Friday, November 4, 2016

डाळिंब पिकातील उत्पादनाच्या दृष्टीने मधमाश्यांचे योगदान…. (१६११०४)

डाळिंब पिकातील उत्पादनाच्या दृष्टीने मधमाश्यांचे योगदान…. (१६११०४)
संकलन - जुईली गांधी 

डाळिंब पिकातील जास्तीत जास्त उत्पादनाच्या दृष्टीकोनातुन अत्यंत महत्वाच्या असणा-या परागीभवनाच्या क्रियेत मधमाश्या मह्तवाचे योगदान देत असतात. परंतु डाळिंब पिकावर होत असलेल्या विविध किटकनाशकांच्या फवारणीतुन मधमाश्या वाचत नाही, त्यामुळे मधमाश्यांचे संगोपन करुन त्यांची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी मधुमक्षिका पालन करणे गरजेचे आहे.


मधमाशा व पिके एकमेकांना पूरक
भारत अन्नधान्याच्या उत्पादनात जगात पाचव्या स्थानी आहे. मात्र महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची स्थिती फारशी चांगली नाही. अल्पभूधारक शेतकरी आजही शेतीला योग्य पूरक व्यवसायाच्या शोधात आहे. ‘मधुमक्षिका’ पालन हा त्याच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो़ पृथ्वीवरील जीवांच्या उत्क्रांती प्रक्रियेत प्राणी जीवन निर्माण होण्यापूर्वी फुलणाऱ्या वनस्पतीवर खाद्यासाठी पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या मधमाश्यांचा जन्म झाला. शेतातील पिके, वनस्पती व मधमाशा हे एकमेकांना पूरक आहेत. शेतपिकापैकी गळिताची धान्ये, कडधान्ये, चाऱ्याची पिके, मसाल्यांची पिके, बियाण्याची पिके व फळफळावळ यासारखी पिके परागभवनासाठी मधमाशांसारख्या किटकावर अवलंबून असतात. मधमाशांना परागफलन केल्याने या पिकांची प्रत वाढत असल्याचे निष्कर्ष नोंदविण्यात आले आहेत. मधमाश्यांअभावी चांगले उत्पादन होऊ शकत नाही असा निष्कर्षही या संशोधकांनी काढला आहे. इतर कोणत्याही कीटकांपेक्षा पराग फलनासाठी मधमाशा कार्यक्षम आहेत.
मधमाशी पालनातील अडचणी
मधमाश्यांच्या एका वसाहतीत सुमारे ५ ते १० हजार मधमाशा असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात परागसिंचन करण्याची क्षमता दुसऱ्या कोणत्याही किटकांत नसते. या मधमाशा फुलातील मकरंद गोळा करून मधाची निर्मिती करतात. त्यांचे हे कार्य निरंतर सुरू असते. पाळीव मधमाश्यांच्या वसाहतीच्या माध्यमातून हमखास परागफलन करता येते. महाराष्ट्रात सुमारे २१० लाख हेक्टर क्षेत्र निरनिराळ्या पिकांच्या लागवडीखाली आहे. तृणधान्य व भुईमूग वगळता सर्वच गळितांच्या पिकांच्या फुलोऱ्यापासून मधनिर्मिती केली जाते. मात्र मधमाशी पालनात काही अडचणी आहेत. खरीप व रबी हंगाम वगळता अन्य हंगामात त्यांना पुरेसे खाद्य मिळत नाही. कीटकनाशकांचा अती वापर हा मधमाशांसाठी हानीकारक ठरला आहे.
स्वयंरोजगार प्रदान करणारा व्यवसाय
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या यासाठी शासनाने डॉ. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्यांनी आपल्या अहवालात शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी अशी शिफारस केली आहे. मधमाशी पालनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो असा निष्कर्ष डॉ.घुगल व डॉ. राहिले यांनीही आपल्या अभ्यासात नोंदविला आहे. मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना एकरी पिक वाढीस मदत मिळू शकते. फुलात सुकून वाया जाणारा मकरंद व पराग मधमाशांच्या माध्यमातून गोळा करून कोट्यवधी रुपये किमतीच्या मधाची व मेनाची निर्मिती केली जाऊ शकते. मधमाशी पालन हा व्यवसाय स्वयंरोजगार प्रदान करणारा ठरू शकतो. यासोबतच या व्यवसायाला लागणारे पूरक व्यवसाय देखील गावांत निर्मित केले जाऊ शकतात. एका शेतकऱ्याने ८ ते १० वसाहती पाळल्यास त्याला चांगला मोबदला मिळू शकतो.

संदर्भ - दैनिक लोकमत

No comments:

Post a Comment