Wednesday, January 13, 2016

अ‍ॅपल बोर

अ‍ॅपल बोर लागवड -
हवामान :
या बोराचे झाड फार काटक असते. ते सर्व प्रकारच्या हवामानात वाढत असले, तरी उष्ण व कोरडे हवामान अ‍ॅपल बोरासाठी पोषक ठरते. आर्द्र हवेत झाडाची वाढ व फलधारणा समाधानकारक होत नाही. कमाल तापमान ३७ ते ४८ अंश सेल्शिअस अथवा त्याहून जास्त आणि किमान तापमान ७ ते १३ अंश सेल्शिअस आणि १५ सें.मी. पासून २२५ सें.मी. पावसाच्या प्रदेशात ही झाडे चांगली वाढतात. तसेच झाडाच्या योग्य वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. हिमतुषारांमुळे झाडाला सहसा नुकसान पोहोचत नाही. झाडाला कोणत्याही प्रकारची इजा झाली अथवा ते आगीत होरपळून निघाले, तरी ते जिवंत राहते व पुन्हा वाढू लागते.

जमीन :
अ‍ॅपल बोराचे झाड चांगली हवा खेळणाऱ्या वाळूमिश्रित गाळवट जमिनीत चांगले वाढते. तसेच जांभ्या दगडाच्या खडकाळ अथवा चांगल्या निचऱ्याच्या काळ्या जमिनीसह सर्व प्रकारच्या जमिनीतही वाढते. या झाडाचे सोटमूळ थोड्या अवधीत खोलवर जाते व जमिनीतील थोड्या प्रमाणातील ओल झाडाच्या वाढीसाठी पुरेशी होते.

कलम : 
जंगली प्रकारांच्या खुंटावर अ‍ॅपल बोराच्या झाडांचे डोळे भरुन बोरांची चांगल्या प्रकारांची अभिवृध्दी करण्यात येते. रोपवाटिकेत डोळे भरलेल्या कलमांचे सोटमूळ थोड्या अवधीत खोल जाते व स्थलांतर करताना त्याला इजा पोहोचण्याचा संभव असतो. यासाठी शेतातच जंगली प्रकारांची रोपे लावून त्यांवर डोळे भरणे पसंत करतात; परंतु विशेष प्रकारचे तंत्र वापरुन रोपवाटिकेत डोळे भरलेल्या कलमांचे स्थलांतर करण्यात कृषि विद्यापीठांनी यश मिळविले आहे.
पडीक जमिनीत अथवा शेताच्या बांधावर वाढणाऱ्या बोरीच्या झाडावर अ‍ॅपल बोराच्या झाडांचे डोळे बसविल्यास चांगल्या प्रतीची बोरे मिळू शकतात. यासाठी जानेवारी ते मार्च महिन्यात जमिनीपासून १ ते १.२५ मी. उंचीवरील खोडाचा भाग कापून टाकतात आणि फुटून आलेल्या फांद्यांपैकी एक जोमदार फांदी ठेवून त्यावर डोळा बसवितात व तो फुटून आल्यावर शेंड्याकडील भाग कापून टाकतात. डोळे भरल्यापासून एक वर्षाच्या आत फळे धरण्यास सुरुवात होते.

लागवड : 
साधारणत: जूनमध्ये या बोरांची लागवड करतात. दोन झाडे व ओळीतील अंतर ५ बाय ५ मीटर किंवा ६ बाय ६ मीटर ठेवावे. त्यासाठी रोपं विकत आणावीत किंवा स्वतः तयार करावीत. लागवडीसाठी दीड फूट खोलीचे खड्डे खणून त्यात एक टोपले शेणखत, २५० ग्रॅम नत्र, ५०० ग्रॅम स्फूरद आणि १०० ग्रॅम पालाश, अर्धा किलो लिंबोळी पेंड, १० ग्रॅम फॉरेट टाकावे. जंगली बोर लावून त्यावर अ‍ॅपल बोराचा कलम, डोळा भरला तरी चालतो.

खत व पाणी व्यवस्थापन :
ज्याप्रमाणे लागवड करताना खत मात्रा देणे आवश्यक असते त्याचप्रमाणे ती छाटणीनंतरही देणे आवश्यक असते. छाटणीनंतर प्रत्येक झाडाला ५० किलो शेणखत द्यावं. तसेच २५० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फूरद आणि ५० ग्रॅम पालाश प्रती झाड प्रती वर्ष या प्रमाणे रासायनिक खते द्यावीत. यापैकी फक्त नत्र दोन हफ्त्यांतून विभागून द्यावं. माती-पाणी परिक्षण व झाडांच्या वयानुसार खतांची मात्रा बदलावी. गरजेनुसार सुक्ष्म अन्नद्रव्ये ठिबकाद्वारे किंवा फवारणी करून द्यावे. तसेच फुलफळ व फळगळ नियंत्रणासाठी संजीवकांचा वापर करावा.
अ‍ॅपल बोर कमी पाण्यातही उत्तम प्रकारे येत असले तरी प्रति झाडास रोज एक ते दीड लिटर पाणी द्यावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी देणे आवश्यक असते. पाणी बचतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. काही भागात पाचटाचे अच्छादनही करतात.

छाटणी :
अ‍ॅपल बोराच्या झाडाला फुटून येणाऱ्या फांद्या लांब, किरकोळ आकारमानाच्या व वेड्यावाकड्या वाढणाऱ्या असतात. झाडे लहान असताना त्या फळांच्या भाराने मोडतात. फांद्यांचा बळकट सांगाडा तयार करण्यासाठी वाढीच्या पहिल्या ३-४ वर्षांच्या काळात सर्व लांबलचक व नको असलेल्या फांद्या छाटतात. त्यानंतर दरवर्षी झाडाची छाटणी करणे आवश्यक असते कारण फळे चालू वर्षाच्या फुटीवर नांच्या बगलेत धरतात. अॅपल बेर या जातीला वर्षातून दोन वेळा बहार येतो. या बोरीपासून पावसाळा आणि हिवाळ्यात उत्पादन मिळते. 
छाटणी केल्याने फळांची संख्या वाढते व त्यांची प्रतही सुधारते. फळे काढून घेतल्यावर खरड छाटणी आणि मोहोर येण्यापूर्वी हलकी छाटणी करतात. खरड छाटणी करताना 60 सें.मी.पर्यंत मुख्य खोड ठेवून छाटणी करावी.

कीड-रोग व्यवस्थापन :
या फळाला प्रामुख्याने फळमाशी व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. फळमाशीमुळे या पिकाचे सर्वांत जास्त नुकसान होते. फळाच्या सालीत माशी लांबट आकाराची अंडी घालते व त्यांतून बाहेर पडणाऱ्या अळ्या फळात शिरुन गर खातात. दमट हवामानात या फळमाशीचा फार उपद्रव होतो. अळीच्या बंदोबस्तासाठी प्रथमतः किडलेली फळे गोळा करून त्यांचा नाश करवा. उन्हाळ्यात झाडाखालील जमिनीची मशागत करून या माशीचे कोष उन्हाने मारावेत. तसेच, बागेत एकरी ४-५ कामगंध सापळे लावावेत. 

या बोरावर कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) भुरी नावाचा रोग विशेषेकरून आढळून येतो. पाने व फळे गळतात व झाडावर राहिलेली फळे नीट पोसत नाहीत. या रोगाच्या नियंत्रणासाठी गंधकाची धुरळणी किंवा पाण्यात मिसळणाऱ्या गंधकाची २० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बाग स्वच्छ् ठेवल्यास कीड-रोगांचे प्रमाण कमी राहते. फळांची काढणी करण्यापूर्वी कमीत कमी १५ दिवस रासायनिक औषधांची फवारणी थांबवितात.
तयार झालेल्या फळांचे पक्ष्यांपासून फार नुकसान होते. मासे पकडण्याच्या जाळ्यांनी झाड झाकल्यास हे नुकसान पुष्कळ कमी होते.

काढणी व उत्पन्न :
कलमी झाडांना लागवडीपासून २-३ वर्षांनी व बी लावून तयार केलेल्या झाडांना ४-५ वर्षांनंतर फळे धरण्यास सुरुवात होते. फलधारणेच्या काळात जमिनीत पुरेशी ओल नसल्यास फळे गळतात. कच्ची फळे झाडावरुन काढल्यास पुढे ती पिकत नाहीत. 
छाटणी केल्यानंतर आठ-नऊ महिन्यांत फळे येण्यास सुरु वात होते. पहिल्या वर्षी प्रत्येक झाडाला किमान ३० ते ५० किलो बोरांचे उत्पादन होते. दुसर्‍या वर्षी प्रत्येक झाडाला ८० ते १२० किलो बोरांचे उत्पादन होते. सर्वसाधारण देशी बोरापेक्षा या बोराचे वजन ६० ग्रॅम पासून २०० ग्रॅमपर्यंत भरते. या जातीचे एक झाड सुमारे २० वर्षे जगते. झाडे कायम हिरवीगार राहतात.

अ‍ॅपल बोरांना स्थानिक बाजारपेठेत १५ ते २५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. मागील वर्षी दिल्ली बाजारपेठेत हा दर ३० ते ४० रुपये प्रति किलो इतका होता. उत्तर भारतात प्रकाराप्रमाणे फेब्रुवारीच्या मध्यापासून एप्रिल अखेरपर्यंत फळे काढणीचे काम चालू राहते. दक्षिण व मध्य भारतात नोव्हेंबरपासून फळे बाजारात येतात. उत्पादकांची संख्या जास्त असल्यास दूरच्या बाजारपेठेमध्ये माल नेणे शक्य होते.

उपयोग : 
फळातील खाद्य भागात ८१.६% जलांश, ०.८% प्रथिन, ०.३% वसा (स्निग्ध पदार्थ) व १७% कार्बोहायड्रेट (शर्करा) असतात. शिवाय क जीवनसत्त्व आणि खनिजेही असतात. आवळा व पेरु ही दोनच फळे क जीवनसत्वाच्या बाबतीत बोरापेक्षा श्रेष्ठ आहेत. तसेच बोरातील कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह यांचे प्रमाण सफरचंद व संत्रे या फळांपेक्षा जास्त असते. पोषणाच्या दृष्टीने सफरचंदापेक्षा बोर श्रेष्ठ आहे.
पक्व फळे खाण्यासाठी व औषधासाठी वापरतात. फळे ताजी, सुकी, साखरेत मुरविलेली, वाफविलेली व धुरावलेली अशा निरनिराळ्या स्वरुपात खाण्यात येतात. झाडांचा पाला जनावरांना (गाई, शेळ्या) खाऊ घालतात. लाखेचे किडे पोसण्यासाठी या झाडांचा वापर करतात. तसेच वाऱ्याला अडथळा करून इतर वनस्पतींना संरक्षण देण्यासाठी या झाडांची लागवड उपयुक्त ठरली आहे. बियांतील गर झोप लागण्यासाठी देतात. बियांतील तेलाचा कातडी कमावण्यासाठी उपयोग करतात. सालीचा काढा अतिसार व आमांश यांवर देतात. लाकूड कठीण, मजबूत व टिकाऊ असते आणि त्यापासून शेतीची अवजारे, गाड्यांची चाके व बंदुकीचे दस्ते करतात, तसेच त्यांपासून कोळसाही तयार करतात.

मागील चार-पाच वर्षापासून कधी अतिवृष्टी तर कधी कमी पावसाने महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. पावसाच्या अनिश्चिततेवर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धतीचा वापर करावा. परंपरागत पीक पद्धतीला फाटा देऊन पावसाची अनियमितता व वातावरणातील बदलाप्रमाणे नवीन पिके घ्यावे. विशेषतः तेलकट डाग रोगग्रस्त डाळिंबाच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांना हे बोर चांगला पर्याय होऊ शकेल.

बोरापासून बनवा बनविलेले पदार्थ - जॅम, जेली, मुरांबा

⭕जॅम⭕
१) पिकलेली निरोगी फळे वाहत्या स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यावीत. फळातील बी कॉर्क बोररच्या साहाय्याने काढून त्यांचे लहान लहान तुकडे करावेत. या तुकड्यांच्या वजनाएवढे पाणी टाकून शिजवून घ्यावे व तो लगदा थंड झालेवर एक मिलिमीटरचे छिद्रे असलेल्या चाळणीतून काढून घ्यावा.
२) एकजीव केलेल्या १ किलो गरामध्ये १ लिटर पाणी, ७५० ग्रॅम साखर व ८-१० ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून ते मिश्रण शेगडीवर गरम करावे.
३) मिश्रणाचा ब्रिक्स ६५ ते ६८ अंश ब्रिक्स आला किंवा ते मिश्रण तुकड्यात पडू लागले म्हणजे जॅम तयार झाला असे समजावे.
४) तयार झालेला जॅम गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून, बाटल्या थंड झाल्यावर मेणाचा थर देऊन किंवा अॅल्युमिनियम फॉइल लावून, लेबल लावून, बाटल्या थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.

⭕चटणी⭕
१) चटणीसाठी किंचित पिवळसर रंगाची निरोगी बोरे निवडून त्यांचा किस करून घ्यावा. एक किलो बोराच्या किसापासून साधारणतः १.५०० ते १.७५० किलो चटणी तयार होते.
२) चटणी तयार करण्यासाठी घटक - बोराचा किस - १ किलो, मिरची पूड - २० ग्रॅम, कांदा बारीक वाटलेला - ६० ग्रॅम, मीठ - ५० ग्रॅम, लसूण बारीक वाटलेला - १५ ग्रॅम, वेलदोडे पावडर - १५ ग्रॅम, दालचिनी पावडर - १५ ग्रॅम, व्हिनेगार - १८० मिली.
३) बोराच्या किसामध्ये साखर आणि मीठ मिसळून ते मिश्रण गरम करण्यास ठेवावे व सर्व मसाल्याचे पदार्थ मलमलच्या कापडाच्या पुरचुंडीमध्ये बांधून मिश्रणात सोडावी. अधून-मधून ही पुरचुंडी थोडीशी पळीने दाबावी म्हणजे मसाल्याचा अर्क उतरण्यास मदत होईल. हे मिश्रण ६७-६९ अंश ब्रिक्स येईपर्यंत शिजवावे व त्यात व्हिनेगार टाकावे. मिश्रण पुन्हा गरम करावे. गरम असतानाच ही तयार झालेली चटणी रुंद तोंडाच्या निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये भरावी. थंड झाल्यावर बाटल्या वर जॅममध्ये उल्लेख केल्याप्रमाणे बंद करून कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.

⭕जेली⭕
१) बोराच्या फळामध्ये चांगले पेक्टिन असल्याने त्यांच्या थोड्या कच्च्या फळापासून पेरूपेक्षा उत्तम प्रकारची जेली तयार करता येऊ शकते. ज्याप्रमाणे पेरूपासून किंवा कवठापासून जेली केली जाते, त्याप्रमाणे बोरापासून उत्कृष्ट प्रकारची जेली तयार करता येते. ही जेली फ्रुटब्रेडमध्ये व बेकरी पदार्थ तयार करताना वापर करता येतो.

⭕मुरंबा⭕
१) मुरंबा तयार करण्यासाठी जास्त पिकलेली फळे वापरू नयेत. चांगली फळे निवडून, धुऊन, बी काढून त्यांचे काप करावेत किंवा किसून घ्यावेत. तो किस ३ मिनिटे उकळत्या पाण्यात धरावा. नंतर त्यामध्ये १:१ या प्रमाणात साखर व ८-१० ग्रॅम सायट्रिक आम्ल टाकून नंतर योग्य तार धरेपर्यंत गरम करावे व २४ तास तसेच ठेवून द्यावा.
२) तयार मुरंबा निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून, बाटल्या हवाबंद कराव्यात व लेबल लावून कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.

⭕लोणचे⭕
- पिकलेल्या बोरांपासून उत्तम प्रकारचे लोणचे करता येते. लोणच्यासाठी वापरावयाचे तेल प्रथम उकळून थंड करावे. यासाठी पुढील घटक वापरावेत.
- बोराच्या फोडी - १.५ किलो, मीठ - २५० ग्रॅम, खाद्य तेल - २४० ग्रॅम, मेथी (मध्यम भरडलेली) - २.५ ग्रॅम, मोहरी (मध्यम भरडलेली) - १०० ग्रॅम, मिरची पूड - ५० ग्रॅम, हिंग - ५० ग्रॅम, हळद पावडर - २५ ग्रॅम, सोडियम बेन्झोएट - ०.१ ग्रॅम.
- प्रथम फळाचे तुकडे व मीठ सोडून बाकी सर्व पदार्थ तेलात परतून घ्यावेत. मसाला व फळांचे तुकडे एकत्र मिसळून पुन्हा दोन-तीन मिनिटे परतून घेऊन मीठ मिसळावे.
- तयार लोणचे निर्जंतूक केलेल्या काचेच्या बाटल्यामध्ये भरून, हवाबंद करून, झाकण लावून त्या थंड व कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.

⭕सुकविलेली बोरे⭕
- बोरापासून सुकविलेली बोरे/ सुका मेवा तयार करण्यासाठी निरोगी, पिकलेली फळे निवडून पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत.
- नंतर ती फळे फडक्यात बांधून उकळत्या पाण्यात ४-६ मिनिटे धरावीत व थंड झालेवर २ ग्रॅम प्रति किलो बोर या प्रमाणात गंधकाची धुरी २ तास देऊन वाळवणी यंत्रात ६०-६५ अंश सें. तापमानाला १८-२० तास वाळवावीत.
- पॉलिथीनच्या पिशवीत वाळवलेली बोरे पॅक करून, पिशव्या हवाबंद करून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. ताज्या बोरांमध्ये असणारे अन्नघटक आपणास सुक्या बोरांमधून मिळू शकतात.
- सुकविलेल्या बोरांचे लहान-लहान तुकडे करून त्यांचा उपयोग बेकरी पदार्थ व इतर अन्न पदार्थांमध्ये करता येतो. तसेच सुकविलेली बोरे साखरेच्या पाकात २४ तास ठेवून नंतर त्याच पाकात १० मिनिटे शिजविली असता, त्यांचा खजूर म्हणून उपयोग करता येतो.

⭕बोराचा चिवडा⭕
- पिकलेल्या बोरापासून उत्तम प्रकारचा चिवडा तयार करता येतो. यासाठी प्रथम निरोगी चांगली फळे निवडून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. नंतर किसणीच्या साहाय्याने त्यांचा किस करून घ्यावा व तो किस फडक्यात बांधून उकळत्या पाण्यात ३-४ मिनिटे धरावा.
- नंतर २ ग्रॅम गंधक प्रति किलो किस याप्रमाणे २ तास गंधकाची धुरी द्यावी. यामुळे चिवड्यास पिवळसर रंग प्राप्त होतो व साठवणीच्या काळात बुरशीची लागण होत नाही. नंतर तो किस ट्रेमध्ये पातळ पसरून ते ट्रे ५५ अंश सें. तापमानाला १२ तास वाळवणी यंत्रात ठेवावेत.
-पूर्ण वाळल्यानंतर तो किस पॉलिथीनच्या पिशवीमध्ये भरून पिशव्या हवाबंद करून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. वापरतेवेळी तो किस तेलात तळून त्यामध्ये चवीनुसार मीठ, तिखट व इतर मसाले टाकून त्याचा अस्वाद घ्यावा. ही चिवडा उपवासालादेखील चालतो.

⭕पावडर⭕
- पावडर तयार करण्यासाठी वरीलप्रमाणे तयार केलेला बोराचा वाळविलेला कीस ग्राइंडरला लावून तयार करून घेऊन ती पावडर वस्त्रगाळ करावी.
- नंतर वजन करून ४०० गेजच्या पॉलिथीनच्या पिशवीमध्ये भरून, पिशव्या हवाबंद करून, लेबल लावून, थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. या पावडरचा उपयोग सरबत तयार करण्यासाठी होतो.

⭕हवाबंद डब्यात साठविलेली बोरे⭕
- यासाठी उमराण या जातीचे बोरे वापरावीत. चांगली निवडलेली बोरे पाण्याची धुऊन घेतल्यानंतर त्याच्यातील बी कॉर्करच्या साहाय्याने काढून टाकावे व ती फडक्यात बांधून उकळत्या पाण्यात ३-४ मिनिटे धरावीत. त्यामुळे ती मऊ पडतात व साठवणीच्या काळात त्यांचा रंग बदलत नाही.
- नंतर फळे डब्यामध्ये भरून त्यावर ०.५० टक्के सायट्रिक आम्ल टाकून त्यावर ४० टक्के साखरेचा पाक ओतावा. डब्याची १ सें.मी. जागा वरून मोकळी ठेवावी. नंतर डब्यावर झाकण ठेवून ते एक्झॉस्ट बॉक्समध्ये ठेवून त्यामधून हवा काढून टाकावी.
- नंतर डबे डबल सिमरच्या सहाय्याने हवाबंद करावेत व पुन्हा पाश्चरायझर्स करावेत. नंतर हे डबे थंड करून, लेबल लावून, थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवावेत.

डॉ. विष्णू गरंडे
प्राध्यापक उद्यानविद्या विभाग,
कृषी महाविद्यालय, कोल्हापूर.

No comments:

Post a Comment