात खोलीवर पाण्याचा प्रचंड साठा असतो. 

प्राण्यांच्या अस्तित्वानुसार भूजल लक्षणे 
- एखाद्या प्रदेशात जमिनीस उतार असून, त्यावर लोकांच्या रहदारीच्या खुणा असतील तर त्या भूगर्भात साडेसात हात खोलीवर पाणी मिळते. 
- विविध प्रकारच्या जंतूंचे एकही वसतिस्थान आजूबाजूला नसून, फक्त एकाच ठिकाणी जंतूंचा पुंजका दिसत असेल तर त्या भूगर्भात साडेसात हात खोलीवर पाणी असेल. 
- उष्ण भूप्रदेशात थंड भूभाग किंवा थंड भूप्रदेशात उष्ण भूभाग आढळला, तर साडेसतरा हात खोलीवर पाणी मिळते. 
- वरील ठिकाणी जर वारूळ किंवा मासे आढळतील, तर चार हातावरच पाणी मिळते. 
- अनेक वारुळाच्या रांगेत एखादे वारूळ सर्वांत जास्त उंच असेल, तर त्याखाली चार हातावर पाणी मिळते. 

भौगोलिक स्थिती, मातीच्या प्रकारावरून पाणी शोधणे 
- जर भूमी अतिशय मऊ, खोलगट, थोडी वाळू असलेली किंवा नाद निर्माण करणारी असेल, तर साडेचार किंवा पाच पुरुष खोलीवर तेथे पाणी मिळते. 
- एखाद्या ठिकाणी वनस्पती वाढून आपोआप जळून जातात किंवा अजिबात वाढत नाहीत, त्या ठिकाणी साडेसतरा हात खोलीवर पाणी मिळते. 
- दोन पर्वतांपैकी/डोंगरांपैकी जो उंच असेल त्याच्या पायथ्याशी पंधरा हात खोलीवर पाणी मिळते. 
वराहमिहिराने वेगवेगळ्या प्रकारच्या मातीचा विचार केला आहे. 
- एखाद्या प्रदेशाची भूमी (माती) निळी असून, त्यात गोल गोटे आढळतील किंवा तांबडी असून तेथे मुंजा गवत, दूर्वा आणि वेत आढळतील तर त्या ठिकाणी पाणी असते. 
- भूमी वालुकामय असून, तांब्याच्या रंगाची असेल तर तेथे तीव्र चवीचे पाणी मिळते. 
- तपकिरी/तांबूस रंगाच्या भूमीत खारे पाणी आढळते. 
- पांढऱ्या रंगाची भूमी खारट पाणी देते. 
- निळ्या रंगाची भूमी गोड पाणी देते. 
- सूर्य, अग्नी, राख, उंट किंवा गाढव यांच्यासारखा रंग असलेल्या मातीच्या भूमीत पाणी मिळत नाही. 
- जर एखादा खडक वैडूर्य (पाचू), हिरवे, मूग, काळा मेघ, नीलमणी, पिकलेले अंजीर किंवा काजळ यासारख्या किंवा तपकिरी रंगाचा असेल तर त्याच्या खाली भरपूर पाणी मिळते. 
- कबूतर, मध, तूप, रेशीम किंवा सोमलता यासारख्या रंग असलेल्या खडकाच्या खालीदेखील पाणी मिळते. 
- तांबडा, राखाडी रंगाचा, उंट, गाढव, मधमाशी यांच्यासारखा किंवा काळ्या-तांबड्या फुलासारखा रंग असलेल्या खडकाखाली अजिबात पाणी मिळत नाही. 
- चंद्र, स्फटिक, मोती, सुवर्ण, नीलमणी, काजळ, हरिताल किंवा उगवत्या सूर्याच्या कोवळ्या किरणांसारखा रंग असलेले खडक किंवा दगड पाण्याच्या दृष्टीने अतिशय अनुकूल असतात. 
- भूमीवर पाय आपटल्यानंतर जर गंभीर व कर्णसह्य ध्वनी आला तर त्याखाली तीन पुरुष अंतरावर पाण्याचा साठा आढळतो. 
- पृथ्वीच्या पृष्ठभागावर आतून वाफ बाहेर येताना आढळली, तर दहा हात खोलीवर पाण्याचा प्रचंड साठा असतो. 
- शेतातील वाढलेले पीक वरून पाणी घालूनही आपोआप जळून गेले किंवा त्याची पाने वाजवीपेक्षा जास्त स्निग्ध व चमकदार झाली, तर तेथे दोन पुरुष खोलीवर पाणी मिळते. 

वाळवंटी प्रदेशातील भूगर्भांतर्गत जलशिरा उंटाच्या पाठीसारख्याच वाकड्या असतात. त्या सरळ वाहत नाहीत, तसेच त्या फार खोलीवर असून थोड्या पाण्याच्या व मध्ये खंडित झालेल्या असतात. ज्या वाळवंटी प्रदेशात भूगर्भात जलशिरा आहेत, त्या ठिकाणी भूपृष्ठावर खालील लक्षणे दिसतात ः 
- पिलू वृक्षाच्या ईशान्येला एखादे वारूळ असेल, तर पश्‍चिम दिशेला साडेचार हातावर पाच पुरुष खोलीवर पाणी सापडते. खोदताना एकेक पुरुष खोलीवर एक बेडूक, नंतर तपकिरी माती, त्याखाली हिरवट रंगाची माती व त्याखाली पाणी मिळते. 
- पिलू वृक्षाच्या पूर्वेला वारूळ असेल, तर त्याच्या दक्षिणेला साडेचार हातावर सात पुरुष खोलीवर पाणी मिळते. पहिल्या चार हातावर एक काळा व एक पांढरा, हातभर लांब सर्प दिसतो. त्याच्या दक्षिणेला क्षारयुक्त पाण्याची मोठी शीर दिसते. 
- करीर वृक्षाच्या उत्तरेला वारूळ असेल तर त्याच्या दक्षिणेला साडेचार हात अंतरावर दहा पुरुष खोलीवर पाणी मिळते. खोदताना पाच हातांवर पिवळा बेडूक सापडतो. 
- रोहितक वृक्षाच्या पश्‍चिमेला वारूळ असल्यास त्याच्या दक्षिणेला तीन हातांवर व बारा पुरुष खोलीवर खाऱ्या पाण्याचा पश्‍चिमाभिमुख भूजलस्रोत असतो. 
- सुवर्णक झाडाच्या उत्तरेला वारूळ असेल, तर त्याच्या दक्षिणेला दोन हातांवर पंधरा पुरुष खोलीवर क्षारयुक्त जलवाहिनी आढळते. खोदताना अडीच हातावर मुंगूस, नंतर तांब्याच्या रंगाचा दगड, नंतर लाल माती व शेवटी दक्षिणवाहिनी जलशिरा मिळते. 
- रोहित वृक्ष व बोरीचे झाड जवळ असून त्यांच्यामध्ये वारूळ असेल तर त्यांच्या पश्‍चिमेला तीन हात अंतरावर सोळा पुरुष खोलीवर गोड्या पाण्याची जलशिरा मिळते. प्रथम दक्षिणवाहिनी व नंतर उत्तरवाहिनी होणारी ही जलशिरा असते. खोदताना पिठासारखा पांढरा दगड, नंतर पांढरी माती व अडीच हातांवर विंचू लागतो. 
- इंद्रवृक्षाच्या पूर्वेला वारूळ असल्यास पश्‍चिमेला एका हातावर 14 पुरुष पाणी लागते. पाच हात खोदल्यावर एक पिवळा सरडा सापडतो. 
- बोरीचे झाड व करीर वृक्ष एकमेकांत गुंतले असतील तर त्यांच्या पश्‍चिमेला तीन हातांवर अठरा पुरुष खोलीवर पाणी लागते. 
- बोरी व पिलू वृक्ष जवळ जवळ आढळल्यास पूर्वेला तीन हातांवर वीस पुरुष खोलीवर खाऱ्या पाण्याचा अखंड झरा आढळतो. 
- जर करीर व ककुभवृक्ष किंवा बिल्व आणि ककुभवृक्ष जवळ जवळ असतील तर त्यांच्या पश्‍चिमेला दोन हातांवर पंचवीस पुरुष खोलीवर पाणी सापडते. 
- जर दूर्वा पांढऱ्या रंगाच्या असतील, तर त्या ठिकाणी 21 पुरुष खोलीवर पाणी मिळते, तेथे विहीर खोदावी. 
- कदंब वृक्षांनी भरलेल्या भूभागात जर दूर्वा आढळल्या तर कदंबाच्या दक्षिणेला दोन हातांवर आणि 25 पुरुष खोलीवर पाणी आढळते. 
- तीन वारुळांतून उगवलेल्या तीन प्रकारच्या झाडांमुळे जर रोहित वृक्षांशी त्रिकोण होत असेल तर उत्तरेला साडेचार हातांवर व दोनशे फूट खोलीवर पाणी मिळेल. तळाशी मोठा खडक व त्याखाली पाणी असेल. 
- गाठी असलेल्या शमीच्या उत्तरेला जर वारूळ आढळले तर पश्‍चिमेला पाच हातांवर व पन्नास पुरुष खोलीवर पाणी असते. 
- जर एकाच ठिकाणी पाच वारुळे आढळली व त्यातील मध्य वारूळ जर श्‍वेतरंगाचे असेल, तर त्या मध्य वारुळाच्या खाली 55 पुरुष खोलीवर जलशिरा असते. 
- पळस व शमी एकमेकांजवळ वाढून, एकमेकांत गुंतले असतील तर त्यांच्या पश्‍चिमेला पाच हातांवर साठ पुरुष खोलीवर पाणी सापडते. अडीच हात खोदल्यावर एक सर्प व नंतर वाळूमिश्रित माती असते, त्याखाली पाणी असते. 
- जर श्‍वेतरोहित वृक्ष वारुळांनी वेढला गेला असेल, तर पूर्वेला एका हातावर सत्तर पुरुष खोलीवर पाणी मिळते. 
- काटेरी शमीच्या दक्षिणेला एका हातावर 77 पुरुष खोलीवर पाणी सापडते. अडीच हात खणल्यावर एक साप दिसतो. 
- वालुकामय प्रदेशातील लक्षणे कमी पाण्याच्या प्रदेशाला लागू पडत नाहीत. जर जांभूळवृक्ष व वेत वालुकामय प्रदेशात आढळले तर मात्र वर सांगितलेल्या खोलीच्या दुप्पट खोलीवर पाणी मिळते. 
- एखाद्या वारुळावर जांभळाचे झाड व त्यावर किंवा जवळच त्रिवृत्ता, मौर्वी, शिशुमारी, सारिवा, शिवा, श्‍यामा, वाराही, ज्योतिष्मती, गरुडवेगा, सूकरिता, माषपर्णी आणि व्याध्रपदा यापैकी एखादी वेल उगवलेली आढळली, तर वारुळाच्या उत्तरेला तीन हातांवर तीन पुरुष खोलीवर पाणी आढळते. जर वालुकामय प्रदेशात अशी स्थिती आढळली, तर 25 किंवा 35 हात खोलीवर पाणी मिळते. 
- निर्जल प्रदेशात असलेल्या अंजिराच्या किंवा औदुंबराच्या झाडाच्या पश्‍चिमेस दहा हातांवर खोदकाम करताना पाच हातांवर एक सर्प आणि काजळासारखा काळा पत्थर आढळल्यास भूपृष्ठाखाली साडेचार पुरुष अंतरावर पाणी मिळते. ते गोड पाणी असते. 
- अर्जुन वृक्षाच्या उत्तरेस वारूळ असल्यास पश्‍चिमेला तीन हातांवर व तीन पुरुष खोलीवर पाण्याचा झरा सापडतो. खोदताना तीन हातांवर एक पांढरा सरडा, पाच हातांवर क्रमाने करडी, काळी, पिवळी व पांढरी माती असून, त्याखाली वाळूयुक्त माती मिळते व नंतर भरपूर पाणी सापडते. 
- निर्गुंडीच्या झाडाजवळ वारूळ असल्यास दक्षिणेला तीन हातांवर दोन पुरुष खोलीवर गोड व अखंड पाण्याचा झरा मिळतो. अडीच हात खोलीवर लाल मासा, तपकिरी रंगाची माती, नंतर वाळूचा पातळ थर व नंतर पाणी असा क्रम असतो. 
- बोरीच्या पूर्वेला वारूळ असल्यास पश्‍चिमेला तीन पुरुष खोल खोदावे. अडीच हात खोलीवर पांढरा सरडा सापडल्यास निश्‍चित पाणी मिळते. 
- बोरीचे व पळसाचे झाड जवळ जवळ असल्यास त्यांच्या पश्‍चिमेला तीन हातांवर खोदताना पाच हात खोलीवर बिनविषारी सर्प आढळल्यास, तीन पुरुष खोलीवर पाणी मिळते. 
- बेल व औदुंबर यांची झाडे जवळ जवळ असल्यास त्यांच्या पश्‍चिमेला तीन हातांवर व तीन पुरुष खोलीवर पाणी असते. खोदताना अडीच हातांवर काळा बेडूक आढळतो. 
- औदुंबराच्या वृक्षाजवळ वारूळ आढळल्यास तीन पुरुष खोलीवर पश्‍चिमाभिमुख वाहणारी जलशिरा मिळते. अडीच हातांवर पांढरा उंदीर सापडून पिवळी माती व पांढरा दगड सापडल्यास अखंड पाण्याचा झरा मिळतो. 
- निर्जल प्रदेशात कम्पिल्लक (कदंब) नावाचा वृक्ष आढळल्यास त्याच्या पूर्वेला तीन हात अंतरावर व तीन पुरुष खोलीवर एक दक्षिणाभिमुखी वाहणारी जलशिरा मिळते. खोदताना प्रथम निळी व नंतर पांढरी माती एक हात खोली. बोकडासारखा वास येणारा मासा व क्षारयुक्त थोडे पाणी अशी लक्षणे आढळतात. 
- शोणाक वृक्षाच्या वायव्य दिशेला दोन हात अंतरावर व तीन पुरुष खोलीवर कुमुदा नावाची जलशिरा निश्‍चित सापडते. 
- बिब्ब्याच्या झाडाच्या दक्षिणेला जवळच वारूळ असेल, तर वारुळातून पूर्वेला दोन हात अंतरावर दीड पुरुष खोलीवर पाणी मिळते; तसेच पश्‍चिमेला वारूळ असल्यास झाडाच्या उत्तरेला एक हात अंतरावर व साडेचार पुरुष खोलीवर पाणी मिळते. खोदताना पाच हातांवर पांढरा सरडा किंवा विंचू, लाल रंगाचा दगड व त्याखाली पश्‍चिमाभिमुख वाहणारी मोठी जलशिरा असा क्रम असतो; परंतु ही जलशिरा तीन वर्षांनी नष्ट होते. 
- दर्भांनी भरलेल्या वारुळाच्या ईशान्य दिशेला कोरडाच. झाड असेल तर ते झाड व वारूळ यांच्या मध्यभागी साडेपाच पुरुष खोलीवर भरपूर पाणी मिळते. खोदताना पाच हातांवर पांढरट रंगाचा साप, त्या खोलीवर पाणी मिळते. खोदताना अडीच हातावर एक हिरवा बेडूक, नंतर हळदीसारखी पिवळी माती आणि त्याखाली मेघासारखा श्‍यामवर्णाचा दगड सापडतो. त्याखाली उत्तराभिमुख अखंड वाहणारी जलशिरा मिळते. 
- एखाद्या वृक्षाखाली एक किंवा अनेक बेडूक वस्ती करून राहात असतील तर त्याच्या उत्तरेला एक हात अंतरावर साडेचार पुरुष खोलीवर पाण्याचा साठा सापडतो. 
- करंजीच्या झाडाच्या दक्षिणेला वारूळ असल्यास त्याच्या दक्षिणेला दोन हातांवर व तीन पुरुष खोलीवर पाणी आढळते. खोदताना अडीच हातांवर एक लहान कासव व नंतर पूर्वाभिमुख वाहणारी जलशिरा, नंतर पुन्हा एक उत्तराभिमुख जलशिरा, नंतर एक हिरवा किंवा पिवळा दगड व त्याच्या खाली अखंड पाणी मिळते. 
- मोहाच्या वृक्षाच्या उत्तरेला वारूळ असल्यास वृक्षाच्या पश्‍चिमेला पाच हातांवर साडेआठ पुरुष खोलीवर पाणी असते. प्रथम पाच हातावर एक मोठा सर्प, नंतर तपकिरी माती, नंतर कुळिथाच्या रंगाचा दगड व सर्वांत शेवटी पूर्वाभिमुख वाहणारी फेसाळ पाणीयुक्त जलशिरा मिळते. 
- तिलक (तीळ) वृक्षाच्या दक्षिणेला दर्भ व दूर्वा यांनी भरलेले चकाकणारे वारूळ असेल तर वृक्षाच्या पश्‍चिमेला पाच हात अंतरावर पंचवीस हातांवर पाणी लागते. ही जलशिरा पूर्वाभिमुख असते. 
- ताडाच्या किंवा नारळाच्या बुंध्याशी वारूळ आढळले तर पश्‍चिमेला सहा हातांवर व वीस हात खोलीवर दक्षिणाभिमुख वाहणारा जलस्रोत मिळतो. 
- कपित्थवृक्षाच्या (कवठ) दक्षिणेला वारूळ असेल तर विरुद्ध उत्तर दिशेला सात हातांवर पंचवीस हात खोल खणावे, पाच हातांवर एक चित्रविचित्र ठिपक्‍यांचा साप, नंतर काळी माती, एक कठीण दगड, पुढे पांढरी माती व त्याच्या खाली प्रथम पश्‍चिमाभिमुख व नंतर उत्तराभिमुख वाहणारा जलस्रोत मिळतो. 
- अश्‍मन्तक वृक्षाच्या उत्तरेला बोरीचे झाड, वारूळ असेल तर उत्तरेला सहा हातांवर व साडेसतरा हात खोलीवर पाणी मिळते. खणताना पाच हातावर एक कासव, नंतर निळा दगड, वाळूयुक्त माती नंतर एक दक्षिणवाहिनी जलशिरा व त्यानंतर ईशान्यवाहिनी जलशिरा मिळते. 
- दारू हळदीच्या झाडाच्या वारूळ असेल तर पूर्वेला तीन हातांवर खणल्यास पावणे एकोणतीस हातावर पाणी लागते. खणताना प्रथम पाच हातांवर निळा साप, नंतर पिवळी माती, नंतर पाचूच्या रंगाचा दगड, पुढे काळी माती व तिच्याखाली एक पश्‍चिमाभिमुख व नंतर दक्षिणाभिमुख जलशिरा सापडते. 
- एखाद्या निर्जल प्रदेशात विशिष्ट ठिकाणी दूर्वा किंवा विरळ गवताचा भाग आढळला तर त्याखाली पाच हातांवर पाणी मिळते. 
- एका प्रकारचे वांगे, त्रिवृता, दंती, सूकरपादी लक्ष्मणा (वेलवर्गीय काटेरी) आणि नवमालिका (जुई) या वनस्पती या वेली जर एखाद्या भागात आढळल्या, तर त्यांच्या दक्षिणेला दोन हातांवर व पंधरा हात खोलीवर पाणी मिळते. 
- एखाद्या भागातील वृक्षांची पाने जर मऊ व चकाकणारी असली, फांद्या लांबवर पसरून लोंबत असल्या तर त्या भागातील भूगर्भात पाण्याचा साठा असतो. 
- याउलट रुक्ष व निस्तेज पाने, वाळल्यासारखे दिसणारे खोड अशी वृक्षांची स्थिती असेल तर त्या भागात पाणी नाही, असे समजावे. 
- तिलक, अंबाडी, वरुण, भल्लातक, बिल्व, तिन्दुक, अंकोल, पिंडार, शिरीष, अंजन, परुषक, वंजुल (अशोक) आणि अतिबला या वनस्पतींची पाने स्निग्ध व तेजस्वी असली आणि आजूबाजूला वारूळ असेल तर तेथे उत्तरेला तीन हातांवर साडेबावीस हात खोलीवर पाण्याचा साठा असतो. 

खडक फोडण्याची प्रक्रिया :
भूमिगत पाणी शोधून काढताना पुष्कळदा खडक लागतो. काही वेळेला हा खडक अजिबात फुटत नाही. हल्लीच्या काळात डायनामाईट किंवा सुरुंगाची दारू लावून फोडतात, परंतु पूर्वीच्या काळी खडक फोडण्यासाठी ज्या काही युक्‍त्या वापरीत, त्या वराहमिहिरांनी सांगितल्या आहेत. 
- खडक फुटत नसेल तर त्यावर तिंदुक (टेंभूर्णी) व पळस यांचे ओंडके तो खडक लाल होईपर्यंत जाळावे. नंतर त्या खडकावर चुनकळीचे पाणी ओतावे व नंतर खोदावे म्हणजे तो खडक फुटतो. 
- मोक्षक (मोखा) झाडाच्या फांद्या जाळून, त्यांची राख वेत जाळून केलेल्या राखेत मिश्र करावी. हे मिश्रण पाण्यात खूप वेळ उकळावे आणि तप्त झालेल्या खडकावर ते मिश्रण सात वेळा ओतावे. ओतण्याच्या प्रत्येक वेळी खडक तापवावा, म्हणजे खडक फुटतो. 
- ताक, अज्जिक (म्हणजे पिठापासूनच केलेले एक प्रकारचे आंबट द्रव्य) व दारू यांचे कुळीथ व बोरे यांच्याशी मिश्रण करून सात रात्री ते मिश्रण ठेवावे. तप्त केलेल्या खडकावर ते मिश्रण आठव्या दिवशी ओतावे म्हणजे खडक फुटतो. 
- लिंबाची पाने व साल, तिळाचे बुंधे, अपामार्ग (म्हणजे आघाडा), तिंदुक आणि अमृतावेल हे सर्व एकत्र जाळून राख करावी. गोमूत्रात त्याचे मिश्रण करावे. हे मिश्रण तापविलेल्या खडकावर सहा वेळा ओतावे. प्रत्येक ओतण्यावेळी खडक तापवावा. 

पाणी साठवून ठेवण्याचे उपाय : 
भूगर्भातून आणि आकाशातून मिळालेले पाणी कसे साचवून ठेवावे, कशा तऱ्हेचे तलाव बांधावे यासंबंधीसुद्धा काही सूचना पूर्वाचार्यांनी केल्या आहेत. 
- आयताकृती तळे करावे. त्याच्या पूर्व व पश्‍चिम दिशेची लांबी दक्षिण-उत्तर दिशेच्या लांबीपेक्षा जास्त असावी, म्हणजे त्यातील पाणी जास्त दिवस पुरते. कारण दक्षिण-उत्तर दिशेची लांबी जास्त असल्यास त्या भिंती सोसाट्याच्या वाऱ्याने लवकर झिजतात. पूर्व-पश्‍चिमेच्या भिंती झिजत नाहीत. जर तलावाची दक्षिण-उत्तर बाजू जास्त लांबीची करावयाची असेल, तर त्या बाजू विटांनी, दगडांनी किंवा लाकडांनी भक्कम बांधून घ्याव्यात. तलावाचा तळदेखील अनेक हत्ती बरेच दिवस चालवून पक्का करावा. जमल्यास तोही बांधून काढावा. तलावाच्या काठी अर्जुन, वड, आंबा, पिंपळ, प्लक्ष (पळस), कदंब, जांभूळ, वेत, ताड, अशोक, मधूक (मोहा) आणि बकुळ हे वृक्ष लावून विहिरीचे सदर झाकून टाकावे, तसेच पाणी जाण्यासाठी तळाशी दगडांनी बांधून काढलेले एक छिद्र असावे. 


Sunday, April 21, 2013 AT 12:00 AM (IST) अग्रोवन मधील लेखाचे संकलन आणि पुन्ह्प्रसिद्धी श्री. महेश बोरगे यांनी केले आहे.