Showing posts with label Pomegranate. Show all posts
Showing posts with label Pomegranate. Show all posts

Wednesday, January 28, 2015

हिवाळ्यामध्ये तेलकट डाग रोगाचे जिवाणू सुप्तावस्थेत असतात. या काळातच बागेतील स्वच्छता आणि रोगट अवशेष नष्ट करण्याकडे लक्ष दिल्यास रोगाचा प्रसार रोखणे शक्‍य होईल.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:
दि. 27/01/2015

तेलकट डाग रोग नियंत्रणासाठी बागेतील स्वच्छतेला द्या महत्त्व
- नेचर अग्री, सोलापुर

हिवाळ्यामध्ये तेलकट डाग रोगाचे जिवाणू सुप्तावस्थेत असतात. या काळातच बागेतील स्वच्छता आणि रोगट अवशेष नष्ट करण्याकडे लक्ष दिल्यास रोगाचा प्रसार रोखणे शक्‍य होईल. 🍊🍎

तेलकट डाग हा रोग झान्थोमोनास ऍक्‍झानोपोडीस पुनिका या जिवाणूमुळे होतो. 

हंगामानुसार प्रादुर्भाव - 
सर्वेक्षणामध्ये तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव मृग बहाराच्या वेळी (म्हणजेच जून ते ऑक्‍टोबर महिन्यामध्ये) सर्वात जास्त असतो. त्या खालोखाल आंबे बहाराच्या वेळी (म्हणजे मार्च ते मे महिन्यापर्यंत) डाळिंबावर तेलकट डागाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. तेलकट डागाचा सर्वांत कमी प्रादुर्भाव हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात म्हणजे सर्वसाधारण हस्त बहारात दिसून येतो. जिवाणूंची संख्या दमट व उष्ण हवामानात व पावसाळी हवामानात खूप मोठ्या प्रमाणात वाढते. थंड हवामानात तेलकट डाग रोगाच्या जिवाणूंची संख्या त्यांच्या नैसर्गिक वेगाने वाढत नाहीत. याचा फायदा घेऊन डाळिंब बागायतदारांनी घेऊन बागेतील तेलकट डाग रोगाचे अवशेष नष्ट करावेत. 

तेलकट डाग रोगास पोषक हवामान - 
- तेलकट डाग रोगाच्या जिवाणूच्या वाढ व प्रसारासाठी 25 ते 32 अंश सें. तापमान आणि 36 ते 88 टक्के आर्द्रता फार पोषक ठरते. 
- वातावरणातील किमान तापमान 18 ते 28 अंश से. आणि कमाल 30 ते 35 अंश से. तापमान या रोगाच्या वाढीस आणि प्रसारास पोषक असल्याचे आढळून आले आहे. (यानुसार 18 अंश सें.पेक्षा कमी तापमान रोगवाढीस पोषक नाही.) 
- तेलकट डाग रोगाच्या वाढीस वातावरणातील किमान आर्द्रता 21 ते 84 टक्के, तर कमाल आर्द्रता 50 ते 92 टक्के ही पोषक ठरते. 
- हिवाळ्यात किमान तापमान 18 अंश से.पेक्षा कमी राहते. या काळात रोगाचे जिवाणू सुप्तावस्थेत जातात. याच काळात बागेत स्वच्छता मोहीम राबविल्यास रोगाच्या उत्पत्तीस आळा बसतो. 

तेलकट डाग रोगाची लक्षणे - 
पानांवरील लक्षणे - 
सर्वप्रथम रेखीव ते अनियमित लहान आकाराचे (2-5 मि.मी.) करड्या काळसर रंगाचे, तेलकट पाणीदार डाग पानावर दिसतात. कालांतराने हे डाग आकाराने मोठे होऊन गर्द तपकिरी ते काळे होतात. डागाभोवती पोकळ पिवळसर पाणीदार कडा दिसते. एक ते अनेक ठिपके एका पानावर आढळून येतात. काही वेळेस हे सर्व ठिपके एकमेकांत मिसळतात. परिणामी पूर्ण पान पिवळे पडून गळून पडते. कधीकधी पानाची मध्यरेषा व शिरांनाही लागण होऊन त्या काळसर पडतात. नंतरच्या अवस्थेत पाने पिवळसर काळपट होऊन गळतात. 

फांद्यांवरील लक्षणे - 
फांदीवर काळपट अथवा काळे खोलगट चट्टे आढळतात. कालांतराने हे चट्टे फांदीवर गोलाकार पसरतात. फांद्या त्या भागात तडकतात आणि थोडासाही दाब दिल्यास तुटतात. 

फूल आणि फळांवरील लक्षणे - 
कळ्या अथवा फुलांवर कदाचित लागण झाल्यास कॅलीक्‍सवर लक्षणे आढळतात. फळांवर लागण जास्त प्रमाणात होते. फळाच्या देठाकडील पृष्ठभागावर रोगाची लागण लवकर व जास्त प्रमाणात होऊन काळे ठिपके पडतात. ते कालांतराने वाढत जाऊन एकमेकांत मिसळतात. इंग्रजी एल (L) अथवा वाय (Y) आकारात फळांचा लागण झालेला भाग तडकतो. लागण वाढल्यास फळे तडकतात, दुभंगतात, आतील दाणे बाहेर पडतात व फळे गळतात. 
- मात्र, अतिरिक्त पाऊस व आर्द्रतेच्या परिस्थितीत मोठ्या डागावरसुद्धा भेगा आढळत नाहीत. हे डाग खोल मध्यभागी दबलेले आढळतात. पावसाळ्यात या डागावर पाणी साचल्यास जिवाणूचा प्रादुर्भाव वाढून द्राव चिकट पांढुरक्‍या रंगाचा बनतो. हाच द्राव त्याच जागी वाळल्याने या डागाला पांढरी चकाकी येते. 
- जिवाणू व सरकोस्पोरा बुरशीच्या प्रादुर्भावाने होणारे ठिपके रोगांची लक्षणे साधारणतः सारखीच असतात. खालील प्रकारे फरक लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात. 

शेतावरच करा तेलकट डाग रोगाचे निदान - 

ही चाचणी अतिशय सोपी असून, शेतावरच करता येते. 
- तेलकट डाग रोगग्रस्त पान किंवा फळ रोगट ठिपके वरच्या बाजूस येतील अशा प्रकारे सपाट जागेवर ठेवा. थेंबभर पाणी टाकल्यास दाट चिकट गढूळ द्रवात रूपांतरित झालेले दिसून येईल. रोगट भागातून पाण्यात होणाऱ्या जिवाणूच्या प्रवेशाने असे झालेले असते. रोगट ठिपके मोठ्या आकाराचे असल्यास जिवाणू जास्त प्रमाणात प्रवेश करतात व निदान अतिशय चांगल्या प्रकारे होते. रोगट ठिपके बुरशी वा इतर कारणाने पडले असल्यास पाणी तसेच राहते. 

- शेतात रोगनिदान करण्याची आणखी दुसरी पद्धत आहे. यामध्ये काचेच्या पात्रावर रोगट भागाचे लहान लहान तुकडे करून त्यावर पाण्याचे 2 ते 3 थेंब टाकावे व ते हाताने कुस्करावे. द्रावण घट्ट व चिकट झाल्यास तो भाग तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव असल्याचे समजावे; अन्यथा द्रावण तसेच राहिल्यास अन्य बुरशीचा प्रादुर्भाव आहे, असे समजावे. 

पाऊस किंवा पाण्याचा तेलकट डाग रोग व जिवाणूवर होणारा परिणाम ः 
- तेलकट डाग रोगाच्या जिवाणूच्या वाढीस पाण्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. पावसामुळे किंवा पाणी साचल्याने तेलकट डाग रोगाचे जिवाणू क्रियाशील होऊन रोग प्रसारास प्रारंभ होतो. अपरिणामकारक बुरशीनाशकांची किंवा कमी तीव्रतेच्या द्रावणांची फवारणी केल्यास त्या पाण्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येते. 
- हिवाळ्यानंतर आलेल्या अवकाळी पावसाने तेलकट डाग रोगाच्या वाढीस पोषक हवामान तयार होते. अशा परिस्थितीत बागेतील तेलकट डागाचे अवशेष व झाडावरील रोगाचे जीवंत डाग प्रसारामध्ये प्रमुख भूमिका पार पाडतात. बागेत स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे. 

रोगाचा प्रसार रोखण्यासाठी स्वच्छता आवश्‍यक - 
- एकदा बागेत या रोगाचा शिरकाव झाल्यास त्याचे जिवाणू झाडाच्या अवशेषांवर जगतात व वर्षानुवर्षे बागेत राहतात आणि पोषक वातावरण मिळताच वाढीस लागतात. यासाठी जिवाणूंचा बागेत शिरकाव रोखणेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी लागवडीसाठी रोगमुक्त रोपांचा वापर आवश्‍यक आहे. 
- तेलकट डाग रोगाचा प्रसार एका हंगामातून दुसऱ्या व पुढील हंगामात प्रामुख्याने बागेत पडलेल्या रोगट अवशेषाद्वारेच होतो. 
- या रोगाचे विषाणू नुसत्या मातीत जिवंत राहत नाहीत. मात्र, बागेतील रोगग्रस्त पाने, फळे, फांद्यांमध्ये हे जिवाणू 240 दिवसांपर्यंत सहजपणे सुप्तावस्थेत जिवंत राहतात. वाढीस पोषक हवामान मिळताक्षणीच वेगाने वाढ होऊन रोग प्रसार होतो, म्हणून बागेत स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. गावपातळीवरच सर्वांनी मिळून स्वच्छतेचा कार्यक्रम राबविल्यास तेलकट डाग रोगाच्या जिवाणूंचे उच्चाटन शक्‍य होईल. 

तातडीने करावयाच्या उपाययोजना - 
1. गावपातळीवर सर्वांच्या बागेत स्वच्छता मोहीम राबवणे. 
2. मागील हंगामातील फळांची संपूर्ण काढणी झाल्यानंतर ब्रोमोपॉल 500 पीपीएम. (2 ब्रोमो, 2 नायट्रोप्रोपेन, 1-3 डायोल) 50 ग्रॅम प्रति 100 लिटर प्रमाणात फवारावे. जर फळ काढणी पावसाळ्यात झाली, तर ब्रोमोपॉल 500 पीपीएम+ कॅप्टन 0.5 टक्के फवारावे. (ब्रोमोपॉल 50 ग्रॅम + कॅप्टन 500 ग्रॅम प्रति 100 लि. पाणी). 
3. संपूर्ण फळे काढणी झाल्यानंतर बागेला 3 ते 4 महिने विश्रांती द्यावी. 
4. बहार घेण्यापूर्वी संपूर्ण पानगळ करून घ्यावी. यासाठी इथेफॉन 1 ते 2 मि.लि. प्रतिलिटर फवारावे. रोगट फांद्याची छाटणी करावी. 
5. झाडाच्या खोडाला निमऑईल + ब्रोमोपॉल (500 पीपीएम) + कॅप्टन (0.5 टक्के)चा मुलामा द्यावा. 
6. बागेतील व बांधावरील गोळा केलेले तेलकट डागग्रस्त व इतर रोगट अवशेष सातत्याने जाळून नष्ट करावेत. 
7. बागेत जमिनीवर ब्लिचिंग पावडर 60 किलो प्रतिहेक्‍टर किंवा कॉपर डस्ट (4 टक्के) (उपलब्ध असल्यास) 20 कि. प्रतिहेक्‍टर धुरळणी करावी. 
8. पानगळ आणि छाटणीनंतर ब्रोमोपॉल 500 पीपीएम + कॅप्टन 0.5 टक्के फवारावे. 
9. नवीन पालवी फुटल्यानंतर ब्रोमोपॉल (250 पीपीएम) किंवा बोर्डोमिश्रण (0.5 ते 1 टक्का) किंवा कॅप्टन (0.25) टक्के 8 ते 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. पानांवर आणि फळांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल, तर फवारणी चालू ठेवावी. रोग दिसत नसल्यास 30 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. 
10. ही फवारणी फळ काढणीपूर्वी 30 दिवस आधी बंद करावी. पावसाळी हंगामात ही फवारणी फळ काढणीच्या 20 दिवसांआधी बंद करावी. 

टीप- निर्यातक्षम डाळिंब बागेत रसायनांचा वापर करण्यापूर्वी कृषी संशोधन केंद्र वा कृषी  शास्त्रज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
~~~~~
* तुमची संस्था नोंदणीकृत असेल आणि तुम्हाला समाजसेवेची आवड असेल तर mazishetifoundation@gmail.com वर संपर्क करा.
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444