Wednesday, January 13, 2016

बेदाणा / किसमिस/ सुकी द्राक्षे

बेदाण्यासाठीच्या बागेचे फळछाटणीनंतरचे व्यवस्थापन

बाजारात बेदाण्याला चांगला दर मिळत असल्यामुळे बेदाणा निर्मितीसदेखील चांगला वाव आहे. या लेखामध्ये दर्जेदार बेदाणानिर्मितीसाठी बागेचे व्यवस्थापन कसे असावे याबद्दलची माहिती आपण घेत आहोत.

द्राक्षबागेत एप्रिल महिन्यात खरड छाटणी झाल्यानंतर द्राक्षबागेत नवीन फुटी निघतात. या फुटींची योग्य ती वाढ होण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतात. त्यानंतर वेलीवर तयार झालेल्या काडीमध्ये घडनिर्मिती झाली, काडी परिपक्व झाली. याच काडीवर आता फळछाटणी करावयाची आहे. त्यानंतर बागेचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे असते.

वेलीची मुळी सक्षम करा
1) बेदाण्यासाठीच्या द्राक्ष बागेतील वेलीवर इतर द्राक्षांपेक्षा (उदा. खाण्याची व मद्यनिर्मितीची द्राक्षे) घडांची संख्या जास्त असते. त्यामुळेच वेलीची अन्नद्रव्यांची गरजसुद्धा तितकीच वाढते. ही गरज पूर्ण करण्यासाठी आपल्या बागेत शिफारसनुसार अन्नद्रव्यांची मात्रा द्यावी. परंतु, जर वेलीची मुळी कार्यक्षम नसेल तर जमिनीतून किंवा ठिबकद्वारे दिलेले अन्नद्रव्य वेल उचलण्यास असमर्थ ठरेल. याकरिता जमिनीत पांढरी मुळी महत्त्वाची असते.
2) पांढरी मुळी नवीन तयार झाली असल्यामुळे इतर मुळींपेक्षा सक्षम असते. ही मुळी दिलेले अन्नद्रव्य आवश्यकतेनुसार उचलते. ही मुळी तयार करण्याकरिता फळछाटणीच्या 12 ते 14 दिवसांपूर्वी बोद खोदून चारी घ्यावी. त्यानंतर चारीच्या तळात काडीकचरा, कंपोस्ट किंवा शेणखत आणि शिफारशीत खतमात्रा मिसळून बंद करावी. यामुळे पांढरी मुळी तयार होऊन आवश्यक अन्नद्रव्यपुरवठा करण्यास वेल सक्षम राहाते.

द्राक्षवेल निरोगी असावी
1) द्राक्षबागेत ऑक्टोबर महिन्यात फळछाटणी घेतली जाते. अशा वेळी पाऊस सुरू असतो. सोबतच जमिनीत ओलावा जास्त असल्याने बागेमध्ये आर्द्रता जास्त प्रमाणात वाढते. यामुळे जुन्या कॅनॉपीवर (फळ छाटणीपूर्वी) डाऊनी मिल्ड्यू व करपा या रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.
2) फळछाटणी करतेवेळी ही रोगग्रस्त पाने वेलीवर थोड्या प्रमाणात राहिली तरी तितकीच हानिकारक असतात. त्यामुळे फळछाटणीच्या दोन दिवसांपूर्वी बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. फळछाटणी होताच बागेत पुन्हा दोन दिवसांमध्ये वेलीवर एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी वेलीच्या ओलांड्यावर तसेच जमिनीवरसुद्धा करावी. याचसोबत वेलीवर चुकून राहिलेली रोगग्रस्त पाने बाग पोंगाअवस्थेत येण्यापूर्वीच काढून टाकावीत. यामुळे द्राक्षबाग निरोगी ठेवण्यास मदत होईल.
3) वेलीवर नवीन फुटी व घडांची आवश्यकता
1) फळछाटणीनंतर बागेमध्ये वेलीवर 100 पेक्षा जास्त घड आलेले दिसून येतात. आपण प्रत्येक काडीवर 4 ते 5 डोळ्यांवर हायड्रोजन सायनामाईडचे पेस्टिंग करतो, त्यामुळे प्रत्येक काडीवर तितक्याच फुटी बाहेर येतात.
2) बेदाणानिर्मितीकरिता आवश्यक असलेली घडांची संख्या व वेलीवर त्या घडांच्या पोषणाकरिता गरजेची पाने या गोष्टींचा विचार करता वेलीवर प्रती वर्गफूट 2 ते 2.5 घड असणे गरजेचे असते.
3) प्रत्येक घडाच्या पोषणाकरिता त्या काडीवर 15 ते 16 पानेसुद्धा तितकीच महत्त्वाची असतात. तेव्हा वेलीवर आवश्यक तितक्या फुटी राखून इतर फुटी काढून टाकाव्यात. यामुळे कॅनॉपीमध्ये मोकळी हवा राहील.
4) प्रत्येक पान व घड सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात येत असल्यामुळे त्या वेलीचे प्रकाशसंश्लेषण चांगले होऊन अन्नद्रव्याचा साठासुद्धा तितक्याच प्रमाणात होईल. वेल सशक्त राहून घडाचा विकास चांगला होण्यास मदत होईल. या फुटी काढण्याची ठराविक वेळ आहे. म्हणजेच फळछाटणीच्या 14 ते 15 दिवसांच्या कालावधीमध्ये बागेतील अनावश्यक फुटी काढून टाकाव्यात.

बेदाणानिर्मिती आणि संजीवकांचा वापर
1) जर द्राक्षमण्याची साल पातळ असेल तरच बेदाण्याची प्रत चांगली आहे असे मानली जाते. म्हणजेच अशा प्रकारचा बेदाणा तोंडात टाकल्यावर लवकर विरघळेल. ही परिस्थिती तयार होण्याकरिता फळकाढणी करतेवेळी मण्यामध्ये गोडी (जवळपास 24 डिग्री ब्रिक्स) आणि साल पातळ असावी. याकरिता संजीवकाचा वापर शक्य तितका टाळावा.
2) एकसारखा बेदाणा मिळण्याकरिता द्राक्षघड सुटसुटीत असावा. म्हणजेच घडाच्या दोन पाकळ्यांमधील अंतर वाढल्यास हा घड सुटसुटीत करून घेता येईल. परिणामी एकसारखा आकाराचे मणी मिळवता येईल. तेव्हा संजीवकाचा वापर फक्त प्रिब्लुम अवस्थेमध्येच करावा.
1) पोपटी रंगाची घड अवस्था ः 10 पीपीए जीए3 (ही अवस्था फळछाटणीनंतर 17 ते 19 व्या दिवशी दिसून येईल.)
2) जीए3ची दुसरी फवारणी ः 15 पीपीएमने करावी.
ही फवारणी पहिल्या फवारणीच्या 4 ते 5 दिवसांनी करावी. यामुळे मोकळा घड मिळण्यास मदत होईल. यानंतर बागेमध्ये संजीवकाची फवारणी टाळावी. मणी सेटिंगनंतर फवारणी केल्यास मण्याची साल जाड होईल. त्यामुळे साखर उतरण्यास उशीर लागेल. फळकाढणी करण्याकरिता उशीर होईल.

अन्नद्रव्यांचा पुरवठा
द्राक्षबागेमध्ये बेदाणानिर्मितीकरिता घडांची संख्या व उपलब्ध घडांचा विकास होण्यासाठी आवश्यक ती कॅनॉपी असावी. याकरिता बागेमध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा गरजेचा असतो. फळछाटणीनंतर ही वाढ तीन टप्प्यांमध्ये विभागली जाते.

पहिला टप्पा शाकीय वाढ
1) वेलीची शाकीय वाढ होण्याकरिता फळछाटणीनंतर सुरवातीच्या 30 दिवसांकरिता नत्राचा वापर गरजेचा असतो. ही गरज पूर्ण होण्याकरिता युरिया, 12:61:0, 13:0:45, 18:46:0 इत्यादी खतांचा शिफारशीनुसार वापर केला जातो.
2) जमिनीचा प्रकार व वेलीच्या वाढीचा जोम या गोष्टींचा विचार करूनच वर दिलेल्या खतांपैकी निवड करावी.

दुसरा टप्पा घडाचा विकास होणे
1) या अवस्थेमध्ये घडाचा तसेच मण्याचा विकास होणे गरजेचे आहे. याचवेळी वेलीमधील सोर्स सिंक संबंध प्रस्थापित करावा. याकरिता मणी सेटिंगपर्यंत वेलीवरील घडाच्या विकासाकरिता आवश्यक त्या पानांची पूर्तता झाली, की शेंडापिंचिंग करून घ्यावी. यावेळी घडाचा विकास होण्याकरिता स्फुरदाची आवश्यकता असते, तेव्हा 0:52:34 किंवा फॉस्फरीक ऍसिडच्या माध्यमातून 30 ते 60 दिवसांच्या कालावधीमध्ये स्फुरदाची उपलब्धता करून घ्यावी.

वाढीचा तिसरा टप्पा मण्यात गोडी येण्याची स्थिती
1) या अवस्थेमध्ये वेलीस नत्राचा व स्फुरदचा पुरवठा बंद करून फक्त पालाशची पूर्तता करावी. ही अवस्था बागेमध्ये 60 ते 90 दिवसांच्या कालावधीमध्ये असते.
2) जमिनीचा प्रकार, कॅनॉपीची अवस्था इ. गोष्टींचा विचार करता 0ः0ः50 किंवा सल्फेट ऑफ पोटॅश या ग्रेडच्या खतांच्या माध्यमातून वेलीस पालाशची पूर्तता करावी. यामुळे मण्यामध्ये गोडी वाढेल. त्याचा परिणाम चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार करण्यास सोपे होईल.

द्राक्षापासून बेदाणा कसा तयार करतात?

* चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार करावयाचा असेल, तर बेदाणे तयार करतेवेळी एकसारख्या आकाराचे, रंगाचे घड बागेतून तोडावेत.
* घड काढण्यापूर्वी मण्यामध्ये साखरेची गोडी उतरली आहे याची खात्री करून घ्यावी, कारण चांगल्या प्रतीचा बेदाणा म्हटल्यास त्यात गोडी जास्त असावी लागते.
* काढलेली द्राक्षे शक्यतो सुरवातीला स्वच्छ पाण्यातून काढून घ्यावी. त्यानंतर ही द्राक्षे 25 ग्रॅम पोटॅशिअम कार्बोनेट अधिक 15 मि.लि. ईथाइल ओलिएट (डीपिंग ऑइल) प्रति लिटरच्या द्रावणात दोन ते चार मिनिटे बुडवून ठेवावीत.
* या द्रावणाचा सामू 11 पर्यंत असावा. तद्नंतर द्रावणातून काढलेली द्राक्षे सावलीमध्ये जाळीवर सुकवावीत. वातावरणातील तापमानानुसार 15 ते 22 दिवसांत चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार होऊ शकतो.
* चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार करायचा असेल, तर जास्त तापमान (35-40 अंश से.) व कमी आर्द्रता (30 टक्केपेक्षा कमी) असल्यास त्याचे परिणाम चांगले मिळतात.
* वाऱ्याचा वेग कसा आहे, यावरसुद्धा बेदाण्याची प्रत अवलंबून असते. हवा खेळती असल्यास कमी वेळेत चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार होतो.

*चांगल्या प्रतीचा बेदाणा
- एकसारख्या आकाराचा आणि रंगाचा बेदाणा.
- तयार झालेल्या बेदाण्याची साल पातळ असावी.
- बेदाण्याची गोडी चांगली असावी.

☎020-26956060
(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे येथे कार्यरत आहेत.)
माहिती संदर्भ -अग्रोवोन

Sunday, January 10, 2016

ट्रायकोडर्मा मित्र बुरशी

माझीशेती : FFC (160110)
ट्रायकोडर्मा मित्र बुरशी
___Sachin Rasal

गेल्या आठ दशकापासून ट्रायकोडर्मा चा उपयोग बुरशिनाशक म्हणून केला जातो आहे. हिरव्या रंगाची ही बुरशी ईतर बुरशींचे अन्न लांबवण्यात अतिशय पटाइत आहे. जोमाने वाढणारे तंतू उपलब्ध पृष्टभागावर वेगाने पसरतात व मग विकरांचा स्त्राव सोडतात.

ह्या विकरांमधे सर्व प्रकारचे जैविक पदार्थांचे विघटन करण्याची क्षमता असते. विघटनात तयार झालेल्या पदार्थांचे शोषण करण्यातही ट्रायकॉडर्मा सर्वात पुढे असते. उपलब्ध अन्नावर कोणी ताव मारू नये म्हणुन ही खादाड बूरशी विशिष्ट प्रकारचि प्रतीजैविके स्त्रवते. ह्या स्त्रावात इतर बुरशींसोबत जीवाणूंनाही थोपवण्याची क्षमता असते. ट्रायकोडर्मा आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या शरीरावर भोके पाडुन- त्यातून आत जावुन प्रतिस्पर्ध्याचे शोषण करते. तिची ही शक्ति विलक्षण आहे.

ट्रायकोडर्मा इतर बुरशींशी जीतके शत्रुत्व बाळगते तितकेच मित्रत्व वनस्पतींना दाखवते. जिवंत वनस्पतिंना कुठलीही हानी न पोहोचवता ती मुळावर आपली वसाहत बनवते. जमिनीकडून होऊ शकणार्‍या शत्रूच्या हल्ल्याला जशी ती थोपवाते त्याच प्रमाणे ती वनस्पतिंना सतर्क करून पानांद्वारे होऊ शकणार्‍या शत्रूच्या प्रवेशाला ही रोखते. आँक्झिन सारखे पदार्थ स्त्रवून ती मुळाची वा त्यावरील शोषकेशीकांची संख्याही वाढवते.

मुळांसोबत ती जमिनीवर खोलवर रूतते. विकरांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या विघटीत द्रवातील लोह, जस्त, मँग्नीज, तांबे व मोलिब्डेनम आदी सूक्ष्मद्रव्यांची पूर्तता वनस्पतींना केली जाते.
जॆव्हा आपण " ट्रायकोडर्मा" हा शब्दा वापरतो तेव्हा तो एकच जीव आहे असा भ्रम निर्मण होतो. प्रत्यक्षात तसे नाही. ट्रायकोडर्माच्या एकोन्नवद प्रजाती माहिती आहेत. व्हिरिडी व हारज़ीआनम ह्यांना आपण ओळखतोच त्याव्यतिरिक्त कोनींनजी, शुडोमोनाज, अस्पेरलंम, लोंजीओब्रॅन्कम अशा अनेक प्रजाती आहेत.
ह्या प्रत्येक जातीत अनेक स्ट्रेन असतात. प्रत्येक स्ट्रेनमधे वर वर्णन केलेले काही गुणधर्म असतात. निसर्गात एका वेळी एकापेक्षा जास्त स्ट्रेन एकत्र रहातात व परिणामकारक पध्दतीनॆ आपले काम करतात. ट्रायकोडर्मावर भरपुर संशोधन झालेले असून अजूनही भरपुर अभ्यास सुरू आहे. इंटरनेटवर शोध घेतला असता असे लक्षात आले की आज समोर येत असलेली माहिती अतिशय रंजक तर आहेच शिवाय शेती साठी अतिशय उपयुक्त आहे.

आपण पुढच्या वेळी जेव्हाही शेतात पीक पेरायच ठरवाल तेव्हा ट्रायकोडर्मा युक्त कंपोस्ट खत व ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करायला विसरू नका. ढगाळ वातावरणात आपल्या पिकाच्या संरक्षणाची जबाबदारी ट्रायकोडर्माच्या मिश्रणाला द्या व बिनधास्त रहा. शत्रू बुरशीची काय मजाल की ती तुमचा शेताकडे वळुनही पाहील.

* माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान *
**********************
www.mazisheti.org
www.facebook.com/agriindia
what's app 9975740444
**********************
व्हाट्स अप मेसेजसाठी खालीलप्रमाणे माहिती 9975740444 वर फक्त व्हाट्स अप मेसेज द्वारा पाठवा.
नाव -
पत्ता -
जिल्हा -
गट नं-
मोबाईल नं.-
**********************
* नवीन शेतकरी नोंदणी - 9975740444
* FFC नोंदणी - mazishetifoundation@gmail.com
* MAATI नोंदणी - FFC every block
* H2O नोंदणी - FFC every block
* GREET नोंदणी - FFC every block

Saturday, January 9, 2016

GREET - नाविन्यपूर्ण शेतीचे उत्तम उदाहरण श्री. जगन्नाथ तायडे. अडीच एकर क्षेत्रात १८ लाखांचं उत्पन्न...

माझीशेती : GREET (16010901)
नाविन्यपूर्ण शेतीचे उत्तम उदाहरण श्री. जगन्नाथ तायडे. अडीच एकर क्षेत्रात १८ लाखांचं उत्पन्न...
श्री. मनोज लोखंडे, हिंगोली (कृषी विभाग)

औरंगाबाद – शेतीवर भविष्यात येणाऱ्या संकटांचा विचार करून मेहनत आणि योग्य नियोजन केल्यास त्यावर मात करता येते हे जगन्नाथ तायडे या प्रगतशील शेतकऱ्यानं आपल्या कृतीनं दाखवून दिलंय. त्यांनी केवळ अडीच एकर क्षेत्रात १८ लाखांचं निव्वळ उत्पन्न मिळवलं, तेही सहा महिन्यांत.

महत्त्वाचं म्हणजे, तायडे यांनी हे उत्पन्न मिळवलंय ते आडरानातील पडीक जमिनीतून. यासाठी अवलंबलेली करार शेती पद्धत आणि शेडनेटचा योग्य वापर करून केलेली शेती तायडेंना फायदेशीर ठरलीय.

औरंगाबादपासून केवळ २८ किलोमीटर अंतरावर असलेल्या लाडसांगवी गावात तायडे यांची शेती आहे. त्यांनी सुरुवातीला डाळिंब, मोसंबी आणि कापूस या पिकांची लागवड केली. मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांना त्यात फारसं यश आलं नाही. सुरुवातीला पैसा अपुरा होता. शेतीला लागणाऱ्या कोणत्याच गोष्टी त्यांच्याजवळ नव्हत्या. पण त्यामुळे खचून न जाता तायडे यांनी आपले शेतीविषयक वेगवेगळे प्रयोग करणं सुरूच ठेवलं. त्याच वेळी त्यांना 'करार शेती'विषयी माहिती मिळाली. यासाठी त्यांनी आपली शेती तीन महिन्याला अडीच हजार रुपये कराराने खाजगी कंपन्यांना भाड्यानं दिली. वैयक्तिक शेतीत न मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न त्यांना पुरेसं होतं. 

प्रयोगशील शेतकरी

सुरुवातीला त्यांनी कंपनीसाठी कापसाच्या बीजोत्पादनाचे प्रयोग सुरू केले. यामुळं त्यांना शेडनेटमध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं शेती केल्याचे फायदे लक्षात आले. कमी जागेत, कमी खर्चात खात्रीशीर उत्पन्नाचे स्रोत तायडेंना मिळाले. यानंतर त्यांनी मागं वळून पाहिलं नाही. गेली १० वर्षं ते या क्षेत्रात काम करताहेत. पाण्याच्या सततच्या कमतरतेमुळं पाण्याची गरज भागवण्यासाठी त्यांनी शेतात शेततळं घेतलं. यातील पाण्याचं तुषार आणि ठिबक सिंचनाद्वारे योग्य नियोजन करून कापसासहित शेडनेटमधील सर्व पिकांच्या पाण्याची तहान भागवली. विशेष म्हणजे कमी खर्चात म्हणजेच जेमतेम ७५ हजारात शेडनेड तयार केलंय. कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या शेडनेटच्या तंत्रज्ञानाला अडीच लाख रुपये इतका खर्च येतो. 

करार शेती आणि शेडनेटचा वापर

तायडे यांनी एका १० गुंठ्याच्या शेडनेटमध्ये घेतलेल्या मिरचीचं उत्पन्न हे जवळपास सव्वा क्विंटल असून आजच्या बाजारभावाप्रमाणं साडेतीन लाख रुपये मिळतात. तर टोमॅटोच्या एका दहा गुंठ्याच्या शेडनेटमध्ये तायडे यांना ३० ते ३५ किलो उत्पन्न मिळतं. याची किंमत ८००० रु. प्रती किलो आहे. ३५ किलोप्रमाणे तायडेंना सरासरी एका टोमॅटोच्या शेडनेटमागं अडीच लाख रुपये मिळतात. तायडेंना मिरचीचे तीन शेड आणि टोमॅटोचे तीन शेड यापासून मिळणारं एकूण उत्पन्न लक्षात घेता जवळपास खर्चवजा जाता निव्वळ नफा (टोमॅटोचे साडेसात लाख आणि मिरचीचे साडेदहा लाख) १८ लाख रुपये होतो आणि तोही केवळ सहा महिन्यांत. 

या अनोख्या शेती पद्धतीबाबत 'भारत4इंडिया'शी बोलताना ते म्हणाले, “या शेडनेटमध्ये पीक घेण्यास जुलैत सुरुवात होते. पिकाचा कालावधी हा जुलै ते डिंसेबर असा सहा महिन्यांचा असतो. डिसेंबरमधील पीक काढणीनंतर जमिनीला सहा महिने विश्रांती देण्यात येते. या विश्रांतीदरम्यान जमिनीची उत्पादकता, तिचा पोत कसा वाढेल याकडं कटाक्षानं लक्ष दिलं जातं. यासाठी धेंचा, सेंद्रीय खत, शेणखत, गांडूळखत टाकून हिरवळीची जमीन तयार केली जाते. पिकांनुसार गादी आणि वाफे तयार करावे लागतात. मग जुलैत पुन्हा पीक घेतलं जातं. यावेळी पिकांच्या वाढीदरम्यान योग्य कीटकनाशकांची फवारणी करणं, पाण्याचं योग्य नियोजन करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणं; तसंच एका शेडनेटमधून दुसऱ्या शेडनेटमध्ये जाताना काळजी घेणं आवश्यक आहे. यामुळं एका शेडमधील कीटाणू दुसऱ्या शेडमध्ये जात नाहीत किंवा रोगांचा, कीटाणूंचा फैलाव होत नाही. शेडनेटमध्ये परागीकरण योग्य पद्धतीनं करणं आवश्यक आहे. यामुळं येणारं बीज हे सक्षम आणि दर्जेदार ठरतं. हेच बीज पुढे अनेक देशांमध्ये 'सीड्स' म्हणून विकलं जातं.” तायडे यांच्या शेतातील बीज उत्पन्न आफ्रिकेसह युरोपातल्या अनेक देशांत निर्यात केलं जातं.

सरकारचे अनेक पुरस्कार 

तायडे यांच्या प्रयोगशील शेती पद्धतीला सरकारचे अनेक पुरस्कार मिळालेत. यांच्या यशाचं सूत्र जाणून घेण्यासाठी शेतकरी, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ त्यांच्या शेतीला आवर्जून भेट देतात. विशेष म्हणजे परिसरातील शेतकऱ्यांनाही माहिती व्हावी म्हणून तायडे यांनी गावातच शेतकरी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळामार्फत ते शासनाच्या विविध योजना, खतवाटप इत्यादींबाबत मार्गदर्शन करतात. 

(माझीशेतीकडून शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनासाठी हा मेसेज प्रसारित केला आहे.)

* माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान *
**********************
www.mazisheti.org
www.facebook.com/agriindia
what's app 9975740444
**********************
तुमच्या मित्रांना नाविन्यपूर्ण शेती चळवळीत जोडा, त्यांना त्यांची खालील माहिती 9975740444 वर whats app मेसेज करायला सांगा.
नाव -
पत्ता -
जिल्हा -
गट नं-
मोबाईल नं.-

Sunday, January 3, 2016

पिकांची काळजी (160103)

माझीशेती: पिकांची काळजी (160103)
-इरफ़ान शेख, बीड

* उभ्या बटाटा
पिकामध्ये करपा व बटाटा पोखरणा-या अळीचा प्रादुर्भाव ब-याच शेतांमध्ये जाणवत आहे. जेथे ठिबक सिंचनावर बटाटा पिकाची लागवड केलेली आहे अशा ठिकाणी एकरी १ लिटर क्लोरोपायरीफॉस ड्रिपमधून सोडावे. जेथे ठिबक सिंचनाची सोय नाही अशा ठिकाणी फोरेट १० जी एकरी ५ कि. सरीत टाकून पाणी द्यावे. करपा व मर रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोपीकोनॅझॉल ५ मिली + ८०% पाण्यात मिसळणारे गंधक २० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

* पपई, भेंडी, मिरची, टोमॅटो, वांगी
या पिकावर रस शोषण करणा-या कीडींच्या प्रादुर्भावामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. विशेषतः पपईमध्ये रिंगस्पॉट व्हायरस व फायटोक्थोरा या रोगांचा तर भेंडीमध्ये यलोव्हेन मोझॅक, टोमॅटो, मिरचीमध्ये कोकडा तर वांगी पिकामध्ये गोसावी व पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. नियंत्रणासाठी फवारणी ही स्ट्रेप्टोसायक्लीन २ ग्रॅम + कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम किंवा कॅपटॉफ २५ ग्रॅम + हेक्झाकोनॅझॉल ५ मिली किंवा ८०% गंधक २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळू फवारणी करावी.

*मोसंबी
पिकास आंबेबहार कालावधीत लाल कोळी, फुलकीडी, कॅन्कर, करपा व फायटोक्थोरा या कीड रोगांचा प्रादुर्भाव सूरू होतो. यांचे नियंत्रणासाठी सुध्दा वर दिल्याप्रमाणे फवारणी करावी. यामुळे बागेतील मधमाशीचे प्रमाण कमी होणार नाही व फळधारणा चांगली होण्यास मदत मिळेल.

* वेलवर्गीय पिकांच्या
लागवडीसाठी पूर्वतयारी झाली असल्यास आता लागवड करावयास हरकत नाही. प्रयत्न मल्चिंग पेपर व बेड करूनच लागवड करण्याचा करावा. लागवडीपूर्वी आवश्यक रासायनिक खतांच्या व सेंद्रिय खतांच्या मात्रा बेडमध्ये भरून घ्याव्यात व नंतरच लागवड करावी.

* कांदा
(रब्बी हंगामात) लागवड केलेल्या पिकास २० किलो नत्र खताचा दुसरा हप्ता प्रति एकरी द्यावा. 

* टोमॅटो
पिकासाठी ताटी पद्धत उभारणी करावी. तसेच मातीची भर पिकास लावावी. 

* कोबी-फुलकोबी
पिकास मातीची भर लावावी तसेच लवकर लागवड केलेल्या गड्ड्याची पूर्ण वाढ झाली असल्यास फुलकोबीचा गड्डा पिवळा पडण्यापूर्वी वेळेवर काढणी करावी. 

* ब्रोकोली
पिकाची लागवड केलेल्या गड्ड्याची काढणी वेळेवर करावी उशिरा काढणी केल्यास गड्ड्याची चव कडसर होते. 
महाराष्ट्रामध्ये सध्या विषम वातावरणामुळे अनेक प्रकारचे बुरशीजन्य, जीवाणूजन्य व विषाणूजन्य रोगांचे व तसेच किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. 

* कांदा व लसूण
पिकांवरील फुलकिडे व करपा नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन ८ मिलि किंवा फिप्रोनील १५ मिलि या कीडनाशकासोबत मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा क्‍लोरोथॅलोनील २५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १० मिलि अधिक स्टिकर १० मिलि प्रति १० लिटर पाण्यातून नॅपसॅक पंपाने फवारणी करावी. 

* कोबी व फुलकोबी
पिकांवर जर चौकोनी ठिपक्‍यांचा पतंगाचा (डीबीएम)च्या दोन अळ्या प्रति रोप दिसू लागल्यास बॅसिलस थुरीजिएन्सीस (बीटी) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १० मिलि स्टिकर मिसळून संध्याकाळी फवारणी करावी. दुसरी फवारणी निंबोळी अर्क ४ टक्के करावी. तिसरी फवारणी गरज भासल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने इंडोक्‍झाकार्ब १० मिलि किंवा स्पिनोसॅड (२.५ एससी) १० मिलि प्रति १० लिटर पाण्यातून १० मिलि स्टीकर मिसळून फवारणी करावी. 

* वाटाणा
पिकावर मावा या रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून आल्यास त्यासाठी डायमेथोएट १० मिलि किंवा इमिडाक्‍लोप्रिड ४ मिलि प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास डेल्टामेथ्रीन ७ मिलि प्रति १० लिटर पाण्यातून साध्या हात पंपाने फवारावे. त्यानंतर ४ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. 

* भुरी
रोगाची लक्षणे दिसताच पाण्यात विरघळणारे गंधक २५ ग्रॅम किंवा डिनोकॅप १० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

* माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान *
www.mazisheti.org
www.facebook.com/agriindia
whats app - 9975740444
-----------------------------------
जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना आपल्यासोबत चळवळीत सामावून घ्या.

Wednesday, December 30, 2015

एक शेतकरी आणि ग्रामीण भागात तुमच्या पासून दूर राहणारा नागरिक म्हणून विनंती मागणी ...

(एक सुज्ञ आणि जागृत नागरिक म्हणून या मेसेजला शक्य तितकी प्रसिद्धी द्या. याबाबत काही शंका किंवा अडचण असेल तर 09975740444 या नंबरवर संपर्क करा.)

प्रति,
महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक परिक्षेत्रात राहणारे,
तुम्ही सर्वजण, नागरिक, शासन, प्रशासन, मीडिया,
हे आणि यांच्याशी संबंधित सर्व जिवंत घटक

यांना नम्र निवेदन,

कृपया, तुमच्या स्तरावरून आम्हास शक्य तितके सहकार्य करावे, कारण हा असा प्रश्न आहे कि तो तुमच्या सहकार्याशिवाय पूर्ण होणार नाही.

* शासनाचे हजारो कोटी खर्च करून गुणवत्ता का मिळत नाही?
* समाजात बदल का होत नाही?
* नेहमी विकासासाठी अमुक इतका निधी खर्च केला असे बोलले जाते.... खर्च केला म्हणजे विकास झाला असे कसे म्हणता येईल.
* पैसा शासनाचा, गुणवत्ता तपासणारे शासन, अहवाल करणारे शासन, नियम बनवणार शासन..... कोणाचा कोणाला मेळ नाही.

शासनाचा प्रत्येक अधिकारी एका महत्वाच्या कामात व्यस्त आहे, ते म्हणजे "हे काम माझे नाही, हे काम माझ्या विभागाचे नाही, हे काम माझ्या टेबलवर येत नाही." मग या लोकांना शासन पगार कश्यासाठी देतेय. प्रत्येक कामात चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नाही. खूप वैतागून जनतेने सत्ताबदल केला आणि बहुमत दिले, तर भारताचे कैवारी परदेशी दौऱ्यात व्यस्त आहेत तर महाराष्ट्राचे कैवारी महत्वाच्या कामात व्यस्त आहेत.

असो, एक शेतकरी आणि ग्रामीण भागात तुमच्या पासून दूर राहणारा नागरिक म्हणून विनंती मागणी एवढीच आहे कि,

१. शेती पिको अगर न पिको, माझीशेती तुम्ही चालवायला घ्या.
२. शेतीसाठी तुम्हाला जमतील तश्या मुलभूत सुविधा द्या अगर न द्या, मला माझ्या जमिनीच्या क्षेत्राप्रमाणे कसण्याचा मासिक मोबदला द्या.
३. माझ्या पोरांना ५० किमी अंतरावर हरतर्हेचे शिक्षण मिळायला पाहिजे.
४. माझ्या पोरांच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी शासकीय द्या अगर कंत्राटी द्या पण कायम (किमान वयाच्या ६० वर्षेपर्यंत) भाकरी मिळेल याची शाश्वती द्या.
५. माझ्या घरच्या बायका-पोरींना रात्री-बेरात्री बाहेरून घरी परत सुरक्षित पोहचण्याची हमी द्या.
६. माझ्या पोराबाळांना स्वच्छ पाणी आणि चांगल्या आरोग्याची हमी द्या.
७. माझ्या जाती-धर्मामध्ये आरक्षणाच्या नावाखाली लुडबुड करू नका. हा माझ्या श्रद्धेचा भाग आहे. तुम्हाला आरक्षण द्यायचेच असेल तर आर्थिक निकषांवर द्या.

मला हे पण माहित आहे कि माझ्या वरच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे यंत्रणा आहे आणि तुम्ही हे वर्षानुवर्षे करताय असे लेखी सांगाल पण पुन्हा तुमचा सरकारी बाबु आडवा येतोय. तो अगदी गोड, मधुर आणि स्वच्छ वाणीने पटवून देतो कि तो कामात व्यस्त आहे. आता यांचे काम परत सांगावे असे वाटत नाही कारण त्याचा वर उल्लेख केलेलाच आहे.

हे सहज शक्य झाले तर तुमच्यावरील आमचा विश्वास द्विगुणित होईल पण जर याबाबत कुचराई झाली तर अखंड महाराष्ट्रातून जन आंदोलन उभे राहील. याची कृपया नोंद घ्यावी.

____MAHESHBORGE (अध्यक्ष)
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान, सावळज (सांगली) महाराष्ट्र राज्य
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कर्मचारी संघटना, सावळज (सांगली) महाराष्ट्र राज्य
संपर्क - ९९७५७४०४४४, maheshborge@gmail.com

Sunday, November 29, 2015

ढबु / शिमला मिरची



** जमीन
चांगली कसदार व सुपीक लागते. मध्‍यम ते भारी काळी पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी जमिन या पिकास योग्‍य आहे. नदीकाठच्‍या पोयटयाच्‍या सुपिक जमिनी लागवडीस योग्‍य आहेत. जमिनीचा सामु 6 ते 7 च्‍या दरम्‍यान असावा.


** लागवड
रोपे तयार करण्‍यास निवडलली रोपवाटीकेची जागा चांगली नांगरून कुळवून तयार करावी. त्‍यानंतर तीन मीटर लागवडीसाठी लांब 1 मीटर रूंद व 15 सेमी उंचीचे गादी वाफे तयार करून वाफयावर चांगले कुजलेले शेणखत घालावे. वाफयांच्‍या रूंदीला समांतर अशा 2 सेमी खोलीच्‍या रेघा ओढून त्‍यांत फोरेट 10 जी हे किटकनाशक 10 ग्रॅम प्रत्‍येक वाफयात टाकून बी पेरावे व ते मातीने झाकून टाकावे व बियाण्‍यांची चांगली उगवण व्‍हावी म्‍हणून वाफयांना झारीने हलकेसे पाणी दयावे. बी 6 ते 8 आठवडयाने लागवडीस तयार होते.

पुर्नलागवड करण्‍यासाठी 60 सेमी अंतराने स-या काढाव्‍यात. रोपे सरीच्‍या दोनही बाजूस सरीच्‍या बगलेत 30 सेमी अंतरावर एका ठिकाणी एक रोप लावून करावे. पूर्नलागवड शक्‍यतो दुपारी 4.00 नंतर करावी. व रोपांना लगेच पाणी द्यावे.

**बियाणे 
लागवडीसाठी अर्का गौरव, अर्का मोहिनी, कॅलिफोर्निया वंडर, यलो वंडर या जातींची शिफारस करण्यात आली आहे. दर हेक्‍टरी 3 किलो बियाणे लागतील. एक किलो बियाण्‍यास पेरणी करण्‍यापूर्वी 2 ग्रॅम थायरम चोळावे.

रोपे तयार करण्यासाठी निवडलेली जागा स्वच्छ असावी. जमीन चांगली नांगरून कुळवून भुसभुशीत करून तीन मीटर लांब, एक मीटर रुंद आणि 15 सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत. गादी वाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत पसरावे व मातीत मिसळावे. वाफ्यावर दोन सें.मी. खोलीच्या दहा सें.मी. अंतरावर रुंदीला समांतर रेघा ओढून घ्याव्यात.नंतर बी पेरणी करावी. प्रति वाफा दहा ग्रॅम बियाणे वापरावे. एक हेक्‍टर ढोबळी मिरची लागवड करण्यासाठी सुमारे 400 ते 500 ग्रॅम बियाण्याची गरज असते. जातीनुसार बियाण्याची गरज बदलू शकते.

** खत व्यवस्थापन
शेणखत - हेक्‍टरी 15 ते 20 गाड्या चांगले कुजलेले 
नत्र - 150 किलो नत्र, 
स्फुरद - 150 किलो  आणि 
पालाश - 200 किलो

संपूर्ण पालाश, स्फुरद आणि शेणखत तसेच अर्धी नत्राची मात्रा लागवड करताना द्यावी. उर्वरित अर्धे नत्र दोन समान हप्त्यांत द्यावे. एक लागवडीनंतर एक महिना व पन्नास दिवसांच्या अंतराने विभागून द्यावे. रासायनिक मिश्रखतांचा उपयोग केल्यास फायदा अधिक होतो. 

** पाणी व्‍यवस्‍थापन
ढोबळी मिरचीला लागवडीपासून सुरुवातीच्‍या वाढीसाठी भरपूर व नियमित पाण्‍याची आवश्‍यकता असते. फूले व फळे लागताना नियमित पाणी दयावे. सर्वसाधारपणे एक आठवडयाचे अंतराने पाणी दयावे.


**रोग व किड व्यवस्थापन 
पीक संरक्षण : (संदर्भ : बावस्कर टेक्नोलॉजी)

१) मर : रोप बाल्यावस्थेमध्ये असताना उन्हाळ्यामध्ये मर होत असते. उगवण व्यवस्थित होऊन रोपातील मर टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून वरील प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. लागवडीस तयार झालेली रोपे नंतर पुर्णपणे जर्मिनेटरमध्ये बुडवून लावावीत. त्यामुळे रोपांची मर होत नाही.

२) करपा : रोपे लहान असताना पहिल्या अवस्थेत पाने जाड हिरव्या रंगाची होतात. दुसर्‍या अवस्थेत पाने वाळू लागतात. तिसर्‍या अवस्थेत जुन्या पानांच्या खालील भागावर पिवळे ठिपके पडून करड्या रंगाची अनियमित छटा चकल्यासारखी दिसते. पानाचा तो भाग जळाल्यासारखा दिसतो. या डागांचे प्रमाण वाढत जाऊन पाने जळतात व झाड निकामी होते. काही वेळा रोगाची लागण रोपाच्या बाल्ल्यावस्थेत झाल्यास झाडांचा शेंडा पिवळसर होऊन खालच्या बाजूने पांढर्‍या रंगाची बुरशीही दिसू लागते.

३) चुराडा -मुरडा (बोकड्या ) : या विकृतीचा प्रादुर्भाव फुलकिडे, मावा, तुडतुडे, पांढी माशी आणि विषाणूंमुळे होतो. प्रादुर्भाव झालेल्या झाडावरील पाने आकसतात. त्यातील अन्नरस कमी होतो आणि झाडांची वाढ खुंटते. नवीन पालवी येत नाही. 

ढोबळी मिरचीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत, हार्मोनी फवारण्याची वेळ व प्रमाण -

फवारणी (रोपांवर ) - बी उगवल्यानंतर ८ -८ दिवसांनी - (३० दिवसांत तीन वेळा) जर्मिनेटर २० मिली.+ थ्राईवर २५ मिली + क्रॉंपशाईनर २५ मिली. + प्रोटेक्टंट १ चमचा + प्रिझम २० मिली.+ १० लि.पाणी 

रोपांची लागवड करताना : २५० मिली जर्मिनेटर + १०० ग्रॅम प्रोटेक्टंट + १० लि.पाणी या प्रमाणात घेऊन रोपे त्यामध्ये संपूर्ण बुडवून सुकवून लावावीत.

पुन : लागवडीनंतरच्या फवारण्य :

१) पहिली फवारणी :(रोप लावल्यानंतर १५ ते २० दिवसांनी) : जर्मिनेटर ३० मिली.+ थ्राईवर ३० मिली + क्रॉंपशाईनर ३० मिली. + प्रोटेक्टंट ३० ग्रॅम + प्रिझम ३० मिली. + हार्मोनी १५ मिली + १५ लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (रोप लावल्यानंतर ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ४० मिली.+ थ्राईवर ४० मिली + क्रॉंपशाईनर ४० मिली. + प्रोटेक्टंट ३० ग्रॅम + प्रिझम ३० मिली. + न्युट्राटोन २० मिली + हार्मोनी १५ मिली + १५ लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (रोप लावल्यानंतर ४५ दिवसांनी) : थ्राईवर ५० मिली + क्रॉंपशाईनर ५० मिली. + राईपनर ३० ते ४० मिली + प्रोटेक्टंट ४० ग्रॅम + प्रिझम ४० मिली. + न्युट्राटोन ३० ते ४० मिली + हार्मोनी २० मिली + १० लि.पाणी.

४) फळे काढणीच्या सुमारास व नंतर मिरची संपेपर्यंत (७ महिने ) वरील फवारणीनंतर दर ८ ते १५ दिवसांनी : थ्राईवर ५० मिली + क्रॉंपशाईनर ५० मिली. + राईपनर ४० ते ५० मिली + प्रोटेक्टंट ४० ग्रॅम + प्रिझम ४० मिली. + न्युट्राटोन ५० मिली + हार्मोनी २० ते २५ मिली + १५ लि.पाणी.


** काढणी व उत्‍पादन
फळे हिरवीगार व संपूर्ण वाळलेली असल्‍यास फळांची काढणी करावी. त्‍यासाठी फळांच्‍या टोकांच्‍या वाळलेल्‍या स्‍त्री केसरांचा भाग गळून पडलेला असावा. फळे झाडावर जास्‍त काळ ठेवल्‍यास ती पिकतात. काही देशात लाल फळांना जास्‍त मागणी असते. परंतु यामुळे पुढील फळांच्‍या वाढीवर अनिष्‍ट परिणाम होतो व उत्‍पादन कमी मिळते. फळे झाडावरून देठासहीत काढावीत. साधारणपणे दर 8 दिवसांनी फळांची काढणी करावी. अशा 4 ते 5 काढणीत सर्वर पिक निघते.

प्रति हेक्‍टरी ढोबळया मिरचीचे 17 ते 20 टनापर्यंत सरासरी उत्‍पादन मिळते.