Saturday, February 24, 2018

शेळीच्या जाती निवड आणि जोपासना

भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात. शेळ्यांचा व्यावसायिक उपयोग करून दुध उत्पादन, लोकर / मोहर उत्पादन, मांस उत्पादन करता येते. दोन शेळ्या एका छोट्या कुटुंबाचा सक्षम उपजीविकेचा आधार बनू शकतात. शेळीच्या जाती निवड आणि जोपासना अधिक वाचा...

शेळीच्या जाती निवड आणि जोपासना 
संगोपनासाठी शेलीची निवड :
 • शेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड यांवर अवलंबून आहे. 
 • उत्पादनाच्या उद्दिष्टांसाठी योग्य शेळी व बोकडांची निवड करावी. 
 • एकदा वेत झालेली (व्यायलेली) शेळी विकत घेणे चांगले असते. तिची आई जुळी करडे देणारी शेळी मिळत असेल, तर अशा शेळीची पैदास विकत घेणे चांगले असते. 
 • निरोगी व भरपूर दूध देणाऱ्या शेळीचे करडू खरेदी करावे. 
 • करडे रोगमुक्त, तसेच परोपजीवी कीटकांपासून मुक्त असावीत.
 • माझीशेती 'उस्मानाबादी' शेलीची शिफारस करते.
 • दक्षिण आफ्रिकेतील खास मटण उत्पादनासाठी विकसित केलेल्या सुधारित बोअर जातीच्या शेळी आफ्रिकेतून ऑस्ट्रेलिया मध्ये आयात करण्यात आली. त्या शेळ्या काही रोगांपासून रोगमुक्त असल्याचेही जाहीर झाले.
 • ऑस्ट्रेलियन उच्चायोगाने विकास साहाय्य योजने अंतर्गत ऑस्ट्रेलियातून फलटण येथील महाराष्ट्र शेळी व मेंढी संशोधन व विकास संस्थेच्या माध्यमातुन २० गोठविलेले बोअर भ्रूण व १०० बोअर वीर्य मात्रांची आयात करण्यात आली.
 • १४ डिसेंबर १९९३ रोजी ऑस्ट्रेलियन ब्रीडिंग सर्व्हिसेसच्या पशुवैद्यांनी फलटण येथे संस्थेच्या सिरोही शेळ्यांमध्ये बोअर जातीच्या भ्रूणांचे प्रत्यारोपण केले. परिणामी मे १९९४ मध्ये बोअर जातीची ४ नर व ३ मादी पिल्ले जन्माला आली.
गाभण शेळी निवड 
 • आकार - शेळी आकाराने मोठी असावी. तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा हेही महत्त्वाचे लक्षण आहे. केस मऊ व चमकदार दिसणारे असावेत. भरपूर छाती असावी. बांधा मोठा असावा, जेणेकरून दोन किंवा अधिक करडांना शेळी आपल्या गर्भाशयात जोपासू शकेल. पाय सरळ, पिळदार व खूर (टाचा) उंच असावेत. 
 • दात - शेळीचे सर्व दात बळकट व सुस्थितीत असावेत. शक्यशतो एक ते दोन वर्षे वयाचीच (दोन ते चार दाती) शेळी विकत घ्यावी.
 • कास - शेळी विकत घेताना तिची कास नीट पारखून घ्यावी. तिला कासदाह तर नाही ना, याची तपासणी करावी.
दुभती शेळी निवड 
 • दुभती शेळी निवडताना तिचे वय, करडांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे.
 • दुभती शेळी लठ्ठ व मंद नसावी, टवटवीत व चपळ असावी. 
 • दुभत्या शेळीची धार काढून पाहावी. दुधाचे प्रमाण, दुधाचा रंग, कासेवर सूज या गोष्टी पारखून घ्याव्यात. 
बोकडाची निवड 
 • कळपात जन्मणाऱ्या शेळ्यांचे 50 टक्के गुणधर्म बोकडांवर अवलंबून असतात, म्हणून कळपाची सुधारणा बऱ्याच प्रमाणात पैदाशीच्या बोकडांवर अवलंबून असते.
 • शुद्ध जातीचा बोकड शक्यतो विकत घ्यावा. ते न जमल्यास निदान सुधारित जातीचा बोकड घ्यावा.
 • तो चपळ व माजावर आलेल्या शेळीकडे चटकन आकर्षित होणारा असावा व बोकड मारका नसावा. 
 • आकार - विकायला आलेल्या बोकडांपैकी सर्वांत मोठा डौलदार व निरोगी बोकड निवडावा. त्याची छाती भरदार असावी व पायांत भरपूर अंतर असावे. शरीराचा मागील भाग जास्त मोठा व उंच असावा. पाय मजबूत व खूर उंच असावेत. डोके व खांद्याचा भाग दणकट, थोराड व नराची लक्षणे दाखवणारा असावा.
दूध व मांस देणाऱ्या - उस्मानाबादी, संगमनेरी, बारबेदी, जमनापारी, मलबारी, मेहसाना, झालावाडी, बीटल, सिरोही, अजमेरी, कच्छी
मांस उत्पादनासाठी 
आष्ट्रेलियन बोअर, आसाम डोंगरी, काळी बंगाली, तपकिरी बंगाली, मारवाडी, काश्मिरी, गंजभ या जाती चांगल्या आहेत.

महाराष्ट्रात मांसासाठी व दूधासाठी उत्तंम जातीच्या् शेळ्या खालीलप्रमाणे आहेत.
शेळीची जात
पालन प्रकार
उपयोग
उस्मानाबादी
अर्धबंदिस्त शेळीपालन
मांस उत्पादनासाठी
संगमनेरी
अर्धबंदिस्त शेळीपालन
मांस व दुध उत्पादनासाठी
सिरोही
अर्धबंदिस्त शेळीपालन
मांस व दुध उत्पादनासाठी
बोअर
बंदिस्त शेळीपालन
मांस उत्पादनासाठी
सानेन
बंदिस्त शेळीपालन
दुध उत्पादनासाठी
कोकण कन्यावळ
अर्धबंदिस्त शेळीपालन
मांस उत्पादनासाठी

उस्मानाबादी शेळया मूखेड - नांदेड, रेणापूर - लातूर, कोण -कल्यााण, लोणंद - सातारा, म्हसवड - सातारा च्या आठवडी बाजारात या शेळया विकत मिळू शकतात. 

शेळ्यांचे माज आणि भरवणे:
 • शेळ्यांचा मुका माज ओळखण्यासाठी शेळ्यांच्या कळपात नर नेहमी ठेवावा.
 • योग्य आहार व वजन असलेस शेळी १० महिने वयानंतर शेळी भरवावी.
 • गाभन काळात शेळीला अधिक सकस चारा व खाद्य द्यावे. 
 • शेळी विण्यास एक महिना असताना दूध काढणे बंद करावे. 
 • या काळात त्यांना २०० ते २५० ग्रॅम खाद्य द्यावे. त्यामुळे गर्भाची वाढ चांगली होते.
 • शेळी माजावर येत नसेल तर गुळभेंडीची टेंबरे एक आठवड्यातून ३ वेळेस भाकारीतून चारा.
शेळ्यांची जोपासना
गाभण शेळीची जोपासना -
गाभण शेळीची व्यवस्था स्वतंत्ररीत्या करावी. तिला ओला व सुका चारा आणि मुबलक स्वच्छ पाणी यांची योग्य प्रमाणात व्यवस्था करावी. शेवटच्या दोन - तीन महिन्यांत 200 ते 250 ग्रॅम पोषण आहार द्यावा. शेळी नैसर्गिकपणे विते; मात्र काही घटनांमध्ये वैद्यकीय मदत आवश्यक असते.

दुभत्या शेळीची जोपासना -
दुभत्या शेळ्यांना शारीरिक गरजेसाठी लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा अतिरिक्त ऊर्जेची आवश्ययकता भासते. म्हणून त्यांना ओल्या व सुक्याे चाऱ्यासोबतच 100 ग्रॅम खुराक प्रति लिटर दुधामागे जास्त द्यावा. चारा देताना त्यामध्ये योग्य प्रमाणात मीठ व खनिजद्रव्ये मिसळून द्यावीत.

नवजात करडांचे संगोपन


 • शरीर स्वच्छ करणे - नवजात करडास शेळी स्वतः चाटून स्वच्छ करते, त्याचे दोन फायदे असतात. त्यामुळे करडांचे रक्ताभिसरण वाढत असते; शेळीने चाटून स्वच्छ न केल्यास पिल्लांचे अंग स्वच्छ, खरखरीत कापडाने स्वच्छ करावे. नाकातील व तोंडातील चिकट स्राव काढावा, त्यामुळे करडांना श्वांस घेण्यास सोपे जाते. खुरांवर वाढलेला पिवळा भाग हळूच खरडून काढावा, जेणेकरून करडांना ताठ उभे राहता येईल.
 • चीक पाजणे - करडांना उभे राहण्यास मदत करावी. करडे उभे राहिल्यानंतर शेळीच्या सडाला तोंड लावून दूध पिण्याचे प्रयत्न करते की नाही ते पाहावे. नाही तर दूध पिण्यास शिकवावे. पिल्लू जन्मल्यानंतर अर्धा तासाच्या आत शेळीचे दूध म्हणजे चीक पाजणे आवश्याक असते, यामुळे करडांची रोगप्रतिकारक्षमता वाढत असते आणि करडांची पचनसंस्था व पचनमार्ग साफ होतो.
 • दुध पाजणे - पहिल्या आठवड्यात करडाच्या वजनाच्या दहा टक्के एवढे दूध चार- पाच वेळेस विभागून पाजावे. आवश्य्कतेपेक्षा जास्त दूध पाजू नये, नाही तर अपचन होऊन हगवण वाढते. करडे जन्मल्यानंतर त्याचे वजन करून नोंद करून घ्यावी.
 • जन्मल्यानंतर पाच- सात दिवस शेळी व करडे एकत्र ठेवावीत व रोज त्यांना वजनाच्या दहा टक्के दूध तीन- चार वेळा विभागून पाजावे. शेळीच्या पाण्याची व्यवस्था/ भांडे उंचीवर असावे, जेणेकरून करडे पाण्यात पडणार नाहीत, याची काळजी घेता येते.
 • आहार - साधारणपणे 65- 70 दिवसांपासून करडांचे दूध कमी करत 90 दिवसांपर्यंत पूर्णपणे बंद करावे आणि शेळीपासून पूर्णपणे वेगळे करावे. करडांना वयाच्या 30 ते 40 दिवसांपासून मऊ, लुसलुशीत चारा देण्यास सुरवात करावी, जेणेकरून चारा खाण्याची सवय होऊ लागते.
 • करडांची निरोगी व झपाट्याने वाढ करण्यासाठी त्यांना आवश्यक औषधी, सकस आहार इ.कडे बारकाईने लक्ष देण्यात यावे. खनिज क्षारांचा पुरवठा करण्यासाठी खनिज विटा टांगून ठेवाव्यात.
 • करडे पाच महिन्यांच्या नंतरच विक्रीसाठी काढावीत, कारण या वयानंतर करडांची वाढ झपाट्याने होते व जास्त नफा मिळतो.
 • आरोग्य - तीन महिन्यांनंतर करडांना आंत्रविषार, लाळ्या खुरकूत व घटसर्प आणि फर रोगांविरुद्धचे लसीकरण करून घेणे आवश्यतक आहे.
पैदाशीच्या बोकडाची जोपासना
पैदाशीकरिता योग्य शारीरिक व वांशिक गुण असणाऱ्या निरोगी बोकडाची निवड करावी. निवड करताना त्याचे वय एक वर्षापेक्षा जास्त असावे, तो मारका नसावा. अशा बोकडास योग्य प्रमाणात हिरवा, वाळलेला चारा, खुराक व मुबलक पाण्याची व्यवस्था करावी.

शेळी पालनामध्ये गोठा पद्धतीला महत्व आहे. कमीत कमी खर्चात व्यवस्थित संगोपन केल्यास जास्तीत जास्त नफा राहतो. शेळीच्या निवासावरून मुक्त, अर्धबंदिस्त आणि बंदिस्त असे शेळी पालनाचे प्रकार पडतात. गोठा पद्धतीबाबत अधिक वाचा...

साधारणपणे शेळ्यांना दररोज तीन ते चार किलो हिरवा चारा व एक किलो वाळलेला चारा लागतो. त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला आवश्यक आहे. त्याचबरोबर गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या बोकडासाठी पूरक आहाराची आवश्यकता अधिक वाचा...

वाढते तापमान आणि कमी पर्जन्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष या बदलत्या हवामानाचा शेळ्या- मेंढ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सर्वसाधारणपणे शेळ्या- मेंढ्यांचा पैदासकाळ हा पावसाळ्याच्या सुरवातीला येतो; मात्र पैदाशीसाठी सक्षम शरीर यंत्रणा तयार होण्यासाठी उन्हाळी हंगामातच त्यांची काळजी कशी घ्यायची अधिक वाचा... 

शेळी ही निसर्गतः काटक व रोगांना कमी बळी पडते; मात्र अनेक कारणांमुळे विविध रोगांचे संक्रमण होऊन शेळीपालन व्यवसायाचे व्यवस्थापन बिघडण्याची दाट शक्यनता असते. शेळी संगोपानामध्ये आरोग्य व्यवस्थापन अधिक वाचा...

माझीशेती मार्फत शेलीपालनाचे संपुर्ण व्यवसाय शोध अहवालापासून मांस प्रक्रिया व निर्यातीबाबत सविस्तर ३ दिवस दररोज २ सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. तज्ञ मार्गदर्शक, देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सफर असा प्रशिक्षणाचा भाग आहे. प्रशिक्षणाबाबत अधिक वाचा... 
गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही हातभार लावा. प्रकल्प अहवाल बनवुन घ्या. तुम्ही दिलेला निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला जातो. आमच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्या. 

माझीशेतीच्या शेळी पालन ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह...
उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह...

No comments:

Post a Comment