Search here..

Friday, May 22, 2015

सोयाबीन बीजोत्पादनाची प्रक्रिया: बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी मूलभूत किंवा पायाभूत बियाणे आवश्यक असते.

सोयाबीन बीजोत्पादनाची प्रक्रिया:

बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी मूलभूत किंवा पायाभूत बियाणे आवश्यक असते. बियाण्याचे प्रमाणीकरण खालील अवस्थांमधून पार पाडले जाते.
१) क्षेत्राची निवड -
बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बीजोत्पादन क्षेत्राची मंजुरी घ्यावी. मागील वर्षी सोयाबीन घेतलेल्या क्षेत्रात बीजोत्पादन कार्यक्रम घेऊ नये. निवडलेले क्षेत्र शक्यतो रस्त्यालगत असावे. ओलिताची सोय असावी. जेवढ्या क्षेत्रासाठी बियाणे वाटप केले असेल, तेवढेच क्षेत्र तपासणीकरिता स्वीकारले जाते.
२) विलगीकरण (आयसोलेशन) -
प्रत्येक जातीवर त्याच पिकाच्या वर्गातील इतर वाणांचे परागसिंचन होऊ नये म्हणून बीजोत्पादन क्षेत्राभोवती ठराविक अंतर मोकळे ठेवले जाते. यास विलगीकरण अंतर असे म्हणतात. सोयाबीन हे. १०० टक्के स्वपरागसिंचित असल्यामुळे विलगीकरण अंतर फक्त तीन मीटर ठेवावे लागते.
३) बीजोत्पादन क्षेत्राची तपासणी -
बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून सोयाबीन पिकाच्या दोन तपासण्या कराव्यात. पहिली तपासणी पीक फुलावर येतेवेळी (३५ ते ४० दिवस) व दुसरी तपासणी पिकाची काढणी/ कापणी अगोदर करावी.
भेसळ काढणे -
- मुख्य पिकातील इतर सोयाबीन जातींची झाडे वेळेवर काढणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी बीजोत्पादकांनी पेरणीपूर्वी अथवा पेरणी केल्यानंतर १५ दिवसांत आपले क्षेत्र फी भरून बीज प्रमाणीकरणासाठी नोंद करून घ्यावे. तसेच पीक फुलावर येण्याच्या अगोदर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा म्हणजे भेसळ ओळखणे व ती काढणे याबाबतचे प्रात्यक्षिक ज्ञान संबंधित अधिकारी देऊ शकतील.
- पीक वाढीच्या काळात बीजोत्पादन क्षेत्राची तपासणी करून फुलांचा रंग, खोड व फांद्यांवरील लव, शेंगाचा केसाळपणा वाढीचा प्रकार व फुलोऱ्याचा कालावधी इ. गुणधर्मावर आधारित वेगळी वाटणारी झाडे फुलोऱ्याच्या पूर्वी व फुलोऱ्यावर असताना किमान दोन किंवा तीन वेळा क्षेत्राची तपासणी करावी.
४) प्रक्रिया करणे-
बीजप्रक्रिया केंद्रावर बियाणे पाठवून १० x ६४ (४.०० एम.एम.) या आकाराच्या चाळणीतून प्रक्रिया (ग्रेडिंग) करणे अत्यंत आवश्यक आहे. यापेक्षा छोट्या आकाराची चाळणी वापरू नये. अन्यथा, लहान आकाराचे बियाणेसुद्धा चांगल्या प्रकारच्या बियाण्यामध्ये मिसळले जातील. बीज प्रक्रिया केंद्रावर तयार झालेले उच्च दर्जाच्या बियाण्याचे नमुने बीज परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावे. प्रयोगशाळेत बियाण्याची उगवणशक्ती, बियाण्याची भौतिक व अानुवंशिक शुद्धता, आर्द्रतेचे प्रमाण इ. तपासण्या केल्या जातात. प्रयोग शाळेतील प्राप्त झालेल्या अहवालानुसार ज्या लॉटनंतरची उगवणशक्ती ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा बियाण्याचे ३० किलोग्रॅम प्रति बॅग प्रमाणात पॅकिंग केले जाते.
५) बीज प्रमाणित होण्यास लागणाऱ्या महत्त्वाच्या बाबी -
बियाणे पिशवीत भरताना व मोहोरबंद करताना बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण त्यांची उगवणशक्ती, इतर काडीकचरा बियाण्याची शुद्धता, तणांचे प्रमाण हे ठराविक मर्यादेपेक्षा अधिक असल्यास बियाणे स्वीकारले जात नाही. (तक्ता क्र. २) मूलभूत बियाण्यासाठी सोनेरी पिवळे, पायाभूतकरिता पांढरे व प्रमाणित बियाण्यासाठी निळ्या रंगाचे टॅग (लेबल) वापरतात. जेणे करून बियाणे कुठल्या प्रकारे आहे हे तत्काळ लक्षात येते.
आवश्यकता बाबी ---- बियाण्याचा प्रकार
---- मूलभूत ---- पायाभूत ---- प्रमाणित
१) शुद्ध बियाणे (कमीत कमी) ---- १०० टक्के ---- ९८ टक्के ---- ९८ टक्के
२) घाण व इतर काडीकचरा (जास्तीत जास्त) ---- ०.० टक्के ---- २ टक्के ---- २ टक्के
३) इतर पिकांचे बियाणे (जास्तीत जास्त) ---- नाही ---- नाही ---- १० प्र.कि.ला
४) तणांचे बियाणे (जास्तीत जास्त) ---- नाही ---- ५ प्र.कि.ला ---- १० प्र.कि.ला
५) इतर ओळखू शकणाऱ्या जातीचे प्रमाण (जास्तीत जास्त) ---- नाही ---- ५ प्र.कि.ला ---- १० प्र.कि.ला
६) उगवणशक्ती (कमीत कमी) ---- ७० टक्के ---- ७० टक्के ---- ७० टक्के
७) बियाण्यातील ओलावा (जास्तीत जास्त) ---- १२ टक्के ---- १२ टक्के ---- १२ टक्के
सोयाबीन बीजोत्पादनासंबंधी महत्त्वाच्या बाबी -
- पिकाची कापणी करतेवेळी त्यात गवत असता कामा नये. कापणी जमिनीलगत करावी.
- आंतरपिकामध्ये सोयाबीन बीजोत्पादन घेऊ नये.
- पीक तयार होण्याच्या १० दिवस अगोदर, प्रति १० लिटर पाण्यात ३० ग्रॅम मॅन्कोझेब हे बुरशीनाशक ८०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे साठवणीमध्ये बियाण्यावरील बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होण्यास मदत होते. बियाण्याची उगवणशक्ती वाढण्यास मदत होते. रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
- बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १५-१७ टक्के असताना मळणी करावी.
- बीजोत्पादन क्षेत्र हे इतर सोयाबीन पीक वाणापासून ३ मीटर अंतरावर असावे.
- स्फुरद विरघळणारे जिवाणू (पी.एस.बी.) संवर्धन कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीत समप्रमाणात देऊन स्फुरद सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून दिल्यास बियाण्याची प्रत सुधारते व दाणे वजनदार होतात.
- पिकाची अनुत्पादक कायिक वाढ रोखण्यासाठी पीक कळी अवस्थेत असताना ---- पोटॅशियम आर्थोफॉस्फेट ५०० ग्रॅम अधिक २० मि.ली. ---- लिव्होसीन १०० लि. पाण्यात मिसळून फवारावे.
- फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा दीर्घकाळ ताण पडल्यास ओलित देण्याची व्यवस्था करावी, तसेच पीक फुलोऱ्यात असताना कोळपणी करू नये.
- सोयाबीनची झाडे मुळासकट उपटून येणार नाहीत याची काळजी घ्यावी, नाहीतर बियाण्यात मातीचे खडे येण्याची शक्यता असते.
- मळणी शेतातच ताडपत्रीवर किंवा मातीच्या खळ्यावर सोयाबीनचा जाड थर पसरून करावी.
- तयार झालेले बियाणे सारखे पसरून उन्हात चांगले वाळवावे. बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत खालील आल्यास वाळवणे थांबवावे.
- पोत्यांची साठवण करताना जास्तीत जास्त ५ पोत्यांची थप्पी मारावी. त्यापेक्षा जास्त थप्पी लावल्यास उगवणशक्ती कमी होण्याची शक्यता असते.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
नाविन्यपुर्ण शेतीकडे वाटचालीसाठी चळवळ -
-----------------------------------
**** संस्थेच्या न्यूज व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
------------------------------------------
विभागीय कार्यालय - सांगली, रत्नागिरी, औरंगाबाद, अकोला, जळगाव, चंद्रपुर
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
मोबाईल - 07745820077
www.mazisheti.org
www.facebook.com/agriindia
Whatsapp - 9975740444

No comments:

Post a Comment