Monday, November 23, 2015

ट्रॅक्टर व्यवस्थित तर शेती व्यवस्थित आणि शेती व्यवस्थित तर शेतकरी व्यवस्थित....

माझीशेती : ट्रॅक्टर काळजी (151123)
(पुढील शृंखला -  मिरची)

ट्रॅक्टर व्यवस्थित तर शेती व्यवस्थित आणि शेती व्यवस्थित तर शेतकरी व्यवस्थित....

प्रा. डी. डी. टेकाळे
स्रोत - ऍग्रोवन

** दैनंदिन वापरातील ट्रॅक्‍टरची निगा घेण्यात होणाऱ्या चुका -
- इंजिन ऑइल, रेडिएटरमधील पाणी, इंजिनाच्या टाकीतील तेल आणि एअर क्‍लिनरमधील तेल यांची पूर्तता न करणे.
- ट्रॅक्‍टरला ग्रीस करताना एखादी जागा हुकने.
- बॅटरीतील पाण्याची लेव्हल न करणे.
- सर्व नट-बोल्ट टाईट न करणे.
- दररोज ट्रॅक्‍टर सुरू करण्याआधी लिकेज तपासणी न करणे.
- टायरमध्ये हवेचा दाब कमी असणे.

** ट्रॅक्‍टर वापरात नसताना निगा घेण्यात होणाऱ्या चुका -
- निगा राखण्यासाठी नेहमीची वंगणाची पूर्तता करून न ठेवणे.
- टायरमध्ये हवा भरून न ठेवणे अगर जॅक किंवा ठोकळे न लावणे.
- रेडिएटरमधील पाणी काढून न ठेवणे.
- बॅटरी ट्रॅक्‍टरला जोडून ठेवणे.

** ट्रॅक्‍टरचा अपघात होण्याची कारणे -
- बेजबाबदारपणे ट्रॅक्‍टरचा वापर केल्यास होणाऱ्या सामान्य चुका अपघातास कारणीभूत ठरतात.
- ड्रायव्हर शिवाय इंजिन चालू करणे.
- ट्रॅक्‍टर सुरू असताना त्यावर चढण्याचा अगर उतरण्याचा प्रयत्न करणे.
- ट्रॅक्‍टरजवळ धूम्रपान करणे.
- मशाल किंवा मेणबत्ती जवळ नेऊन बॅटरीतील पाण्याची पातळी पाहणे.
- ट्रॅक्‍टरचे इंजिन चालू असताना ट्रॅक्‍टरखाली काम करणे.
- इंजिन फारच गरम असताना रेडिएटरचे झाकण उघडणे.
- ट्रॅक्‍टर शेडच्या किंवा गॅरेजच्या बाहेर काढत असताना ट्रॅक्‍टर व ट्रॉलीच्या जवळपास लहान मुले किंवा इतर कोणी नाही याची खात्री न करणे किंवा हॉर्न न देणे.

** अवजारे जोडताना आणि वापरताना होणाऱ्या चुका -
- ट्रॅक्‍टरच्या मागे जोडली जाणारी अवजारे ट्रॅक्टरच्या क्षमतेनुसार योग्य जोडावीत.
- ट्रॅक्‍टरमागचे अवजार उचलून वाहून नेताना त्यावर वजनाला जड वस्तू ठेवून वाहून नेऊ नये त्यामुळे ट्रॅक्‍टरच्या हायड्रॉलिक यंत्रणेवर ताण पडतो व ती निकामी होण्याचा संभव असतो.
- ट्रॅक्‍टरची शेतात वापरली जाणारी औजारे वळण आल्यावर उचलावे ते न उचलता वळण घेऊ नये.
- काही वजनी अवजाराकडून काम करायचे असल्यास पुढच्या चाकावर आवश्‍यक तेवढीच वजने लावावीत.
- मळणी यंत्र, चाफकटर, पंप यासारखी यंत्रे चालवताना ट्रॅक्‍टर समपातळीत उभा करावा. ट्रॅक्‍टरचे दोन्ही ब्रेक लावलेले असावेत.

** ट्रॅक्‍टर चालविताना होणाऱ्या संभाव्य चुका -
- ट्रॅक्‍टरची साधारण माहिती असणे, तो मागे-पुढे चालविणे आणि गिअर बदलता येणे म्हणजे ट्रॅक्‍टर चालविता येतोच असे नाही. हे तज्ञाचे काम आहे.
- कामाचा प्रकार पाहून ट्रॅक्‍टरच्या गिअरचा वापर करावा. तिसऱ्या गिअरमध्ये ट्रॅक्‍टर चालविल्यास ट्रॅक्‍टरचे नुकसान होते. जड कामासाठी किंवा ज्या कामासाठी जास्त शक्तीची आवश्‍यकता असते तेथे ट्रॅक्‍टर कमी वेगात चालवावा.
- रस्त्याच्या चढणीवर किंवा उतरणीवर नेहमी (low) लो गिअर निवडावा. तसे न केल्यास अनुक्रमे ट्रॅक्‍टर शक्ती मर्यादेवर व ट्रॅक्‍टरच्या भागांवर अनिश्‍चित ताण पडतो.
- खाचखळग्यांच्या रस्त्यावर वेगात ट्रॅक्‍टर चालवू नये. अशा वेळी ट्रॅक्‍टर कमी वेगात चालविल्यास यंत्रास कमी धक्के बसतात. ट्रॅक्‍टरचे पार्ट ढिले होत नाहीत. चालकास जास्त त्रास होत नाही.
- मागचे एखादे चाक जागेवरच फिरते त्या वेळी डिफरन्शल लॉकचा वापर केला जातो. पण ही अडचण दूर झाल्यावर त्याचा आपणास उपयोग नसतो. पण बऱ्याच वेळा डिफरन्शल लॉकचे लिव्हर सरकवण्याचे विसरून आपण ट्रॅक्‍टरला वळविण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी ट्रॅक्‍टरमधील गियरचे नुकसान होते.

** अज्ञानामुळे होणाऱ्या चुका -
1) ट्रॅक्‍टरच्या फॅन बेल्टचा ताण, बॅटरीचे कनेक्‍शन, इंजिन ऑइल बदलणे, फिल्टर स्वच्छ करणे, फिल्टर बदलणे, सायलेन्सर साफ करणे वगैरे विषयीचे बेसिक ज्ञान असावे लागते.
2) नोझलच्या दाबाची व इंजेक्‍टरची तपासणी व्हॉल्व्ह स्प्रिंग आणि टायपेटचे अंतर पाहणे, मागील चाकातील बेअरिंग स्वच्छ करणे, मेन बेअरिंग व कनेक्‍टिंग रॉड बेअरिंग बदलणे ही कामे तज्ञ मेकॅनिककडून करून घ्यावीत.
3) ट्रॅक्‍टरव्दारे व्यवस्थीत काम होण्यासाठी वेळच्यावेळी ट्रॅक्‍टर मेकॅनिककडून तपासून घ्यावा.

(जास्तीत जास्त शेतकरी या चळवळीत सामावून घ्या. त्यांच्या मोबाईल वरुन खालील प्रमाणे whats app मेसेज करायला सांगा)

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
चळवळ - नाविन्यपुर्ण शेतीची
-----------------------------------
** शेतीच्या बातम्या व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
-----------------------------------
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
www.mazisheti.org
www.fb.com/agriindia
Whatsapp - 9975740444

No comments:

Post a Comment