Friday, November 4, 2016

माझीशेतीमार्फत शेतीची दशा आणि दिशा बदलण्यासाठी “ग्रामीण शाश्वत विकासाची” पायाभरणी वाफगावमध्ये सुरु.

(राजगुरुनगर/जिल्हा:पुणे)

शेतमाल व उत्पादनांना उत्तम व खात्रीशीर बाजारपेठ मिळवून देण्याच्या अनुषंगाने माझीशेती संस्थेद्वारे ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचा शाश्वत विकास करण्यासाठी “ग्रामीण शाश्वत विकास (RSD) उपक्रम राबाविला जात आहे. याच वाटचालीत दि.०२/११/२०१६ रोजी वाफगाव (ता.राजगुरुनगर) येथे माझीशेती संस्थेमार्फत ग्रामीण शाश्वत शेती उपक्रमाचा उद्देश सांगितला. ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावचे सरपंच मा.श्री.अजय भागवत यांना या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आश्वासन दिले. 
ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाची सुरुवात करताना वाफगाव ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांच्यासोबत माझीशेती  RSD  प्रकल्पातील सर्व सदस्य उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना श्री.अजय भागवत उपसरपंच म्हणाले की,शेतकऱ्यांना फक्त माझे ‘शेतकरी बांधव’न म्हणता, त्यांच्या शेतीमालाला सुयोग्य भाव आणि खात्रीशीर उत्पन्न मिळवून देण्याचे प्रयत्न करायला पाहिजे.यासाठी गावातील तरुण युवक व प्रगतशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन माझीशेतीच्या सहकार्याने काम करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. श्री. शैलेश मांदळे यांनी गावातील तरुण शेतकऱ्यांना भौगोलिक बंधने विसरून उज्वल भविष्याला गवसणी घालण्यासाठी आधुनिक प्रणालीचा वापर करून प्रगत शेती करण्याची गरज आहे असे सांगितले. तांत्रिकदृष्ट्या सक्षम तरुणांना उद्देशून बोलताना तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतीमध्ये वापर करून शेतीमध्ये प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन केले.
जुईली गांधी यांनी ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाची माहिती देताना गावातील अर्थव्यवस्था बळकट करण्यावर भर दिला. प्रगतशील शेतकऱ्यांच्या प्रयोगांना प्रसिद्धी देऊन इतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह शेती करण्यासाठी माझीशेतीच्या RSD प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. RSD प्रकल्पाच्या माध्यमातून शेती मार्गदर्शन, कृषी निविष्ठा, प्रशिक्षण, बांधावरील बैठक या अश्या वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांची क्षमता बांधणी करणे आणि तयार झालेला शेतीमाल विक्रीसाठी हमी भाव देण्यासाठी प्रयत्न करणे असे माझीशेतीचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.