Saturday, January 16, 2016

भेंडी

जमीन
लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून हेक्‍टरी 20 टन शेणखत मिसळावे.

लागवड
खरीप हंगामात जुलैच्या पहिला आठवड्यात आणि उन्हाळी हंगामात जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात भेंडी लागवड करावी. शक्यतो २२ ते ३० सें. तापमान असलेल्या भागात केंव्हाही लागण केलेली चालते. 

बियाणे / वाण
लागवडीसाठी फुले उत्कर्षा, परभणी क्रांती, अर्का अनामिका, अर्का अभय या जातींची निवड करावी. लागवडीसाठी हेक्‍टरी 15 किलो बियाणे लागते. लागण 30 X 15 सें.मी. अंतराने करावी.

बीज :
BRO 6 : ही जात पिवळ्या शिरा आणि सुरवातीचा विषानुजन्य मर रोग रोधक आहे. २८ ते ४० दिवसात चार ते पाच फुटव्यावर फुले लागतात.
उत्पादन प्रति हेक्टर - उन्हाळ्यात 130 क्विंटल आणि पावसाळ्यात 160 क्विंटल

BRO 5 : ही बुटकी जात आहे. याचे फुटवे जास्त वाढत नाहीत. वाढ ६० ते ८० CM होते. ४० दिवसात चौथ्या फुटव्यावर फुले लागतात. ही जात पिवळ्या शिरा आणि सुरवातीचा विषानुजन्य मर रोग रोधक आहे.
उत्पादन प्रति हेक्टर - उन्हाळ्यात 120 क्विंटल आणि पावसाळ्यात 150 क्विंटल

परभणी क्रांती : ही जात पिवळ्या शिरा आणि सुरवातीचा विषानुजन्य मर रोग रोधक आहे. ५० ते ५५ दिवसात तोडा चालु होतो. ही पाच कडांची भिंडी आहे. कुस नसते.
उत्पादन प्रति हेक्टर - उन्हाळ्यात 80 क्विंटल आणि पावसाळ्यात 110 क्विंटल


IIVR-10 : ही जात पिवळ्या शिरा आणि सुरवातीचा विषानुजन्य मर रोग रोधक आहे. ४० ते ४५ दिवसात फुटव्यावर फुले लागतात. ही सात कडांची भिंडी आहे. कुस नसते.
उत्पादन प्रति हेक्टर - उन्हाळ्यात 130 क्विंटल आणि पावसाळ्यात 150 क्विंटल
बीजप्रक्रिया
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 25 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर आणि 25 ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.

ख़त व्यवस्थापन
या पिकाला माती परीक्षणानुसार लागवडीच्या वेळी हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश ही खत मात्रा द्यावी. लागवडीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्राची मात्रा द्यावी. पिक तणमुक्त ठेवावे.

भेंडीसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती
भेंडीचे उत्पादन करताना कीटक, रोग आणि नेमेटोड्सचा फार त्रास होतो. भेंडीची साल नरम असते आणि दमट हवामानात घेतले जाते ज्यामुळे कीडकीटकांचा हल्ला जास्त प्रमाणात होतो.  35-40% पर्यंत नुकसान होते.

कीडनाशकांच्या अति वापरामुळे उद्भवणारे प्रश्न
किडीपासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी भेंडीवर मोठ्या प्रमाणात कीडनाशके इ. फवारली जातात. मात्र ह्यामुळे
कमी मुदतीत तयार होणार्याम भेंडीमध्ये ह्या औषधांचे अंश शिल्लक राहतात आणि त्याचे वाईट परिणाम खाणार्याच्या प्रकृतीवर होतात.
•रासायनिक कीडनाशके सतत वापरल्याने किडींनाही त्यांची सवय होते आणि ते त्यांना दाद देत नाहीत. त्यामुळे तेच रोग पुन्हा उद्भवतात शिवाय एकंदर पर्यावरणावर व इतर वनस्पतींवर घातक परिणाम होतात.

मुख्य किडी
तुडतुडे / लीफ हॉपर:
लीफ हॉपर व त्यांच्या अळ्या हिरव्या रंगाच्या असतात.ते पानावर तिरक्या रेषेत हल्ला करतात व पाने पिवळी पडून दुमडली जातात. रोग गंभीर बनल्यास पाने विटकरी रंगाची होऊन चुरगळतात.

खोड व फळे पोखरणारे किडे:
ह्यांच्या अळ्या रोपट्यांच्या फुटव्यांत वरून खाली भोके पाडून ठेवतात व झाड मरतुकडे बनते. सुरकुतलेले व निस्तेज फुटवे हे लक्षण आहे. त्यानंतर ह्या अळ्या फळांमध्ये घुसल्याने ती वेडीवाकडी होतात.

लाल कोळी:
ह्यांच्या अळ्या हिरवट लाल तर मोठे कोळी लंबगोलाकार व विटकरी रंगाचे असतात. लाल कोळी पानाच्या खालच्या पृष्ठभागावर हल्ला करतात. ह्यामुळे पाने दुमडली व अखेर चुरगाळली जातात.

पिवळ्या शिरांच्या नक्षीचा रोग:
पानावर पिवळ्या शिरांचे जाळे तयार होते व त्यात मधेमधे पानाचा हिरवा रंग दिसतो. नंतर मात्र पूर्ण पानच पिवळे पडते. हा रोग पांढऱ्या माशीमार्फत पसरतो.

मुळावर गाठी आणणारा किडा:
मुळांवर गाठी तयार होतात. झाडाची वाढ खुंटते. ही कीड सूक्ष्म असते व जमिनीत राहून वनस्पतिजन्य पदार्थांवर जगते.

एकात्मिक कीड-व्यवस्थापन पद्धती
• YVMV (Yellow Vein Mosaic Virus) रोधक हायब्रीड जाती लागण करणे, लागण खरीप हंगामात करणे. उदा. मखमली, तुलसी, अनुपमा-१ किंवा सन-४० इ.
•खोड व फळ पोखरणारी कीड दूर ठेवण्यासाठी शेताच्या बांधावर मका किंवा ज्वारीसारखे तटरक्षक पीक घ्यावे.
•पांढऱ्या माशा चिकटून बसाव्या ह्यासाठी डेल्टा व पिवळे चिकट सापळे ठेवा.
•किडे खाणाऱ्या पक्ष्यांसाठी एकरी १० पक्षीथांबे उभारा.
•लीफ हॉपर, पांढरी माशी, माइट्स आणि ऍफिड्सना दूर ठेवण्यासाठी ५% Neem Seed Kernal Extract च्या दोन-तीन फवारण्या, आळीपाळीने, कीटकनाशकांसोबत द्या. AESA based IPM & ETL पातळी (प्रत्येक झाडावर जास्तीतजास्त 5 हॉपर) ओलांडली गेल्यास इमिडाक्रोपिल १७.८ एसएलची फवारणी १५० मिली/हेक्टरप्रमाणे करा. ह्याने इतर शोषक किडीही दूर राहतील.
•इरियास व्हायटेला ही माशी दूर ठेवण्यासाठी फेरोमोन तत्त्वावर काम करणारे सापळे एकरी 2 या प्रमाणे बसवा. दर १५-२० दिवसांनंतर सापळ्यांतील आमिष बदला.
•खोड व फळाला भोके पाडणार्याम किड्यांच्या अंड्यांना खाऊन जगणाऱ्या (एग पॅरासॉइट) ट्रायकोडर्मा चिलोनिस चा वापर १-१.५ लाख/ हे ह्या प्रमाणात, पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी, दर आठवड्यानंतर ४-५ वेळा करा. किडींचे प्रमाण ईटीएल पातळीच्या (५.३ % संसर्ग) वर राहिल्यास सायपरमेथ्रिन २५ ईसी, २०० g a.i /हे या प्रमाणात वापरा.
YVMV ने ग्रस्त झाडे आढळल्यास ती नष्ट करा.
•खोडकिड्याने पोखरलेले फुटवे व फळे वारंवार वेचून नष्ट करा
•लीफ हॉपर, पांढरी माशी, माइट्स आणि ऍफिड्सना दूर ठेवण्यासाठी कडुनिंबावर आधारित रासायनिक खतांचा वापर करा – उदा. इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल, १५० मिली/हेक्टर, सायपरमेथ्रिन २५ ईसी, २०० g a.i/हे (०.००५%), क्विनॉलफॉस २५ ईसी, ०.०५% अथवा प्रोपर्गाइट. ५७ ईसी, ०.१% इ.

स्रोत:  एकात्मिक कीड-व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय केंद्राची विस्तारित पुस्तिका (ICAR) पुसा संकुल, नवी दिल्ली 110 012