Monday, February 8, 2016

मधमाशी / मधुमक्षिका पालन

आर्थिक प्राप्तीचा एक उद्योग म्हणून मधमाशी पालनाचे फायदे उत्पादन प्रक्रिया
अ. मधमाशी पालनासाठी लागणारे साहित्य
आ. मधुमाशांच्या प्रजाती
इ. मधाच्या पोळ्यांची स्थापना
ई. मधमाशांच्या वसाहतीची स्थापना करणे
उ. वसाहतींचे व्यवस्थापन
ऊ. मधाची काढणी

आर्थिक प्राप्तीचा एक उद्योग म्हणून मधमाशी पालनाचे फायदे
मधमाशी पालनासाठी वेळ, पैसे आणि पायाभूत गुंतवणुकीची आवश्यकता असते. मध आणि माशांनी तयार केलेलं मेण शेतीच्या दृष्टीने फारशा मूल्यवान नसलेल्या जागेतून उत्पादित करता येते. मधमाशा स्रोतांसाठी कोणत्याही अन्य शेती उद्योगासोबत स्पर्धा करीत नाहीत. मधमाशी पालनाचे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतात. मधमाशा फुलोरा येणा-या अनेक वनस्पतींच्या परागीकरणात महत्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे सूर्यफूल आणि विविध फळे यांसारख्या ठराविक पिकांच्या उत्पादनात वाढ होते. 

मध हे एक रुचकर आणि अत्यंत पोषक अन्न आहे. मध गोळा करण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे मधमाशांच्या अनेक जंगली वसाहती नष्ट होतात. त्यामुळे मधमाशांचं पेट्यांमधे संगोपन करुन आणि घरच्या घरीच मध उत्पादन घेऊन हे टाळता येते. वैयक्तिक किंवा गटगटानं मधमाशी पालन सुरु करता येऊ शकते. मध आणि मेण यांच्यासाठी बाजारपेठेत मोठी मागणी आहे. 

महाबळेश्वर येथे मधमाशी पालन व्यवसायाचे 15 दिवस प्रशिक्षण मिळते. 45 हजार रुपयांना मधमाशांच्या 10 पेट्या मिळतात. या एका पेटीत 10 फे्रम तयार होतात. फे्रममध्ये एक एक करून मधमाशा शिरतात व मध जमा करतात. एका पेटीत 30 ते 40 हजार मधमाशा राहतात. खादी ग्रामोद्योग तर्फे अर्थसहाय्यित कर्ज मिळते. यामध्ये जवळपास 80 टक्के अनुदान असते, तर 20 टक्के रक्कम परतफेड करायची असते. सरासरी 100 रुपये किलो दराने मधाची विक्री होते. 


थंडीपासून बचाव
दहा सेल्सियसपेक्षा कमी तापमानास मधमाश्या उडणे थांबवतात आणि पोळ्याच्या मध्यवर्ती भागावर गोळा होतात. थंडीमध्ये एकत्र येण्याच्या या प्रकारामुळे आणि टप्प्याटप्प्याने केलेल्या हालचालीमुळे राणी माशीभोवतीचे तापमान २७ सेंटिग्रेडपर्यंत ठेवले जाते. या तापमानास राणी माशी अंडी घालू शकत नाही. पोळ्याचे तापमान 34 अंशापर्यंत वाढल्यानंतर राणी आणखी एकदा अंडी घालण्यास प्रारंभ करते. कामकरी माशा सतत पोळ्याच्या आतील भागाकडून बाहेरील भागाकडे फिरत राहिल्याने कोणत्याही माशीस असह्य थंडीस तोंड द्यावे लागत नाही. बाहेरील तापमान जेवढे थंड तेवढे एकत्र आलेल्या माश्यांचे थर वाढत जातात. थंडीच्या दिवसात माशा साठवून ठेवलेला मध शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी वापरतात. सतत खर्च केलेल्या मधामुळे पोळ्याचे वजन कमी होत जाते. थंडीच्या तीव्रतेनुसार तीस ते सत्तर टक्के मध खर्च केला जातो.


मधुमक्षिका पालनामधील धोके -
पाश्चिमात्य मधुमक्षिका पालन उद्योगामध्ये एक धोका सध्या उत्पन्न झाला आहे. वरवर पाहता एकाएकी मधमाश्यांची संख्या कमी होते. आणि एक पोळे टिकवून ठेवण्यासाठी जेवढ्या मा्श्यांची आवशकता आहे त्याहून कमी माश्या राहिल्या म्हणजे पोळेच नाहीसे होते. २००७मध्ये तीस ते सत्तर टक्के मधमाश्यांची पोळी नाहीशी झाली. अपुरी प्रथिने, शेती करण्यामधील काहीं बदल किंवा अनिश्चित हवामान अशी याची तीन कारणे सांगितली जातात. उत्तर अमेरिकेत सुद्धा मधमाश्यांची संख्या एवढी कमी आतापर्यंत कधीच झालेली नव्हती. या प्रकारास ‘कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर’ असे नाव मिळाले. हा प्रकार नवा आहे की इतर बाह्य घटकामुळे झाला याचा अभ्यास अजून अपूर्ण आहे. पण हे एक लक्षण (सिंड्रोम) असून आजार नाही असे दिसते. जसे इस्रायली अक्यूट परजीवी विषाणूमुळे इस्राईल मध्ये मधमाश्या जवळजवळ संपल्या. २००९मध्ये झालेल्या संशोधनामध्ये मधमाश्यांमधील प्रथिन निर्मितीसाठी एकच जनुक कारणीभूत आहे असे सिद्ध झाले. मधमाश्यांमधील प्रथिननिर्मितीसाठी डिसिट्रिव्हिरिडी जातीचा विषाणू मधमाशीमधील रायबोसोम मधील जनुकीय यंत्रणेवर परिणाम करतो असे दिसले आहे.

उत्पादन प्रक्रिया
मधमाशांचं संगोपन शेतावर किंवा घरी पेट्यांमध्ये करता येते.

अ. मधमाशी पालनासाठी लागणारे साहित्य
पोळे ही एक साधी लांब पेटी असते आणि तिच्या वरील भागावर अनेक पट्ट्या असतात. या पेटीचा अंदाजे आकार १०० सेंमी लांब, ४५ सेंमी रुंद आणि २४ सेंमी उंच असा असावा. ही पेटी २ सेंमी जाड असावी आणि पोळे १ सेंमी रुंदीच्या प्रवेश छिद्रांसहित एकत्र चिटकवलेले आणि स्क्रूने घट्ट केलेले असावे. वरील पट्ट्या पोळ्याच्या रुंदीइतक्याच लांबीच्या असाव्यात जेणेकरुन त्या आडव्या बरोबर बसतील आणि त्यांची जाडी १.५ सेंमी असावी म्हणजे एक वजनदार मधाचे पोळे पेलण्यासाठी त्या पुरेशा होतील. प्रत्येक स्वतंत्र वरील पट्टीला एकेक पोळे तयार करण्यासाठी मधमाशांना आवश्यक नैसर्गिक जागा मिळण्याकरता ३.३ सेंमीची रुंदी ठेवणं गरजेचं आहे.धुराडं हे दुसरं महत्वाचं साधन आहे. ते लहान पत्र्याच्या डब्यापासून तयार करता येतं. मधमाशा आपल्याला चावू नयेत आणि त्यांना नियंत्रित करता येण्यासाठी त्याचा वापर केला जातो. कापड - मधमाशा पालन क्षेत्रात काम करताना माशांच्या दंशापासून आपले डोळे आणि नाकाचा बचाव करण्यासाठी. सुरी वरील पट्ट्या सैल करण्यासाठी आणि मधाची पोळी कापण्यासाठी. पिस मधमाशांना पोळ्यापासून दूर करण्यासाठी. राणीमाशीविलगक Queen Excluder

आ. मधुमाशांच्या प्रजाती
भारतामध्ये मधमाश्यांच्या चार प्रजाती आहेत. त्या खालीलप्रमाणेः

दगडी माशी अपीस डोरसाटा या माशा उत्तम प्रकारे मध गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहतीमागे सरासरी मध उत्पादन ५०-८० किलो असतं. लहान माशी अपीस फ्लोरिआ या माशा कमी मध गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहतीमागे अंदाजे २००-९०० ग्रॅम मध मिळतो. भारतीय मधमाशी अपीस सेराना इंडीका या मधमाशांद्वारे होणारं मध उत्पादन दर वर्षी प्रति वसाहत ६-८ किलो असतं. युरोपिअन मधमाशी इटालिअन मधमाशी अपीस मेल्लीफेरा यांच दर वसाहतीमागे सरासरी मध उत्पादन २५-४० किलो असतं.
डंखरहित मधमाशी त्रिगोना इरीडीपेन्नीस वर उल्लेख केलेल्या प्रजातींच्या शिवाय, केरळमध्ये आणखी एक प्रजाती अस्तित्वात आहे तिला डंखरहित मधमाशी म्हणतात. त्या ख-या अर्थानं डंखरहित नसतात, परंतु त्यांचा डंख पुरेसा विकसित झालेला नसतो. त्या परागीकरण चांगल्या प्रकारे करतात. त्यांच्याद्वारे दर वर्षी ३००-४०० ग्रॅम मध उत्पादन मिळतं.

इ. मधाच्या पोळ्यांची स्थापना
मध उत्पादन केंद्र पाण्याचा चांगला निचरा असलेल्या खुल्या जागेत उभारावं, शक्यतो फळांच्या बागांच्या जवळ, मकरंद, परागकण आणि पाणी भरपूर असलेल्या ठिकाणी उभारणी करावी. पोळ्यामधलं तापमान आवश्यक तितकं राहण्यासाठी सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणं महत्वाचं आहे. पोळ्याच्या स्टँडच्या भोवती मुंग्या शिरु नयेत यासाठी पाणी भरलेले खंदक (अँट वेल्स) ठेवाव्यात. वसाहतींचे तोंड पूर्वेच्या दिशेला असावं, पाऊस आणि सूर्यापासून पेटीचं रक्षण होण्यासाठी दिशेमध्ये थोडेफार बदल करावेत. या वसाहतींना पाळीव जनावरं, अन्य प्राणी, गर्दीचे रस्ते आणि रस्त्याकडील दिव्याच्या खांबांपासून दूर ठेवावं.

ई. मधमाशांच्या वसाहतीची स्थापना करणे
मधमाशांची वसाहत स्थापन करण्यासाठी, जंगलात वसलेली वसाहत एखाद्या पोळ्याकडे स्थानांतरित करुन किंवा मधमाशांचा जत्था जवळून जात असताना त्यांना तिथे वसण्यासाठी आकृष्ट करुन मधमाशा मिळवता येतात. तयार केलेल्या पोळ्यामध्ये एक जत्था किंवा एक वसाहत वसवण्याच्या पूर्वी, जुन्या पोळ्याचे करड्या रंगाचे तुकडे किंवा पोळ्यातील मेण नव्या पोळ्याला चोळून त्याचा वास मधमाशांसाठी ओळखीचा करणं फायद्याचं ठरतं. शक्य झाल्यास, राणी मधमाशीला एका नैसर्गिक जत्थ्यातून पकडून एखाद्या पोळ्याखाली ठेवावं आणि अन्य मधमाशांना आकृष्ट करावं. पोळ्यामध्ये वसवलेल्या जत्थ्याला काही आठवडे अर्धा कप गरम पाण्यात अर्धा कप पांढरी साखर विरघळवून अन्न द्यावं म्हणजे पट्ट्यांच्या लगत पोळं जलदगतीनं तयार करण्यात मदत होईल. अधिक गर्दी होऊ देऊ नये.

उ. वसाहतींचे व्यवस्थापन
मधाच्या पोळ्यांची तपासणी शक्यतो सकाळच्या तासांमध्ये मधाच्या हंगामामध्ये आठवड्यातून एकदा करावी. पोळ्याची स्वच्छता पुढील क्रमाने करावी, छप्पर, सुपर /सुपर्स, ब्रूड चेंबर्स आणि फ्लोअर बोर्ड. सुदृढ राणी माशी, अळ्यांची वाढ, मध आणि परागकणांची साठवणूक, राणी चौकटींची उपस्थिती, माशांच्या संख्या आणि नर मधमाश्यांच्या वाढ पाहण्यासाठी वसाहतींवर नियमितपणे देखरेख ठेवा.

मधमाश्यांच्या खालीलपैकी कोणत्याही शत्रूंद्वारे त्रास होत असल्यास त्याचा शोध घ्या. मेण पतंग (गॅलेरिया मेल्लोनेला) -  मधमाशांच्या पेटीतील पोळं, कोपरे आणि पोकळीतून सर्व अळ्या आणि रेशीमयुक्त जाळ्या काढून टाका.

मेण कीडे (प्लॅटीबोलियम स्प.) - प्रौढ कीडे गोळा करुन नष्ट करा. 
तुडतुडे - Mites: पोळ्याची चौकट आणि तळाचा बोर्ड ताज्या बनवलेल्या पोटॅशिअम परमँग्नेटमध्ये बुडवलेल्या कापसाच्या बोळ्यांनी स्वच्छ करा. तळाच्या बोर्डवरील सर्व तुडतुडे निघून जाईतोवर ही प्रक्रिया वारंवार करा. 

अनुत्पादन काळातील व्यवस्थापन ज्येष्ठ माशांना काढा आणि उपलब्ध सुदृढ नव्या माशांना ब्रूड चेम्बरमध्ये नीट बसवा. आवश्यक असल्यास, विभाजन बोर्ड बसवा. राणीच्या चौकटी आणि नर मधमाशांची चौकटी, दिसल्यास नष्ट करा.

भारतीय मधमाश्यांसाठी प्रति आठवडा प्रति वसाहत २०० ग्रॅम साखर या दराने साखर सीरप (१:१) द्या. पळवापळवी टाळण्यासाठी सर्व वसाहतींना एकाचवेळी अन्न द्या. मधाची उपलब्धता असण्याच्या काळातील व्यवस्थापन मध उपलब्ध असण्याच्या हंगामापूर्वी वसाहतीत पुरेशा संख्येनं माशा ठेवा. पहिले सुपर आणि ब्रूड चेम्बर यांच्यामध्ये जास्तीत जास्त जागा द्या आणि पहिल्या सुपरच्या वर नको. राणीमाशीला ब्रूड चेम्बरमध्येच ठेवण्यासाठी ब्रूड आणि सुपर चेम्बर यांच्या दरम्यान राणीला वेगळी करण्याच्या शीट्स ठेवा. वसाहतीची तपासणी आठवड्यातून एकदा करा आणि मधानं भरलेल्या फ्रेम्स सुपरच्या बाजून काढून घ्याव्यात. तीन-चतुर्थांश भाग मधानं किंवा परागकणांनी भरलेल्या आणि एक-चतुर्थांश बंदीस्त अळ्यांनी भरलेल्या फ्रेम्स चेंबरच्या बाहेर काढून घ्याव्यात आणि त्यांच्या जागी रिकामी पोळी किंवा फ्रेम्स आधारीसहित ठेवण्यात याव्यात. पूर्णतः बंदीस्त, किंवा दोन-तृतियांश आवरणयुक्त पोळी मध काढण्यासाठी बाहेर काढण्यात यावीत आणि मध काढून घेतल्यानंतर सुपर्समध्ये परत ठेवावीत.

ऊ. मधाची काढणी
मधमाशी पालन हा शेतीवर आधारित एक उपक्रम आहे, शेतकरी अतिरीक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा उद्योग करु शकतात. मधमाश्या फुलांमधील मकरंदाचे मधामध्ये रुपांतरण करतात आणि त्यांना पोळ्याच्या कप्प्यांमध्ये साठवून ठेवतात. जंगलांमधून मध गोळा करण्याचा उद्योग दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे. मध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वाढत असल्याने मधमाशी पालनाचा उद्योग एक टिकाऊ उद्योग म्हणून उदयास येत आहे. मध आणि मेण ही मधमाशी पालनातून मिळणारी आर्थिकदृष्ट्या महत्वाची दोन उत्पादने आहेत.

मधमाशीचे जीवनचक्र
समूहाने राहणाऱ्या कीटकापैकी एक मधमाशी. अशा प्राण्यांना eusocial असे म्हणण्याची पद्धत आहे. सुझान बात्रा यानी ही संज्ञा दिली..[१]. याचा मराठीमध्ये “ समूह सहजीवन वृत्ती” असे म्हणता येईल. समूहाने पिढ्यान्‌पिढ्या राहताना या गटाएवढे सामूहिक वर्तन जनुकीय पातळीपर्यंत पोहोचले आहे. एका वसाहतीमध्ये एक राणी माशी, ऋतुमानाप्रमाणे थोडे नर आणि सतत बदलता राहणारा कामकरी माश्यांचा समूह अशी पोळ्याची रचना असते. जातीप्रमाणे पोळ्याच्या राणी, नर, आणि कामकरी माश्यांची संख्या बदलते. पण या श्रेणीमध्ये सहसा बदल होत नाही. सामान्यपणे सर्व पोळ्यामधील समान गोष्टी खालीलप्रमाणे-

१. कामकरी माश्या राणीमाशीनेने घातलेली अंडी मेणाने बनवलेल्या कोठड्यामध्ये ठेवतात. कोठड्या बनविण्याचे काम कामकरी माश्यांचे असते. एका कोठडीत एकच अंडे ठेवले जाते. राणी माशी शुक्रगाहिकेमधील [[शुक्रजंतू]पासून अंडे फलित करू शकते. कामकरी माश्या आणि राणी माशी फलित अंड्यांपासून तर नर अफलित अंड्यांमधून निपजतात. नर एकगुणित गुणसूत्राचे, तर राणी आणि कामकरी माशा द्विगुणित गुणसूत्रांच्या असतात. अंड्यातून बाहेर पड्लेल्या अळ्याना कामकरी माश्या प्रारंभी रॉयल जेली खायला घालतात. नंतरच्या काळात अंळ्याना फक्त मध आणि परागकण खायला घातले जातात. ज्या अळीला फक्त रॉयल जेलीच्या खाद्यावर ठेवलेले असते त्यापासून राणी माशी तयार होते. अनेक वेळा कात टाकल्यानंतर अळी स्वत:भोवती कोश तयार करते.

२. कामकरी माश्यांच्या कार्याच्या विभागणीचा विस्तृत अभ्यास झालेला आहे. नव्या कामकरी माश्या पोळे स्वच्छ ठेवण्याचे आणि अंड्यांतून बाहेर आलेल्या अळ्याना खायला घालण्याचे काम करतात. नव्या कामकरी माश्यांच्या शरीरात असलेल्या ग्रंथीनी रॉयल जेली बनविण्याचे काम थांबविल्यानंतर त्या पोळ्यामधील नव्या कोठड्या बांधण्यास मेण तयार करतात. कामकरी माश्यांचे वय जसे अधिक होईल तसे त्यांचे काम बदलत जाते. मेण बनविण्याचे काम जमेनासे झाल्यावर त्या मध गोळा करणे आणि परागकण आणणे, पोळ्याचे रक्षण करणे अशी कामे करतात. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्या मध आणि पराग गोळा करण्याच्या कामाव्यतिरिक्त काहीं काम करीत नाहीत.

३. कामकरी माश्या अन्न गोळा करतात. ठरावीक प्रकारच्या “वॅगल डान्स”च्या सहाय्याने त्या परस्पराना अन्न आणि पाणी कोठल्या दिशेला आणि किती लांब आहे हे सांगतात. अन्न पोळ्याच्या जवळ असेल तर वर्तुळाकार डान्स आणि लांबवर असेल तर वॅगल डान्स अशी त्यांची संदेशवहनाची पद्धत आहे. मधमाश्यांच्या “डान्स लँग्वेज” च्या अभ्यासास कार्ल व्हॉन फ्रिश्च या ऑस्ट्रियामधील संशोधकास १९७३ साली फिजिऑलॉजी आणि मेडिसीनमधील नोबेल पुरस्कार देण्यात आला. एपिस मेलिफेरा या मधमाशीवर त्यानी हा अभ्यास केला होता.

४. अन्न गोळा करून आणलेल्या माष्यांकडून ते पोळ्यात नेण्यासाठी नव्याने कामाला लागलेल्या माश्यांसाठी वेगळ्या पद्धतीचे “थरथराट नृत्य”, ट्रेम्बल डान्स केला जातो.

५. नवी राणी मधमाशी पोळ्यापासून दूरवर उड्डाण करून अनेक नर माशांशी मैथुन करून आपल्या शुक्रकोशिकेमध्ये शुक्रजंतू साठवून ठेवते. मिथुनानंतर नर माशीचा मृत्यू होतो. साठवलेल्या शुक्रजंतूपासून फलित अंडे घालायचे की अफलित हे राणी माशी नेमके कसे ठरविते हे नीटसे समजले नाही.

६. मधमाश्या या बाराही महिने समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. मधाचे पोळे हा राणीमाशी, अनेक कामकरी माश्या आणि थोडे नर यांचा एकत्रित समूह म्हणून अस्तित्वात असतो. एकदा नव्या राणी माशीचे फलन झाले म्हणजे पोळ्यातील कामकरी माश्या आणि राणीमाशी नवे पोळे बांधायला बाहेर पडतात. नव्या पोळ्याची जागा कामकरी माशानी आधीच शोधून ठेवलेली असते. नव्या जागेवर आल्या आल्या त्या नव्या पोळ्यासाठी मेणाच्या कोठड्या बांधायला घेतात. त्याच वेळी नव्या कामकरी माश्यांचे उत्पादन चालू होते. सामूहिक कीटकसृष्टीमध्ये असे वर्तन इतर जातीमध्ये आढळत नाही.

मधमाश्यांमधील एका वेगळ्या प्रकाराच्या नांगी नसलेल्या माश्या राणी माशी येण्याआधीच पोळे बांधून तयार ठेवतात.

Saturday, February 6, 2016

लाळ्या खुरकुत - उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला

माझीशेती : FFC (160206)
लाळ्या खुरकुत - उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला

लाळ्या खुरकुत रोगाची लागण झाल्यानंतर ती नियंत्रणात येण्यास बराच उशीर लागतो. या काळात बाधित जनावर चारा खाऊ शकत नाही, लंगडत चालते, दुधाळ जनावराचे दुध घटते. गंभीर परिस्थितीत जनावर दगावण्याची शक्यता असते.
त्यामुळे नुकसान होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक लस टोचावी.

* प्रतिबंधात्मक उपाय आणि घ्यावयाची काळजी -
- थंडी ओसरताना फेब्रुवारी महिन्यात आपल्याकडील गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या अशा सर्व दोन खुरी जनावरांना लाळ्या खुरकुत या रोगासाठी प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
- सहा महिनेपेक्षा मोठ्या वासरांनाही लस टोचावी.
- गाभण गाईंना डॉक्टरच्या सल्याने लस टोचावी.
- या कला बाधित जनावर स्वतंत्र दूर बांधावे, पाणी स्वंतंत्र पाजावे. खुरातील जखम पोटाशियामच्या पाण्याने किंवा त्रिफळा चुर्णच्या पाण्याने धुवून काढावी.
- गावात साथ आली असल्यास सार्वजनिक ठिकाणी जनावरांना पाणी पाजू नये.
- लस स्वत: आणली किंवा घरी ठेवली तर २ ते ८ सेल्सियस तापमानात ठेवावी वाहतूकही या तापमानात करावी. शक्यतो गावातील सर्व जनावरांना लस द्यावी.

(जास्तीत जास्त शेतकरी या चळवळीत सामावून घ्या. त्यांच्या मोबाईल वरुन खालील प्रमाणे whats app मेसेज करायला सांगा)

* माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान *
**********************
www.mazisheti.org
www.facebook.com/agriindia
**********************
व्हाट्स अप मेसेजसाठी खालीलप्रमाणे माहिती 9975740444 वर फक्त व्हाट्स अप मेसेज द्वारा पाठवा.
नाव -
संपुर्ण पत्ता -
जमीन क्षेत्र (एकर)-
प्रमुख पिक व त्याचे क्षेत्र -

Thursday, February 4, 2016

शेवगा लागवड

  • जमीन
शेवगा हलक्या ,माळरान तसेच डोंगराळउताराच्या जमिनीत करता लागवड  येतो . काळ्या भारी जमिनीत शेवग्याचे  झाड जोमाने वाढते पण उत्पादन कमी येते . जमिनीचा सामू     6 - 7.5 इतका  असावा.

  • लागणीची पद्धत
पावसाळा सुरू होण्या पूर्वी  60×60×60 सेंमी आकाराचे खड्डे खोदुन त्यात 1घमीले शेनखत ,250 ग्राम 15:15:15 आणी 50 ग्राम फॉलिदॉल पावडर टाकून भरून घ्यवी .दोन झाडातिल व ओळीतिल अंतर 4×4 मीटर इतके ठेवावे . 
बियाणे - कोइमतूर-1, कोइमतूर-2, पीकेएम-1, पीकेएम-2 आणि कोकण रुचिरा 
सुधारित जाती :
१) जाफना, रोहित-१, कोकण रुचिरा, पी. के. एम. १

  • पाणी व ख़त व्यवस्थापन
शेवग्याच्या प्रत्येक झाडास दरवर्षी 10 किलो शेनखत ,75ग्राम नत्र ,75 ग्राम स्फूरद ,75 ग्राम पालाश द्यावे . भारी जमीनीत एकरी 50 किलो    डि ए पी दिल्यास पालवी चांगली फुटते .

  • रोग  नियंत्रण
शेवगा पिकावर जास्त  प्रमाणात रोग आढळून येत नाही.काही वेळा खोडवर कँकर या रोगाचा  प्रादूर्भाव आढळून येतो त्यावर 1%बोर्डो मिश्रण किंवा 10लिटर पाण्यात 10 ग्राम बाविस्टिन बुरशीनाशक फवरावे .        

  • किड नियंत्रण 
शेवगा पिकावर आढळून येणारी महत्वाची किड म्हणजे खोड आणी फांदी पोखरनारी अळी. नियंत्रना करीता डायमेथोयेट किंवा ट्रायजोफॉस या किटकनाशकात किंवा पेट्रोल मध्ये बुडवलेला बोळा टाकून  छिद्र बंद करावे . त्याच प्रमाणे पाने गुंडाळनारी आळी आढळून आल्यास  20 मिली प्रॉफेनॉफॉस किंवा फॉस्फिमिडोन 10 लिटर पाण्यातून फवारावे .

  • महत्वाची घ्यावयाची काळजी 
दर वर्षी 1 झाडा पासून 30 ते 35 किलो शेंगा  मिळतात .खत ,पानी ,आंतरिक मशागत याचे योग्य नियोजन केल्यास उत्पादन वाढून सातत्याने मिळते अन्यथा उत्पादनात घट होते .त्यामु़ळे नियमित काळजी घेणे आवश्यक आहे .

  • काढणी आणि उत्पादन 
शेवगा लागवडीनंतर पहिल्या सहा महिन्यांत प्रत्येक झाडापासून सरासरी ३ ते ७ किलो शेंगा मिळतात. दुसऱ्या वर्षी १५ ते २० किलो शेंगा मिळतात व पुढे जसजसे झाडाचे वय वाढत जाते तसतसे उत्पन्नात वाढ होते. जेथे जमीन हलकी आहे व पाणी फेब्रुवारी- मार्चपर्यंतच आहे, अशा ठिकाणी वर्षभरात ३ ते ४ टन शेंगांचे उत्पन्न मिळते व खर्च वजा जाता ३० ते ५० हजार रुपये फायदा होतो.

जेथे जमीन मध्यम व भारी आहे व वर्षभर पाण्याची सुविधा आहे. अशा ठिकाणी वर्षभरात ५ ते ८ टन शेंगांचे उत्पन्न मिळते व ६० ते ८० हजार रुपयांचा फायदा होतो. शेवगा शेतीचे चांगले व्यवस्थापन करून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी बागायत शेतीतून ७० हजार ते १ लाख २५ हजारापर्यंत उत्पन्न मिळवले आहे. शेवगा शेंगांना स्थानिक बाजारपेठांपासूनपुणे व मुंबई बाजारात चांगले दर मिळतात.

Friday, January 29, 2016

कारले लागवड

कारले लागवड

* हवामान
जास्त थंडी झाल्यास बुरशीजन्य रोगांचे प्रादुर्भाव होवून नुकसान होते, उबदार वातावरण योग्य.

* जमीन
मध्यम भारी ,पोयट्याची ते रेताड चालते.  ६.५ ते ७.५ पीएच योग्य.

* लागणपूर्व मशागत
- चांगल्या वाढीसाठी १५ टन शेणखत किंवा एरंड पेंड १५ किलो प्रती एकर जमीन तयार करताना द्या. खोल नांगरट व सपाट करा.१.५  ते २ मी. अंतराच्या ओळी तयार करा.
- ट्राइकोडर्मा विरडी २५० ग्रॅम प्रति १० किलो शेणखतासोबत पिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणाऱ्या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणाऱ्या मर रोगापासून पिकाचे रक्षण होवू शकते.
- दोन बाय दोन फुटाचे खड्डे किंवा रेज्ड  बेड करून हेच वरील अंतरावर लागवड करावी. मांडव उभारणी करणे आवश्यक आहे.

* लागण
वरीलप्रमाणे एका खड्यात एका ठिकाणी पाच बिया लावा, पंधरा दिवसांनी त्यातील दोन सशक्त रोपे ठेवावी.

* वाण
- फुले ग्रीन गोल्ड, हिरकणी,कोईमतूर लॉंग, अर्का हरित, पुसा मोसमी, पुसा विशेष इत्यादिचे बियाणे एकरी दोन किलो वापरावे.
- बियाणे प्रक्रिया साठी ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम किंवा कार्बनडेझिम १० ग्रॅम एका किलोस चोळावे. 

* खत व्यवस्थापन
चांगल्या उत्पादनासाठी व वाढीसाठी २० किलो नत्र (४३ किलो युरिया)+२० किलो फॉस्फरस (१२५ किलो एसएसपी) + २० किलो पोटॅशियम (३३ किलो एमओपी) प्रती एकर लागवडीच्यावेळी द्या.
त्यानंतर ३२ दिवसांनी २० किलो नत्र (४३ किलो युरिया किंवा ९७ किलो अमोनियम सल्फेट) प्रती एकर द्या.

* पाणी व्यवस्थापन 
तापमानानुसार दर ३ ते १० दिवसांनी पाणी पाळी द्यावी जेने करुण ५०%आर्द्रता राहील.

* पीक काळजी, कीड व रोग नियंत्रण -
* फुलगळ
फुलगळ रोखण्यासाठी, उत्पादनात १०% वाढ होण्यासाठी व चांगला आर्थिक परतावा मिळण्यासाठी पिक फुलोरा अवस्थेत असताना हुमिक एसिड ३ मिली + १२:६१:०० ५ ग्रॅम प्रति लीटर पाण्यातून फवारा.

*फुले,फळे येण्याच्या व पक्व होण्याच्या काळात,सॅलिसीलिक ऍसिड ३५० मी.ग्रॅ. च्या,४-५ गोळ्या १५ लीटर पाण्यातून १-२ वेळा फवारा. तसेच चांगली फुलधारणा मिळण्यासाठी ०:५२:३४ची १५० ग्रॅम प्रति १० पाण्यातून फुलोरा अवस्थेत व फळे तयार होताना फवारा .
* गुणवत्ता मिळण्यासाठी १३:०:४५ हे १० ग्रॅम +हाइ बोरॉन १ मिली प्रती लीटर पाण्यातून फळ धारणा अवस्थेत फवारा.

* नाग अळी
नियंत्रणासाठी अबामेक्टिन ४ मिली १० लीटर पाण्यातून किंवा डाइफेनथियौरॉन २० ग्रॅम किंवा स्पीरोमेसिफेन  १८ मिली  किंवा अ‍ॅसिफेट +इमीडाक्लोप्रिड  ५० ग्रॅम किंवा फ्लोनीकॅमिड ६ मिली प्रति १५ लीटर पाण्यातून फवारा.

* अंकुर आणि मुळे खाणारी अळी
पिकाचे मातीपासून मुळाचे व खोडाचे नुकसान करते प्रतिबंध करण्यासाठी कार्बोफ्युरान ३जी १२ किलो प्रती एकर सरीत टाका. उभ्या पिकातील नियंत्रणासाठी फिप्रॉनिल ५%एस सी ५०० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० ई सी ड्रेंचिंग करा किंवा फिप्रोनील + इमीडाक्लोप्रिड ८० डब्ल्यू जी १५० मिली प्रति २५० लीटर पाण्यातून प्रती एकर भिजवणी करा.

* फळ माशी
नियंत्रणासाठी इंडोक्साकार्ब १४.५ एस सी ५ मिली + स्प्रेडिंग एजेंट ६मिली  १० लीटर पाण्यातून फवारा किंवा फिप्रोनिल ५ एस सी ३० मिली प्रति १५ लीटर पानी किंवा लॅंब्डा सायहॅलोथ्रिन ५ मिली प्रति १० लीटर पानी ची फवारणी करा.

* पांढरी माशी
ही माशी पिकात मोझाईक व्हायरस पसरवते. नियंत्रणासाठी डाइफेनथियौरॉन ५० डब्ल्यू पी २०ग्रॅम किंवा स्पीरोमेसिफेन १८ मिली किंवा अ‍ॅसिफेट ५०%+इमीडाक्लोप्रिड ५० ग्रॅम किंवा फ्लोनीकॅमिड ६ मिली प्रति १५ लीटर पाण्यातून फवारा.

* डाऊनी/केवडा
नियंत्रणासाठी बिटरटेनोल २५ डब्ल्यू पी ३० ग्रॅम प्रति १५ लीटर पानी किंवा क्लोरोथॅलोनील ७५ डब्ल्यू पी ३० ग्रॅम प्रति १५ लीटर पानी किंवा टेब्युकोनॅझोल २५ मिली प्रती १५ लीटर पानी किंवा कार्बनडॅझिम १२%+ मॅनकोझेब  ३० ग्रॅम प्रति १५ लीटर पाण्यातून फवारा.

* भूरी
या रोगामध्ये पानांवर पांढरी पावडर दिसून येते. प्रतिबंध करण्यासाठी गंधक पावडर १० किलो प्रति एकर सकाळी पानांवर दव असताना द्या.प्रभावी नियंत्रणासाठी क्लोरोथॅलोनील ७५ डब्ल्यू पी ३० ग्रॅम प्रति १५ लीटर पानी किंवा टेब्युकोनॅझोल १ मिली प्रति लीटर पानी किंवा कार्बनडॅझिम+ मॅनकोझेब २ ग्रॅम प्रति लीटर पाण्यातून फवारा.

* पाना फळांवरील ठिपके रोगात
सुरवातीच्या काळात पानांवर पाण्याने भरलेले डाग दिसून येतात.या ठिपक्यांमध्ये मध्यभागी पांढरा आणि काठावरुन राखाडी रंग दिसून येतो.प्रभावी नियंत्रणासाठी भूरी प्रमाणे नियंत्रण करा.

* तण नियंत्रण
पेंडीमेथलीन १.२५ लीटर प्रती २०० लीटर पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर ४८ तासांच्या आत जमीन ओलसर असताना ऐका एकरात फवारा. तसेच बियाणांची उगवण झाल्यावर १० ते १५ दिवसांनी एक व फुले येण्यापूर्वी १-२ वेळा अंतर मशागत करणे गरजेचे आहे.
* काढणी
२ ते २.५ महिन्यानी सुरु करता येईल, आठ ते दहा तोडे करुण १८० दिवसात उत्पादन एकरी १० टना पर्यंत उत्पन्न मिळवता येईल.

Thursday, January 28, 2016

गहू

हवामान गहू पिकास रात्री थंड आणि दिवसा कोरडे हवामान मानवते. थंडीचे कमीत कमी 100 दिवस मिळणे गरजेचे आहे.

* जमीन
गहू पिकासाठी भारी खोल काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पूर्व मशागतपेरणीपूर्वी जमिनीची 15 ते 20 सें.मी पर्यंत खोल नांगरणी करावी. त्यानंतर कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुषीत करावी. ह्याच वेळी शेतात प्रती हेक्टरी 25 ते 30 गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकुन कुळवाची पाळी द्यावी. 

* लागवड
पेरणीची योग्य वेळ
- कोरडवाहू गहू पेरणी ऑक्टोंबर महिन्याच्या दुस-या पंधरवडा
- बागायती गहू पेरणी नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा ते 15 डिसेंबर पर्यंत

बागायती वेळेवर पेरणीकरीता शिफारशीतवाण
बागायती उशिरा पेरणीकरीता शिफारशीतवाण
1) AKAW 3722 (विमल)
2) AKW 1071 (पूर्णा)
3) MACS 6222
4) MACS 2846
5) NIAW 301 (त्र्यंबक)
6) HD 2189
7) NIAWnWWQ 917 (तपोवन) 
1) AKW 381
2) AKAW 4627 (नविन वाण)
3) HD-2501
4) NIAW 34
5) HI 977


* पेरणी
- कोरडवाहू आणि बागायत - दोन ओळीतील अंतर 23 सें.मी ठेवावे.
- उशिरा बागायत - दोन ओळीतील अंतर १६ सें.मी ठेवावे.
- पेरणी करतांना बियाणे हे जमीनीत 5 ते 6 सें.मी पेक्षा जास्त खोलवर पाडू नये.
- कोरडवाहू पेरणी - प्रती एकरी ३० किलो बियाणे
- बागायती वेळेवर पेरणी - प्रती एकरी ४० ते ५० किलो बियाणे
(HD 2189 किंवा AKW 1071 या वाणाचे बियाणे ठसठसीत किंवा जाडसर असल्यामुळे अषा वाणाकरीता प्रती एकरी 60 किलो बियाणे वापरावे.)
- प्रती हेक्टरी रोपांची संख्या 22.5 ते 25 लाख ठेवा.

* बीज प्रक्रिया
- पेरणीपूर्वी थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे.
- त्यानंतर अॅझोटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धन 250 ग्रॅम प्रती 10 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळून लावावे. जिवाणू संवर्धन लावून पेरणी केल्यास उत्पन्नात निष्चितच वाढ होते.
- अॅझोटोबॅक्टर बीज प्रक्रिया केल्यानंतर लावावे व बियाण्यास घट्ट चिटकले पाहिजे याची काळजी घ्यावी.
- त्यासाठी अॅझोटोबॅक्टर पेरणीपूर्वी 2 तास अगोदर लावून बियाणे सावलीत वाळवावे.

* पाणी व्यवस्थापन
- एका ओलीताची सोय असल्यास- 42 दिवसांनी
- दोन ओलीताची सोय असल्यास- 21 व 65 दिवसांनी
- तीन ओलीताची सोय असल्यास - 21, 42 व 65 दिवसांनी

* खत व्यवस्थापन
माती परीक्षणावरून पिकासाठी रासायनिक खताच्या मात्रा ठरविणे.
म्हणून पेरणीपूर्वी माती परिक्षण करणे गरजेचे आहे. गहू पिकास रासायनिक खताचा
- पहिली मात्रा पेरणीच्या वेळी दोन चाड्याची तिफण वापरून बियाण्यासोबतच द्यावी.
- बागायती वेळेवर पेरणीसाठी 100 ते 120 किलो नत्र 50 ते 60 किलो स्फुरद आणि 50 ते 60 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे.
- बागायती उशिरा पेरणीसाठी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे.
- बागायती वेळेवर आणि उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास नत्र खताची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशची पूर्ण मात्रा पेरणी सोबतच द्यावी.
- नत्राची उर्वरीत अर्धी मात्रा पेरणीनंतर 21 दिवसांनी ओलीत करतांना द्यावी.
- कोरडवाहू गहू पेरणी करतांना नत्र व स्फुरदाची पुर्ण मात्रा म्हणजेच 40 किलो नत्र व 20 किलो स्फुरद प्रती हेक्टरी पेरणी सोबतच द्यावी.

* कीड व रोग नियंत्रण
- मावा किडीची आर्थिक नुकसान पातळी म्हणजे साधारणपणे दहा मावा कीड (पिले/प्रौढ) प्रति झाड किंवा फुटवा दिसल्यानंतर उपाययोजना त्वरित हाती घ्याव्यात.
- शेतामध्ये पिवळे चिकट कार्ड(स्टिकी ट्रॅप)चा वापर करावा, की ज्यामुळे शेतात पंख असलेली मावा कीड या कार्डला चिकटलेली दिसून येतात.
- जैविक पद्धतीने नियंत्रण करताना व्हर्टीसिलिअम लेकॅनी किंवा मेटारायझियम ऍनिसोप्ली ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा (गरजेनुसार) फवारणी करावी.
- रासायनिक पद्धतीने कीड नियंत्रणासाठी थायामिथोक्‍झाम (२५%) १ ग्रॅम किंवा ऍसिटामिप्रीड (५ ग्रॅम) प्रति १० लिटर पाण्यातून एक फवारणी करावी.

Friday, January 22, 2016

बाजरी

बाजरी 
लागवड
मॉन्सून पावसानंतर जमिनीत पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी. पेरणीसाठी शिफारस केलेल्या सुधारित व संकरित वाणांचाच वापर करावा. 

संकरित वाण - 
श्रद्धा (आर.एच.आर.बी.एच. 8609), सबुरी (आर.एच.आर.बी.एच. 8924) शांती (आर.एच.आर.बी.एच. - 9808) ओलिताची सोय असेल अशा ठिकाणी शक्‍यतो संकरित वाण पेरावेत.

पेरणी व बीजप्रक्रिया -
पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करून 45 x 15 सें.मी. अंतराने पेरणी करावी. बाजरीचे वाणानुसार हेक्‍टरी तीन ते चार किलो बियाणे वापरा. बाजरी अधिक तूर 2:1, 2:2 या प्रमाणात आंतरपीक घ्यावी. कोरडवाहू बाजरीसाठी सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी.अरगट रोग नियंत्रणासाठी 20 टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया करावी. गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी सहा ग्रॅम मेटॅलॅक्‍झील 35 एसडी (बीजप्रक्रियेसाठीचे) प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यानंतर प्रति 10 किलो बियाण्यावर 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धक व 250 ग्रॅम स्फुरद जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.

खत व्यवस्थापन -
शिफारशीप्रमाणे वरखते वेळेवर द्यावीत. हलक्‍या जमिनीसाठी 40 किलो नत्र, 20किलो स्फुरद, 50 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे. मध्यम जमिनीसाठी 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद, 25 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे.

आंतरमशागत -
पेरणीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी गरजेनुसार विरळणी करावी किंवा नांग्या भरून दोन रोपांतील अंतर 12-15 सें.मी. ठेवावे. जमिनीत चांगली ओल असल्यास विरळणी केलेली रोपे नांग्या भरण्यास वापरता येतात. तीस ते चाळीस दिवसांपर्यंत पीक तणविरहित राहण्यासाठी खुरपणी किंवा डवरणी करावी. एक महिन्यानंतर पिकास नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. कोरडवाहू पिकास युरिया देताना जमिनीत चांगली ओल असणे गरजेचे आहे. 

हंगाम ----माध्यान्ह---- उपाययोजना -
चांगल्या उगवणीनंतर मधल्या काळात पावसाचा खंड पडला तर मृद्‌बाष्पाची गरज भागविण्यासाठी डवरणी करून जमिनीचा वरचा पापुद्रा मोकळा करावा. यालाच डस्ट मल्चिंग म्हणतात. पिकातील काढलेले तण दोन ओळींत पसरून ठेवावे. डवरणी करताना डवऱ्याला खाली दोरी बांधल्यास पिकाला मातीची भर बसेल व पडणाऱ्या पावसाचे पाणी तयार झालेल्या सरीमध्ये व्यवस्थित मुरले जाऊन त्याचा उपयोग पिकाच्या पुढील वाढीच्या काळात होतो. 

पाणी व्यवस्थापन -
बाजरी पिकास फुटवे येण्याची वेळ, पीक पोटरी अवस्थेत असताना आणि कणसात दाणे भरताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. या अवस्थेत जमिनीत पुरेशी ओल नसल्यास पिकास संरक्षित ओलित म्हणून पावसाचा अंदाज बघून हलकेसे पाणी द्यावे. 

आंतरपीक -
अन्नद्रव्यासाठी व जागेसाठी स्पर्धा नसलेला कालावधी या तत्त्वानुसार बाजरी + तूर ही आंतरपीक पद्धती सर्व दृष्टीने फायदेशीर आहे. यासाठी बाजरी व तूर यांची आंतरपीक म्हणून पेरणी करताना याचे ओळीचे प्रमाण 2ः1 (बाजरी ः तूर) किंवा 4ः2 ठेवावे. या प्रमाणेच बाजरीत सोयाबीन, सूर्यफूल ही पिकेसुद्धा 4ः2 या प्रमाणात आंतरपीक म्हणून घेता येतात. 
हलक्‍या जमिनीत आणि कमी पाऊस असणाऱ्या प्रदेशात बाजरी + मटकी 2ः1 या प्रमाणात आंतरपीक अवलंब करावा. 

तणनाशकाचा वापर -
गरजेनुसार बाजरी पिकात तणनाशकांचा वापर करता येतो. यासाठी ऍट्राझीन किंवा सिमाझीन हे उगवणपूर्व (पेरणीनंतर परंतु बी उगवण्यापूर्वी) तणनाशक हेक्‍टरी 1.5 ते 2 किलो 600 ते 700 लिटर पाण्यासोबत फवारावे. फवारणी नंतर 15 ते 20 दिवस पिकात खुरपणी किंवा डवरणी करू नये. तसेच पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी 2,4-डी (फक्त सोडिअम साल्ट) हे उगवणपश्‍चात तणनाशक हेक्‍टरी 1250 ग्रॅम या प्रमाणात 600 लिटर पाण्यासोबत तणावर फवारावे. तणनाशक फवारणीपूर्वी तज्ज्ञाचा सल्ला अवश्‍य घ्यावा. 

बीट लागवड

जमीन 
बीटची लागवडीसाठी मध्यम आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. बीटच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू ६ ते ७.५ असावा परंतु सामु १० पर्यत असेल तरी उत्पन्नात फारसा फरक पडत नाही. कृष्णेच्या खारवट क्षारयुक्त जमिनीत बीट हा उत्तम पर्याय आहे. 

हवामान 
बीट वाढीसाठी १५ ते ३५ से. तापमान योग्य आहे. कमी तापमानात साखर उतरत नाही तर जास्त तापमानात कंदाचा आकार बिघडतो. महाराष्ट्रात खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात बीट पीक घेता येते. 

वाण 
डेट्राईट डार्क रेड
आकार - गोल आणि मुलायम 
रंग - गर्द लाल (रक्तासारखा) 
पाने - गर्द हिरव्या रंगाची व तपकिरी 
कालावधी - ८० ते १०० दिवस 

क्रीमसन ग्लोब
आकार - निमुळता गोल आणि चपटा 
रंग - मध्यम व फिकट लाल 
पाने - आकाराने मोठी आणि गर्द हिरव्या रंगाची व तपकिरी 
कालावधी - ८० ते १०० दिवस 

इतर वाण - क्रॉसब्रॉय इजिप्शीयन आणि अर्ली वन्डर 

लागवड 
एक हेक्टर लागवडीसाठी बीटरूटचे ७ ते १० किलो बियाणे लागते. बीटचे बी लागण करण्यापुर्वी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास उगवण चांगली होते. बियाणे पेरताना जमिनीत ओलावा असावा.  पाभरीने बीटची पेरणी ३० सेंटीमीटर अंतरावर करतात नंतर विरळणी करून एका ठीकाणी एकच रोप ठेवावे.  बी टोकून बीटची लागवड करण्यासाठी ४५ सेंटीमिटर अंतरावर सऱ्या कराव्यात आणि वरंब्यावर १५ - २० सेंटीमीटर अंतरावर बिया टोकून लागवड करावी. बीटची लागवड ३०-४५ बाय १५-२० सेंटीमीटर अंतरावर करावी.

विरळणी 
बीटच्या बियाण्याची पेरणी केल्यानंतर विरळणी करणे आवश्यक आहे. बिटच्या एका बीजामध्ये २ ते ६ बिया असतात आणि त्यातील प्रत्येक बी उगवू शकते. म्हणून बीटमध्ये विरळणी करणे अत्यंत आवश्यक आहे. विरळणी करतांना एका ठीकाणी फक्त एकच रोप ठेवावे. आणि बाकीची रोपे हातांनी काढून टाकावीत. 


खते व्यवस्थापन 
जमिनीच्या मशागतीची वेळी १५- २० गाड्या शेणखत जमिनीत चांगले मिसळून द्यावे. बीटच्या पिकाला ६०-७० किलो नत्र, १०० ते १२० किलो स्फुरद आणि ६०-७० किलो पलाश दर हेक्टरी द्यावे. नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद आणि पलाशची पुर्ण मात्रा बियांची पेरणी करताना द्यावी. नत्राची उरलेली अर्धी मात्रा पेरणीनंतर ४ ते ६ आठवड्यांनी द्यावी. हलक्या जमिनीत लागवड केल्यास नत्राची मात्रा वाढवावी.

पाणी व्यवस्थापन 
कंदाच्या चांगल्या वाढीसाठी पिकाला पाण्याचा भरपूर पुरवठा करावा. जमिनीत सतत ओलावा राहील याची काळजी घ्यावी. त्यामुळे उगवण चांगली होऊन पिकांची वाढ चांगली होते. पिकवाढीच्या काळात पाण्याची कमतरता पडू देऊ नये. रब्बी हंगामात पिकाला ८-१० दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.

काढणी आणि उत्पादन -
बीटच्या कंदाची वाढ ३ ते ५ सेंमी झाल्यावर काढणी करावी. काढणीनंतर कंदाची प्रतवारी करावी. कंद विक्रीला पाठविण्यापुर्वी त्यांची पाने काढून टाकावीत आणि कंद पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत. बीटचे उत्पादन हेक्टरी २५ टन इतके मिळते.

मेथी

मेथी लागवड.

वर्षभर चवीने खाल्ली जाणारी भाजी म्हणजे मेथी. याची मागणीपण वर्षभर असते आणि समशीतोष्ण हवामानात लागवडही वर्षभर करता येते.
* यासाठी जमीन मध्यम ते काळी, पाण्याचा निचरा होणारी असावी.  
* हि भाजी ४०ते ६० दिवसांनी काढता येते त्यामुळे  टप्प्या टप्प्याने वाफे लावल्यास वर्षभर उत्पन्न घेता येते.
* लागवड करण्यापूर्वी दोन वखर पाळ्या देवुन जमीन भुसभूषित करावी.
* त्यानंतर  ३ बाय २ मीटरचे सपाट वाफे करुण भाजीसाठी फेकून लागवड करता येते. 
* वाण: मेथी-१, राजस्थान मेथी-१. मेथी नं.४७, प्रभा,पुसा अर्ली बंचिंग, कसुरी इत्यादि सुधारित वाण निवडावेत.

* पाणी व्यवस्थापन करताना जमिनीच्या मगदुरा नुसार मध्यम जमिनीस दर ७-८ दिवसांनी एक पाणी पाळी द्यावी.
* यात मर हाच प्रमुख रोग आहे. बियाणे  संस्कार  करुण तो टाळता येतो. इतर विशेष रोग येत नाही. 
* किडी मधे नागअळी हा मोठा धोका आहे. यासाठी लागवडी नंतर ७ दिवसांनी १००० पी पी एम निंबोळी अर्काची ३ मिली प्रति लीटर प्रमाणे एक फवारनी घ्या.ु
* ४० ते ६० दिवसांनी उपटून जुड्या बांधाव्या व भाजीची माती तिथेच शेतात झटकुन घ्यावी. हिरवी भाजी उत्पादन एकरी ३ टन मिळू शकते.

मेथी बीजोत्पादन करण्यासाठी:
* मेथी बिया उत्पादनासाठी थंडी आवश्यक म्हणून लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर मधे करावी.
*  दोन रोपात १० सेमी.अंतर काही राज्यात रोप तयार करून सरी वरंबालागवड करतात
* बिया काढणीसाठी १५० दिवसांनी काढनी करुण खळ्यावर वाळवाव्या नंतर मळणी करावी याचे उत्पादन एकरी ५ ते ७ क्विंटल मिळते.

कलिंगड

जमीन : हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते. चुनखडीयुक्त खारवट, चोपण जमीन लागवडीस अयोग्य आहे. कारण अशा जमिनीत अतिप्रमाणात असणार्‍या सोडियम, क्लोराईड, कार्बोनेट व बायकार्बोनेटसारख्या विद्राव्य क्षारांमुळे कलिंगडाच्या फळावर डाग पडण्याची शक्यता असते. बारामती, फलटण भागातून येणार्‍या कलिंगडावरती अशा प्रकारचे डाग नेहमी मोठ्या प्रमाणात दिसतात. लागवडीसाठी हलकी, पोयट्याची, मध्यम - काळ्या ते करड्या रंगाची, पाण्याचा निचरा असणारी जमीन लागवडीस योग्य आहे.

हवामान : उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. अलीकडे कडक उन्हाळ्याचा आणि भर पावसाळ्याचा काळ सोडला तर वर्षभर कलिंगडाची लागवड केली जाते. वाढीच्या कालावधीमध्ये हवेमध्ये दमटपणा व धुके असल्यास वेलीची वाढ व्यवस्थित होत नाही. पीक रोगास बळी पडण्याची शक्यता असते.

जाती : शुगरबेबी, असाहीयामाटो, मधू, अर्कामाणिक, अर्काज्योती, मिलन, तुप्ती, मोहिनी, अमृत इ.
१) शुगरबेबी : फळांची साल गर्द हिरव्या रंगाची, कमी जाडीची असून हिरवट काळे रेखावृत्तासारखे पट्टे असतात. गोडी जास्त असते. गर भडक लाल रंगाचा रवाळ व गोड असतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड करतात.
२) असाहीयामाटो : फिकट हिरव्या रंगाची साल असून फळे मोठी असली तरी गोडी कमी असते व चवीस थोडेसे पांचट असते. त्यामुळे मागील वीस वर्षापासून ही जात पडद्याआड गेली.
३) मधु : या संकरित जातीची फळे लंबगोल आकाराची असून फळांची साल गर्द हिरवी असते. फळांचे वजन ६ ते ७ किलो भरते. गर भरपूर व लाल असतो. या दशकात या जातीची मागणी बर्‍यापैकी होती.
४) अर्कामाणिक : या जातीची फळे आकाराने मोठी, गोल असतात. फळाची साला गर्द हिरव्या रंगाची मध्यम जाड सालीची असते.
५) मिलन : लवकर तयार होणारी संकरित जात असून फळे लंबगोल आकाराची असतात. फळाचे वजन ६ ते ७ किलो भरते.
६) अमृत : महिको कंपनीची संकरित जात असून फळे मध्यम आकाराची किंचित लंबगोल असून ५ ते ७ किलो वजनाची असतात. फळांच्या सालीचा रंग गर्द हिरवा असतो. फळांमध्ये बी कमी असते.

संकरित कलिंगड :
१) सुपर ड्रॅगन : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळाचा आकार लांबट गोल असून फळाचे सरासरी वजन ८ -१० किलो, सालीचा रंग फिकट हिरवा व त्यावर गर्द हिरवे पट्टे असून गर लाल किरमिजी व रवाळ आहे. दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण.
२) ऑगस्टा : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी आहे. फळाचा आकार उभट गोल असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचे सरासरी वजन ६ -१० किलो आहे. फालचा गर आकर्षक लाल असून चवीला अतिशय गोड आहे. फळांमध्ये बियांचे प्रमाण कमी असून बियांचा आकार लहान आहे.दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण.
३) शुगर किंग : अतिशय जोमाने वाढणारी मजबूत वेल. फळ गोलाकार असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचा गर आकर्षक लाल असून चवीला गोड आहे. ही जात मर रोगास (फ्युजॅरियम) प्रतिकारक आहे. फळाचे सरासरी वजन ८-१० किलो आहे.
४) बादशाह : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळ लांबट गोल आकाराचे, गर्द हिरवे पट्टे असलेले फिक्कट हिरव्या सालीचे असून त्याचे सरासरी वजन ८ ते १० किलो असते. फळातील गर अतिशय लाल, कुरकुरीत, रवाळ असून, चवीला गोड आहे. दूरच्या बाजारपेठत पाठविण्यास योग्य आहे.

लागवडीचा हंगाम : लागवड शक्यतो जानेवारी महिन्यात करावी. म्हणजे उन्हाळ्याच्या तोंडावर याची फळे तयार होत असून त्यांना मागणी अधिक राहते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात. दक्षिण महाराष्ट्रामध्ये कलिंगडाची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात व ही फळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तयार होतात. उत्पादन कमी येते. परंतु भाव चांगला मिळतो.

पाणी : पाच ते सहा दिवसांचे अंतराने पाणी द्यावे. थंडीमध्ये दुपारी ११ ते ४ ह्या वेळेत व उन्हाळ्यामध्ये सकाळी ९ च्या आत पाणी द्यावे. पाण्याच्या पाळ्या अनियमित दिल्यास फळे तडकण्याचा किंवा त्यांचा आकार बदलण्याचा संभव असतो.

पीक संरक्षण : (कीड व रोग)

कीड : नागअळी, भुंगेरे, फळमाशी (फळे सडतात) इत्यादी किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो.
१) नागआळी (लीफ मायनर) : ही आळी वेलीचे पान पोखरते, त्यामुळे पानांवर नागमोडी, पिवळट, जाड रेषा दिसतात. या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पाने पिवळी पडून गळतात. त्यामुळे फळांचे पोषण होत नाही.
२) लाल भुंगेरे : हे किडे रंगाने लाल असून कलिंगडाची पाने व फुले कुरतडतात.
३) फळमाशी : या किडीची मादी फळाच्या सालीवर छिद्र पाडून फळात शिरते व तेथे अंडी घालते. त्यामुळे आतून पुर्ण फळ सडण्यास सुरुवात होते.

रोग :
१) करपा : वेलवर्गीय फळपीक असल्यामुळे पानांवर लव अधिक असून वेळ जमिनीवर पसरल्याने दमट हवामानामध्ये करपा रोगाचे प्रमाण वाढल्यास सर्व पाने गळून पडतात.
२) भुरी : पानांवर दोन्ही बाजूंनी पांढरी बुरशी वाढून पाने भुरकट होऊन गळतात.
३) मर : बुरशीजन्य रोग असून वेली संपूर्ण जळून जातात. 

फळे काढणीस तयार झाली, हे कसे ओळखावे ?

१) फळांचा आकार गोलसर व मधे फुगीर तयार होऊन देठ सुकल्यानंतर बोटांच्या मागच्या बाजूने पक्क फळावर वाजवल्यावर डबडब असा आवाज येतो.
२) फळांच्या देठावरील लव फळ पक्क होण्याच्या वेळी नाहीशी होते.
३) पूर्ण पक्क झालेल्या फळांचा जमिनीवर टेकलेला भाग पांढरट - पिवळसर रंगाचा दिसतो.
उत्पादन : साधारण एकरी २० ते ४५ टन उत्पादन मिळू शकते.

भोपळा

भोपळा लागवड
हवामान
हे उबदार हवामानातील फळभाजीचे पीक आहे. थंडीचा कडाका या पिकाला अपायकारक असतो. भरपूर आर्द्रता व सौम्य तापमान असलेल्या प्रदेशात हे पीक चांगले येते. मक्यासारख्या पिकात थोड्याफार सावलीतही ते वाढते. उन्हाळ्यातील कोरड्या हवामानापेक्षा पावसाळ्यातील आर्द्र हवामान या पिकाला जास्त मानवते. बी लावल्यापासून ११० ते १२० दिवसांत फळे तयार होतात.

जमीन : या पिकाला कोणतीही चांगल्या निचऱ्याची जमीन चालते. वेलाची मुळे जमिनीच्या वरच्या भागात वाढणारी व पसरणारी असतात. धुळे जिल्ह्यात नदीकाठच्या जमिनीत भोपळ्याची लागवड करतात.

प्रकार : काळा भोपळा भारतात सर्वत्र लागवडीत आहे. यात आकार, आकारमान आणि मगजाचा रंग या बाबतींत भिन्नता असलेले अनेक प्रकार आढळून येतात. मोठा लाल, मोठा हिरवा, मोठा गोल, पिवळा मगज व लाल मगज हे लागवडीतील सामान्य प्रकार आहेत. अर्का चंदन, आय. एच. आर ८३-१-१-१ आणि सी. ओ. १ हे सुधारित प्रकार उपलब्ध आहेत. अर्का चंदन या हळव्या प्रकाराची फळे मध्यम आकारमानाची (२.५ ते ३.५ किग्रॅ. वजनाची) व गोल आकाराची असून वरच्या व खालच्या टोकाला काहीशी चपटी असतात. मगज घट्ट असून फळाच्या सालीचा रंग फिकट हिरवा असतो. बी लावल्यापासून १२५ दिवसांत फळे तयार होतात. दर वेलाला ४-५ फळे धरतात. वाहतुकीत फळे चांगली टिकतात. फळांत कॅरोटिनाचे प्रमाण पुष्कळ असते. आय. एच. आर ८३-१-१-१ प्रकाराची फळे मध्यम आकारमानाची (२ ते ३ किग्रॅ. वजनाची) व गोल असून वरच्या व खालच्या बाजूला जास्त चपटी असतात. सालीचा रंग फिकट तपकिरी ते पिवळा असून खोवणी उथळ असतात. सी. ओ. १ ची फळे गोलाकार व ७ ते ८ किग्रॅ. वजनाची असून बी लावल्यापासून १७५ दिवसांत फळे तयार होतात.

लागवड
उन्हाळी पिकासाठी बी लावणी जानेवारी ते मार्च व पावसाळी पिकासाठी जून-जुलै महिन्यांत करतात. नांगरून चांगल्या भुसभुशीत केलेल्या जमिनीत ८० सेंमी. व्यासाची गोल आळी खणून व त्यात भरपूर शेणखत घालून प्रत्येक आळ्यात ३-४ बिया २.५ ते ५ सेमी. खोलीवर लावतात. उहाळी पिकासाठी दोन ओळींत १.५ मी. व दोन वेलांत ७६ सेंमी. व पावसाळी पिकासाठी अनुक्रमे १.५ मी. व. ०.९ ते १.२ मी. अंतर ठेवतात.

पाणी
पावसाळी पिकास पाणी देण्याची गरज नसते. उन्हाळी पिकास गरजेप्रमाणे ४-५ अथवा ८-१० दिवसांनी पाणी देतात
वरखत
हेक्टरी ८० किग्रॅ, नायट्रोजन (दोन हप्त्यांत), ५० किग्रॅ. फॉस्फरस व तितकेच पोटॅश देतात. नायट्रोजनाचा निम्मा भाग, सर्व फॉस्फरस व पोटॅश जमिनीच्या मशागतीच्या वेळी व राहिलेला नायट्रोजन पीक फुलावर येण्याच्या सुमारास देतात.

रोग व किडी
या पिकावरील भुरी, तंतुभुरी, मर व व्हायरसजन्य रोग महत्त्वाचे आहेत. भुरीसाठी गंधकाचा व तंतुभुरीसाठी ताम्रयुक्त कवकनाशकांचा (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचा नाश करणाऱ्या द्रव्याचा) वापर करतात. मर रोग आणि व्हायरसजन्य रोगांसाठी रोगप्रतिकारक प्रकारांची लागवड करणे हाच खात्रीलायक उपाय आहे. या पिकावर भुंगेरे व फळमाशी या विशेष उपद्रवी कडी आहेत. भुंगेऱ्यांसाठी १% लिंडेनाची भुकटी पिस्कारतात. फळमाशीमुळे किडलेली फळे काढून जाळतात अगर जमिनीत पुरतात. वेलांवर मॅलॅथिऑन फवारतात.

फळांची काढणी व उत्पादन
बी लावल्यापासून ३ ते ४ महिन्यांनी भोपळे तयार होण्यास सुरुवात होते व त्यानंतर दोन महिन्यांपर्यंत फळे मिळत राहतात. फळे तोडताना देठाचा काही भाग ठेवून तोडतात. वेलावरच पिकलेली फळे पुष्कळ दिवस टिकतात. फळे काढल्यावर ती काही दिवस साठवून मग विक्रीला पाठवितात. हे फळ ४-६ महिन्यांपर्यंत टिकते.
पावसाळी पिकाचे हेक्टरी उत्पादन १३,७०० ते १८,८०० किग्रॅ. व उन्हाळी पिकाचे ६,५०० ते ७,५०० किग्रॅ. असते.


संदर्भ : 1. Chauhan, D. V. S. Vegetable Production in India, Agra, 1972.
2. Choudhury, B. Vegetables, New Delhi, 1967.
3. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, Delhi, 1950.
क्षीरसागर, ब. ग.; परांडेकर, शं. आ.; गोखले, वा. पु.
स्त्रोत: मराठी विश्वकोश, दौलतगिरी गोसावी