Thursday, November 19, 2015

कांदा लागवड

जमीन 
मध्यम ते साधारण कसदार व पाण्याचा निचरा होणारी जमीन कांद्याला चांगली मानवते. मध्यम प्रतीच्या रेतीमिश्रित जमिनीत कांदा चांगला पोसतो. मुळाभोवती भरपूर ओलावा राखून कांद्याच्या संपूर्ण वाढीला वाव देणारी भुसभुशीत जमीन कांद्यासाठी उपयोगी असते. जमिनीचा पी.एच. (सामू) 6.5 ते 7.5 असल्यास कांदा चांगला वाढतो. भारी चिकण मातीच्या जमिनीत कांद्याची वाढ होत नाही.


लागवडीची वेळ 
रोपवाटिका तयार करणे 
बियाण्याची उगवणशक्ती चांगली असल्यास हेक्‍टरी आठ किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाण्याला शिफारशीत ताम्रयुक्त बुरशीनाशक दोन ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे चोळून घ्यावे. रोपवाटिकेत तणांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी रोपवाटिकेची जागा नांगरून, भिजवून, पॉलिथिन कागदाने 10-12 दिवस झाकून निर्जंतुक करून घ्यावी. दर 100 चौ.मी.ला 25 ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हीरीडी बुरशीचे मिश्रण 1250 ग्रॅम कुजलेल्या शेणखतात मिसळून रोपवाटिकेच्या जागेत मिसळावे. जमीन चांगली भुसभुशीत करून त्यात शेणखत व नत्रयुक्त खत चांगल्याप्रकारे मिसळावे. एक हेक्‍टर लागवडीसाठी अंदाजे 10 आर क्षेत्रावर रोपवाटिका करावी. बियाणे पेरणीपूर्वी रोपवाटिकेत पाच गाड्या कुजलेले शेणखत, अडीच किलो नत्र आणि पाच किलो स्फुरद द्यावे. पेरणीसाठी 3 मी. x 1 मी. आकाराचे गादी वाफे करावेत. पेरणी करताना ओळीमध्ये पाच सें.मी. अंतर ठेवून दोन सें.मी. खोलीवर करावी. बियाणे फार दाट पेरू नये म्हणजे रोपांची वाढ सारखी होऊन रोपवाटिकेची देखभाल सुलभतेने करता येते. रोपवाटिकेमध्ये मर आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याकडे लक्ष द्यावे. तीन आठवड्यांनी 2.5 किलो नत्र द्यावे. पुनर्लागवडीच्या आधी आठ दिवस हळूहळू पाणी तोडावे म्हणजे रोप काटक बनते, पुनर्लागवडीत टिकाव धरते. रोपे उपटताना मुळे तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. रोप उपटण्यापूर्वी 24 तास आधी वाफ्यांना चांगले पाणी द्यावे.


लागवडीचे तंत्र - 
नांगरणी व कुळवणी करून जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी. शेत तयार करताना चांगले कुजलेले शेणखत हेक्‍टरी 20 टन याप्रमाणे शेतात मिसळावे. कांद्याची लागवड सपाट वाफ्यात किंवा सरी-वरंब्यावर करता येते.

साधारणतः दोन मीटर रुंद व तीन मीटर लांब आकाराचे वाफे सोईस्कर असतात. 
पुनर्लागवडीसाठी रोपवाटिकेतून जोमदार, सारख्या वाढीची निरोगी रोपे निवडून घ्यावीत. रोप लागवडीपूर्वी त्याची मुळे पाच मिनिटे ऍझोटोबॅक्‍टरच्या द्रावणात (पाच लिटर पाणी + 250 ग्रॅम जिवाणू खत) बुडवावीत, त्याचा रोपवाढीवर आणि कांद्याच्या उत्पादनावर चांगला परिणाम दिसून येतो. रब्बी व उन्हाळी हंगामासाठी 12 x 7.5 सें.मी. अंतरावर दोन ते तीन सें.मी. खोलीवर ओळीत प्रत्येक ठिकाणी एक रोप लावावे. पुनर्लागवडीनंतर त्वरित हलके पाणी द्यावे. सरी पद्धतीने लागवड करताना दोन सऱ्यांमधील अंतर 30 ते 45 सें.मी. ठेवून सरीच्या दोन्ही बाजूंस लागवड करावी. वाफ्यांमध्ये पाणी साचून राहिल्यास कांद्याच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. लागवडीपूर्वी रोपांची मुळे कार्बेन्डाझिमच्या द्रावणात बुडवावीत. हे द्रावण तयार करण्यासाठी एक ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळावे.


खत व्यवस्थापन 
माती परीक्षणानुसार कांदा पिकाला रासायनिक खते द्यावीत. कांद्याचे पीक सेंद्रिय खते व नत्रयुक्त खते यांना चांगला प्रतिसाद देते. जमिनीच्या पूर्वमशागतीच्या वेळी हेक्‍टरी 20 टन शेणखत, कंपोस्ट द्यावे; तसेच हेक्‍टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश या प्रमाणात रासायनिक खते द्यावीत. संपूर्ण स्फुरद व पालाश आणि निम्मे नत्र लावणीच्या वेळी आणि राहिलेले नत्र दोन समान हप्त्यांत द्यावे. पहिला हप्ता लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यांच्या आत द्यावा. खतमात्रा उशिरा (पातीच्या वाढीच्या काळात) दिल्यास पातीची जोमदार वाढ होऊन कांदे नीट पोसत नाहीत, जाड मानेचे होतात, तसेच त्यात जोडकांद्याचे प्रमाण अधिक वाढते. हे कांदे साठवणुकीसाठी निरुपयोगी असतात.


सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर - 
1) पिकाच्या निरोगी वाढीसाठी तांबे, झिंक, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये लागतात, त्यामुळे कांद्याची प्रत सुधारते आणि असे कांदे साठवणीत चांगल्या स्थितीत टिकून राहतात. माती परीक्षणानुसार हेक्‍टरी 125 ते 155 किलो कॉपर सल्फेट लागवडीच्यावेळी मिसळल्यास कांदे घट्ट होतात, त्यांचा रंग आकर्षक व चमकदार दिसतो. उत्पादनवाढीस मदत होते. 
2) बोरॉनच्या कमतरतेमुळे रोपांची वाढ खुंटते व पातीचा रंग करडा- निळसर पडतो, कांद्याची पात कडक आणि ठिसूळ बनते. शिफारशीनुसार बोरॅक्‍सची फवारणी करावी. 
3) झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता पडल्यास पाने जाड होणे, खालच्या अंगाने वाकणे ही लक्षणे दिसतात. दोन मि.लि. झिंक सल्फेट प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास यावर नियंत्रण मिळते. सेंद्रिय खतांचा (शेणखत, लेंडीखत) चांगला पुरवठा असल्यास सर्वसाधारण जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासत नाही.


पीक व्यवस्थापन -
कांद्याच्या पिकाला नियमित पाणीपुरवठा महत्त्वाचा असतो. कांद्याची मुळे जमिनीच्या वरच्या थरात म्हणजे बहुतेक आठ सें.मी. खोलीपर्यंत पसरलेली असतात. यामुळे पिकाला पाणी देताना 15 सें.मी.पेक्षा जास्त खोलवर जाईल असे पाणी देण्याची गरज नाही. कांदा पोसायला लागल्यावर पाण्याचा ताण देऊ नये, कारण या काळात पाण्याचा खंड पडल्यास पाणी पुन्हा सुरू केल्यावर वाढीला लागलेल्या कांद्यात जोडकांद्याचे प्रमाण वाढते. तसेच, कांद्याच्या वरच्या पापुद्य्राला तडा जातो. लागवडीनंतर कांद्याला लगेच पाणी द्यावे. त्यानंतर 12 ते 15 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. नंतर जमिनीचा मगदूर आणि हवामान लक्षात घेऊन 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे. कांद्याला तुषार सिंचन व ठिबक सिंचन पद्धतीनेही पाणी देता येते. 
लागवडीनंतर खुरपणी व निंदणी करून तण काढून टाकावे. पहिली खुरपणी एक ते दीड महिन्याने आणि दुसरी त्यानंतर एक महिन्याने करावी. खुरपणीच्या वेळी वरखताचा हप्ता द्यावा आणि लगेच पाणी द्यावे.


कांदावरील महत्वाचे रोग व त्यांचे नियंत्रण
तपकिरी करपा-
◆ हा बुरशीजन्य रोग असून, प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांवर पिवळसर, तपकिरी रंगाचे लांबट चट्टे बाहेरच्या बाजूला दिसतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकतात.
◆ फुलांचे दांडे मऊ होऊन वाळून    मोडतात.
नियंत्रण-
◆ दर १० ते १५ दिवसांच्या अंतराने ०.२% कार्बेण्डझिमची फवारणी करावी किंवा ३ ग्रॅम मॅकॉझेब प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्रावणात सर्फेक्टटचा वापर करावा.

जांभळा करपा-
◆ हा बुरशीजन्य रोग पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत येतो. पानावर सुरुवातीस खोलगट, लांबट पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांचा मधला भाग सुरुवातीस जांभळट व नंतर काळपट होतो.
◆ चट्टे पान किंवा फुलांच्या दांड्यावर दिसतात. चट्टे वाढून एकमेकात मिसळून पाने करपून वळतात.
नियंत्रण-
◆ ३० ग्रॅम मॅकोझेब किंवा २० ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा २० ग्रॅम क्लोरोथलोनील प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी. द्रावणात सर्फेक्टटचा वापर करावा.