Saturday, March 10, 2018

माझीशेतीमार्फत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा रौप्यमहोत्सव आणि जागतिक महिला दिन उत्साहात साजरा...

माझीशेतीच्या तासगाव जि. सांगली येथील ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पातील टीमने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा रौप्यमहोत्सव आणि जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला. संपुर्ण टीमने जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळपास ३०० च्या वर महिलांना प्रबोधन देऊन प्रोत्साहित केले. आम्ही अंगणवाडी हॉल, आरवडे, PDVP कॉलेज, तासगाव, शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव, पंचायत समिती, तासगाव, ग्रामपंचायत कवठे एकंद, ग्रामपंचायत मांजर्डे, मोरया हॉटेल सभागृह, सावळज या ठिकाणी कार्यक्रम घेतले. आयोजित कार्यक्रमात कायदा मार्गदर्शनासोबत पुढील विषयांचा सविस्तर अंतर्भाव केलेला होता.

 

महिला धोरण
महिलांचे अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून देऊन महिलांचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. संरक्षण आणि सक्षमीकरण करताना जबाबदारीचे विश्लेषण करून महिलांच्या पाठीशी भावासारखे खंबीरपणे उभा राहण्याचे आव्हान पेलणे आवश्यक आहे.
 • महिलांचा सर्वांगीण विकास करणे. सर्व क्षेत्रांमध्ये समानसंधी निर्माण करणे व त्यांना त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे.
 • पुरुषप्रधान मानसिकता बदलणे आणि स्त्री-पुरुष समानता ठेवणे.
 • धर्म, वंश, जात, सत्ता, प्रदेश या कारणांमुळे वाढत्या हिंसाचाराचा मुकाबला करण्यासाठी पाठबळ देणे व हिंसा होणारच नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे.
 • जन्मदर समान राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे.
 • पारंपारिक स्त्रीचे रूप बदलुन आधुनिक व स्वबळावर उभी असणारी नवी रणरागिणी उभी करणे.
 • घर व्यवस्थापन आणि कंपनी व्यवस्थापन यामधील फरक / दरी कमी करणे आणि गृहिणींना सन्मान मिळवून देणे.
 • निर्णय प्रक्रियेत समाजातील सर्व महिलांचे हितांचे आणि हक्कांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणे.
 • रूढी परंपरेच्या नावाखाली समाजाच्या प्रवाहातून बाहेर असलेल्या स्त्रियांचे अन्यायकारक रूढी-परंपरेपासून मुक्ती करणे.
 • महिलांचे संघटन करणे आणि त्यांना दिशा देणे.
 • तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून महिलांचे कायदे, हक्क, धोरण आणि योजना समजण्यासाठी जबाबदार अधिकारी, संपर्क क्रमांक आणि कार्यालय पत्ते प्रसिद्ध करणे.
 • शाळा, महाविद्यालये, सरकारी व खाजगी कार्यालये, सार्वजनिक संस्था, कारखाने अश्या सर्व ठिकाणी काम करणाऱ्या महिलांपर्यंत पोहोचणे व त्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी साधन केंद्रे तयार करणे.
शासकीय योजना

 • मनोधैर्य योजना - बलात्कार पिडीत, लैंगिक शोषण पिडीत बालक आणि हल्ला पिडीतांकरिता (महिला आणि बालक)
 • माझी कन्या भाग्यश्री योजना
 • बाल संगोपन संस्था (सी सी आय)
 • निराश्रित महिलां, किशोरवयीन माता, अत्याचार पिडीत महिलां यांच्यासाठी राज्य महिला गृहे (वय गट १८ ते ६० वर्षे
 • देवदासी कल्याण योजना
 • अनाथालय, महिला स्वीकृती केंद्रे आणि संरक्षित गृहे यामधील निराधार आणि परित्यक्ता विधवांच्या मुलींच्या विवाहाकरीता अनुदान
 • शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
 • महिला समुपदेशन केंद्र
 • अत्याचारग्रस्त पिडीत महिलांसाठी सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय महिला केंद्र
 • निराश्रित महिलांसाठी आधार गृहे
 • बाल सल्ला केंद्र
 • बाल संगोपन योजना (मुलांसाठी कौटुंबिक देखभाल)
 • बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना
 • काम करणार्‍या महिलांच्या मुलांकरीता राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना
 • इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
 • राजीव गांधी सबला योजना
 • किशोरी शक्ति योजना
 • एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आय सी डी एस)
विद्यार्थी महिला विकास
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनात होणारा उपयोग आणि ग्रामीण जीवनाकडे ओढा वाढविण्यासाठी संस्थेची ‘विद्यार्थी विकास योजना’ आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे रु. १०००/- प्रतिमाह मानधन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी शेती आणि शेती पुरक व्यवसायांची शृंखला तयार करणे गरजेचे आहे. तज्ञ मनुष्यबळ गावस्तरावर कार्यरत ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.

व्यावसायिक महिला विकास
आगकाडीच्या पेटीतील काडी आणि माणसाच्या मनातील स्वप्ने यांच्यामध्ये एक अतूट साम्य आहे ते म्हणजे काडी जोपर्यंत बाहेर काढून घासली जात नाही तोपर्यंत तिच्यामध्ये छुपा असलेला वणवा दिसत नाही अगदी तसेच आपल्या मनातील इच्छा जोपर्यंत वास्तवात आणण्यासाठी घासल्या जात नाहीत तोपर्यंत स्वप्ने हि दिवास्वप्नेच राहतात....

महिला बचत आणि स्वयंसहाय्यता गट विकास
संस्थेचे महाराष्ट्रातील कार्यक्षेत्राची माहिती दिली. बचत गटांना उपजीविकेसाठी व्यवसाय निवड कशी करायची? उत्पादन विक्री कशी करायची ?? व्यवसाय व्यवस्थापनाचे मुलभूत वैशिष्ट्ये यावर मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. संस्थेच्या वतीने वकील श्री. माने यांनी महिलांचे कायदे आणि महिलांना सक्षम करण्यासाठी शासनाचे धोरण यावर प्रकाशझोत टाकला.

शेतकरी महिला विकास
ग्रामीण भागाच्या विकासामध्ये शेतकरी विकास प्राधान्याने करणे आणि त्यासाठी विद्यार्थी, उद्योजक, इतर सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा यांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे. व्यावसायिक स्तरावर शेती व्यवस्थापन करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा असे सांगितले. शेती व्यवस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करताना हवामान अंदाज, बाजारभाव, पिकसल्ला, शासकीय योजना यांची माहिती घेणे कसे महत्वाचे आहे.

महिलांना डिजिटल व्यासपीठ
ई- गव्हर्नन्स मध्ये घेतलेला पुढाकार हा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा चेहरा बदलून देईल हे सांगताना त्यांनी संगणकीय भाषेतील डोमेन आणि वेबसाईट याबाबत माहिती देत शासकीय, खाजगी, शैक्षणिक, व्यावसायिक वेबसाईट कश्या ओळखायच्या हे सांगितले. माहिती तंत्रज्ञान आणि सोशल मिडिया याचे फायदे –तोटे समजावून सांगताना त्यांनी ‘ब्ल्यु व्हेल’ या ऑनलाईन खेळाचे गंभीर परिणाम सांगितले. सोशल मिडिया आणि संकेतस्थळे यांचा व्यवसाय वृद्धीसाठी वापर करणेसाठी संस्थेची बहुआयामी डिजिटल व्यासपीठ उपयोग करण्याबाबत प्रोत्साहन दिले. या योजनेचा विद्यार्थी, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना होणारा उपयोग आणि त्यातुन रोजगार निर्मिती याकडे लक्ष वेधले. 

No comments:

Post a Comment